विमेन वॉकेथॉन फिट राहण्याची अभिनव कल्पना

20 Mar 2019 17:00:00

 नुकत्याच झालेल्या महिला दिनानिमित्त नाशकात दिनांक 3 मार्च 2019 रोजी 'विमेन वॉकेथॉन' पार पडली, ज्यात सुमारे 3 हजाराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. नाशकात काही आगळंवेगळं करू पाहत असलेल्या सोनाली श्रीपाद दाबक यांनी सुरू केलेल्या 'विमेन वॉकेथॉन'ची ही यशकथा जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद.

मेन वॉकेथॉन म्हणजे नक्की काय?

वॉकेथॉन म्हणजे मॅरेथॉनचं पळण्याऐवजी चालण्याचं रूप! आता प्रत्येक जण असाच विचार करणार की, नुसतं चालणं यात वेगळं ते काय आणि कशासाठी!? मॅरेथॉनपूर्वी स्पर्धकांना विशेष सराव करावा लागतो, ज्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकेलच असं नाही. पण नुसतंच चालण्यासाठी असा काही विशेष सराव किंवा विशेष असा काही फिटनेस वगैरे लागत नाही. आणि वॉकेथॉन चालणं तर आहेच, पण हे चालणं नुसतं चालणं नाहीये, यात सलग 3 किलोमीटर चालायचं असतं. सर्वांनी मिळून एकत्र येऊन चालणं, त्याचा आनंद घेणं आणि त्या निमित्ताने आपल्याच शारीरिक स्वास्थ्याबद्दल जागरूक होणं म्हणजे खरी वॉकेथॉन होय! यात महिला विविध ग्रूप्स करून येतात. कोणताही ड्रेस कोड नसला, तरी प्रत्येक ग्रूप आपल्या कपडयांची वेगळी काहीतरी थीम ठरवून येतात. त्यात वेगवेगळया घोषणा लिहिलेल्या असतात. 'मुली वाचवा, मुली शिकवा', 'पर्यावरण बचाव' इत्यादी वेगवेगळया पाटया रंगवून महिला त्या हातात घेऊन चालतात. यामध्येही मग आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक महिलेला मेडल देतो. 'मोस्ट एनर्जेटिक वूमन'सारखे पुरस्कार देऊनही आम्ही त्यांचा गौरव होतो, जेणेकरून हटके काही करण्यासाठी महिलांना प्रेरणा मिळते!

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

यात कोण सहभागी होऊ शकतं?

हा वॉकेथॉन केवळ महिलांसाठी असून 8 वर्षांवरील सर्व महिलांना यात सहभागी होण्याची मुभा आहे. ज्या बायकांची मुलं अगदीच छोटी आहेत, त्यांना मात्र आपल्या मुलांनादेखील या ठिकाणी घेऊन सहभागी होता येतं. कारण, शेवटी आपल्या मुलांकडे घरी लक्ष देणारं कोणी नसेल, तर ती महिला पूर्णपणे मनापासून स्पर्धेत सहभगी होऊ शकत नाही. 12 वर्षाच्या वरच्या मुलांना मात्र या वॉकेथॉनमध्ये सहभागी होता येत नाही. 8 वर्षाच्या छोटया मुलींपासून 70 वर्षाच्या तरुण आजींपर्यंत सर्व वयोगटातल्या, सर्व सामाजिक परिस्थितीतल्या, सर्व आर्थिक स्तरांतल्या महिला या वॉकेथॉनमध्ये सहभागी होतात!

हा कार्यक्रम सुरू करण्यामागे नेमका काय उद्देश होता आणि त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?

डॉक्टरांचा सल्ला, हौस यामुळे अधूनमधून मी व्यायाम करतच असे. पण नेमकं काही आजारपण, काही दौरे, कार्यक्रम यांमुळे ते मध्येच बंद पडायचं. अशातच 2012 साली दम्याचा गंभीर त्रास सुरू झाला. सहा महिने दैनंदिन आयुष्य पूर्णत: विस्कळीत झालं होतं. दहा पायऱ्या चढल्यावरसुध्दा दम लागे. भाजी घ्यायला जाणंही कठीण झालं होतं. साधं जॉगिंग ट्रॅकवर फिरायला गेले, तरी धुळीने त्रास व्हायला लागायचा. दुसरीकडे नवरा मात्र अत्यंत फिटनेस कॉन्शस होता. त्यांची दररोजची मॅरेथॉनची चाललेली तयारी पाहून मलाही त्यात सहभागी व्हावंसं वाटे! नवऱ्याच्या आग्रहाने आणि खंबीर पाठिंबा, प्रोत्साहनामुळे मी मुंबईत होणाऱ्या एका मॅरेथॉनमध्ये नावाची नोंदणी केली. तयारी सुरू केली. सहभागी व्हायला गेले. इतकं करूनही मी नोंदणी केलेल्या 10 किलोमीटर्सचा शर्यतीचा टप्पा पळून पूर्ण केला. यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. हा माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा आनंद एकटीपुरता मर्यादित न ठेवता माझ्या मैत्रिणी, आसपासच्या महिला यांनाही मिळायला हवा, असं मला वाटू लागलं. कारण, यातल्या बहुतांश मैत्रिणींनी, महिलांनी, मुलींनी कधी शाळा-कॉलेजात खेळात भाग घेतलेला नसतो. मी जेव्हा व्यायामशाळेमध्ये जायचे, तो माझा Me-time असायचा, तिथेही बायका तशा पुरुषांच्या मानाने कमीच संख्येत असल्याचं दिसायचं. पण मग यामध्ये आणखी एक आव्हान होतं, ते म्हणजे बायकांना आपण एकत्र आणलं, तरी त्या पळू शकतीलच असं नाही. कारण, पळायला प्रचंड सराव करावा लागतो, विशिष्ट कपडे घालावे लागतात. मग यावर उपाय म्हणून व्यायामाचा सर्वांत सोपा तरीही प्रभावी असा प्रकार म्हणजे चालणं, हा निवडला आणि त्याला नाव दिलं 'वॉकेथॉन' आणि हा उपक्रम केवळ महिलांसाठी असल्याने स्वाभाविकच सर्वांनी त्याला म्हटलं 'विमेन वॉकेथॉन!'

या उपक्रमाची सुरुवात, सुरुवातीचे टप्पे, सर्व गोष्टी, स्वयंसेवकांची जमवाजमव याबद्दल काय सांगाल?

मला या कार्यक्रमाला एक उत्सवाचं स्वरूप द्यायचं होतं. विदेशात जसं कार्निव्हल साजरं केलं जातं, तसं आपली वॉकेथॉनसुध्दा एक 'सेलिब्रेशनचं निमित्त' बनावं, असं मला हवं होतं. यासाठी एका मित्राने मदत करायचं कबूल केलं. पहिलं वर्ष म्हणून आम्ही नोंदणी मोफत ठेवली होती. चारच दिवसांत आम्हाला 1000 लोकांनी नाव नोंदवल्यामुळे नोंदणी बंद करावी लागली. लोकांच्या आग्रहाखातर 1200 नोंदणी करावी लागली. आणि वैशिष्टय म्हणजे मोफत नोंदणी असूनही आम्हाला 95% उपस्थिती मिळाली. एवढया सर्व आयोजनासाठी मनुष्यबळही तेवढच लागणार होतं. परंतु पहिल्या इव्हेंटनंतर आम्हाला या सहभागी स्पर्धक महिलांमधूनच कार्यकर्त्या मिळू लागल्या आणि आता आमच्या बहुतांश कार्यकर्त्या ह्या पहिल्या वॉकेथॉनमधल्या स्पर्धकच आहेत. आम्हाला पुरुषांचाही तितकाच खंबीर पाठिंबा मिळतो. या सर्वांच्या मदतीशिवाय हा इव्हेंट होणं तर अशक्यच होतं.

तुम्ही वॉकेथॉनबरोबरच महिलांसाठी आणखी काय काय करू इच्छिता?

महिलांसाठी केवळ वर्षातून एकदा वॉकेथॉन घेणं इथपर्यंत मला या विषयाचं स्वरूप मर्यादित ठेवायचं नाहीये. महिलांमध्ये त्यांच्या आरोग्याविषयी, फिटनेसविषयी जागृती निर्माण व्हावी आणि हा विषय अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, हा माझा उद्देश आहे. यासाठी आम्ही 'इव्हेंट्स बाय सोनाली दाबक' या संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून आम्ही वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो.

  1. 'वॉक फॉर लाइफ' - यात सर्वांत महत्त्वाचा आणि वर्षभर चालणारा उपक्रम म्हणजे 'वॉक फॉर लाइफ'. इतर उपक्रम हे प्रासंगिक किंवा नैमित्तिक असतात. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'वॉक फॉर लाइफ' हे आता समीकरण झालं आहे. सकाळी लवकर याला सुरुवात ठेवतो. आमच्याकडे असलेले फिटनेस मार्गदर्शक या वेळी वॉकपूर्वी आणि नंतर करावयाच्या स्ट्रेचिंगची आणि व्यायामाची योग्य अशी माहिती देऊन महिलांकडून ते करून घेतात.

  2. 'मूनलाइट वॉक' - आमचा आणखी एक उपक्रम म्हणजे, 'मूनलाइट वॉक.' हा वॉक नावाप्रमाणेच मूनलाइट अर्थात पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात करायचा, अशी संकल्पना आहे. त्यासाठी आम्ही निसर्गसौंदर्याने नटलेला, शहराच्या वर्दळीपासून लांब पण तरीही सुरक्षित असा त्र्यंबकेश्वर रस्ता निवडतो आणि मध्यरात्री चालायला जातो. पोलिसांचीही आम्हाला या वेळी सुरक्षेसाठी मदत होते.

  3. 'आद्या - नवरात्री वॉक' - नवरात्रात आम्ही ह्या इव्हेंटचं आयोजन करतो. याची थीम म्हणजे नवरात्रात गरब्याच्या पोशाखात, चनिया चोली, घागरा अशा पारंपरिक पोशाखात वॉक करणं. आणि वॉकनंतर नाशकातल्या एका भव्य मैदानात वॉक संपवून त्या ठिकाणी गरब्याचं आयोजन करण्यात येतं. भोंडलासुध्दा आयोजित करतो. ह्या उपक्रमामुळे, ज्या महिला अशा कार्यक्रमात सहभागी होत नाहीत, त्याचं लक्ष वेधलं जातं आणि सहभागी महिलांनाही सुरक्षित वातावरणात गरबाचा आनंद उपभोगता येतो.
  4. 'मड मॅनिया' - यात आम्ही विशेषकरून साहसी खेळांचं आयोजन करतो. यात आम्ही अत्यंत तज्ज्ञ प्रशिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या निरीक्षणाखाली हे खेळ आयोजित करतो. यात सैनिकी प्रकारातील चिखलातील साहसी खेळ खेळले जातात. या सर्व आयोजनासाठी विशेष पायाभूत सुविधांची, साहित्याची व तज्ज्ञ मार्गदर्शकांची आवश्यकता लागत असल्याने आम्ही यातील प्रवेश खूपच मर्यादित ठेवला आहे.

  5. 'योगा फॉर हर' - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग प्रशिक्षण व योग दिनाच्या दिवशी सामूहिक योग प्रात्यक्षिकं अशा स्वरूपाचा हा कार्यक्रमदेखील विशेषकरून महिलांसाठीच आयोजित करण्यात येतो.

केवळ इतकंच नव्हे, तर याहूनही अधिक विविध उपक्रम महिलांसाठी आयोजित करणं आणि त्या माध्यमातून महिलांमध्ये आपल्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करणं हेच मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवलं आहे. त्याला मिळणारा महिलांचा प्रतिसाद आणि विशेषकरून त्यांच्या कुटुंबांचा पाठिंबा आणि या सगळया खटाटोपात मला मिळणारी माझ्या कुटुंबाची भक्कम साथ या गोष्टी मला सतत प्रेरणा देत असतात. या कोणत्याही आयोजनात, कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कोठूनही 9422940778 किंवा 9422705144 या क्रमांकावर महिला माझ्याशी संपर्क साधू शकतात. सर्वच महिलांनी या उपक्रमांत सहभागी व्हावं, असं मी आवाहन करते. कारण एक महिला / एक आई फिट राहिली, तर तिचं संपूर्ण कुटुंब फिट राहतं!

मुलाखत :  ओम्कार शौचे

8275273677

 

Powered By Sangraha 9.0