मनोहर पर्रिकर अगोदर आमदार झाले, मग गोव्याचे मुख्यमंत्री झाले, काही काळ देशाचे संरक्षण मंत्री झाले, आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. राजनेत्याचा असा प्रवास असतो. आमदार अनेक होतात, मुख्यमंत्री अनेक होतात, संरक्षण मंत्रीदेखील अनेक होतात, परंतु मनोहर पर्रिकरांसारखा माणूस एकटाच असतो.
माझ्या लहान बहिणीचा फोन सकाळीच खणखणला. ती म्हणाली,''मनोहर पर्रिकर गेले, ही बातमी मी ऐकली आणि माझे डोळे अश्रूंनी भरुन आले.''
सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/
तसा तिचा कधीही मनोहर पर्रिकरांशी संबंध आला नाही. त्यांच्याशी तिचे कधी बोलणे झाले, असेही नाही. ती त्यांचे भाषण ऐकायला गेली होती असेही नाही. तरीही तिच्या डोळयात पाणी आले.
अशा किती माता-भगिनींच्या, बंधूच्या डोळयात, पर्रिकर गेल्यामुळे अश्रू आले असतील, हे सांगता येत नाही. कबीर सांगून गेले,
''कबीरा जब हम पैदा हुये, हम रोये, जग हसे
ऐसी करनी कर चलो, हम हसे, जग रोये॥
मनोहर पर्रिकरांनी कबीराचे हे वचन शब्दशः खरे करुन दाखविले. तीच त्यांची महानता आहे.
मनोहर पर्रिकर अगोदर आमदार झाले, मग गोव्याचे मुख्यमंत्री झाले, काही काळ देशाचे संरक्षण मंत्री झाले, आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. राजनेत्याचा असा प्रवास असतो. आमदार अनेक होतात, मुख्यमंत्री अनेक होतात, संरक्षण मंत्रीदेखील अनेक होतात, परंतु मनोहर पर्रिकरांसारखा माणूस एकटाच असतो.
अतुलनीय, त्यांच्यासारखा तोच असतो. राजनेत्याकडे असंख्य गुण असावे लागतात. मनोहर पर्रिकरांकडे राजनेत्यांचे अवगुण नव्हते. ते गुणसागर होते. त्यांचा किर्तीसुंगध त्यांच्या गुणसागरतेमुळे आपोआप भारतभर पसरला. सुंगधी फुलाला आपल्या सुवासाची जाहीरात करावी लागत नाही. तो हवेत आपोआप पसरतो. मनोहर पर्रिकरांच्या गुणसुमनांचा किर्तीसुंगध वातावरणात आपोआपच पसरला.
एक राजकारणी म्हणून त्यांची योग्यता किती मोठी होती, हे सांगणारे अनेक लेख, अनेक आठवणी प्रकाशित झाल्या आहेत, प्रकाशित होतील.
अब्राहम लिंकन यांना एक सेनाधिकारी डब्ल्यू. एस. किड यांनी एकदा एक प्रश्न विचारला-'यशस्वी राजकारण्याकडे सर्वात अधिक महत्त्वाचा कोणता गुण असला पाहिजे, असे तुम्हाला वाटते.'
किड सांगतात,''माझ्या खांद्यावर हात ठेवून लिंकन म्हणाले, 'एक धगधगता विषय त्याला उत्पन्न करता आला पाहिजे, ज्या विषयाचे काही परिणाम दिसायला लागतील. आणि नंतर जे परिणाम होतील, त्याच्याशी झुंज दिली पाहिजे.'' लिंकने गुलामीचा धगधगता विषय हाती घेतला, त्याचा परिणाम अमेरिकन गृहयुध्दात झाला, आणि या परिणामाशी लिंकन झुंजत राहिले.
मनोहर पर्रिकरांनी गोव्यात राष्ट्रवादी सरकार आणण्याचा धगधगता विषय हाती घेतला, तो यशस्वी करुन दाखविला. त्याचे परिणाम वेगवेगळे झाले. अनेक प्रकारच्या टीका-टिपण्णी झाल्या. त्या मनोहर पर्रिकरांनी झेलल्या.
संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी पाकिस्तानला धडा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाले. त्याचे परिणाम देशाच्या राजकारणावर उमटू लागले. सवयीप्रमाणे काही लोकांनी शंका उपस्थित केल्या. मनोहर पर्रिकरांनी त्याची चिंता केली नाही. संरक्षण, हे संरक्षण दलाचे काम आहे आणि त्याबाबतीत त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. पर्रिकरांनी संरक्षणाची सर्व संकल्पनाच बदलून टाकली.
सत्तेच्या वेगवेगळया पदावर जाण्यासाठी आणि तेथे कायम राहण्यासाठी पर्रिकरांना काहीही उचापती कराव्या लागल्या नाहीत. ज्याच्याकडे कतृत्त्व आहे, बुध्दिमत्ता आहे, निर्णयक्षमता आहे, निर्णयाचे परिणाम भोगण्याची मानसिक सिध्दता आहे, त्याच्याकडे पदे आपोआप येतात, ती त्याला मागावी लागत नाहीत.
सर्वांनीच म्हटले की, त्यांचे चारित्र्य शुध्द होते, ते अत्यंत साधे राहत. स्वतःचे घर भरण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही. अकाली विदुर झाले, जीवनसाथी त्यांना अर्ध्यावरच सोडून गेली. परंतु अनेक स्त्रियांच्या गराडयात राहून देखील मनोहरांनी आपले चारित्र्य जपले. आणि त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'मनोहर' झाले. जंगलात राहणारा, ब्रह्मचारी राहिला तर त्यात विशेष काही नाही, संसारात राहून ब्रह्मचारी राहणे, ही मानसिक सिध्दी आहे.
उपकृत करण्याची, अनेक करोडो रुपयांची उलाढाल करण्याची शक्ती प्राप्त झाली असताना, तिचा उपयोग केवळ आणि केवळ देशकार्यासाठीच करायचा, हीदेखील मनोहरसिध्दी होती. भ्रष्टाचाराची संधी मिळत नाही म्हणून सर्वच जण चांगले असतात. सर्व प्रकारची संधी असताना त्यापासून दूर राहणे, अवघड आहे.
येथे मनोहर पर्रिकरांनी आपले स्वयंसेवकत्त्व प्राणापलीकडे जपल्याचे लक्षात येते. जी जबाबदारी शिरावर आली, ती सर्व शक्तीने पार पाडायची, अफाट काम करायचे, परंतु कामाच्या मोहात गुंतायचे नाही. पदाला चिटकून राहायचे नाही आणि हे सर्व माझे नाही, समाजाचे आहे, ते समाजाला अर्पण करायचे, हे जगणे म्हणजे संघजगणे आहे, स्वयंसेवकत्त्व जोपासणे आहे.
अनंताच्या यात्रेला हा मनोहर गेला आहे, परंतु मागे त्याने आदर्श जीवनाचा वस्तूपाठ आपल्या सर्वांपुढे ठेवलेला आहे. आपआपल्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना मनोहरांचा किर्तीसुंगध, आपल्यात समर्पित राष्ट्रसेवेची प्रेरणा निरंतर निर्माण करीत राहील, यात शंका नाही.
रमेश पतंगे