भव्य - दिव्य विश्वविक्रमी

18 Mar 2019 15:33:00

 


प्रयागराज कुंभ व्यवस्थापन, स्वच्छता आणि सुरक्षा यांबरोबरच अनेक वैशिष्टयांमुळे लोकांना भावला. विशेष म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड समितीनेही मान्य केले की हा कुंभमेळा खरेच भव्य-दिव्य होता. याच कारणामुळे या कुंभमेळयाचे तीन विश्वविक्रम झाले. मात्र त्याव्यतिरिक्त इतरही अनेक वैशिष्टयांचा उल्लेख करावा लागेल.

  कुंभमेळा म्हटले की लोकांची प्रचंड गर्दी, अस्वच्छता आणि अव्यवस्थेचे वातावरण हेच चित्र डोक्यात येते. इतरांप्रमाणे लोकांचे ऐकून मीही असाच विचार करत असे. पण या वर्षीच्या प्रयागराज कुंभासाठी जेव्हा मी स्वत: गेलो, त्या वेळी माझे मन, माझे विचार पालटले. कारण मी तिथे अद्भुत, रम्य आणि अविस्मरणीय 'महाकुंभ'चा अनुभव घेतला.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये मकरसंक्रांतीला सुरू होऊन महाशिवरात्रीपर्यंत 49 दिवस चालणारा हा 'महाकुंभ' हिंदू संस्कृतीतील महापर्व मानले जाते. एरव्ही हा कुंभ तेथील आध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिध्द असतो, पण या वर्षी इतर अनेक वैशिष्टयांसाठी त्याचा जगभर नावलौकिक झाला.

गंगा, यमुना आणि सरस्वती संगमाच्या किनाऱ्यावर 3200 हेक्टर क्षेत्रात पसरलेला आणि 20 सेक्टरमध्ये विभागण्यात आलेला प्रयागराजचा हा कुंभ आपल्या आध्यात्मिक वारशाबरोबरच अप्रतिम व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था यांच्यासाठीही चचर्ेत होता. यंदाच्या कुंभाची व्यवस्था पाहून मोठया मोठया व्यवस्थापनतज्ज्ञांनी तोंडात बोटे घातली. या कुंभात पहिल्या दिवशी अडीच कोटी भाविकांनी स्नान केले. शेवटच्या दिवसापर्यंत 24 कोटीहून अधिक भाविक कुंभमेळयात सहभागी झाले होते. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते दररोज 10 लाखांहून अधिक लोक कुंभमेळयात 24 तास उपस्थित होते. जर कुंभमेळयाचे व्यवस्थापन नीट झाले नाही, तर ही इतकी मोठी लोकसंख्या गर्दीत आणि चेंगराचेंगरीत रूपांतरित होऊ शकते. मात्र 49 दिवस चाललेल्या या मेळयात असा कोणताही प्रकार घडला नाही. त्याचे मुख्य कारण या कुंभमेळयाची अद्भुत आणि अद्वितीय व्यवस्था हेच आहे.

या वेळी प्रयागराज कुंभ व्यवस्थापन, स्वच्छता आणि सुरक्षा यांबरोबरच अनेक वैशिष्टयांमुळे लोकांना भावला. विशेष म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड समितीनेही मान्य केले की हा कुंभमेळा खरेच भव्य-दिव्य होता. याच कारणामुळे या कुंभमेळयाचे तीन विश्वविक्रम झाले.

प्रयागराजमध्ये प्रवेश करताच आपल्याला 'महाकुंभा'चे दर्शन होते. कारण प्रयागराजमध्ये प्रत्येक ठिकाणी आयोजकांनी कुंभमेळयाचे वातावरण प्रतिबिंबित करणारी चित्रे दाखवली जात होती.

महाकुंभाचे आयोजन पाहण्यासाठी आणि त्यास विश्वविक्रमाचा दर्जा देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमला आमंत्रित केले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमनेही हे आमंत्रण स्वीकारून 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान प्रयागराज कुंभाला भेट दिली. टीमच्या सदस्यांनी 4 दिवस संपूर्ण कुंभात फिरून निरीक्षण केले आणि अखेर कुंभाच्या तीन वैशिष्टयांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली.

व्यवस्थापन

प्रयागराज कुंभमेळा आपल्या अद्वितीय व्यवस्थेसाठी सर्वश्रेष्ठ सिध्द झाला. तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या कुंभातील व्यवस्थेचा अनुभव घेतला. या अनेक सुंदर व्यवस्थांपैकी एक म्हणजे भाविकांची ने-आण करण्यासाठी केलेली 503 बसेसची व्यवस्था. सर्व बसेसना एकसारख्याच रंगाच्या आणि कुंभमेळयाच्या थीमने सजवले होते. या सर्व बसेसचा उपयोग केवळ कुंभ भाविकांसाठीच होत होता.

28 फेब्रुवारीच्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्ड टीमने या व्यवस्थेचे निरीक्षण केले. एकाच वेळी एकाच ठिकाणी 503 बसेस एका क्रमाने यात्रेकरूंची सेवा करत असल्याचे त्यांना दिसले. ही बाब वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने विश्वविक्रम म्हणून नोंदवली. यापूर्वी हा विक्रम अबूधाबीच्या नावावर होता, ज्यात एकाच ठिकाणी 390 बसेस होत्या.

त्याशिवाय तेथील इतरही अनेक व्यवस्था होत्या, ज्या खरोखरच प्रभावी होत्या. सुमारे 20 कि.मी. विस्तारावर पसरलेल्या या कुंभमेळयात 10 लाखांहूनही अधिक तंबू उभारण्यात आले होते. लोकांना तंबूपासून संगमापर्यंत जाण्यासाठी 22हून अधिक हंगामी पूल तयार करण्यात आले होते. तसेच 5 लाखाहूनही अधिक वाहने पार्क करण्यासाठी 84 वाहनतळ तयार करण्यात आले होते.

5000हून अधिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि 500हून अधिक हातपंपांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय 200 वॉटर एटीएम, 150हून अधिक पाण्याचे टँकर्सही ठेवण्यात आले होते. संपूर्ण कुंभ परिसरात प्रत्येक ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी 800 कि.मी.हून मोठी जलवाहिनी टाकण्यात आली होती.

कुंभमेळयातील रात्रीचे वातावरणही संस्मरणीय बनवण्यात आले होते. 40 हजारांहूनही अधिक एलईडी दिवे कुंभ परिसराला दिवसाप्रमाणे प्रकाशमान करत होते. 100हून अधिक एटीएम ऑन व्हील, पोस्ट सेवा केंद्र, माहिती केंद्र, आराम केंद्र अशा व्यवस्था करण्यात आल्या होत्या. संपूर्ण कुंभ परिसरात गाडीने सहज फिरता यावे, यासाठी 250 कि.मी.हून लांब हंगामी मार्ग बनवण्यात आला होता. तसेच रेल्वे विभागानेही खास कुंभासाठी 800हून अधिक जादा गाडया सोडल्या होत्या.

स्वच्छता

व्यवस्था कितीही चांगली असली, तरी स्वच्छता नसेल त्या जागी लोकांना जावेसे वाटत नाही. ज्याप्रमाणे कुंभाची व्यवस्था चोख होती, तशी तेथील स्वच्छताही कमालीची होती.

1 मार्च रोजी वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने कुंभातील स्वच्छतेचे परीक्षण केले. एकाच ठिकाणी एकाच वेळी दहा हजारहून अधिक लोक हातात झाडू घेऊन आणि तोंडावर मास्क लावून साफसफाई करत होते. या दृश्याद्वारे स्वच्छ भारत अभियानच लोकांपर्यंत पोहोचत होते. विश्वविक्रम म्हणून त्याचीही नोंद करण्यात आली.

याशिवायही कुंभमेळयात स्वच्छतेचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले होते. 15 हजारपेक्षा अधिक सफाई कर्मचारी 24 तास कुंभमेळयाच्या स्वच्छतेसाठी तैनात होते. 40 हजाराहूनही अधिक मुताऱ्या आणि 1.5 लाखांहून अधिक हंगामी शौचालये तयार करण्यात आली होती. याच कारणामुळे कुंभमेळयाला उघडयावर शौचमुक्त घोषित करण्यात आले होते. 

निवास व्यवस्थांच्या तंबू परिसरात आणि मार्गावरही पिण्याचे पाणी, धुण्यासाठी पाणी, बाथरूम, शौचालय यांची व्यवस्था करण्यात आली होती. सगळयात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण 20 कि.मी.च्या परिसरात कुठेही फिरलात, तरी कुठेही पाण्याची गळती किंवा सांडपाणी दिसत नव्हते. कुंभात कुठेही प्लास्टिक दिसत नव्हते. कुठेही कचऱ्याचे ढीग किंवा अस्वच्छता नव्हती.

कला-संस्कृतीचे दर्शन

कुंभ म्हटले की स्वाभाविकच मनात आध्यात्मिक भाव जागृत होतात. हिंदू संस्कृतीत त्याचे महत्त्व आध्यात्मिकदृष्टयाच आहे. पण मी आधी नमूद केले, त्याप्रमाणे यंदाचा कुंभ केवळ अध्यात्मिक कुंभ राहिला नव्हता, तर अनेक वैशिष्टयांसाठी या कुंभाने भाविकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती. त्यांपैकी एक म्हणजे कला-संस्कृती.

आयोजकांनी कुंभासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मनोरंजनाच्या, तसेच अन्य कला-संस्कृतीच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. उपस्थितांनी या सर्व कार्यक्रमांचा मनापासून आनंद घेतला. या कार्यक्रमात नामवंत कलाकारापासून ते ज्यात काही तरी कला आहे अशा सामान्य व्यक्तीपर्यंत सगळयांनी सहभाग घेतला होता.

या सगळयात विश्वविक्रम म्हणून एका कार्यक्रमाची नोंद झाली, तो म्हणजे 'पेंट माय सिटी'. या मोहिमेअंतर्गत शहरात भित्तिचित्रे रेखाटण्याचा कार्यक्रम झाला. यात लहानांपासून वृध्दांपर्यंत 7664 लोकांनी सतत 8 तास 'जय गंगे' विषयावर वेगवेगळी चित्रे काढली. ही सर्व चित्रे प्रयागराजमध्ये आकर्षण ठरली. ही चित्रे केवळ प्रयागराज किंवा उत्तर प्रदेशपर्यंत मर्यादित न राहता समाजमाध्यमांच्या माध्यमातून देश-विदेशातही पोहोचली. जो कोणी ही चित्रे समाजमाध्यमांवर पाहत असे, त्याच्या मनात कुंभाला भेट देण्याची इच्छा नक्कीच जागृत होत  होती. यापूर्वीहा विश्वविक्रम सियोलच्या नावावर होता. तेथे 4675 लोकांनी मोहिमेत भाग घेतला होता.

अशा प्रकारे या कुंभातील तीन वैशिष्टयांची नोंद विश्वविक्रम म्हणून झाली. मात्र त्याव्यतिरिक्त इतरही अनेक वैशिष्टयांचा उल्लेख करावा लागेल. उदा., कुंभातील सुरक्षा व्यवस्था.

ज्या ठिकाणी इतक्या मोठया प्रमाणावर लोक जमा होणार असतात, तेथे व्यवस्था चांगली असेल, पण सुरक्षा नसेल तर काहीही होऊ शकते. मी जेव्हा एका नावेत बसून स्नानासाठी जात होतो, तेव्हा नौकाचालक सुभाष म्हणाला होता, ''योगी सरकारने या वेळी आमच्यासाठी आणि तुम्हा यात्रेकरूंसाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे. तुम्ही जमिनीवर असा किंवा पाण्यात, 24 तास तुमच्या आजूबाजूला सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. आकाशातूनही आपल्याकडे लक्ष ठेवले जात आहे.''

कुंभमेळयात सुरक्षा व्यवस्थेसाठी 20 हजारांहूनही अधिक पोलीस कर्मचारी, 6 हजारहून अधिक होमगार्ड, केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या 80 तुकडया आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 20 तुकडया, 100 बाइक रायडर्स, 50 बाँबशोधक पथके, 100 घोडेस्वार पोलीस तैनात होते. 40पेक्षा अधिक तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारण्यात आल्या होत्या. त्यात महिलांसाठी 3 विशेष पोलीस चौक्या उभारण्यात आल्या. त्याशिवाय 40 मोठी अगि्शामक केंद्रे, 15 छोटी अगि्शमन केंद्रे, 50पेक्षा जास्त वॉच टॉवर्स, 500हून अधिक ड्रोन कॅमेरे, 2000पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे यांची व्यवस्था होती. पाण्यातही जल पोलिसांच्या चौक्या तैनात होत्या. आणि 3 नौका पोलिसांना घेऊन सतत फिरत होत्या, तर वर आकाशातून हॅलिकॉप्टरद्वारे सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात होते.

आयोजकांनी लोकांच्या आरोग्याचा विचार करून बेडची सुविधा असलेली 14 मोठी हंगामी रुग्णालये उभारली होती. 243 डॉक्टर 24 तास ऑन कॉल उपलब्ध होते. तसेच पाण्यातही डॉक्टरांचे पथक, वैद्यकीय साहित्य यांच्यासह 3 नौका सज्ज होत्या.

एकूणच हा प्रयागराज कुंभ सर्वच प्रकारे अद्भुत, रमणीय आणि अविस्मरणीय झाला. चांगल्या व्यवस्थेमुळे या कुंभासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येतही मोठी वाढ झाली. एका अहवालानुसार हा कुंभ स्थानिक लोकांसाठी खूपच उपयुक्त ठरला. नौका, खान-पान, रिक्षा, कपडे आणि अन्य गोष्टींच्या माध्यमातून सुमारे 18 हजार कोटींहूनही अधिक पैसा तेथील स्थानिकांच्या हाती आला. या 49 दिवसांत प्रयागराजमधील 1 लाखांहूनही अधिक लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध झाला. तसेच सरकारी विभागांनाही तिकीट भाडे, कर यांद्वारे आर्थिक फायदा झाला.

या वर्षी किन्नर आखाडा पहिल्यांदा कुंभात सहभागी झाला. या आखाडयाच्या महामंडलेश्वर सोनियाजी यांना कुंभाविषयी विचारले, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती, ''यापेक्षा चांगल्या व्यवस्थेची कोणी कल्पनाही करू शकत नाही आणि करूही शकत नाही.'' या कुंभाला उपस्थित प्रत्येकाच्या मनात हीच भावना होती.

dantiwada.bhaskar@gmail.com

 डॉ. प्रशांत जोशी

9909290393

 

 अनुवाद : सपना कदम-आचरेकर

 

 

Powered By Sangraha 9.0