देशाची अनेक वर्षांची भूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागविली. पोटाची भूक अन्नाने भागविता येते, बुध्दीची भूक वैचारिक पुस्तके वाचून भागविता येते, पराक्रमाची भूक पराक्रम करून भागविता येते. आपण पराक्रम करण्यास विसरलो की काय, असे देशाला वाटू लागले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केव्हाही यावे, कुठेही हल्ला करावा, निरापराध माणसे मारावीत, सुरक्षा जवानांना ठार करावे. आपण काय करायचे? तर प्रेते मोजत बसायचे. पाकिस्तानला पुरावे देत राहायचे. जगात लाचार चेहरा घेऊन फिरायचे. महासत्तांना विनंती करायची, 'तुम्ही जरा बघा, पाकिस्तानला समज द्या, तो सारखा आम्हाला जखमा करीत आहे.'
जगाला याच्याशी काही पडलेले नसते. महासत्ता आश्वासने देतात, पण कारवाई कोणतीही करीत नाही आणि त्यांनी कारवाई तरी का करावी? दहशतवादी हल्ल्यात त्यांचे काय नुकसान होते? संयम पाळा, शांतताभंग होऊ देऊ नका, असा उपदेश करायला त्यांचे काय जाते? जो मार खातो, त्यानेच मार द्यायचा असतो. आणि जेव्हा मार देण्याची शक्ती असूनही तिचा वापर केला जात नाही, तेव्हा भित्रेपणाचा आरोप होतो. बेबी चित्रपटात एका मौलानाचे दृश्य आहे. मौलाना म्हणतो, ''इंडिया को हम जानते है। वो कुछ भी नही कर सकेंगे। ये बाते करते रहते है, ये रोत-पोते रहते है। ये ना तो कुछ कर सकते है, ना कुछ करेंगे, इन्शा अल्लाह!'' चित्रपटातील हा मौलाना हफीज अली सईद किंवा अजहर मसूद याची प्रतिकृती आहे.
'इंडिया कुछ नही करेगा' हे त्याचे म्हणणे पंतप्रधान मनमोहन सिंग असताना खरे होते. पण आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. पुलवामा हल्ल्यात 43 जवान ठार झाले, तेव्हा मोदी म्हणाले, ''जे दुःख तुमच्या मनात आहे, जो क्रोध तुमच्या मनात आहे, तो माझ्याही मनात आहे. या कृत्याचा बदला घेतला जाईल.'' आजवर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने अशा प्रकारची भाषा वापरली नाही. शांतीची भाषा वापरण्यात कुणी मागे राहिलेला नाही. अशा वेळी या लोकांना भगवान गौतम बुध्द, महावीर, महात्मा गांधी यांची आठवण होते. शांतीची माळ सगळे जपत राहतात.
शांतीची माळ जपत राहिल्याने शांती मिळत नाही. शांतीची माळ जपणारा जगात अशांती निर्माण करीत असतो. शांतीमागे शक्ती हवी. शक्तीशिवाय शांतीला अर्थ नाही. शक्तिहीन शांती दुर्बळांची शांती असते. कॅण्डल मार्चवाल्यांची शांती असते. अशा शांतीला पाकिस्तानी दहशतवादी कवडीचे मोल देत नाहीत. त्यांची शांती म्हणजे तुम्हाला 'शांत' करणे असते. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. आपला एक मारला तर त्यांचे दहा मारले पाहिजेत आणि आपले दहा मारले तर त्यांचे शंभर मारले पाहिजेत.
जशास तसे वागावे लागते. कुणी जर कानाखाली खेचली तर दुसरा गाल पुढे करून चालत नाही. धार्मिक प्रवचनात हे सर्व ठीक आहे. व्यवहारात ज्याने कानाखाली मारली, त्याच्या कानावर दोन ठेवून द्याव्या लागतात. मग तो पुन्हा मारामारी करण्याचे धाडस करू शकत नाही. जे स्वभावाने असुर आहेत, त्यांना असुरी भाषेतच उत्तर द्यावे लागते, तेथे शांतीचा पाठ काही उपयोगाचा नाही. सगळे पाकिस्तानी दहशतवादी वृत्तीने राक्षस आहेत. माणसे मारण्यात त्यांना आनंद होतो. मारलेल्या माणसांचे ते रक्त पीत नाहीत, एवढाच त्यांच्यात आणि राक्षसात फरक आहे. ते रक्त पीत नसले, तरी रक्त सांडण्यात त्यांना खूप आनंद होतो. अशा राक्षसी प्रवृत्तीला बाँबवर्षाव करूनच समाप्त करावे लागते. बालाकोट येथे हवाई हल्ला करून हवाई दलाने हे काम यशस्वीपणे पूर्ण केले.
ज्याक्षणी ही बातमी भारतीयांनी ऐकली, त्याक्षणी त्यांची अवस्था न जेवताच तुडुंब पोट भरल्यासारखी झाली. त्यांचा आनंद गगनात मावेना. गगन ठेंगणे झाले. अनेक वर्षांची भूक भागविली गेली. साडेतीनशे दहशतवादी काही क्षणात ठार झाले. असे पूर्वी कधी घडले नव्हते. घडविण्याची ताकद असूनही ज्यांनी निर्णय घ्यायचा, त्यांच्यात हिम्मत नसल्यामुळे, धाडस नसल्यामुळे आपण फक्त प्रेते मोजत बसलो. पुलवामा हल्ल्यात मारले गेलेल्या मुलाच्या तेराव्यासाठी गंगा घाटावर आलेली त्याची आई म्हणाली, ''आता शांतपणे डोळे मिटायला हरकत नाही.'' आपल्या मुलाच्या हत्येचा सूड घेतला गेला, याचा तिला आनंद झाला. हा आनंद खाण्या-पिण्याचा किंवा इतर कोणत्या सुखाचा आनंद नसतो. या आनंदाची जात वेगळी. राष्ट्रीय कर्तव्याची परिपूर्ती झाली, याचा हा आनंद आहे, तो शब्दात पकडता येणार नाही.
नरेंद्र मोदी यांची टिंगलटवाळी करण्यात पगडी-पागोटेवाल्यांपासून ते त्यांच्या छप्पन इंची छातीची जपमाळ ओढणाऱ्यांपर्यंत आणि चौकीदाराला चोर म्हणण्यापर्यंत सगळी फलटण येते. वाघाचे कातडे पांघरून दादरच्या एका गल्लीत कोल्हेकुई करणारेही येतात. बांगला देशी मुसलमानांना घरजावई करणाऱ्या ममताही येतात. ही सगळी मंडळी आज मोदींपुढे खुजी झालेली आहेत. या हवाई सर्जिकल स्ट्राइकने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी भारताला आणि जगाला संदेश दिला आहे की, मोदी म्हणजे काम, मोदी म्हणजे दृढ निर्धार, मोदी म्हणजे देशासाठी काहीही करायला तयार, मोदी म्हणजे समर्पण, मोदी म्हणजे धडाडीची कृती, मोदी म्हणजे काटेकोर नियोजन. या सर्वांशी बरोबरी करू शकेल असा दुसरा कोण आहे?
vivekedit@gmail.com