चराचरातून भेटणारं प्रेम!

20 Feb 2019 12:58:00

चांदण्यात फिरताना

 

वृक्षवल्लींनाच सोयरे मानणाऱ्या तुकोबांपासून सृष्टीतील सर्व घटकांशी आपल्या कवितेतून संवाद साधणाऱ्या रवींद्रनाथांपर्यंत साऱ्याच कवींनी प्रेमभावनेला विशाल करून ठेवलंय. द.भा. धामणस्कर यांच्या कविता वाचताना नेहमीच एक विलक्षण एकात्म अनुभूती येते. माणसाला खच्ची करणारी माणसं आणि त्यांची संकुचित वृत्ती नाकारून एका विराट अस्तित्वाशीच फक्त बांधिलकी मानणारी ही कविता.

द. बा. धामणस्कर यांच्या कविता वाचताना नेहमीच एक विलक्षण एकात्म अनुभूती येते. प्रेम ही सुंदर संकल्पना अनेकदा फार वरवर पाहिली वा वापरली जाते. पण या कविमनाला नेहमीच निसर्गाच्या हिरव्या प्रेमाने बांधून घातलंय.

एकदा साऱ्या सृष्टीशी असलेलं तादात्म्य लक्षात आलं की मग मानवी प्रेम, त्यातली सफलता-असफलता, अपेक्षा-निराशा याच्या पार जाऊन आपण शुध्द प्रेम अनुभवू शकतो. कवी म्हणतोय तशी प्रेम ही खरं तर अतिशय नैसर्गिक उपजत प्रेरणा. वय वाढेल तसतसं माणूस त्यातली शुध्दता गमावत जातो. अनेक व्यावहारिक फायद्यांची, स्वार्थाची भेसळ होत जाते. अनेक हेतू, वासना चिकटत जातात आणि मग ते जन्मताना आपल्या हातात दिलेलं नितळ - निर्मळ प्रेम माणूस आपल्या हाताने मलिन करून टाकतो.

आपल्याच मनात प्रेमाचा संकुचित अर्थ असेल, तर आपण स्वत: मोकळया मनाने प्रेम नाही करू शकत आणि दुसऱ्या कुणाच्या प्रेमाचा स्वीकारही नाही करू शकत. इतक्या सुंदर गोष्टीसाठी आपण किती चौकटी आखतो, निकष-नियम लावतो आणि शक्य तेवढे प्रतिशब्द शोधतो. देवाने भरभरून दिलेली आणि कितीही उधळलीत तरी न संपणारी ही संपत्ती, आपण किती सावधपणे, कद्रूपणे वापरतो! नातं-वय-अंतर-लिंग-प्रजात साऱ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडं पाहत, हसत असतं प्रेम! सारे प्राणिमात्र, वस्तुमात्र यांना कवेत घेऊ शकेल इतका अफाट त्याचा विस्तार आणि सारं मागणं विरघळून जावं अशी याची ताकद! त्याला ठरावीक नात्यात-शब्दांत-प्रतिमांमध्ये नाहीच बांधू.

समाज म्हणून आमची समज अजूनही इतकी कोती आहे की अनेकदा प्रेम करणाऱ्याच्या भोवती हातात भाले घेऊन उभा राहतो समाज. पण ही भावना इतकी समर्थ, प्रबळ आहे की ती कुणीच दाबून नाही ठेवू शकत.

म्हणूनच कवीला फिकीर नाहीये असल्या घाबरट लोकांची, जे स्वत: कधीही मोकळेपणाने प्रेमच करू शकलेले नाहीत. प्रेम असा शब्द उच्चारताच झटकणारे, अंगावर येणारे, कुजबुज करणारे हे लोक.

प्रेम नावाची विशुध्द भावना मनात उगवणं हे खरं तर ईश्वराचं देणं! ज्याला ते मिळालं, तो ते शोधल्याशिवाय राहतच नाही. त्याच्या प्रेमाला कसलंही कुंपण नसतं. ते शरीर, भाषा, वस्तू असल्या कुठल्याच माध्यमांवर किंवा प्रकटीकरण, प्रतिसाद, मान्यता या बाबींवर अवलंबून नसतं. प्रेम मिळत राहणं ही ज्याची जगण्याची गरज आहे, तो प्रेम करत राहतो. प्रेम या भावनेसह जगणं हाच त्याच्यासाठी आनंद असतो. ती त्याची उपजत भावना, गरज, सहजप्रेरणा असते.

तो चराचर सृष्टीवरच प्रेम करतो. जसं झाडं, वेली, पशुपक्षी, ऊन-चांदणं, जमीन-आकाश हे त्याचे प्रेमविषय, तसाच माणूस हाही. त्या साऱ्यांवर तो जसं निरामय, निरपेक्ष, निर्भय, अशारीर प्रेम करू शकतो, तसंच तो माणसांवरही करतो. त्यामुळे माणसांमध्ये प्रेमामागोमाग येणाऱ्या क्षुद्र गोष्टी त्याला नाकारायच्याहेत. त्याच्या मनातल्या हेतूंविषयी शंका घेणारी, त्याला पुरावे मागणारी वा देणारी, त्यासाठी आटापिटा करणारी, नवनवीन साधनांची मदत घेणारी माणसं त्याला नको आहेत.

त्याला मुळात काही सिध्दच करायचं नाहीये.

त्याला महत्त्व आहे संवादाचं. जोडलं राहण्याचं. एकामेकांच्यात असणारं अद्वैत, ती एकतानता अनुभवण्याचं. मग तुमच्या माणसांच्या जगात त्याच्या जोडीने येणारी कुजबुज, चर्चा, टीका हे सारं जर अपरिहार्य असेल, तर तो माणसाशी संवादच नाकारतो.

तो सांगूनच टाकतोय की माझी संवादाची गरज भागवायला मला मुळात माणसांची गरजच नाहीये! मी फिरत राहीन माझ्या हृदयातल्या श्रध्देसह. मी गूज करेन झाडांशी. मी तर बोलू शकतो त्या दूरस्थ मेघाशीही! माझा एकटेपणा केव्हाच संपून गेलाय. माझ्या भवताली असलेली सृष्टी - ही सर्जक भूमी, हे खळाळतं पाणी, हे सोनेरी सूर्यकिरण, हा शीतल वायू, हे अमर्याद आकाश... हे सारं म्हणजे मीच आहे हे मला जाणवतंय, हेच माझं पुण्य! मग आता एकटेपणा उरलाच कुठे! प्रेम शोधायचं असतं ते आपल्या आत. बाहेर कुणाच्या रूपात नव्हे.

जे आवडतं, तेच होऊन जाणं, इतकं समरस होणं जाणतं, ते प्रेम. माझ्यात आणि या विश्वात आता इतकी एकतानता आली आहे की मी दुसरा उरलोच नाहीये. आता सूर्यास्त पाहताना मीही हळूहळू मंदावत जातो. निस्तेज होतो. संध्याकाळ हळुवारपणे सारे रंग पुसते नि रात्रीचा काळभोर अवकाश असतो भवताली, तेव्हा मीही तसाच काळाभोर होत होत विरूनच जातो. रात्रीच्या अंधकारात विरघळतं माझं अस्तित्व. नव्या दिवसाबरोबर मी पुन्हा नव्याने उगवून येतो.

कुणीतरी कधीतरी बोललेले शब्ददेखील सांभाळून ठेवत वापरत राहणारी आणि माणसाला खच्ची करणारी माणसं आणि त्यांची संकुचित वृत्ती नाकारून एका विराट अस्तित्वाशीच फक्त बांधिलकी मानणारी ही कविता. वृक्षवल्लींनाच सोयरे मानणाऱ्या तुकोबांपासून सृष्टीतील सर्व घटकांशी आपल्या कवितेतून संवाद साधणाऱ्या रवींद्रनाथांपर्यंत साऱ्याच कवींनी प्रेमभावनेला किती विशाल करून ठेवलंय!

  

प्रेम करणं ही माझी

उपजत पवित्र प्रेरणा आहे.

मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,

उन्हावर, चांदण्यावर आणि

माणसांवरदेखील.

मला ऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्या

भयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणे.

मला ऐकू येत नाही तुमची

हलक्या आवाजातील कुजबुज;

मी नाकारतो तुमचा मौल्यवान टेपरेकॉर्डर माझ्याविरुध्द

उच्चारलेला हरेक शब्द मला पोहोचवणारा...

मी फिरेन संवादत कधी जवळच्या झाडाशी,

कधी दूरच्या मेघाशी.

एकटेपणा संपलेला

मी एक पुण्यात्मा आहे...

मी सर्व चराचराशी निगडित : सूर्यास्त पाहताना

मीही होतो निस्तेज; सांजवताना

काळाभोर हळूहळू.

मी नष्ट होतो रात्रीच्या अंधारात आणि उगवतो

नवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्यासारखा.

- द.भा. धामणस्कर

 

Powered By Sangraha 9.0