युती कधी नव्हती?

19 Feb 2019 16:23:00

 

 

युती झाली आहे, आता शक्ती एकवटून गिधाडे आणि कोल्हे यांना त्यांच्या जागा दाखवून देण्यासाठी लढले पाहिजे. शिवजयंतीच्या दिवशी हा लेख मी लिहितो आहे. सेना आणि भाजपाने खऱ्या अर्थाने शिवशाही देशात आणावी, हीच सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे.

फेब्रुवारी 19च्या सर्व वर्तमानपत्रांच्या बातम्यांचा मुख्य विषय 'शिवसेना-भाजपा युती झाली' असा आहे. ही युती कधी नव्हती? असा प्रश्न माझ्या मनात लगेच आला. 2014पासून महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे शासन आहे. म्हणजे युतीचे शासन आहे. दिल्लीत शिवसेना भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झालेली आहे. याचा अर्थ गेल्या चार वर्षांहून अधिक काळ ही युती आहे. 2014च्या विधानसभा निवडणुका सोडल्या, तर शिवसेना आणि भाजपा यांची तीस वर्षे युती आहे. 'युतीशिवाय गती नाही' हे महाराष्ट्राच्या सेना-भाजपा राजकारणाचे सूत्रवाक्य आहे.

 

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/


मग प्रश्न असा निर्माण होतो की, शिवसेना आणि भाजपा गेली चार वर्षे एकमेकांशी भांडत का बसले? पक्षप्रमुखांनी नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील टीका करताना मागेपुढे पाहिले नाही. दैनिक सामनाने तर भाजपा विरोधाचा रतीबच घातला होता. शिवसेनेतील दुय्यम दर्जाचे नेते 'उचलली जीभ आणि लावली टाळयाला' ही म्हण खरी करून दाखवीत होते. राजीनामे आमच्या खिशात आहेत, योग्य वेळी आम्ही सत्तेतून बाहेर पडू, भाजपाला त्यांची जागा दाखवून देऊ, चौकीदारच चोर झाला आहे, अशी एका पाठोपाठ भन्नाट वक्तव्ये आपण सतत ऐकत होतो.

या वाग्युध्दात भाजपादेखील मागे नव्हता. आम्ही सर्वच्या सर्व जागा लढविणार आहोत, युतीची आम्हाला काही गरज नाही, स्वबळावर आम्ही सत्ता आणू, शतप्रतिशत भाजपा अशा घोषणा भाजपा नेत्यांनीदेखील दिल्या. हे सर्व भांडण, गल्लीत दोन मुले जशी भांडत असतात, तशा प्रकारचे होते. एक मुलगा म्हणतो, ''जा, मी तुला बघून घेईन.'' तर दुसरा म्हणतो, ''जा, जा, तुझ्यात काय दम आहे का? तू नुसता पोकळ भोपळा आहेस.'' राजनेत्यांनी राजकीय स्तरावर हे मुलांचे भांडण केले. ते चांगले केले की वाईट केले, हे वाचकांनीच ठरवावे.

2014च्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षेइतके यश मिळाले नाही. यापूर्वीच्या सर्व निवडणुकांत युतीतील शिवसेना सर्वाधिक जागा जिंकून विजयी होत असे. युतीत भाजपा दुसऱ्या क्रमांकावर असे. 2014 साली उलटे झाले आणि भाजपा पहिल्या क्रमांकावर आला. शिवसेनेच्या जिव्हारी हा विषय लागला आणि महाराष्ट्रात सत्ता निर्माण होत असताना काही काळ शिवसेना सत्तेपासून दूर राहिली. परंतु ती दीर्घकाळ दूर राहू शकत नव्हती. आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा रेटा इतका प्रचंड होता की, सत्तेत सहभागी होण्याशिवाय सेनेकडे दुसरा पर्याय नव्हता. पराभवाचे शल्य विसरता येत नव्हते, दुःख पचविता येत नव्हते, त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी भन्नाट वक्तव्ये देण्याचा सपाटा शिवसेनेने चालविला.


 इसापच्या एका गोष्टीची आठवण झाली. सिंह आणि अस्वल आपआपसात लढू लागले. आपआपसात लढून दोघे मरणार, म्हणून आपल्याला मेजवानी मिळणार म्हणून कोल्हे आणि आकाशात गिधाडे वाट बघत होती. सिंह आणि अस्वल दोघांच्या हे लक्षात आले, तेव्हा त्यांनी आपले भांडण बंद केले. आपला जन्म कोल्हे जमिनीवर आणि गिधाडांच्या पोटात जाण्यासाठी नाही, हे त्यांना समजले. या गोष्टीवर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.

सत्तेत सहभागी होऊन आम्ही भाजपा शरण झालो नसून, आमची स्वतःची स्वतंत्र ओळख आहे, हे शिवसेनेने दाखवायला सुरुवात केली. ओळख दाखवायची तर सत्तेत बसलेल्यांचा विरोध केला पाहिजे. म्हणजे सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे. त्यातून मग नाणार प्रकल्पाला विरोध, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी स्वतंत्र भूमिका, राम मंदिरासंबंधी आक्रमक भूमिका, पाकिस्तानविषयी तेवढीच आक्रमक भूमिका, असे सर्व विषय आलेले आहेत. आपली स्वतंत्र ओळख टिकविण्यासाठी हे सर्व करणे शिवसेनेला आवश्यकच होते. राजकारणात युती हा धोकादायक जुगार असतो. कुठल्याही पक्षाला दुसऱ्या पक्षाची कार्बन कॉपी बनता येत नाही किंवा त्याची बी टीम बनता येत नाही. आपली ओळख स्वतंत्र ठेवावी लागते. आपला मित्रपक्ष सत्ता राबवीत असेल, तर काही धोरणांविषयी असहमती प्रकट करावी लागते. ही युतीच्या राजकारणाची मजबूरी आहे. सामान्य माणसाचे राजकारण आणि सत्तेचे राजकारण यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. सामान्य माणसाला वाटते की, एकत्र आलात, एकदिलाने काम करा, भांडण-तंटा करू नका. राजकारणात याचा फारसा उपयोग नसतो. राजकारण म्हणजे धूर्तांचा बाजार असतो. दुसरा कधी आपल्याला खाऊन टाकेल याचा नेम नसतो. राजकारण असेच चालत आलेले आहे आणि असेच चालत राहणार आहे.


असे प्रेमाचे भांडण चार वर्षे चालले. दोन्ही पक्षांना माहीत होते की, आपण एकत्र आलो तर तरून जाऊ आणि वेगवेगळे झालो तर आपले गलबत बुडेल. त्यामुळे दोन्ही पक्षांनी रबर ताणले, परंतु ते तुटणार नाही याची भरपूर काळजी घेतली. शेवटी युती करावी लागणार आहे, इतकी वर्षे भांडलो, मग आता एकत्र येण्याचा आधार कोणता? याचाही विचार सुरुवातीपासून दोन्ही पक्षांनी करून ठेवला होता. केवळ हिंदुत्व हाच एकत्र येण्याचा आधार राहू शकतो. उध्दव ठाकरे यांनी अयोध्या वारी करून त्याचे संकेत दिले. शिवसेना हिंदुत्व सोडू शकत नाही आणि भाजपाने ते सोडण्याचा प्रश्नच येत नाही. राजकारणातील हिंदुत्व म्हणजे जातीच्या आणि धर्माच्या आधारे राजकारण करायचे नाही. राजकारण सर्वांना बरोबर घेऊन करायचे, सर्वांच्या न्यायासाठी करायचे, सर्वांच्या कल्याणासाठी करायचे, हा समान वैचारिक आधार आहे. त्या आधारावर गेली सुमारे तीस वर्षे युती टिकली आणि पुढेही ती टिकेल.

हिंदू माणसाचा स्वभाव भांडण करण्याचा आहे, संस्था करून जगण्याचा नाही. संस्था केली की नियम येतात आणि नियमांचे पालन करावे लागते, त्याची हिंदू माणसाला सवय नाही. त्यात हिंदू माणूस प्रथम स्वतःचा विचार करतो, मग कुटुंबाचा, मग जातीचा, सगळयात शेवटी देशाचा. हिंदू माणसाच्या या स्वभाव प्रवृत्तीला राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांनी फार मोठे धक्के दिले. संस्था करून जगण्याची सवय लावली. नियमात राहण्याची सवय लावली आणि देशाचा आणि समाजाचा विचार करण्याची सवय लावली. भाजपाला हा वारसा संघाकडून मिळालेला आहे. त्या बाबतीत त्यांना फार काही करावे लागत नाही. त्यामुळे समान विचार आणि समान भूमिकांचे पक्ष एकत्र येण्याशिवाय कुठलाही पर्याय राहत नाही. यासाठी शिवसेना आणि भाजपा युतीचे वर्णन 'नैसर्गिक युती' असे करावे लागते. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती जशी नैसर्गिक असते, तशी ही युती आहे. दोघांची विचारधारा एक, दोघांचे आदर्श समान आणि दोघांचे लक्ष्य समान अशी वस्तुस्थिती आहे.

युती झाल्यानंतर ज्यांना पराकोटीचे दुःख झाले, त्यांनी ते वक्तव्य देऊन प्रगट केले आहे. अशोक चव्हाण (काँगे्रस प्रदेशाध्यक्ष) म्हणतात, ''युती गेली चुलीत, उखाड देंगे, फेक देगें, अशी भाषा करीत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आज सत्तेसाठी लाचार झाल्याचे दिसून येत आहे.'' नवाब मलिक (राष्ट्रवादी प्रवक्ते) म्हणतात, ''कालपर्यंत सेना-भाजपा वेगवेगळे लढण्याची भाषा करत होते. परंतु पराभवाच्या भीतीने या दोन्ही पक्षांनी युती केली आहे.'' धनंजय मुंडे (विरोधी पक्षनेते, विधान परिषद) म्हणतात, ''शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली की अयोध्येत राम मंदिर उभे राहिले? नाणारचा प्रकल्प समुद्रात बुडाला की शिवसेना म्हणते तसे पाकिस्तानला धडा शिकविला? कोणता प्रश्न सुटला म्हणून शिवसेनेने भाजपाशी युती केली?''

ही वक्तव्ये वाचल्यानंतर इसापच्या एका गोष्टीची आठवण झाली. सिंह आणि अस्वल आपआपसात लढू लागले. आपआपसात लढून दोघे मरणार, म्हणून आपल्याला मेजवानी मिळणार म्हणून कोल्हे आणि आकाशात गिधाडे वाट बघत होती. सिंह आणि अस्वल दोघांच्या हे लक्षात आले, तेव्हा त्यांनी आपले भांडण बंद केले. आपला जन्म कोल्हे जमिनीवर आणि गिधाडांच्या पोटात जाण्यासाठी नाही, हे त्यांना समजले. या गोष्टीवर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.

युती झाली आहे, आता शक्ती एकवटून गिधाडे आणि कोल्हे यांना त्यांच्या जागा दाखवून देण्यासाठी लढले पाहिजे. शिवजयंतीच्या दिवशी हा लेख मी लिहितो आहे. सेना आणि भाजपाने खऱ्या अर्थाने शिवशाही देशात आणावी, हीच सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे.

- रमेश पतंगे

Powered By Sangraha 9.0