प्रजातंत्राची अपेक्षा अशी असते की, नागरिकांनी, मतदारांनी सर्वप्रथम मी देशाचा नागरिक आहे, भारताचा विचार करायचा तर मी प्रथम भारतीय आहे, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही भारतीय आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात उत्कटतेने असली पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा होतो की, मी माझ्या राजकीय अधिकाराचे प्रकटीकरण करत असताना जात, धर्म, वंश, भाषा, लिंग आदी कशाचाही विचार करणार नाही, फक्त राजकीय विचार करून मतदान करीन.
प्रजातंत्र म्हणजे निवडणुका आल्या की मतदान करणे नव्हे. याने प्रजातंत्राचे सोने होत नाही. या प्रजातंत्राचे सोने करण्याचे रसायन आणि त्याच्या रासायनिक क्रिया फार वेगळया असतात. प्रजातंत्राची गम्मत अशी आहे की, सोने करण्याचे काम कोणतीही राजसत्ता करू शकत नाही. राजनेता कितीही मोठा असेल, कितीही मोठा भाषणपटू असेल, कितीही मोठा राजधुरंधर असेल, तरीही तो हे काम करू शकत नाही. आपण सर्व जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर टाकून स्वस्थ बसतो किंवा वायफळ चर्चा करीत बसतो आणि त्यातून निर्माण होणारे वाईट परिणाम भोगत बसतो.
प्रजातंत्राचे सोने करण्याचे रसायन कोणते असते? त्या रसायनाचा एक घटक आहे समग्र राजकीय विचार करायला शिकणे. मतदानाची लोकशाही, राजकीय लोकशाही असते. मतदान करणे हा राजकीय अधिकार आहे. लोकशाहीत हा अधिकार वयात आलेल्या सर्व नागरिकांना मिळतो. या अधिकारात वंशभेद, जातिभेद, लिंगभेद, भाषाभेद, धर्मभेद केला जात नाही. सर्वांना समानतेने दिलेला अधिकार असतो. राजकीय लोकशाहीत त्याचे महत्त्व खूप मोठे आहे.
परंतु हा अधिकार अनेक प्रकारच्या पण, परंतु, किंतू यांनी घेरलेला असतो. डॉ. बाबासाहेबांचे उदाहरण देतो. ते म्हणतात की, आपल्याकडचे मतदान जातीय आधारावर केले जाते. उमेदवाराची जात किंवा धर्म पाहून मतदान केले जाते. या मतदानाला राजकीय मतदान म्हणता येणार नाही. त्याला सांप्रदायिक मतदान असे म्हणावे लागते.
प्रजातंत्राची अपेक्षा अशी असते की, नागरिकांनी, मतदारांनी सर्वप्रथम मी देशाचा नागरिक आहे, भारताचा विचार करायचा तर मी प्रथम भारतीय आहे, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही भारतीय आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात उत्कटतेने असली पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा होतो की, मी माझ्या राजकीय अधिकाराचे प्रकटीकरण करत असताना जात, धर्म, वंश, भाषा, लिंग आदी कशाचाही विचार करणार नाही, फक्त राजकीय विचार करून मतदान करीन.
अमेरिकेच्या लोकशाहीची परंपरा सव्वादोनशे वर्षांची आहे. अमेरिकेत, युरोपातील देशांतून गोऱ्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी गेल्या. त्यांच्या भाषा वेगळया, त्यांचे राष्ट्रीयत्व वेगळे, त्यांची संस्कृती वेगळी, एवढेच नव्हे, तर ते जरी ख्रिश्चन असले तरी त्यांचे ख्रिश्चन पंथ वेगळे होते. प्रारंभीच्या काळात तेथे गेलेल्या लोकांत पंथावरून भांडणे झाली नाहीत किंवा राष्ट्रीयत्वावरून भांडणे झाली नाहीत, असे नाही. परंतु त्यांना फार लवकर शहाणपण सुचले.
त्यांच्यापुढे प्रश्न असा आला की, युरोपातील भांडणे जर आपण अमेरिकेतही आणली, तर युरोपमध्ये जशा सतत लढाया सुरू असतात, तशा अमेरिकेतही कराव्या लागतील. मग आपण अमेरिकेत लढून मरण्यासाठी आलोत का? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला.
एकदा एका सिंहाचे आणि अस्वलाचे भांडण झाले. भांडणाची परिणती दोघांच्या लढाईत झाली. दोघेही रक्तबंबाळ व्हायला लागले. आकाशात घिरटया घालणाऱ्या गिधाडांनी हे पाहिले. आज आपल्याला उत्तम मेजवानी मिळणार असे त्यांना वाटले. म्हणून ते समोरच्या झाडावर येऊन बसले. अस्वल आणि सिंहाची लढाई चालू असताना बाजूला कोल्हेही येऊन बसले. त्यांनाही असे वाटले की, या भांडणात कोणतरी एक किंवा दोघेही मरतील, मग आपल्याला उत्तम मेजवानी मिळेल.
लढाई करता करता सिंहाचे आणि अस्वलाचे लक्ष आकाशाकडे आणि जमिनीकडे गेले. गिधाडे कशासाठी आली आहेत आणि कोल्हे कशासाठी बसले आहेत, हे दोघांनाही समजले आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, शहाणपण आले. आपण असे भांडण करत राहिलो, तर गिधाडांचे आणि कोल्ह्यांचे भक्ष्य होऊ. इतक्या हलक्या प्राण्यांचे भक्ष्य होण्यापेक्षा आपआपसात समझोता करू, समजूतदारपणा दाखवू, असे म्हणून त्यांनी लढाई बंद केली आणि सर्व आपल्या घरी गेले.
युरोपातून अमेरिकेत गेलेल्या गोऱ्या लोकांना सिंह आणि अस्वलाचे हे शहाणपण फार लवकर समजले, म्हणून त्यांनी युरोपातील भांडणे अमेरिकेत आणली नाहीत आणि ते नवीन देश उभा करण्याच्या मागे लागले. आपला देश कसा असावा, आपली राजवट कशी असावी, ती कशी चालवावी, आपल्याला कोणते राजकीय अधिकार असावेत, त्याचे रक्षण कसे करावे, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधून काढली. या प्रश्नांची उत्तरे ज्यात आहेत, तिला अमेरिकेचे संविधान म्हणतात.
अमेरिकेतील नागरिक, मतदार सामान्यपणे वंशाचा, वर्णाचा, पंथाचा, भाषेचा, मतदान करताना विचार करीत नाहीत. तो विचार करतो की, ज्या उमेदवाराला आणि पक्षाला मला मत द्यायचे आहे त्याची विचारसरणी कोणती आहे, उमेदवार पक्षबदलू आहे का, मागच्या वेळी संसदेत जी विधेयके आली त्यावर त्याने काय मत व्यक्त केले, त्याने विधेयकाच्या बाजूने की विरुध्द बाजूने मतदान केले, या सर्वांचा विचार करून तो मतदान करतो. त्याचे मतदान शंभर टक्के राजकीय मतदान असते. 1836 साली अमेरिकन मतदार राजकीयदृष्टया किती जागरूक होता, याचा हा अब्राहम लिंकन यांच्या जीवनातील एक किस्सा आहे.
अब्राहम लिंकन 1836 साली इलिनॉइस राज्याच्या विधानसभेसाठी उभा होता. तेव्हा एकाच व्यासपीठावर सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन आपले विचार मतदारांपुढे मांडीत. वीग, आणि डेमोक्रॅट पक्षांचे नेते एका व्यासपीठावर आले. त्यांनी आपआपले विचार मांडले. विचार मांडणाऱ्यांमध्ये एकाचे नाव होते - जॉर्ज फोरकर. हा पूर्वी वीग पक्षाचा होता. सत्तेचा लाभ घेण्यासाठी तो डेमोक्रॅटिक पक्षात गेला. त्याला सरकारी पद मिळाले. शहरातील त्याचे घर फार मोठे आणि सुंदर होते. घरावर त्याने खूप मोठा विद्युतरोधक स्तंभ उभा केला होता.
लिंकनला लक्ष्य करून त्याने भाषण केले. लिंकनकडे बोट दाखवून तो म्हणाला की, ''लिंकनला लोळविण्याचे काम माझ्याकडे आलेले आहे मला याचा खेद होतो.'' भाषणात त्याने लिंकनचा पोशाख, त्याची राहणी याची खिल्ली उडविली. (लिंकनचा पोशाख गबाळा असे.) लिंकनच्या विचाराचीदेखील त्याने टिंगलटवाळी केली. श्रोत्यांनी त्याच्या भाषणाला चांगली दाद दिली. लिंकनचे समर्थक तरुण नाराज झाले. फोरकरला ठोकून काढले पाहिजे असे ते म्हणू लागले. लिंकनने सर्वांना शांत केले. फोरकरला उत्तर देताना लिंकन म्हणाला की, ''राजकारणाच्या व्यापारात आणि चलाखीत मी खरोखरच तरुण आहे. (म्हणजे मला त्याचे अज्ञान आहे.)'' फोरकरकडे बोट दाखवून लिंकन पुढे म्हणाला की, ''फोरकर वृध्द होऊन मरेल की तरुण वयात मरेल हे मात्र मला माहीत नाही, परंतु मी मात्र तुम्हाला सांगतो की, पक्ष बदलण्याची जर माझ्यावर वेळ आली, तर त्याक्षणी मी मृत्यूला जवळ करीन. सरकारी लाभाचे पद मिळविण्यासाठी मी पक्षबदल करू शकत नाही आणि पक्षबदल केल्यामुळे जे पाप घडले, त्याचा धडा देवाकडून मला मिळेल. याची भीती वाटल्यामुळे मी माझ्या घरावर विद्युतरोधक खांब उभा करणार नाही.''
सामान्य माणसाच्या राजकीय जागृतीमुळे अमेरिका जगातील महासत्ता झाली आहे. आपली राजकीय जागृती कोणत्या दर्जाची असेल याचा आपणच विचार केला पाहिजे.
(ही लेखमाला इथेच थांबवत आहोत. या लेखांसह उर्वरित सर्व लेख लवकरच प्रकाशित होणाऱ्या पुस्तिकेत वाचायला मिळतील.)