टिटवाळयाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश चाटुफळे यांचे 3 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले. तुळजापूरजवळील चाटुफळे परिवाराची अठरा एकर जमीन त्यांनी यमगरवाडी प्रकल्पासाठी दान केली. त्यांच्या या असामान्य दातृत्वाचा परिचय करून देणारा लेख...
टिटवाळयाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश चाटुफळे यांच्या निधनाच्या बातमीने मनात त्यांच्या सहवासाच्या अनेक स्मृती जागृत झाल्या. विवेकच्या कामानिमित्ताने अनेक वेळा मी टिटवाळयाला गेलो, तेव्हा आवर्जून रमेश चाटुफळे यांची भेट होत असे. संघाचे लहान-मोठे दायित्व त्यांच्याकडे असे. संघाच्या परिभाषेत त्याला अधिकारपद म्हणतात. हे अधिकारपद अधिकार गाजविण्यासाठी नसते, तर काम करण्यासाठी असते. रमेशजी आपल्या शक्ती-बुध्दीप्रमाणे संघाचे काम करीत राहिले.
सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/
नंतर योगायोगाने ते यमगरवाडी प्रकल्पाशी अभिन्नपणे जोडले गेले. त्याचे असे झाले - 1990च्या आसपास कल्याणचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि वकील सबनीस यांचा निरोप आला की, तुळजापूरजवळ चाटुफळे परिवाराची अठरा एकर जमीन आहे. ती त्यांना सेवा कार्यासाठी दान करायची आहे. समरसता मंचाला जर त्याच्यामध्ये रस असेल तर विषय पुढे नेता येईल. तेव्हा संघटनमंत्री होते सुखदेव नवले. आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की, तुळजापूरला जाऊन जमीन बघून आले पाहिजे. नव्वदपर्यंत भटके विमुक्त विकास परिषदेचे काम सुरू झाले होते. गिरीश प्रभुणे यांचे पारधी पालांवर निरंतर प्रवास चालू झाले होते. त्यातून ज्या समस्या पुढे येत होत्या, त्या सोडविणे आवश्यक झाले होते. मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे हे अग्रक्रमाचे काम झाले. त्यासाठी जमीन हवी होती.
नवले, गिरीश प्रभुणे, इदाते, मी आणि सोलापूरचे काही कार्यकर्ते असे सर्व जण यमगरवाडीला गेलो. माळरानावरील पडीक जमीन बघितली. अर्धवट खणलेली विहीर पाहिली, एक छोटीशी झोपडी, बोराचे झाड आणि उंबराचे झाड एवढी मालमत्ता तेथे होती. पारध्यांची वस्ती या गावाच्या 25-30 किलोमीटर अंतरावरच होती. आम्ही जमीन घेण्याचा निर्णय घेतला. रमेश चाटुफळे यांनी सर्व भावंडांची लेखी सहमती मिळविली. नंतर कायदेशीर अडचणी नकोत यासाठी ते आवश्यक होते.
आज यमगरवाडी हे नाव अखिल भारतीय झालेले आहे. भटके आणि विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी काय केले पाहिजे, याचे पथदर्शन करणारा प्रकल्प यमगरवाडीत उभा आहे. रमेश चाटुफळे यांनी आपले वडील रामचंद्र चाटुफळे यांच्या नावाने ही जमीन भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या हवाली केली. ही जमीन जर त्यांनी दिली नसती, तर भटके विमुक्तांचा शैक्षणिक प्रकल्प उभा करायला आणखी काही वर्षेगेली असती.
संघाचा स्वयंसेवक समाजाचा विचार कसा करतो, याचे रमेश चाटुफळे हे सुंदर उदाहरण आहे. डॉ. हेडगेवार म्हणत असत की, स्वयंसेवक हीच संघाची शक्ती आहे. त्यांनी असे म्हटले नाही की धनवान स्वयंसेवक, बुध्दिमान स्वयंसेवक, शक्तिमान स्वयंसेवक, संघाची शक्ती आहे. त्यांना हे म्हणायचे आहे की, सामान्य स्वयंसेवक हीच संघाची शक्ती आहे. रमेश चाटुफळे धनवान स्वयंसेवक नव्हते, तात्त्वि विवेचन करणारे बुध्दिवादीदेखील नव्हते. ज्याला आपण मध्यमवर्गीय सामान्य माणूस म्हणतो, या वर्गात मोडणारे होते. परंतु त्यांच्या सामाजिक संवेदना निरंतर जागृत होत्या. मी समाजाचे काही देणे लागतो आणि ते माझ्या शक्ती-बुध्दीप्रमाणे मला फेडले पाहिजे, ही जाणीव त्यांच्यात अतिशय प्रबळ होती. त्यामुळेच वडिलोपार्जित जमीन संस्थेला दान केली पाहिजे, असा भाव त्यांच्या आणि त्यांच्या भावंडांच्या मनात निर्माण झाला.
आम्ही जेव्हा ही जमीन ताब्यात घेतली, तेव्हा कायदेशीर बाबी पूर्ण करताना या जमिनीवर काही कर्ज आहे हे लक्षात आले. ते फेडण्याची आम्ही व्यवस्था केली. रमेशजींना हे समजले, तेव्हा त्यांनी जेवढी रक्कम होती तेवढी रक्कम एके दिवशी आमच्या हातात ठेवली. मध्यवर्गीय माणसाच्या दृष्टीने ही रक्कम तेव्हा लहान रक्कम नव्हती. आपण आपले कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे, ही भावना त्यामागे होती. स्वयंसेवकाने कसा विचार करायला पाहिजे आणि कसा व्यवहार करायला पाहिजे, याचा आदर्श पाठच त्यांनी घालून दिला.
आज यमगरवाडी प्रकल्पवार रमेशजींचे पिताश्री रामचंद्र चाटुफळे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्यांनी दान केलेल्या जमिनीवर हा प्रकल्प उभा आहे, हे तेथे भेट देणाऱ्यांच्या लक्षात येते. यमगरवाडी, भटके विमुक्त विकास प्रकल्प याच्याशी रमेश चाटुफळे यांचे आणि त्यांच्या परिवाराचे नाव अशा प्रकारे अभिन्नपणे जोडले गेलेले आहे.