अभिव्यक्त होण्याचा आनंद घ्या - प्रा. प्रवीण दवणे

05 Dec 2019 13:19:48

युवा  साहित्य संमेलनाचे  अध्यक्षीय  भाषण
pravin davane_1 &nbs

विवेक साहित्य मंच (विवेक व्यासपीठ), साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि एम.सी.सी. महाविद्यालय, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या युवक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन आपण माझ्या लेखणीचा, वाणीचा आणि युवक पिढीबद्दल असलेल्या आस्थेचा जो सन्मान केलात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

त्या निमित्ताने हा मुक्तसंवाद साधताना ते केवळ औपचारिक भाषण न होता एकमेकांच्या वैचारिक देवाण-घेवांणीचे मंथन व्हावे, असे मला वाटते.

काही तरी 'दाटून' आल्यानंतर येणाऱ्या ओढीतून अभिव्यक्ती होते. त्या अभिव्यक्तीची रूपे आपापल्या प्रतिभाधर्मानुसार आकाराला येतात. कुणाला चित्र काढावेसे वाटते, कुणाला शिल्प कोरावेसे, कुणाला 'काव्य' करावेसे वाटते. हे अभिव्यक्त व्हावंसं वाटणं हीच माणूसपणाची खूण आहे. परंतु निर्मिती केवळ अभिव्यक्तीच्या असोशीवर थांबत नाही, तर काळाच्या गरजेनुसार आणि कलावंतांच्या संवेदनशील आत्मभानानुसार आपला पिंड घडवत जाते. हे आत्मभान जितके सजग जितके सकारात्मक तसा कस आपल्या नवनिर्मितीला येतो.

तरुण मित्र-मैत्रिणींनो, आजच्या संदर्भात मला आपले संमेलन महत्त्वाचे वाटते कारण या निर्मितीसाठी आवश्यक त्या आत्मभानावरच आज धुके दाटले आहे. पोटार्थी स्पर्धेच्या धावपळीत-मनात अंकुरित होण्यासाठी जो विराम लागतो, जी सर्जनशील शांतता लागते तिचा अभाव हे युवकांच्या निर्मितीपुढील मोठे आव्हान आहे. त्या आव्हानांचे भान देण्यासाठी हे 'विवेक' व्यासपीठ आहे.

पुष्कळदा अशा संभ्रमित कालखंडातून आयुष्य जात असताना. हमखास उत्तरे देणारी जादूची कांडी कुणाहीकडे नसते; मात्र त्या कालखंडाने विचारलेल्या प्रश्नाला थेट भिडताना आपण हलकेच उत्तराच्या दिशेने सरकत असतो. हा कालखंड एकाच वेळी मनात भोवरेही निर्माण करतो नि त्याच वेळी नवनिर्मितीच्या सुंदर शक्यतांचे वातावरणही. म्हणूनच मी येथे उपस्थित नव्या लेखण्यांना आवाहन करेन आजच्या अनेक पदरी संभ्रमांकडे केवळ नकारात्मकतेने पाहू नका, या काळोखातूनच प्रकाशबीजे कशी धुंडाळता येतील याची संधी म्हणून पाहा.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवनव्या आविष्काराचा हा चकित करणारा काळ आहे. हा आविष्कार कशासाठी? याचे प्रयोजन मात्र दुर्लक्षिले जात आहे. आज या युगाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या स्फोटाचे युग म्हटले जाते. 'स्फोट' या संज्ञेत त्यातली विनाशकारी शक्यता अधोरेखित केली आहे. हा स्फोट आहे की विश्वकल्याणाची संधी हे ठरवणे गरजेचे आहे. क्षमतेला संधीचे रूप येण्यासाठीच उत्तम लेखन कार्य करते. भविष्याबद्दलचा सकारात्मक विश्वास जागवणे हे साहित्याचे कार्य आहे. हे कार्य ढोबळ प्रबोधनातून किंवावैचारिक निबंधवजा लेखनातूनच व्हावे. असा उथळ दृष्टिकोन यामागे नाही. तर एखादी वास्तववादी तरल कविताही रसिकाला तो विश्वास देऊ शकेल आणि हे कार्य आव्हानात्मक कालखंडात साहित्याने केले आहे आणि काळाच्या निकषावर अशाच साहित्यकृती अजर राहिल्या आहेत.

मित्रहो, 'सेल्फी' ही वृत्ती केवळ छायाचित्रांपुरती उरली असती तर त्याची इतकी काळजी करावी लागली नसती, पण सेल्फीमग्नतेचा संसर्ग आपल्या अवघ्या जीवनशैलीला झाला आहे. 'मी - माझं - माझ्यापुरता' नि तेही मला हवं तसं ही आत्मलुब्धता, 'दुनिया मेरी मुठ्ठी में' म्हणत आपण 'वैश्विक' न होता जगच आपल्याएवढे करू पाहात आहोत आणि या वृत्तीपायी आपल्या विकासाचे दोरच आपण कापून टाकीत आहोत, याचे साधे भान वर्तमानाला उरलेले नाही, या आत्मलुब्धतेच्याच 'मार्केटिंग'चा हा काळ आहे. त्यावर जाणिवेने विचार करून संवेदनांच्या व सुखदुःखाच्या कक्षा विस्तारणे ही काळाची गरज आहे. त्यासाठीच आजचे साहित्यविश्व युवकांकडे आशेने पाहात आहे.

कागदावर प्रगटणारी अक्षरे आता काचेवर येऊन थडकत आहेत. पान उलटण्याऐवजी बोटांनीच पाने वर सरकत आहेत. एका क्लिकवर जे हवे ते पुस्तक आज उपलब्ध होत आहे. ग्रंथालयात जाणे, हवे ते पुस्तक धुंडाळणं हा प्रकार मागे पडून ग्रंथालय तुमच्या दारी, ऐवजी 'करी' आले आहे. हातातल्या मोबाइलवर सारे ग्रंथालय विराजमान आहे. एका अर्थानं खरोखर अद्भुतरम्य परिकथेत जगणारे तुम्ही युवक भाग्यवान आहात. तुमच्या या भाग्याचा हेवा माझ्या पिढीनं करावा अशीच ही वस्तुस्थिती आहे. परंतु 'भाग्य' कळण्याचंही एक भाग्य असतं. या साधनांचा उपयोग खरोखर वाचनासाठी किती जण करताना दिसतात. यावर कुणी संशोधन केलेले माझ्या तरी वाचनात नाही. परंतु निरीक्षणातून जो निष्कर्ष हाती येतो, तो क्लेशदायक आहे. कागदावरची पुस्तके जशी वाचली जात नाहीत तशी काचेवरचीही नाहीत. वाचनातून होणाऱ्या मनोरंजनाला जर नाच-गाण्याचा स्वस्त पर्याय आपण शोधला असेल, तर ज्याला लेखनातून नव्या पाऊलवाटा शोधण्याचा वेगळा विचार करायचा असेल, त्याच्यापुढे धुकेच दाटून येईल. अपवादासाठीच जर 'हजारातुनि एखादा' तसा उपयोग करीत असेल, तरी प्रश्न कायमच राहतो.

या विवेक-जागृतीच्या व्यासपीठावरून मी आवर्जून सांगेन, भले तंत्रज्ञान नवे असेल. पण त्यातून का होईना, वाचन हवेच, इतर कोणत्याही मनोरंजनाची तुलना वाचनाशी होऊ शकणार नाही. कारण वाचनप्रक्रियेत वाचकाची सृजन प्रक्रियाही समांतर सुरू राहते. मुका मजकूर डोळयात प्रवेश करताना बोलका होऊन मेंदूत प्रवेश करतो. वाचकांच्या कल्पकतेचे कोष जागे होतात, सुप्त संवेदनांना जागृत करण्याचे त्यांचे सुस्तपण हादरवून टाकीत, अस्वस्थ करण्याचे काम वाचन करते. ही विधायक अस्वस्थता अनेक-अनेक प्रकारच्या नवनिर्मितीची उगमस्थान आहे. आज ही अस्वस्थता संपवण्याचे विविध पातळयांवरील वातावरण खरोखरच चिंताजनक आहे.

'ऑल इज वेल' ही जाणीव - तसे नसताना निर्माण झाली तर साहित्याच्या निर्मितीचे हे स्रोतच बंद होतात. मग माणसासारखा दिसणाऱ्या परंतु 'माणूस' नसणाऱ्या कळपाची निर्मिती होते. आपण अशा कळपापैकी न होता काही सांगू इच्छिणारे 'मन' म्हणून जगणार असाल तर वाचन-चिंतन-मनन-सृजन हा माणसाचा गुणविशेष आपण जोपासायला हवा. वाचनाची पध्दत आधुनिक असो की पारंपरिक विचारांच्या वैश्विक आदान-प्रदानासाठी वाचनाला पर्याय नाही.

माझी पिढी हातात पुस्तक घेऊन कागदाच्या स्पर्शासह भोवतीच्या रंग-गंधासह वाचणारी पिढी आहे. छायाचित्र ज्याप्रमाणे मला काचेवरचे भावत नाही. छायाचित्र असे हाती घेऊनच बघण्याचा आनंद घेणारे संस्कार आम्हाला झाले. तसेच वाचन हे कागदावरच्या पुस्तकाचेच, लेखन हे टेबललॅम्पच्या प्रकाशात मेजावर कागद ठेवूनच लेखणीने केल्याशिवाय करताच येत नाही. आता तुम्ही लॅपटॉपवर बोटांनी बटणे पटापट टाइप करून करता तेव्हा मला आश्चर्य वाटते; कौतुकही! सुचलेली कविता अशी मोबाइलवर वा लॅपटॉपवर लिहिता येते, ही कल्पनाही मला 'गद्य' वाटते. परंतु म्हणून अभिव्यक्तीची ही नवी माध्यमे स्वीकारण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही; किंबहुना ती आपल्या इतकी सहज स्वीकारणे आम्हाला जड जात आहे. हे मला मान्य करायला हवे. पेनाने लिहू लागलेली माझ्या वडिलांची पिढी नवी होती तेव्हा बोरू किंवा टाक दौतीने लिहिणाऱ्या माझ्या आजोबा-पणजोबांना जड गेले असणार. सवयीने तंत्ररुळत जाते, पण लेखन वा वाचन हे केवळ तंत्रप्रधान नसते. त्यात वाहणारे, गुंफले जाणारे, 'मी' पण महत्त्वाचे असते. गणकयंत्रावर बेरीज करणे आणि लॅपटॉपवर कविता लिहिणे या दोन्ही गोष्टींत जो फरक आहे. तोच फरक आपण तंत्रविज्ञान आणि सृजनातील मंत्रविज्ञानाबाबत समजून घ्यायला हवा आहे. नवनिर्मितीतील मानव्य जर शुष्क झाले, वाचनातील समृध्द करणारे प्रवाह जर तुमच्या संवेदनापर्यंत पोहोचले नाही, तर युवक मित्रांनो, आयुष्य बहरून टाकणाऱ्या या सर्व गोष्टी केवळ कर्मकांड स्वरूपातच उरतील. म्हणूनच या मुक्तसंवादात मला हे आवर्जून सांगावेसे वाटते, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वेग कितीही वाढला तरी त्यात संवेदनांच्या बेहोशीचा आवेग शुष्क होऊ देऊ नका.

या सेल्फीमग्न आभासी जगात जो युवक स्वतःच्या जाणिवांवर जागता पहारा ठेवेल, तेच पुढे टिकून राहणार आहे. हे मी आज आवर्जून सांगत आहे. 'मी'चे रूपांतर 'आम्ही', 'आपण' मध्ये होण्याऐवजी जर 'मी'त गोठवले गेले, तर पुढचा प्रवास विनाशाकडेच जातो. मित्रहो, युवकांमधील वाढती निराशा आणि ओघाने होणाऱ्या आत्महत्या ही मला माझ्यासारख्या या पिढीवर निस्सीम प्रेम करणाऱ्यांना विलक्षण चिंतेची बाब वाटते. 'मी'त गोठवलेली अभिव्यक्ती आणि अपयश, पराभव, नकार पचवण्याची विरून गेलेली ताकद हेच या निराशेमागचं कारण आहे. मी या वैचारिक आणि जबाबदार व्यासपीठावरून स्पष्ट सांगू इच्छितो, जगण्याचं उद्दिष्ट देण्यात आणि पराभव व नकार हाही वाटचालीतील अटळ भाग आहे, तो स्वीकारूनच पुढे जायला हवे हे तुमच्या पिढीला सांगण्यात मधली पालक पिढी कमी पडली, नव्हे अपुरी पडली. पालक पिढीची मर्यादा फक्त जन्मदाते इतकीच माझ्या दृष्टीने मर्यादित नाही, तर शिक्षक आणि शिक्षणपध्दती, प्रसारमाध्यमरूपी पालक, लेखक सारे सारे खरोखर आपल्याला समृध्द संवेदनांचे देणे देण्यात कमी पडलो; त्याचे परिणाम आज उगवले आहेत. आज या 'युवक साहित्य संमेलना'त मला त्या ज्येष्ठ पिढीला आणि सर्व क्षेत्रांतील सहिष्णु पालक पिढीला हे आवाहन करायचे आहे की, आपल्याही लेखनातून, व्याख्यानातून, विचारपत्रातून याही पिढीला पोटाशी घ्या! कारण ही पिढी समृध्दपणे कसदार लेखन करू लागली, त्यांच्या पराक्रमाच्या कल्पना विधायक झाल्या तरच आपले जीवित कार्य पूर्ण होईल.

विविध निमित्ताने महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रांतील- विविध जीवनस्तरावरील युवक पिढीशी मी अखंड बोलत असतो. त्यांचे लेखन आपुलकीने वाचत असतो, मला आश्चर्य आणि कौतुक या गोष्टीचं वाटतं- जीवनसंघर्ष स्वीकारूनही विविध माध्यमांतून व्यक्त होणारा मोठा युवा आहे. वाचनासाठी सर्व प्रकारची गैरसोय असतानाही पुस्तकासाठी आसुसलेला जसा मोठा युवा वर्ग आहे; त्याची दखल आजही कुणी घेताना दिसत नाही, तरी तो एका अनाकलनीय नेटाने, ध्यासाने मिळेल त्या पुस्तकाचा फडशा पाडतो आहे. कुणाचेही मार्गदर्शन नसताना जखमेची लालबुंद चिळकांडी उडावी तसं या युवक कवींच्या कविता मला अस्वस्थ करतात. या नव्या युवकांच्या कवितांमधील प्रतिमा वेगळया आहेत, त्यांची मांडणी, अभिव्यक्तीचा रूपबंध सारे सारे त्यांचे स्वतःचे आहे. सृजनशक्तीचा हाही मोठा चमत्कार वाटतो केव्हा केव्हा. एखाद्या वाळवंटात- अवचित एखाद्या रसरशीत फळदार वृक्ष बहरावा आणि साऱ्या वाळवंटाला नव्या उन्मेषांचे आश्वासन मिळावे तसे हे ग्रामीण भागातील युवक कवी, लेखक खरोखर मोठे काम करीत आहेत. ते इतके वेगळे व मूल्यवान आहे की त्यांचे त्यांनाही मोल माहीत नाही. जेथे दोन वेळा पोटभर जेवण्याची पंचाईत आहे, शाळा आहे, पण शेतीच्या कामामुळे ही मुले शाळेत- महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत; अक्षरशः बैलांबरोबर नांगराला जुंपल्यागत ज्याचं तारुण्य ओढगस्तीत चाललं आहे, असे तरुण जेव्हा लिहितात. तेव्हा त्यांच्या कवितेत वर्तमानाची अंगारधग असते. या कवितेला, त्यांच्या कथेला जपणारे व्यासपीठ उपलब्ध नाही. त्यांचा जाणीवपूर्वक शोध घेणारी यंत्रणा नाही. महाराष्ट्राचं साहित्यिक भावविश्व जे भविष्य घडवणारं आहे; ते अक्षरशः आजही उपेक्षेत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण प्रतिभेला मुख्य प्रवाहात आणणारी यंत्रणा आज एकविसाव्या शतकात आपल्याकडे नसावी याची एक कलावंत म्हणून मला खंत वाटते!

की आपल्या शहरात गोठलेल्या सांस्कृतिक योजना, उपक्रम हेही सेल्फीमग्न झाले आहेत?

मुख्य धारेत येतायेताच अनेक जण शिणून जातात, मग त्यांच्यातील नवं काही व्यक्त करण्याची ऊर्मी पिवळया पिकल्या पानासारखीच उडून जाते.

आज मला हे आवर्जून सांगावेसे वाटते, यापुढे मराठी भाषेचा ऱ्हास थोपवण्याचे काम आपला गावाकडचा युवकच करताना दिसणार आहे. खेडयापाडयातील युवक ज्या हिकमतीनं अडचणींवर स्वार होऊन लेखन करतो आहे, प्रसिध्दी, पैसा याचा कणभर मोह न ठेवता ही मुलं त्यांच्या लोकभाषेत नाटके लिहितात; झाडाच्या पारावर त्याचे प्रयोग करतात. त्यांच्या प्रगटलेल्या प्रत्येक उद्गारामागे त्यांच्या आक्रोशाचा आवेग आपल्याला जाणवतो. पन्नास वर्षांपूर्वी जे काम विद्रोही साहित्यानं केलं, नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्या कवितांनी, अण्णा भाऊ साठे, दया पवार, गंगाधर पानतावणे, शाहीर अमर शेख ही सारी मूर्तिमंत 'चळवळ' असलेली माणसं होती. चळवळीतलं हे साहित्य मराठी वाङ्मयाचा प्रवाह सशक्त आणि समृध्द करणारं ठरलं. आज याच तोडीचे काम आजचा ग्रामीण युवक साहित्यिक करतो आहे.

माध्यमांनी जग जवळ आणलेल्या आजच्या काळात मात्र आपल्याच राज्यातलं वेदनेचं एक जग आपल्याला पूर्ण अपरिचित आहे. देवदासी तरुणींच्या वेदनेचं जग, तंबाखू खुडणाऱ्या आणि विडया वळतावळता श्वास कोंडून मरून जाणाऱ्या समाजाचं अस्तित्व आपल्या देशात; कशाला आपल्या राज्यात आहे. मुशाफिरी डोळसपणे करायला हवी. आनंदासाठी केलेले पर्यटन तुम्ही जरूर करा; पण आपल्याच समाजातील एक भाग अद्यापही पूर्ण अनोळखी आहे याची खंत वाटू द्या. त्यासाठी केव्हा तरी तो प्रदेशही जाणिवेने जगा.

ऊस तोडणी कामगारांच्या वेदनेबद्दल आपण ऐकतो. मध्यरात्री उसाच्या फडात शिरून साप, नाग, विंचू यांच्या वावरात उभं राहून अंगाची साल्टी निघणारी तरुण मुले-मुली आपल्यापासून सात-आठ तासांच्या अंतरावर आहेत. त्यांची वेदना लिहू लागली, त्यांची भूक गाऊ लागली तर ते साहित्य कसे असेल? आता ही मुले लिहू लागली आहेत. जमीन गहाण टाकून मिळालेल्या पैशावर 'चिवटी' नावाचा चित्रपट काढणारे धैर्यशाली युवक पाहिले की ते वाचताना अंगावर काटा येतो; पण या कलाकृतींना लोकाश्रय मिळाला तरच लोकवाङ्मय आणि लोककला टिकणार आहेत.

पण आता तेथेही 'रेन रेन गो अवे' या कविता म्हणताना मी पाहतो आहे. तेव्हा वाटते ही मुले पावसाला जायला सांगत आहेत की मराठी भाषेला?

वेदनेला संवेदनेचा स्पर्श झाला तर, नवनिर्मितीची शक्यता निर्माण होते माणूस आला की त्याची सुख-दुःखे आलीच, परंतु सगळयांनाच त्याची कलाकृती करता येत नाही आज आपण सारे एका अर्थाने नक्षत्रांचे देणे मिळालेले भाग्यवंत आहोत. परंतु ते देणे जपण्यासाठीसुध्दा एक रियाज लागतो; सराव लागतो. 'मी पहिलीच कविता लिहिली आणि तो झाला कविता- विश्वातील अमर उद्गार!' असे युगायुगाने एकदाच होते. परंतु तुमच्या माझ्यासारख्या शब्दसाधकांना शब्दांची ही साधना करावी लागते. 'शब्दसंपदा' असे जे म्हटले आहे, ते उगीच नाही ते ऐश्वर्य एक एक माणिक टिपावे त्याप्रमाणे टिपावे लागतात. शब्दांचीही सेवा करावी लागते. आरोग्याप्रमाणे शब्दही कमवावे लागतात. आज आपल्या चिमूटभर पुरचुंडीत जेवढे मावतील तेवढेच शब्द आपण गोळा करतो आणि तेवढयावरच गुजराण करतो आहे. त्यात भागवून घेण्याची अल्पसंतुष्ट वृत्ती हा कोणत्याही कलावंताच्या विकासातील मोठा अडसर आहे. मी नम्रपणे माझ्या तरुण मित्रांना सुचवेन, तुमच्या स्वतःच्या भाषेत व्यक्त करतानाही आपल्याच भाषेतील सर्व प्रकारची शब्द श्रीमंती अधीरपणे टिपून घ्या.

नृत्य, गायन, आदी ललित कलांचे ज्याप्रमाणे शास्त्र आहे, त्याचप्रमाणे भाषेतून व्यक्त होणाऱ्या निर्मितीचेही एक शास्त्र आहे. व्यक्त झालेल्या प्रत्येक शब्दालाही त्याचे व्यक्तिमत्त्व असते. 'वृक्ष' या शब्दातून दिसणारे झाड, 'तरु' या शब्दात दिसणार नाही. माय, आई, माता, जननी, माऊली असे आई या नात्यासाठी किती शब्द आहेत परंतु मित्रांनो 'माय' म्हटलं की, जिव्हाळयाची जी साय ओतप्रोत जाणवते, ती 'माता' या शब्दात तटस्थ होते. प्रत्येक शब्दाची निर्मिती होते, ती उगीच आणि अंदाजे नाही त्या शब्दाला आपल्या काळजातलं काही सांगायचं असतं ते ऐकण्याची आपली क्षमता वाढवणं, भाषेच्या रियाजानेच शक्य होते. आज तो रियाज करण्यासाठी तुम्हाला अवधी नाही हे मला माहीत आहे; परंतु एकदा का आपण आस्वाद आणि निर्मिती या क्षेत्रात उतरलात की या समर्थनाला मज्जाव असतो आणि विकसित होऊ इच्छिणारा कलावंत कधीही समर्थनाच्या कुबडया हाती घेत नाही. चुका सुधारत जाणे, जुन्या चुका न करणे आणि प्रकट होणाऱ्या शब्दामागे सदसद्विवेकबुध्दीचा दीपक जागा असणे आवश्यक असतो.

प्रसिध्द पंजाबी कवयित्री आणि लेखिका अमृता प्रीतम यांच्या भेटीनंतर निरोप घेताना मी त्यांना वाकून नमस्कार केला, आणि म्हटले 'अमृताजी आशीर्वाद दीजिए।' अमृताजी चटकन जे उद्गारल्या ते मला इथे सांगावेसे वाटते. त्या म्हणाल्या, 'कलाकारको कलाकाही आशीर्वाद चाहिए।' हे वाक्य आजच्या क्षणापर्यंत, मीरेच्या करातील वीणेप्रमाणे मी जपून ठेवले आहे. खरोखर आहे कलावंताला त्याच्या कलेचाच आशीर्वाद हवा असतो. तो सतत जगता राहावा म्हणून सच्चा कलावंताचा ध्यास असायला हवा! नवनिर्मितीचा झरा अखंड वाहत राहणे याला एक अधिष्ठान लागते. मी जर आध्यात्मिक अधिष्ठान म्हटले, तर ते अधिक योग्य होईल. परंतु आपल्याकडे काही शब्दांनाही रंगांचे आणि विविध प्रकारच्या श्रध्दांचे झगे घातले आहेत. मला माझ्या नव्या तरुण लेखक मित्र-मैत्रिणींना आणि भाषेतून निर्मळ आनंद घेऊ इच्छिणाऱ्या रसिकांना हे सांगायचे आहे की, कलावंताचे अध्यात्म म्हणजे त्याचा कला निर्मितीचा ध्यास! अखंड जागते कुतूहल शब्दामागची सामाजिक करुणा आणि व्यक्त केलेल्या कलाकृतीतील श्रेय आणि अपश्रेय स्वीकारण्याचे धैर्य, सत्याचे मूल्य चुकविण्याची तयारी. मित्रांनो, हे सगळे आजच्या झटपट युगात थोडे अति वाटू शकेल; परंतु अशा अधिष्ठानाला खरोखर पर्याय नाही आणि आजच्या भाषेत तो 'मॅनेज'ही करता येत नाही, अशा निःस्पृह कलावंताला कला आशीर्वाद देत असते.

आज युवक पिढीपुढे आणि अर्थातच सर्वच वाचक रसिकांपुढे भाषाविषयकतेचे पेच आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे आपल्या अभिजात मराठी भाषेचे अभिजातपण आपण सिध्द करू शकलेलो नाही. मराठी भाषा ही नक्कीच लोक परंपरांची नदीच्या काठावर वाढणाऱ्या कृषीवलांची कष्टकरी, कामकरी वर्गाची रसरशीत भाषा परंतु ते मराठी भाषेचे अभिजातपण मान्य करताना आजच्या मराठीचे रूप ती पुढे शतकानुशतके सौष्ठवपूर्ण टिकेल असे आपण ठेवले आहे काय? इतिहासाचा एकीकडे अभिमान बाळगताना वर्तमान जेव्हा इतिहास होईल तेव्हा तो अभिमानास्पद असणारा आहे काय? का आपण फक्त जुन्या शालू नि भरजरी शेल्यांमध्येच गुंतणार आहोत. संकोचाने मान खाली जावी आणि पुन्हा ती मान वर उचलता येऊ नये, अशी आपण आपल्या मराठीची स्थिती करून ठेवली आहे, नुसती मराठी भाषेची आरती करून तिचा चेहरा उजळणार नाही; तर तिला आपल्या अथक ध्यासाने आणि भक्तिभावाने प्रेमळ शुश्रूषेने डौलदार करायला हवे आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जेव्हा म्हणतात, 'सचिवालयातल्या पायाशी बसलेल्या फाटक्यातुटक्या कपडयातील भिकारणीप्रमाणे आजची मराठी भाषा झाली आहे' हे उद्गार कुसुमाग्रजांनी पहिल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात काढले होते; परंतु सचिवालयातल्या पायरीवरून ती हाक जनतेच्या सेवेकरांपर्यंत पोहोचली का? शिरवाडकरांसारख्या दिग्गज साहित्यिकांची ही खंत आपण केवळ भाषणातील एक अवतरण म्हणूनच ठेवणार आहोत का? 'अमृतातेही पैजा जिंके' अशी आपली मराठी भाषा, जर साडेसातशे वर्षांनंतर कुसुमाग्रजांनी व्यक्त केलेल्या 'त्या' उदाहरणासारखी झाली असेल, तर मग आणखी शे-दीडशे वर्षांनी काय होईल? रक्ताचा रंग काढून टाकल्यानंतर शरीराचे जे होईल तेच मराठी भाषा हरवली तर महाराष्ट्राचे होईल. नुकसान केवळ साहित्यिक, सांस्कृतिक असणार नाही, तर ते सामाजिक आणि संवेदनात्मकही असणार आहे. जगातील सर्व भाषातज्ज्ञ कळवळून पुन्हा पुन्हा सांगतात, भारतातील विवेकानंद, गुरुदेव टागोर ते अगदी आताचे आपले पु.ल. देशपांडे वेगवेगळया प्रकारे सांगतात. प्रत्येक मुलाचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे त्या मुलाच्या मातृभाषेतूनच व्हायला हवे हे सांगण्यामागे काही सैध्दांतिक कारणे आहेत की नाहीत? आणि चिंतनातून आलेले निष्कर्ष त्यांच्या या आग्रहामागे आहेत की नाहीत. आपण या निष्कर्षांची जाणूनबुजून पायमल्ली केली. त्याचे परिणाम युवक पिढीतील वैफल्यग्रस्ततेत दिसत आहेत. मी अगदी सतत युवक पिढीच्या पाठीशी आदरपूर्वक उभा राहिलो आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या युगात मेंदूने विकसित झालेली आजची युवकपिढी आश्चर्य वाटावे इतकी बुध्दिवान आहे. पण तरीही आत्यंतिक निराशा, मानसिक दुर्बळता, जीव नकोसा होणे अशी लक्षणे तरुण पिढीत का वाढत आहेत. तर मी त्याचे थेट उत्तर देईन पिढयांचे भावनिक पोषण करणारी मातृभाषा त्यांच्या रांगत्या वयापासूनच हिरावून घेतली आहे. परभाषा येत नाही त्याची लाज वाटते; पण मातृभाषा येत नाही त्याचे कौतुक वाटते हे भयानक वास्तव अधिकाधिक मानसिक असमतोल घडविणारे आहे. म्हणूनच युवक मित्रांनो, पोटार्थी जगाची महाद्वारे उघडण्यासाठी एक व्यवहार म्हणून एकच का अनेक परभाषा शिका. भारतातील आसामी, बंगाली, तमीळ, उर्दू याही भाषा शिका; पण मातृभाषा मराठीच्या मोबदल्यात नव्हे! परभाषेच्या रोषणाईत मातृभाषेचे निरांजन मालवू देऊ नका. यात केवळ मराठी भाषेचा एक लेखक, कवी, अध्यापक म्हणून मी हे सांगत नसून तुमच्या पिढीचा ज्येष्ठ पालक मित्र म्हणून हे सांगत आहे.

भाषा म्हणजे केवळ मुळाक्षरांचा संचय नाही, तर परंपरेच्या मंथनातून तयार झालेले ते नवनीत असतं. एका म्हणी मागे, वाक्प्रचारामागे समाजाने आयुष्यातील जखमांचं मोल दिलेलं असतं. हे सर्व पूर्वसंचित म्हणजे आईनं घरून निघताना दिलेली वात्सल्याची शिदोरी असते. हे सर्व धन आपण गाफीलपणे हरवून टाकीत आहोत. परदेशात आणि देशातही अनेक राज्य आपली भाषा जपण्याचा जिवाच्या आकांतानं प्रयत्न करीत असतात. आपण मात्र आपली मराठी भाषा अभिमान गीतापुरती ठेवतो आहोत. 'एवढया जगात माय मानतो मराठी' म्हणायचे नि मराठी शाळा बंद पडण्याच्या बातम्या वाचायच्या, या गोष्टींची संगती लावायची कशी? हा दांभिकपणा आता तरी संपायला हवा.

पुष्कळदा महाविद्यालयात अध्यापन करताना विद्यार्थी एकाच प्रश्नापाशी अडायचे आणि तो म्हणजे निबंध. खरं तर सर्वात आवडता प्रश्न विद्यार्थ्यांना अवघड जायचा. विद्यार्थी विचारायचे निबंधाची सुरुवात कशी करायची कळत नाही. बाकी पुढचे सुचते. मी त्यांना गमतीने म्हणायचो जिथून सुचते तिथून सुरुवात करा. त्यातली खरी गोष्ट अशी असायची दिलेल्या विषयावर स्वत:चा विचार करण्याची आणि त्यातून नवे मुद्दे मांडण्याची तयारीच कधी केलेली नसायची. इतर प्रश्नांसाठी पाठांतर उपयोगी यायचे. समजले नाही तरी पाठ करीत जाणे आणि परीक्षेत ते उतरवीत जाणे याच गोष्टीला आजच्याही शिक्षण पध्दतीत संकोच वाटावा इतके महत्त्व आहे. बाह्य वाचन, चिंतन आणि मनन हे ज्या शिक्षण पध्दतीत 'ऑप्शन'ला ठेवले जाते तेथे नवनिर्मितीक्षम मने तर जाऊद्याच उत्तम वाचक तरी कसा घडणार? विविध विषयांवरच्या अखंड वाचनातून लेखक निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. आज आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक धोरणात सजग वाचक निर्माण करण्याची कुठलीही बांधेसूद व्यवस्था नाही.

आजही बहुसंख्य महाविद्यालयात विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या मुलांना ललित वैचारिक पुस्तकांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते. विज्ञानात पदवी घेणाऱ्या मुलाने, कविवर्य नारायण सुर्वे यांचे 'माझे विद्यापीठ' हा काव्यसंग्रह मागितला तर त्याला 'नाही' म्हणणारी ग्रंथालय व्यवस्था असेल तर त्याला 'व्यवस्था' तरी का म्हणावे? किंवा एखाद्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथपालाजवळ भालचंद्र नेमाडे यांचे 'कोसला' मागितले आणि समजा, ग्रंथपाल त्याला म्हणाले, ''तू कॉमर्सचा 'कोसला'च्या प्रती कला शाखेच्या मुलांसाठी ठेवले आहेत. तुम्हाला 'कोसला'चा काय उपयोग आहे' असं म्हणून नव्या पिढीला वाङ्मयापासून दूर ठेवणारी मंडळी खऱ्या अर्थाने साहित्याचे नुकसान करीत आहेत. साहित्य, बालपणी, ऐन तरुणपणी मनापर्यंत पोहोचले तरच युवापिढीचे भावनिक पोषण होऊ शकेल. समाजाला फक्त कवी आणि साहित्यिक इतकेच नको आहेत. कसदार वाचकही लेखकाचा पालक असतो. वाचकाशिवाय लेखकाचे लेखकपण कसे पूर्ण होणार? युवक साहित्य संमेलनातून काय वाचावे, कसे वाचावे आणि मुख्य म्हणजे का वाचावे याचे भान पालक पिढीने देण्याची गरज आहे. केवळ साक्षरता वाचनासाठी पुरेशी नसते. साक्षरतेमुळे फार तर रस्त्यावरील दुकानाच्या पाटया वाचता येतील किंवा रेल्वे स्थानकांवरची नावे. म्हणून साक्षरतेला मार्गदर्शकाची जोड मिळून सौंदर्य स्थळे उलघडून दाखवणारा प्रेरक वर्ग निर्माण होण्याची गरज आहे. रियाजाने ज्याप्रमाणे गायकाचा गळा तयार होत जातो त्याचप्रमाणे वाचनाच्या सातत्याने आंतरिक संवेदनांनाही अधिकाधिक तरलता येत जाते. लेखनाच्या भुकेइतकीच समृध्द साहित्याच्या वाचनाची ओढ मला महत्त्वाची वाटते. या इथे मला एका महापुरुषाच्या वाचन वेडाविषयी सांगावेसे वाटते आणि ते मला प्रभावित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मी आपल्यासारख्या युवकांना विनंती करेन त्यांचे चरित्र तुम्ही मुळापासून वाचा. तुमच्या मनगटात जिद्दीच्या बिया फुरफरल्या नाहीत असे होणारच नाही. डॉ. आंबेडकर यांनी मोठया अभिमानाने स्वत:च्या वाचनाबद्दल लिहून ठेवले आहे. परिस्थिती वाईट असताना ते नवनवे ग्रंथ वाचायला कसे मिळतील यासाठी उत्सुक असत. धनंजय कीर यांनी डॉ. आंबेडकरांच्या या वाचन वेडाविषयी लिहिले आहे 'ग्रंथ विकत घेण्याची डॉ. आंबेडकरांची भूक न शमता ती वाढतच होती. वेळ मिळेल तेव्हा ते जुन्या ग्रंथांच्या दुकानातून भटकत असत. पोट बांधून ग्रंथ विकत घेण्याच्या वेडामुळे सुमारे दोन हजार जुन्या ग्रंथांचा त्यांच्याजवळ संग्रह झाला. ते ज्ञान भांडार भारतात नेण्यासाठी त्यांनी आपल्या मित्राच्या स्वाधीन केले. भारतात येईपर्यंत त्यातील बरेच ग्रंथ गहाळ होऊन उरलेसुरलेच त्यांच्या हाती आले.'

यातून काय लक्षात येते तर केवळ पदवी मिळविणे एवढेच त्यांचेय ध्येय नव्हते. तर जीवनाच्या अनेक ज्ञानशाखात पारंगत होणे हीच त्यांची प्रबळ महत्त्वाकांक्षा होती. साहित्य आणि त्यातही चरित्र ग्रंथ योग्य वयात हाती येणं, म्हणजे भविष्यातले 'भविष्य' निश्चित करणे होय. गेल्या चार दशकांच्या मुशाफिरीत शिक्षण संस्थांमधून व्याख्यान मुशाफिरी करताना आणि युवक पिढीशी संवाद साधताना माझ्या हे लक्षात आले की, ज्या शाळेत आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग केले जातात, विविध प्रकारची चर्चासत्रे घेऊन युवकांना त्यांची मते मांडण्याचे व्यासपीठ मिळते. जेथील अध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल आणि सर्वच विषयांचे अध्यापक विद्यार्थ्यांसाठी समर्पित भावनांनी काम करतात. त्या संस्थांमधील विद्यार्थी मला व्यक्तिमत्त्वाने समृध्द आढळले आहेत. दुर्दैवाने आपल्या यशाच्या मोजपट्टीत केवळ परीक्षेतील टक्क्यांवर भर असतो.

व्यावहारिक जगात त्याचे महत्त्व कोण नाकारेल? परंतु आयुष्य म्हणजे केवळ व्यवहार नाही, तर भावना आहेत, प्रेम आहे, मैत्री आहे, चिरविरह आहे आणि मीलनाचा उत्सवही आहे. या सर्व मनउत्सवांना जर आयुष्यातून वजा केले तर मग आयुष्यात उरले तरी काय? पुस्तकी शिक्षण पोटाचे गणित शिकवते, परंतु कविता, कथा, कादंबरी, प्रवासवर्णने, चरित्र, आत्मचरित्रे यांचे वाचन आणि त्यातून मिळणारा आनंद जगण्यातील 'अगणित' शिकवते. मला वाटते आजचा हा महोत्सव म्हणजे जगण्यातील आंतरिक महोत्सव संपन्न करण्याचा महोत्सव आहे. साहित्य संमेलनाकडे मी एक सामाजिक कर्मकांड म्हणून बघत नाही, तर समृध्द माणूस घडविणारी एक प्रयोगशाळा म्हणून बघतो.

या व्यासपीठावर आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला स्पष्ट करायची आहे. केवळ नियमाप्रमाणे म्हणून सर्वच महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळे स्थापली जातात; परंतु बहुसंख्य ठिकाणी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन आणि समारोप एकाच कार्यक्रमात संपन्न होते. एक 'टिकमार्क' म्हणून असे उपक्रम जर होत असतील तर भाषा आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवादाचे एक दालनच आपण मिटून टाकतो आहोत असे म्हणायला हवे.खरे तर मराठी वाङ्मय मंडळ हाच एक जीवनप्रयोग होऊ शकतो; परंतु तो करावासा तर वाटला पाहिजे. शिक्षणसंस्थांनीसुध्दा कोणतीही सबब व समर्थन न सांगता मराठी वाङ्मय मंडळाचे किमान पाच तरी कार्यक्रम वर्षभरात केले पाहिजेत. दर वेळी बाहेरूनच पाहुणा आणण्याची गरज नाही. तर तुमच्यातलेच पाहुणे सहज मिळू शकतात. महाविद्यालयातीलच एखाद्या तरुण कवी-कवयित्रीला 'अध्यक्ष' करून कविसंमेलन सादर होऊ शकते. आवडलेल्या पुस्तकावर केवळ पाच-सात मिनिटे आठ-दहा विद्यार्थी बोलले तरीही एक कार्यक्रम होऊ शकतो. साहित्यिकांच्या स्मरणदिनी त्यांच्या साहित्याचे अभिवाचन होऊ शकते. हे मी केवळ अगदी वानगीदाखल सांगत आहे. मुद्दा एवढाच अपेक्षित उपक्रमाचा केवळ कार्यालयीन उपचार नको, तर उपक्रमांच्या प्रयोगशीलतेतून संस्कारांचा मानसोपचार हवा! येथेच मला आणखी एक निरीक्षण नोंदवायचे आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन गुणांना वाव म्हणून दरवर्षी एक वार्षिक प्रकाशित केले जाते. चांगले दीड-दोनशे पानांचे, गुळगुळीत कागदावर छापलेले, विविध भाषा विभाग केलेले सुबक, देखणे असे हे वार्षिक असते. लक्षावधी रुपयांचे बजेट त्यासाठी असते समजा, महाविद्यालयामध्ये पाच हजार मुले असतील तर निदान तेवढया प्रती प्रकाशित करणे बंधनकारक असते. अगदी खरं सांगा ही वार्षिके प्रकाशित केव्हा केली जातात? अगदी कॉलेज बंद होता होता सर्व मुलांना ती मिळू नये अशीच जणू व्यवस्था केलेली असते. मुलांची वार्षिके मुलांना मिळत नसतील तर ती छापण्याचा आटापिटा तरी कशाला? आणि जर मुलांचे साहित्य मुलांपर्यंत पोहोचणे हीच जर प्रशासनाची ओढ असेल तर निदान दिवाळीच्या सुट्टीत तरी ती त्यांच्या हाती मिळायला नकोत का? उपक्रम उत्तम आहेत; पण योजनेचा अभाव आहे. माझे हे दु:ख आहे की, शेकडो महाविद्यालयातील तरुण प्रतिभा फुलण्याआधीच खुडली जाते. ती उमलावी म्हणून काम करणारे हात अगदी तोकडे आहेत. खरे तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाने युवकांची ही विखुरलेली प्रतिभा एक करण्याची संकल्पना मी मांडली होती; परंतु संकल्पना आणि मी एकाच वेळी बाजूला केले गेले.

आज या साहित्य संमेलनात बोलताना केवळ स्मरणरंजन म्हणून नव्हे, तर या युवा भावावस्थेची तरलता सांगण्यासाठी मला माझे आरंभीचे दिवस आठवतात. मोठे लेखक बघणे आणि आपले नवे लेखन रसिकांनी वाचणे, त्या लेखनाला दाद देणे ही या वयातील आंतरिक गरज असते. एका अर्थाने प्रतिसाद हा साहित्यिकाचा, त्यातही उमलत्या साहित्यिकाचा प्राणवायू असतो. प्राणवायूचे हे कांरजे अशा संमेलनातून ठायी-ठायी रुजवले गेले पाहिजे. त्यामुळेच महाराष्ट्र आणि आपली मराठी भाषा संपन्न होणार आहे.

मला माझ्या प्रतिभासंपन्न युवक मित्रांचे खरंच कौतुक वाटते. अनुकूलता मिळण्याची पूर्ण क्षमता महाविद्यालयीन प्रशासनात असूनही केवळ उदासीनतेमुळे आणि आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावता न आल्यामुळे जी कृतक प्रतिकूलता निर्माण केली जाते, त्या वातावरणाशी जुळवून घेत तरुण कलावंत व्यक्त होताना दिसतात. मला आश्चर्य वाटते. नाटकाच्या रिहर्सलला अनेक ठिकाणी जागाच दिली जात नाही. कुठे कानाकोपऱ्यात झाडाखालीसुध्दा मुले तालीम करतात. कोणतेही मार्गदर्शन न मिळता तरुण नाटककार प्रायोगिक नाटके लिहितात. केवळ निरीक्षणाच्या अभ्यासवर्गात शिकलेले नवे दिग्दर्शक आणि तरुण कलावंत नाटकांचे प्रयोग करतात. महाविद्यालयीन नाटयस्पर्धांना जेवढा रंगमंचावर उत्साह दिसतो त्याहूनही तो चौपट-पाचपट तरुण प्रेक्षकांचा असतो. अक्षरश: भारावून टाकणारे वातावरण असते ते. ते वातावरण म्हणजे नवे नाटककार आणि कलावंत निर्माण करण्याचे पर्यावरण असते. स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर छायाचित्रणासाठी जी मंडळी येतात त्यांनी या कलावंतांना खरंच प्रोत्साहन दिलेले असते का? परंतु हे तरुण कलावंत विद्यार्थी मात्र जुने विसरून नव्या आदराने त्यांना मान देतात. आश्चर्य वाटते गेल्या तीस-चाळीस वर्षांतील या शेकडो एकांकिका गेल्या कुठे, ते नाटककार गेले कुठे हे सामाजिक धन आहे ते केवळ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व्यवस्थेच्या उदासीनतेमुळे हरवून जाणे म्हणजे सांस्कृतिक नुकसान करण्यासारखे आहे हा विचार आजच्या दिवसापुरता मर्यादित न राहता तो झिरपावा असे मला वाटते. लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे विद्यापीठ म्हणजे केवळ पदव्यांचे भटारखाने होऊ नयेत. दीडशे वर्षांपूर्वी सांगितलेले ब्रिटिशकालीन अमलातील हे दु:ख आज लोकमान्य पुन्हा अवतरले तर बदललेले असेल का? शिक्षण केंद्रे ही जीवन कला केंद्रे होण्यासाठी विविध ललित कलांमधील प्रतिभावंतांना निदान दिशा देण्याचे काम तरी विद्यापीठाने केले पाहिजे.

मित्रहो, हे साहित्य संमेलन युवक साहित्यिकांमध्ये एक नवा आशावाद निर्माण करणारे साहित्य संमेलन आहे. लेखनाच्या आणि नवनिर्मितीच्या अनेक पैलूंचा विचार करून आंतरिक समृध्दीकडे जाणार आहे यात नाटय दिग्दर्शनातील साहित्य प्रतिभेचा जसा विचार आहे त्याप्रमाणे रंगमंचीय अभिनयाला साहित्याचे चिंतन-मनन कसे वेगळे परिमाण देते. त्याचाही विचार आहे. आपल्या वाचनातील रुची आणि अभिरुची तपासून त्यावर योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. कवितेचे सांगीतिक रूप आशयाला वेगळे उन्मेष कसे देते हाही विचार आहे, असे काव्य, नाटय, अभिनय, संगीत यांच्यातील बहुसूर जपणारे एकमेकांशी वैचारिक समन्वय घडवणारे असे हे संमेलन आहे. आजच्या युवक साहित्य संमेलनाचे मला हे वैशिष्टय वाटते की, व्यासपीठावरच रंगणारे हे संमेलन नाही तर सभागृहाचेही व्यासपीठ करणारे संवादी असे हे संमेलन आहे. हा केवळ युवक साहित्यिकांचा उत्सव नसून अभिजात साहित्याच्या वाचनावर ज्यांची मने पोसली जातात आणि ती कायम चिरतरुण राहतात त्याचाही हा उत्सव आहे.

समारोपाकडे निघताना मी एवढेच सांगेन केवळ काचेच्या पडद्यावर व्यक्त होऊन क्षणभंगूर 'लाइक्स'च्या खोटया चाऱ्यावर गुजराण करू नका. कलानिर्मिती हा फावल्या वेळेचा उद्योग नाही तर ते एक व्रत आहे. असे म्हणतात, संत कबीर जेव्हा निद्रा घेत असत तेव्हा त्या निद्रेतूनही श्वासामधून हरिनामाचा उच्चार ऐकू येत असे. शब्दकलावंतालासुध्दा या तोडीचा ध्यास हवा! कविवर्य केशवसुतांच्या शब्दात 'झपूर्झा' लागायला हवी! ती एक तंद्रा असते; भावतंद्रा! साहित्याचा आनंद हा एक 'आतला सोहळा' असतो. ती संपन्नताच वेगळी असते. अभिव्यक्त होण्याचा आनंद हा विकसित माणूसपणाचा आनंद असतो. म्हणून म्हणतो 'आजच्या लेखण्यांनी आजचे महाभारत टिपावे.' काल आणि उद्या यामध्ये लेखणीने येरझारा घालण्यापेक्षा वर्तमानातील प्रश्नांचा वेध घ्यावा. आजच्या तरुणांनी व्यक्त होण्याची स्वत:ची भाषा निवडावी. मग ती एखाद्या प्रदेशाची बोली असेल. तर त्या बोलीतून लिहावे. तुमच्या लेखनाला तुम्ही जगत असलेल्या जाणिवांचा गंध आला पाहिजे. तो गंधच अभंग-अक्षय टिकून राहतो. विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी त्यांच्या शेतीतील सुखदु:खांचे हुंकार मांडतील, तर शहरातील युवक मुळे तुटत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेचे प्रश्न मांडतील. एखादा तरुण नाटककार आजच्या निर्नायकी सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भेदक भाष्य करणारे नाटक लिहू शकेल. एखादा कवी आपल्या मनात गोठलेला गॅस चेंबर त्यातल्या स्फोटासह मांडेल. हे सगळे व्यक्त करणे थांबवू नका.

मित्रांनो, प्रसिध्दी, पुरस्कार, सन्मान हे खूप नंतरचे तपश्चर्येनंतर प्रसादासारखे मिळणारे सोहळे आहेत. काही वेळा तर एखाद्याच्या भाग्याने तेही मिळत नाहीत; पण नवनिर्मितीच्या आनंदाचे एक अतुल्य पारितोषिक निसर्गाने तुम्हाला दिलेले आहे. साहित्याचा हा आनंद तुम्हाला गर्दीत राहूनही एक वेगळा चेहरा देईल. केवळ काळाच्या लोंढयात वाहणारे तुम्ही एक न होता विशाल अवकाशाच्या पटावर तुमची एक रेखीव, पण चमकदार चांदणी असेल. ते कर्तृत्वाचे नक्षत्र तुमच्या लेखणीला लाभो. निर्मळ अभिरुचीच्या संगीताचे सूर तुमच्या वाचनाला गवसोत, अशी शुभेच्छा देऊन तूर्तास थांबतो.

धन्यवाद!


pravin davane_1 &nbs 
Powered By Sangraha 9.0