रायगड जिल्ह्यातील प्रसिध्द पोपटी, मराठवाडयातील हुरडा पार्टी, खान्देशातील भरीत पार्टी या पाटर्या घरापासून दूर, मोकळया वातावरणात केल्या जातात. आपण याकडे जरी मौज, मस्ती म्हणून आणि आयोजक व्यवसाय म्हणून पाहत असले, तरी या पाटर्या गावाची, कृषी संस्कृतीची ओळख करून देतात. त्याचबरोबर कोजागरी पौर्णिमा सहल व पर्यटन महोत्सव यामुळे पर्यटनाला नवी दिशा मिळू लागली आहे.
महाराष्ट्रात हिवाळा सुरू झाला की गुलाबी थंडी पडायला सुरू होते. सकाळी मोठया प्रमाणात दवही पडत असते, सकाळी हवा आल्हाददायक असते, त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटनालाही अनुकूल वातावरण असते. गड, किल्ले, समुद्रकिनारे आदी ठिकाणी पर्यटकांची पहिली पसंती असते. याच ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात काही दिवस निवास असतो. त्यामुळे तेथील रुचकर पदार्थ, खाण्याच्या आगळयावेगळया पध्दती यांनाही पर्यटक पसंती दर्शवू लागले आहेत. यातूनच जवळा भाकरी, तांबडा-पांढरा रस्सा, पोपटी, हुरडा पार्टी, चुलीवरचे जेवण, गावरान मटन आदी व्हेज-नॉनव्हेज पदार्थ पर्यटक आवडीने खाऊ लागले आहेत. अनेक सहल आयोजक आणि हॉटेल व्यवसायिक हीच आवड हेरून आपल्या पॅकेजमध्ये रायगड जिल्ह्यातील प्रसिध्द पोपटी, मराठवाडयातील हुरडा पार्टी, खान्देशातील भरीत पार्टी यांचा समावेश करून पर्यटकांना आकर्षित करू लागले आहेत.
रायगड जिल्हा म्हणजे मुंबई-पुणेकरांचे वीकएंडच्या भटकंतीचे ठिकाण! त्यामुळे एकदा आलेल्या पर्यटकांना विविध कारणांनी पुन्हा पुन्हा येण्यासाठी सहल आयोजक, हॉटेल व्यवसायिक पर्यटनाचे नवे आयाम खुले करून देत आहेत - कधी पावसाळयातील निसर्गसौंदर्य, धबधबे पाहण्यासाठी खुणावतात, तर कधी ट्रेकिंगच्या माध्यमातून, तर कधी महोत्सवाच्या निमित्ताने. आता गेल्या काही वर्षांपासून यामध्ये नव्याने भर पडली आहे ती म्हणजे शेतामध्ये शांत शीतल चांदण्यात पोपटी पार्टी... काहींसाठी हे नावही नवीन असेल, पण रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन येथील लोकांना पोपटी पार्टी नवीन नाही. कारण येथील मंडळी हिवाळयात एकदातरी आनंदाने कुटुंबीयांसमवेत, मित्रांसमवेतत पोपटी पार्टी करत असतात.
रायगड जिल्ह्यात मुख्य पीक म्हणजे भाताचे पीक. एकदा मळणी होऊन भात घरात आला की येथील शेतकरी दिवाळीनंतर आपल्या शेतात वालाचे (पावटयाचे) पीक घेत असतो. त्यामुळे वालाच्या हिरव्यागार शेंगा मोठया प्रमाणात उपलब्ध होत असतात. या हंगामात त्यांना चवही चांगली असते. त्यांची पोपटी केल्यास ही चव अधिकच रुचकर होते. पोपटी करण्याची विशिष्ट पध्दत आहे. शेतात किंवा मोकळया जागेत पोपटी करावी लागते. यासाठी वालाच्या शेंगा, भामरूडचा पाला, मोठे मडके, मीठ, लाकडे आदी साहित्य लागते. एका मडक्यामध्ये भामरूडचा पाला तळाला ठेवला जातो. त्यामध्ये हिरव्या वालाच्या शेंगा मीठ लावून ठेवल्या जातात व पुन्हा त्यावर भामरुडाचा पाला ठेवला जातो. त्यानंतर एका खड्डयात मडके ठेवून त्यावर लाकडे पेटवून आग केली जाते. आगीत मडके तापून आतील शेंगा वाफेवर किमान अर्ध्या तासात शिजतात. मग काही वेळाने त्या काढून, एकत्र हास्यविनोद करत शेंगा खाल्या जातात. हीच ती पोपटी पार्टी... हिरव्या शेंगा व भामरुडाचा हिरवा पाला व लाल रंगाचे मडके, म्हणून त्याला 'पोपटी' असे संबोधले जाते.
काही वर्षांपासून व्यवसायिक पर्यटकांचे किंवा मद्यपींचे खाण्याचे चोचले पुरवण्याचे साधन म्हणून मांसाहारी पोपटीही प्रसिध्द होत आहे. यात मडक्यामध्ये शेंगांच्या जोडीला चिकन व अंडी टाकून वाफेवर शिजवले जातात.
हुरडा पार्टी
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात झपाटयाने शहरीकरण होऊ लागले आहे. अनेक तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. गावातील शेती काय असते हेसुध्दा त्यांच्या मुलांना माहीत नाही. अशा तरुणाईला ऍग्रोटूरिझमच्या माध्यमातून शेतीबद्दल माहिती मिळते. पण प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पार्टी करण्याची, जेवणाची, खेळण्याची मौजमज्जा काही औरच असते. आजच्या मॉल आणि कॅफेच्या विश्वात हे सर्व लुप्त झाले आहे. पण आता हुरडा पार्टीमुळे अनेकांना ही संधी मिळू लागली आहे. काही ऍग्रोटूरिझमचा व्यवसाय करणाऱ्यांनी यासाठी खास पॅकेजेससुध्दा सुरू केली आहेत. सोलापूरच्या अभिषेक मळयाचे राजू भंडारकवठेकर हे शेतकरी हुरडा पार्टीचे आयोजन करतात. ते सांगतात,''ज्वारीच्या पिकाला कणसे आली की डिसेंबरपासून या पार्टीचे आयोजन करतो. ज्वारीच्या कणसाला आलेले दाणे किंवा हुरडा भाजणे हे तसे कौशल्याचे काम असते. ते व्यवस्थित शेकले गेले पाहिजेत, करपू नये याची काळजी घ्यावी लागते. हे दाणे आम्ही ताटात नाही, तर मायेच्या हाताने हातावर चोळून पर्यटकांना देतो. असे देऊन तोंडात टाकून खाण्यात वेगळा आनंद असतो. त्यात आपुलकी असते. हे लाकडे किंवा गोवऱ्या यांच्यावर भाजले जातात. याच्याबरोबर शेंगदाणा चटणी, भुईमूग शेंगा, फरसाण देतो. तसेच हुरडा चांगला पचावा म्हणून ताकही देतो. काहींना नुसता हुरडा खाणे कंटाळवाणे वाटते, म्हणून हुडर्याबरोबर कोवळी वांगी, कांदे खरपूस भाजून पर्यटकांना देतो. त्यामुळे ही पार्टी आणखी रुचकर होते.'' भंडारकवठेकर यांनी खास हुरडा पार्टीसाठी 570 रुपयांचे पॅकेज तयार केले आहे. यासाठी वेगवेगळे ग्राूप करून त्यांना हुरडा पार्टी दिली जाते. यामध्ये जेवणात पेंडपाला, गरगट्टा, ज्वारीच्या कडक भाकऱ्या, वांगी मसाला असतो. त्यामुळे एकदम अस्सल गावरान थाटात ही हुरडा पार्टी होते!
शिवार फार्म्स, सांगली यांच्यातर्फे खास हुरडा पार्टीचे आयोजन केलेजाते. विशेष म्हणजे फक्त महिलांसाठीही खास हुरडा पार्टीचे आयोजन केलेजाते.
आज पार्टी म्हटले की समोर येते ते म्हणजे मद्यपान आणि मांसाहार, पण हुरडा व पोपटी पार्टी याला छेद देणारी आहे. कधीतरी दैनंदिन जीवनातून विरंगुळा म्हणून असे काहीतरी आयोजित केले जाते. शक्यतो घरापासून दूर, मोकळया वातावरणात या पाटर्या केल्या जातात. आपण याकडे जरी मौज, मस्ती म्हणून आणि आयोजक व्यवसाय म्हणून पाहत असले, तरी या पाटर्या गावाची, कृषी संस्कृतीची ओळख करून देतात. कुटुंबाचे नाते दृढ होते.
- अभय पालवणकर