***रमा दत्तात्रय गर्गे***
आपल्याला कधीतरी एखादे दीर्घ स्वप्न पडते, ज्यामध्ये नेहमीचे असते ते सगळे काही पूर्णपणे बदलून गेलेले असते आणि त्या नव्या जगामध्ये हरखून जाऊन आपण वावरत असतो. अठराशे अठरा साली एका ज्यू कुटुंबात, जर्मनीमध्ये जन्मलेल्या कार्ल मार्क्सने असेच एक दीर्घ स्वप्न बघितले. ते स्वप्न म्हणजेच साम्यवाद होय.
प्रचलित समाजव्यवस्थेमध्ये सर्व प्रकारची व्यवस्थापने पूर्णपणे बदलून, त्याजागी पूर्णपणे नवीन व्यवस्था आणणे आणि त्यातून सर्वसामान्य मनुष्याला न्याय मिळवून देणे असे स्वप्न कार्ल मार्क्सने बघितले. वर्गसंघर्ष हा त्याच्या सगळया स्वप्नाचा मुख्य पाया होता.
वर्ग म्हणजे काय ते आपण आधी बघू. वर्ग म्हणजे अशा लोकांचा समूह, जो साधारणपणे एकाच पध्दतीने आपला उदरनिर्वाह चालवतो. आता मार्क्स ज्या काळामध्ये होता, त्या काळामध्ये असे अनेक प्रकारचे वर्ग होते.
एक म्हणजे जमीनदार आणि त्याच्या जमिनीवर राबणारा शेतकरी. दुसरे म्हणजे भांडवलदार आणि त्यांच्या कारखान्यांमध्ये गोदामांमध्ये राबणारे मजूर. तिसरे म्हणजे गुलाम आणि त्यांचे मालक आणि चौथे म्हणजे जेथे राजेशाही आहे, तिथला राजा आणि त्याची प्रजा. त्यातील भांडवलशाहीशी मार्क्स अधिक झगडला, तर नंतर त्याचा अनुयायी माओ याने शेतकऱ्यांना क्रांतिकारक म्हणून उभे केले.
मार्क्सचे म्हणणे होते की चालू समाजव्यवस्था आहे, तिच्या उत्पादनाच्या प्रक्रियेत बदल झाल्याशिवाय सामाजिक बदल होऊ शकत नाहीत.
म्हणजे इंग्लंडमधली, फ्रान्समधली राज्यक्रांती ही वरवरची असते आणि समाजावर तिचा काही मूलगामी परिणाम झालेला नसतो.
आता गंमत अशी आहे की याच कार्ल मार्क्सला विद्रोही विचारांमुळे जेव्हा जगात विविध ठिकाणाहून हद्दपार व्हावे लागले, तेव्हा लोकशाहीच्या आणि उदारमतवादाच्या भूमीने, म्हणजे इंग्लंडने त्याला आश्रय दिला.
अखेरीस 1883पर्यंत इंग्लंडमध्येच त्याने आपले संशोधन, लेखन केले. कामगार संघटना हे सगळं चालवत अखेरचा श्वासदेखील तेथेच घेतला.
कार्ल मार्क्सने अपरिहार्य लढयाचे तत्त्वज्ञान मांडले. त्याचे असे मत होते की वर्गसंघर्ष हा अपरिहार्य आहे, कारण भांडवलदार आणि मजूर यांचे नातेच विळया-भोपळयाचे आहे. त्यामुळे कामगारांनी संघटित होऊन क्रांती केली पाहिजे आणि लढा दिला पाहिजे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला उलथून टाकण्यासाठी असे करणे अपरिहार्य आहे.
मग त्यासाठी करायचे काय? तर राष्ट्रव्यापी कामगार संघटना उभरायची. नेहमीपेक्षा ही संघटना वेगळी असली पाहिजे. कारण यांना क्रांती घडवायची आहे. ही क्रांती कशी? तर आधी वर्गसंघर्ष समजावून सांगायचा, एकमेकांचे हितसंबंध हे एकमेकांच्या विरोधी आहे हे समजून सांगायचे. मग संघटन करायचे.
आता यामध्ये भांडवलशाहीच्या बाजूने राज्यसंस्था आणि सैन्य, पोलीस, न्यायालय हे सर्व उभे राहतील. कारण उत्पादन प्रक्रियेवर त्या वर्गाचे प्रभुत्व असते. सत्ताधारी वर्गाचे राज्य हे महत्त्वाचे असे प्रभावी साधन. ते क्रांतीमध्ये मजुरांनी हातात घेतले पाहिजे. मग हे कसे हातात घ्यायचे? तर सांसदीय प्रयत्न करून, बहुमत मिळवून, वेगवेगळे कायदे करून किंवा लोकशाहीच्या मार्गाने किंवा साध्या मार्गाने नाही. राज्यसंस्थेच्या आणि भांडवलशाही समाजरचनेच्या रक्षणाचे काम करणारे सैन्य, पोलीस, न्यायालय, तुरुंग यांना मोडून काढायचे. त्यांची व्यवस्था उद्ध्वस्त करायची. मग राज्यसंस्थेचे हे महत्त्वाचे घटक एकदाचे मोडून पडले की कामगारवर्गाने नव्या इमानदार अशा आपल्या लोकांचे सैन्य, आपल्या लोकांचे पोलीस, आपल्या जनतेची न्यायालये अशी स्थापन करावीत. मग हे सगळे कामगारवर्गाच्या ताब्यात असेल आणि कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम करेल.
मग या नव्या राज्यांमध्ये भांडवलदार हे तुरुंगात जातील आणि कामगार हे राजे बनतील. ही प्रक्रिया हळूहळू सगळया जगात पसरेल आणि मग एक दिवस वर्गसंघर्ष नाहीसा होईल. मग राज्याची गरज लागणार नाही, म्हणून समाज शासनमुक्त आणि वर्गविहीन होईल. सुरुवातीला ही समाजवादी व्यवस्था असेल. हळूहळू उत्पादनाच्या साधनांवरची व्यक्तिगत मालकी काढून घेतली जाईल आणि मग गिरण्या, कारखाने, शेते, जमिनी, यंत्रसामग्राी, मोठी ऐतिहासिक आणि राजकीय ठिकाणे या सगळयाची एकत्रितपणे सामुदायिक मालकी प्रस्थापित होईल. मग सगळी उत्पादन व्यवस्थासुध्दा सहकारी सामुदायिक पध्दतीची होईल.
त्यानंतर उत्पादन शक्तीमध्ये भरपूर वाढ करायची. मग उत्पादनात वाढ झाल्यामुळे जनतेचे राहणीमान वाढेल. राहणीमानात सुधारणा झाली की लोकांची बौध्दिक आणि सांस्कृतिक पातळी आपोआप उंचावेल. एकदा अशी पातळी उंचावली की त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन हळूहळू अधिकाधिक विकसित होत जाईल. आणि मग अशा नियोजनबध्द पध्दतीने सर्व उत्पादन समान प्रमाणात सर्व व्यक्तींना असे वाटले जाईल आणि मग हळूहळू विषमता नाहीशी होईल. कुशल कामगार, साधे कामगार, कसबी कामगार यांना वाटा मिळताना थोडाफार वर-खाली असेल. परंतु एकंदरीत कोणी कोणाचे शोषण करणार नाही. यानंतर मग साम्यवाद नावाची अत्यंत उन्नत अवस्था समाजामध्ये निर्माण होईल, ज्यामध्ये वर्ग, धर्म, पंथ हे सर्व भेद नाहीसे होतील. प्रत्येक जण बुध्दिनिष्ठ आणि शारीरिक श्रम करणारा होईल.
सामुदायिक सभागृहे, सामुदायिक धुलाई केंद्र, बालसंगोपन गृहे अशी सर्व निर्माण करून स्त्रियांनाही समता आणि समान न्याय दिला जाईल. श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद संपतील. वर्ग व राष्ट्र असे संघर्ष नाहीसे होतील. लढाया होणार नाहीत आणि समान आर्थिक परिस्थितीमुळे सर्व जण शांततेत आणि आनंदात राहू लागतील.
कार्ल मार्क्सच्या या तत्त्वज्ञानाला प्रचंड निष्ठावान आणि कडवे अनुयायी मिळाले. आपल्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा म्हणजे वर्गसंघर्ष हा त्याने इतका पसरवला की आपल्या भारत देशामध्ये कौरव-पांडवांचे युध्द, राम-रावणाचे युध्द हीदेखील वर्गयुध्द होती असे आपल्या देशातील कॉ. डांगे यांच्यासारखे मार्क्सवादी म्हणू लागले. तर साने गुरुजींसारखे हळव्या मनाचे लोकदेखील,
'किसान मजूर उठतील.
कंबर लढण्या कसतील.
एकजुटीची मशाल घेऊन
पेटवतिल हे रान'
अशी कवने लिहू लागले.
मार्क्सचे इतिहासविषयक, अर्थकारणविषयक, समाजविषयक सर्व प्रमेय एकांगी होते. ऐतिहासिक भौतिकवाद मनुष्यस्वभावाचा, गुणदोषांचा, त्याच्या मनाचा, त्याच्या आजूबाजूच्या भौगोलिक आर्थिक परिस्थितीचा, त्याच्या धर्माचा कशाचाच विचार न करता त्याला केवळ एक एकक म्हणून बघतो. त्यावर मार्क्सवादाची ही मोठी इमारत रचली जाते. कायदेमंडळ, कोर्ट, पोलीस, तुरुंग ही दृश्य अंगे म्हणजेच राज्यसंस्था असे त्याने समजले. परंतु खरी राज्यसंस्था ही व्यक्तीच्या मनामध्ये असते. ती मनुष्याने निर्मित केलेली व्यवस्था आहे. मनुष्याने सगळीकडे योग्य पध्दतीने नियम असावेत म्हणून स्वतःहोऊन कोणाला तरी चालवण्यास दिलेली ही व्यवस्था आहे, हे त्याने कधी लक्षातच घेतले नाही.
भांडवलदारांचा राज्यसंस्थेवर प्रभाव असतो असे त्याने इंग्लंडमध्ये राहून म्हटले. त्याचप्रमाणे त्याने कधी मानसशास्त्रीय अभ्यास यामध्ये येऊ दिला नाही. मानवी मनाचे विविध कंगोरे, मानवाला असलेल्या इच्छा-आकांक्षा, वेगवेगळया तत्त्वज्ञानाची ओढ, वेगवेगळया प्रकारच्या धर्मकल्पनांची असलेली ओढ याही गोष्टी कधी लक्षात घेतल्या नाहीत. बाजारपेठेमध्ये भांडवलदार जेव्हा उतरतो, तेव्हा तो मोठी जोखीम घेऊन उतरलेला असतो. त्याला जाहिरात करावी लागते, त्याला स्पर्धा करावी लागते, नवीन यंत्रे आणावी लागतात. केवळ कामगारांची पिळवणूक करणे हे त्याच्याकडे एकमेव कार्य नसते. कामगारही अनेक वेळा स्वेच्छेने भांडवलदारांना सहकार्य करत असतात.
धर्म आणि राष्ट्र ह्या मानवी मनावर पकड घेतलेल्या दोन महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना चुटकीसरशी नाहीशा होतील, असे मार्क्ससारख्या मोठया विचारावंताला कसे काय वाटले असेल, हे कळत नाही.
पोलंड, हंगेरी, रशिया, चीन.. कोठेही साम्यवादी व्यवस्था स्थापित होऊ शकली नाही. मात्र असलेली व्यवस्था नाहीशी केल्यामुळे तेथे दीर्घकाळ अनागोंदी माजली!! कामगारवर्गाची हुकूमशाही हा मुद्दा मार्क्सने लक्षातच घेतला नाही. वर्गविरहित शासनविरहित समाज हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, येथे आहे ते सगळे निपटून टाकायचे आणि मग नव्याने घर बांधायला घ्यायचे आणि दरम्यान कुठे राहायचे, याचा विचारच करायचा नाही.. अशा प्रकारचे हे तत्त्वज्ञान होते.
किमान वेतन, नोकरीची शाश्वती, संपाचे हक्क, रजा, पगारवाढ, स्वतःचे घर, शिक्षण, आरोग्य यासारखे हितकारक कायदे करूनदेखील मजूरवर्गाला चांगल्या पध्दतीने पुढे नेता येते, हे अनेक देशांनी सिध्द करून दाखवलेले आहे. असे असताना मार्क्सने आणि मार्क्सवादी लोकांनी मात्र आपला ऐतिहासिक भौतिकवाद पुढे रेटला. परमेश्वर, दैवी शक्ती या गोष्टींना तर त्याने पूर्णपणे नाकारले.
कार्ल मार्क्स जर्मनीतून पॅरिसला गेला. तेथे त्याला फ्रेडरिक एंगल्स हा मित्र मिळाला. त्या दोघांनी 1848मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या कालखंडातच कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला. इंग्लंडमध्ये त्याचा गाजलेला 'दास कॅपिटल' हा ग्रांथ प्रसिध्द झाला.
आदर्श समाज म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा मुक्त विकास. संस्थांमुळे व्यक्तीचे जीवन संपन्न आणि प्रगल्भ होऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा ही मार्क्सची इच्छा होती खरी, परंतु त्याने ज्या पध्दतीने ते पूर्ण करण्यासाठी उपाय सांगितले, ते मात्र मानव समूहाला वेगळया दिशेने नेणारे होते, एवढे खरे!!
1883मध्ये कार्ल मार्क्स इंग्लंडमध्ये मरण पावला. जिवंत असेपर्यंत त्याच्या त्याने रेखाटलेल्या स्वप्नाच्या दिशेने त्याच्या भोवतीचे अनुयायी आणि कार्यकर्ते हळूहळू निघाले होते. भौतिक परिस्थिती बदलली की मन बदलेल आणि मन बदलले की समाज बदलेल असे त्याचे स्वप्न काही लोकांनी साकार करण्याचा प्रयत्न केला. एकाच वेळी मार्क्सला अत्यंत तत्त्वनिष्ठ असे अनुयायी मिळाले, तर सर्वाधिक हल्लादेखील त्याचाच तत्त्वज्ञानावर झाला.
मात्र आजही दार्शनिकांच्या जगात कार्ल मार्क्स एक वेगळया तेजाचा तारा आहेच.