*** विक्रम भागवत***
नेहरू सेंटरमध्ये 3 डिसेंबर ते 8 डिसेंबर असे चार दिवस मिलिंद रामचंद्र ढेरे यांचे Eternal Scapes या विषयाचे फोटोग्रााफी प्रदर्शन होते. निर्मितीत बुध्दी फार मदत करीत नाही, जसे फोटोसाठी कॅमेरा कुठला हे महत्वाचं नसतं, तुमच्या डोळयात काय आहे हे महत्वाचं आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे हे महत्वाचं आहे. मिलिंदे ढेरे यांचे फोटोग्राफी प्रदर्शन पाहताना हाच अनुभव येतो.
सुप्रसिध्द छायाचित्रकार रघू राय ह्यांनी असे म्हटले आहे - Skills are never taught, they are acquired. कौशल्य शिकवले जात नाही, ते आत्मसात केले जाते. रघू राय ह्यांच्या ह्या विधानाची प्रचिती मी 3 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2019 ह्या कालावधीतल्या चार दिवसात पुरेपूर अनुभवली, मिलिंद रामचंद्र ढेरे ह्या माझ्या मित्राशी गप्पा मारत असताना. चार दिवस मी त्याच्यासोबत Eternal Scapes ह्या त्याच्या फोटोग्रााफी प्रदर्शनात होतो. मध्ये मोकळा वेळ मिळायचा, तेव्हा तो खूप बोलायचा, त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल, नोकरी (न आवडणारी), मग फोटोग्रााफीचा डिप्लोमा, तोसुध्दा नोकरी करूनच. मग एका क्षणी नोकरी सोडून आपल्याला जे ध्येय दिसले आहे ते हासिल करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून व्यवसायात उडी मारणे. खूप कष्टाचा प्रवास! हे मिलिंदच्या तोंडून ऐकत असताना कलाकारातला माणूस आणि माणसातला कलाकार हा प्रवास खूप समृध्द करून गेला.
कौशल्य आत्मसात करण्याची प्रक्रिया कुठे एके ठिकाणी पुरी होत नाही. ती सतत चालत राहणारी प्रक्रिया असते. सुप्रसिध्द एस्थेटिक डिझायनर सुहास एकबोटे रविवारी म्हणाले, ''मिलिंदा, तुझे पुण्याच्या आर्ट2डे मधले गेल्या वर्षीचे प्रदर्शन आणि ह्या वेळचे हे नेहरू सेंटरमध्ये भरलेले प्रदर्शन ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे.'' हे ऐकत असताना मिलिंदाचे डोळे एकदम चकाकले. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली ती दाद होती. ह्या एक वर्षाच्या प्रवासात एक छायाचित्रकार म्हणून मिलिंदाचा प्रवास खूप महत्त्वाचा होता. त्याचे वर्णन करून सांगता येणार नाही कदाचित, पण तो अनुभवता येतो कलाकाराला.
मला आठवते आहे, साधारण ऑगस्ट 2019मध्ये मिलिंद एकदम अस्वस्थ होऊन मला भेटला. काही क्षण मला काही कळेना. मग हळूहळू तो मोकळा झाला, डिसेंबरमध्ये नेहरू सेंटरला प्रदर्शन आहे.. आणि मला जाणीव झाली आहे... आहेत ते फोटोग्रााफ्स मला नाही दाखवायचे. मला नवे काहीतरी करायला हवे. मग तेव्हा सुरुवातीला असा विचार होता की उत्तराखंडात शीतला इथे माझ्या स्नेही अरुंधती देवस्थळी राहतात, त्यांच्याकडे जावे का? पण मिलिंदाला नैसर्गिक प्रकाश हवा होता आणि शीतलामध्ये ढग, पाऊस ह्याचे थैमान चालू होते. मग भारताबाहेर जाण्याचे घाटू लागले.
ह्या बाबतीत मिलिंद गरगटे आणि नितीन पाटील हे त्याचे उजवे आणि डावे हात. पण नुसते जायचे ठरवून होत नाही. आपल्याला काय शूट करायचे आहे, तिथला प्रकाश कसा असेल, तिथली राहण्याची आणि प्रवासाची सोय हे प्रश्न असतातच. पण ह्यात कळीचा प्रश्न होता आपल्याला काय छायाचित्रित करायचे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर फक्त मिलिंदाच देऊ शकत होता. जहांगीर आर्ट गॅलरीत त्याने शेपर्डस वॉक हे स्पिती व्हॅलीमधले लँडस्केपचे प्रदर्शन भरवले होते. आर्ट2डेमध्ये बरेचसे तेच पुढे नेले होते. त्याच्या काहीतरी विरुध्द करावे असा विचार असावा आणि मोरोक्को समोर आले. संपूर्ण वेगळा प्रदेश. तिथल्या पुराण इमारतींचे रिस्टोरेशन झाले होते, पण ते करीत असताना कुठेही आधुनिकीकरण करण्यात आले नव्हते. भिंती, गवत आणि माती ह्यांच्या मिश्रणातूनच त्यांचे पुनरुज्जीवन केलेले होते. त्यामुळे रचनात्मक छायाचित्रे त्याला मिळणार होती. तसेच वाळवंट, त्याचा पोत टिपणे शक्य होणार होते. प्रकाशसुध्दा वेगळा. तिथे छाया-प्रकाशाचा खेळ टिपणे हे एक आव्हान होते.
माझे मित्र गणेश कनाटे प्रदर्शन पाहता पाहता मला म्हणाले, ''मिलिंदला समोर जे दिसतं, त्यातून लगेचच त्याला कंपोझिशन सुचतं, फ्रेम दिसते, ती तशीच डोक्यात एडिटसुध्दा होते. मात्र नंतर फार काही करावं लागत नाही.'' आणि नंतर मिलिंदशी बोलत असताना मला नेमके हेच जाणवत राहिले. मिलिंदच्याच शब्दात सांगायचे तर, एक रेकी रात्री व्हायची, मग सकाळी 4 ते 4.30 वाजता कॅमेरा लावून बसायचे, गुडघाभर वाळूत पाय रोवून, प्रकाशाची वाट पहात उभे राहायचे... ह्या दरम्यान आपल्याला काय टिपायचे आहे ह्याचे चित्र डोक्यात तयार व्हायचे. प्रकाश येऊ लागला की तो सतत प्रवाहित असतो, आणि तो विशिष्ट क्षण येतो, जेव्हा सावली आपल्याला हवी तशीच असते, प्रकाश हवा तिथेच असतो, सगळया चित्राचा तोल अत्यंत सुरेख जमून आलेला असतो, आणि मग स्थिर हाताने क्लिक करायचे.
आपल्या निर्मितीप्रक्रियेबद्दल तो खूप छान बोलला. ''छायाचित्र टिपत असताना एक विलक्षण अनुभव येतो, जो फक्त एक निर्मितीक्षम कलाकारच घेऊ शकतो. It provides orgasmic experience. स्खलन व्हावं तसा. एकाच वेळी विलक्षण ऊर्जा आणि थकवा ह्यांचा अनुभव. तेव्हा हवा असतो फक्त चहा... आणि तो तर तीन किलोमीटर चालल्याशिवाय मिळणार नसतो आणि असं जवळपास प्रत्येक छायाचित्रात अनुभवायला येतं.''
एक कलाकार आपल्या मनात होत असलेली प्रक्रिया मला सहज शब्दात सांगत होता. मिलिंदा स्वतःबद्दल खूप कमी बोलतो. पण त्याच्या छायाचित्रांबद्दल बोलताना तो थकत नाही. प्रत्येक छायाचित्राची एक गोष्ट असते किंवा कित्येक छायाचित्रात एक गोष्ट असते. मी त्याच्याबद्दल बोलताना पहिल्या दिवशी असे म्हटले, Dhere family is devoted to letters, exception is Milind who is devoted to lens. त्याची संवादाची परिभाषा लेन्सची आहे. आपण सर्व पाहत असतो, आकळते फार थोडे. मिलिंदा पाहतो आणि त्याला आकळते हा त्याच्यामधला आणि आपल्यातला फरक आहे.
मला आणखी एक प्रतिक्रिया मिळाली! निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर म्हणाल्या, ''अरे विक्रम, ह्या सर्व चित्रांमध्ये किती ऊर्जा आहे! काही उदास, खिन्न, निराश करणारं नाहीच.'' मला वाटते, हा मिलिंद नावाच्या कलाकारामधला माणूस आहे. मी स्वतः मिलिंदाला कधी निराश, हाताश, उद्विग्न, असूया, द्वेष करताना अनुभवलेले नाही. जे त्याच्यात नाही, ते त्याच्या छायाचित्रांमध्ये कसे येणार? कदाचित म्हणूनच जाताना तिने आवर्जून मिलिंदाला म्हटले, ''मला तुमच्या दोघांच्या मैत्रीत सामील करून घ्या.''
असे म्हणतात की निर्मितीत बुध्दी फार मदत करीत नाही. प्रकाश, सावली, पोत आणि रचना हे महत्त्वाचे. ते एकदा चौकटीत सुंदर समाविष्ट झाले की मग तंत्र येते. पण तंत्राची जागा तितकीच. पहिले काही नसेल तर तंत्राचा उपयोग नाही. म्हणून मग त्याचे महत्त्वाचे वाक्य येते - ''अहो, फोटोसाठी कॅमेरा कुठला हे महत्त्वाचं नसतं, तुमच्या डोळयात काय आहे हे महत्वाचं आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे हे महत्त्वाचं आहे.''
मला छायाचित्रकलेमधले काही कळत नाही. आणि कळत नाही हे एका दृष्टीने खूप चांगले आहे असे मला वाटले, कारण मग मी संपूर्ण प्रदर्शन चार दिवस फक्त समीक्षकाच्या भूमिकेतून बघत राहिलो असतो. मला स्वतःला आस्वादकाच्या भूमिकेत राहणे खूप महत्त्वाचे वाटते, कारण मला कलाकाराइतकाच त्याच्यातला माणूस आणि माणसाइतकाच त्याच्यातला कलाकार महत्त्वाचा वाटतो. एक अनुभवी फोटोग्रााफर तावदानातून चित्रे पाहत एकदम आत आले आणि स्पिती व्हॅलीमध्ये काढलेल्या पारदर्शक पाण्याच्या छायाचित्रापाशी येऊन उभे राहिले. म्हणाले, ''प्रत्येक फोटोग्रााफरने एका उत्कृष्ट छायाचित्राची नक्कल करणारे दुसरे छायाचित्र काढावे अशा मताचा मी आहे, त्यातून खूप काही शिकता येते. पण मी ह्या छायाचित्राची नक्कल करायचे धाडस करणार नाही.'' मिलिंदमधल्या कलाकाराला ही दाद कदाचित सुखावून गेली असेल. अर्थात त्याचा चेहरा तेव्हा निर्विकार होता. ''कुणाला काय आवडेल, आपण काय सांगावे विक्रम?'' आम्ही बाजूला झाल्यावर तो बोलला.
शेवटी रघू राय ह्यांचे एक वाक्य उद्धृत करायचा मोह टळत नाही.
photograph has picked up a fact of life, and that fact will live forever. ...
मिलिंदच्या छायाचित्रात त्याने टिपलेले क्षण, निसर्ग, रचना, खिडकी, खिडकीच्या आतला अंधार आणि बाहेरचा प्रकाश-सावलीचा खेळ... सर्व अजरामर आहे.