***मेधा किरीट***
1977-78चा हिवाळा. चिंचवडला नवीनच स्थापन झालेल्या जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा अभ्यासवर्ग. हा वर्ग म्हणजे आमच्या ओळखीची सुरुवात. तिथे उपस्थित असलेली तरुणाई जग जिंकल्याच्या आविर्भावात होती. लोकनायक जयप्रकाशजी, मा. नानाजी देशमुख, मा. अटलबिहारी वाजपेयी यांचे आदर्श समोर ठेवून ध्येयासक्त झालेल्या, 'आपण समाज बदलू शकतो' ह्यावर विश्वास असलेल्या तरुण-तरुणींचा गट. त्यातलीच मी एक. बहुधा तेव्हा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय समितीची सदस्य होते. आमचे हिरो सुब्रह्मण्यम स्वामी (आणीबाणीच्या काळात बंदी आणि अटक हुकूम असूनही त्यांनी अचानक संसदेत हजेरी लावली, म्हणून त्यांना आम्ही प्रतिशिवाजी म्हणत असू.) त्या वर्गात प्रमोद महाजन, धरमचंद चोरडिया, गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर एक नवीनच लग्न झालेलं जोडपं होतं. लख्ख गोरा, दाढीमिशा ठेवलेला, नाकेला आणि सडपातळ, उंच असा देखणा तरुण. त्याच्याबरोबर असलेली बहुधा शेवाळी छटेचा हिरवा चुडा घातलेली, किंचित स्थूलतेकडे झुकणारी, सावळी पण डोळयांत आत्मविश्वास आणि बुध्दीचं तेज असलेली तरुणी. पाहताक्षणी मला तिचे डोळे खूप आवडले. मनमोकळं आणि एका लक्षवेधी सुरातलं तिचं ठाशीव बोलणंही छाप पाडून गेलं. तिचा विचारांमधला ठामपणा आणि स्पष्टता पाहून मी भारून गेले. हे जोडपं म्हणजे - प्रकाश जावडेकर आणि प्राची जावडेकर. प्राची ही पूर्वाश्रमीची मेधा मधुकर द्रविड. आमच्यातल्या नामसाधर्म्यामुळेही ती मला अधिकच जवळची वाटली.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक
दोघेही जण आजच्या ठाणे जिल्ह्यातल्या मनोर इथून आले होते. प्रकाश तिथल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत नोकरीला होता. मात्र राजकीय कार्यकर्ता म्हणून पूर्णवेळ पक्षाचे काम करण्याचा त्याचा इरादा होता. म्हणूनच ते त्यांच्या मूळ गावी -पुण्याला स्थायिक होणार होते.
आमचे सर्वांचे गुरू, मार्गदर्शक, प्रति पालक असलेले मा. वसंतराव भागवत अशा पूर्णकालीन कार्यकर्त्यांची विशेष काळजी घेत. त्यांचं योगक्षेम व्यवस्थित चालावं यासाठी सजग असत आणि अशा कार्यकर्त्यांच्या पत्नीने संसारासाठी काही ना काही नोकरी, उद्योग-व्यवसाय करून पैसा कमवावा असा त्यांचा आग्रह असे.
प्राची हीदेखील अ.भा.वि.प.च्या चळवळीतली कार्यकर्ती. तीही सत्याग्रही. या काळात दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले होते, मग प्राचीने पुढाकार घेऊन विचारलं. आणीबाणी संपल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
प्रकाश आणि प्राची यांची प्रेमकहाणी म्हणजे एक चित्तरकथाच आहे. प्रकाश मिसाखाली येरवडा जेलमध्ये होता. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी तो ससून रुग्णालयात दाखल झाला आणि तिथे समजलं की, त्याच्या हृदयाच्या पडद्याला छिद्र आहे. तत्काळ ओपन हार्ट सर्जरी करणं गरजेचं होतं. त्या वेळी - म्हणजे 1976 साली ही सर्जरी फारच जोखमीची होती. हे ऐकल्यानंतरही प्राची त्याच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिली.
प्राचीचं माहेर, द्रविड कुटुंब मोकळंढाकळं. तिचं आजोळ संघाचं. मामा मुकुंदराव कुलकर्णी यांनी जनसंघातर्फे प्रथमच पदवीधर मतदारसंघ बांधला. ते आमदार होते. तिचं संपूर्ण बालपण पुण्यातच गेलं. शाळा-महाविद्यालयात ती एक उत्तम खोखोपटू, कबड्डीपटू म्हणून ओळखली जायची. लेखनकला अवगत होती. तिने लग्नाआधी B.Com. केलं होतं. लग्नानंतर मुलं, संसार सांभाळत M.Com., D.H.E., D.L.T. केलं आणि शैक्षणिक व्यवस्थापनात Ph.D. केली.
लग्नानंतरचा काळ तसा कसोटीचाच होता. जावडेकर कट्टर हिंदू महासभेचे. प्रकाशचे बाबा शेवटपर्यंत महासभेची भगवी टोपी घालत. मूळ रायगड जिल्ह्यातल्या पळस्पे गावातलं जावडेकर कुटुंब नोकरीनिमित्त महाडला गेलं. एकंदर कट्टरपणातून आलेली अलिप्तता कुटुंबात होती. आई रजनीताई शाळेत शिक्षिका. आपला मुलगा शिक्षणमंत्री झाल्याचा आनंदक्षण रजनीताईंच्या आयुष्यात आला. या गोष्टीचा मायलेकराला सार्थ अभिमान होता. प्रकाशचं अकरावीपर्यंतचं शिक्षण महाडमध्येच झालं. त्यानंतर मुक्काम पोस्ट पुणे. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच अ.भा.वि.प.चं काम सुरू केलं. आणीबाणीच्या काळात प्रकाश मिसाखाली 19 महिने येरवडा कारागृहात होता. प्रकाशने B.Com. केलं. बँकेच्या परीक्षा दिल्या.
मनोरनंतर प्रकाशची पुण्याला बदली झाली. त्या वेळी आशुतोषचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर ते पत्रकार नगरात भाडयाने राहू लागले. जरुरीपुरती चार भांडी आणि स्वयंपाकघरातील एक मांडणी, कपडे ट्रंकेत. आशू रांगता होता. प्राची त्याचे कपडे वर्तमानपत्रावर घडया घालून ठेवत असे. ही गोष्ट शेजारच्या राहूरकर आजींच्या ध्यानात आली. त्यांनी आपल्या घरातली वापरातली मांडणी स्वच्छ करून दिली. त्यात बाळाचे कपडे राहू लागले. आशू वर्षाचा झाला आणि प्राचीला वाडिया कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी लागली. तर प्रकाशने 1981 साली पक्षकामासाठी बँकेतली नोकरी सोडली. त्यानंतर तो वर्षातले सुमारे 270 दिवस पक्षाच्या कामासाठी फिरतीवर असायचा. तोवर अपूर्वचाही जन्म झाला होता. अर्थातच एकाच्या नोकरीमध्ये घर चालवणं ही तारेवरची कसरतच होती. प्राची नोकरीबरोबरच शिकवण्या करायची. त्याच्या जोडीला एका मैत्रिणीच्या प्रोत्साहनामुळे लोकसत्तामधून मैत्रीण या सदरात लेखन सुरू केलं. त्यातून अधिकचे 300 रुपये मिळू लागले, छोटेमोठे खर्च भागू लागले.
गेल्या चाळीस वर्षात आमच्या दोन्ही कुटुंबांतल्या जवळपास सर्व घडामोडींमध्ये आम्ही एकमेकांचे साक्षीदार आहोत आणि गरजेच्या वेळी साथ देणारेही. किरीट आणि प्रकाश या दोघांनीही पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राहायचं ठरवलं. या प्रवासात अनेक चढउतार आले, पण दोघांच्याही निष्ठेत, ध्येयात कधी बदल झाला नाही. म्हणूनच न बोलता, न सांगता परस्परांच्या व्यथा कळत होत्या. 2002 साली पक्षाने प्रकाशला राष्ट्रीय स्तरावर प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिली. तो दिल्लीला गेला. पक्ष कार्यालयामागे एका छोटया खोलीत प्रकाश चार वर्षं राहिला. सकाळी वेगवेगळया कपडयांचे जोड एका सूटकेसमध्ये भरून दिवसभर वेगवेगळया दूरचित्रवाहिन्यांवर, विविध विषयांवर पक्षाची भूमिका मांडायला जायचा. अडचण थोडी भाषेची होती. त्याचं इंग्लिशवर प्रभुत्व होतं, पण हिंदी बोलण्यात त्या भाषेचा 'फ्लेवर' आणणं आवश्यक होतं. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. त्यातून राजकीय प्रवक्ता म्हणून त्याची ओळख तयार झाली. त्याच्या कारकिर्दीत कोणतीही विवादास्पद विधानं न करता प्रकाशने आपली जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली, म्हणूनच शब्द मागे घेण्याची वेळ त्याच्यावर कधी आली नाही.
2008 साली राज्यसभेत खासदार झाल्यानंतर त्याला छोटेखानी बंगला मिळाला. प्राचीने आपल्या उपजत सौंदर्यदृष्टीने तो बंगला छान सजवला. (मुळात ती कलाकारच आहे. गाण्याचं कोणतंही प्रशिक्षण न घेता ती सुरेख गाणी म्हणते.) त्या वेळेस मी 'अंत्योदय' सेलची सदस्य होते. त्या निमित्ताने मला देशभर प्रवास करावा लागे. अनेकदा दिल्लीत राहावं लागे. तेव्हा मी कायमच प्राचीकडे राहिले. प्रकाश-प्राची असोत नसोत, तरीही हक्काने राहिले. प्राची नसताना प्रकाश आवर्जून चौकशी करणार. 'काही हवं असेल तर हक्काने मागून घे' असं सांगणार. खरं तर प्राचीने सर्व मदतनिसांना असे तयार केलं होतं की सर्व काही न मागताच हजर होत असे.
2014 साली पुणे लोकसभा क्षेत्रातून प्रकाशला तिकीट मिळावं अशी कार्यकर्त्यांची खूप इच्छा आणि अपेक्षा होती. ते झालं नाही. त्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने प्रकाशला तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या प्रमुख राजकीय पक्षाशी युती करण्याची अवघड जबाबदारी सोपवली. ती त्याने यशस्वीपणे पार पाडली. भाजपा-रालोआला अभूतपूर्व यश मिळालं. मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रीमंडळात प्रकाशचा समावेश झाला. प्राची-प्रकाशने या कालखंडात माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना खूप मदत केली. त्यांच्या घराचे आणि मनाचेही दरवाजे कार्यकर्त्यांसाठी नेहमीच उघडे राहिले.
आज यशाच्या शिखरावर असलेल्या प्रकाशला विचारलं की, ''त्याच्या राजकीय जीवनातला कायम लक्षात राहिलेला क्षण कोणता?'' त्यावर त्याने सांगितलं, ''पक्षासाठी पूर्ण वेळ काम करायला लागल्यानंतर काढलेली बेरोजगार युवकांची यात्रा कायम लक्षात राहिली आहे. पार्टीचा पाया मजबूत करण्यासाठी, विस्तारण्यासाठी तरुणांचं जिव्हाळयाचे प्रश्न सोडवणं गरजेचं होतं. त्या वेळी बेरोजगारीचा प्रश्न धगधगता होता. तेव्हा तयार केलेल्या खास दोन रथांमधून मी आणि डॉ. खुशाल बोपचे यांनी बावीस दिवसांत पूर्ण महाराष्ट्राची यात्रा केली. एका लाखाहून अधिक युवकांशी संपर्क झाला. अनेक नवे तरुण जोडले गेले. सरकारसमोर निदर्शनं करणं आणि निवेदन देणं हा शेवटचा टप्पा होता. त्यासाठी सर्वांनी चौपाटीवरच मुक्काम केला. संपूर्ण गिरगाव चौपाटी युवकांनी भरून गेली होती. किरीट सोमैया तेव्हा मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. त्या वेळी ती गर्दी पाहून माझी खात्री पटली की आपला राजकीय कल बरोबर आहे. दिशा योग्य आहे. कार्य सिध्द होणारच. हा साक्षात्काराचा तोच क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण आहे.''
*आज प्रकाशने कितीही मोठी झेप घेतली असली, तरी अजूनही चौपाटीवरची ती रात्र तो विसरलेला नाही. त्याचे पाय जमिनीवरच आहेत. आणि हेच त्याच्या यशाचं गमक आहे. तो पक्षाचा सच्चा अनुयायी आहेच, त्याचबरोबर अत्यंत अलिप्त, नेमस्त आणि शिस्तप्रिय हे त्याचे गुण अनुकरणीय आहेत.
इथवरच्या प्रवासात त्याच्या खांद्याला खांदा लावून प्राची उभी होती आणि आहे. तिच्यातही नेतृत्व गुण आहेतच. * पुण्याची Indira Institute of Management ही संस्था उभी करण्यात प्रिन्सिपॉल म्हणून तिचा सिंहाचा वाट आहे.
मात्र अनेक वेळा कुटुंबाची गरज म्हणून आपल्या करिअरमध्ये तिने एक पाऊल मागे घेतलं आहे, याची प्रकाशलाही जाणीव आहे. अशा एका प्रसंगाची मी साक्षीदार आहे, म्हणून ते नमूद करते. मोदी मंत्रीमंडळात खातेपालट होत होते. पॅरिस परिषदेत पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून प्रकाशची कामगिरी उत्कृष्ट झाली होती. तो विदेशातच होता. त्याला तातडीने बोलून घेण्यात आलं. त्याला बढती मिळाली होती. त्या वेळी प्राचीने शिक्षण संस्थांना सल्ला देणारी स्वत:ची कंपनी स्थापन केली होती. ती खूपच चांगली चालू होती. त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्यही आलं होतं. दूरदर्शनवर जेव्हा प्रकाशला बढती मिळत असल्याचं जाहीर झालं, तेव्हा मी प्राचीच्या घरीच बसले होते. खातं कोणतं ते माहीत नव्हतं. मी प्राचीला थट्टेत म्हटलं, ''मानव संसाधन मिळालं तर तुला तुझी कंपनी बंद करावी लागेल.'' योगायोग म्हणजे प्रकाशला तेच मंत्रालय जाहीर झालं. प्राचीला पक्षाच्या शिस्तीप्रमाणे तिची कंपनी बंद करावी लागली. शिक्षण क्षेत्रातलं प्रस्थापित झालेलं सर्व काम बंद करावं लागलं. त्याने हिरमोड करून न घेता, पुन्हा नव्याने दुसरी कंपनी अशा सर्व तरतुदींसह स्थापन केली, जी पक्षशिस्तीच्या आड न येता स्वतंत्र काम करू शकेल. आज तीही कंपनी उत्तमरीत्या चालू आहे.
प्राचीने एकहाती दोन्ही मुलांना वाढवलं असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. पण त्याच वेळी मुलांच्या मनात वडिलांबद्दल आदर राहील याबाबत ती दक्ष होती. सर्वस्व झोकून देत सगळया गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात म्हणून कामात व्यग्र राहणं हा प्रकाशचा स्वभाव आहे. मात्र तो घरी असला की पूर्ण वेळ मुलांचा असतो. त्यात प्राचीने जराही ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे मुलांचं आपल्या वडिलांशी मित्रत्वाचं घट्ट नातं तयार झालं आणि प्रकाशने घरगुती बाबतीत प्राचीला कधी दुखावलं नाही किंवा तिच्या निर्णयात कधी आडकाठी केली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात प्रत्येक जण स्वतःच्या कुवतीवर, हिमतीवर पूर्णतः वेगवेगळया क्षेत्रात यशाच्या पायऱ्या एका मागोमाग एक चढत आहेत. पण या कुटुंब-कमळाची प्रत्येक पाकळी आपल्या देठाला धरून आहे. जावडेकरांच्या घरासारखी 'पद्मालया'सारखी! आमीन!! स्वस्तु!!!
- मेधा
(प्रकाशशी मैत्र चाळीस वर्षं जुनं, त्यामुळे एकेरी संबोधनालाही इतकी वर्षं होऊन गेली. ती सवय मोडणं म्हणजे नातं दुरावल्यासारखं वाटतं. मोठया भाऊ-वहिनीशी असावं तसं प्राची आणि प्रकाश यांच्याशी माझं जिव्हाळयाचं नातं. सार्वजनिक ठिकाणी मी त्यांना आदराने संबोधलं, तरी हे लिखाण माझ्या व्यक्तिगत अनुभवांशी निगडित असल्याने विवेकी वाचकांनी माझी धृष्टता माफ करावी.)