लोकशाहीत जनता सत्तेची मक्तेदारी कुणाला कायमची देत नाही. जे जनतारुपी राजाला नाराज करतात, त्याचा विश्वासघात करतात, आणि त्याच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना राजा माफ करीत नाही. अंहकाराच्या फेऱ्यात मला नको तुला नको, घाल कुत्र्याला असे म्हणून राष्ट्रपती राजवटीचा पर्याय जर स्वीकारला गेला तर राजाच्या हातात असलेला पर्यायाला सामोरे जावे लागेल. जनताजनार्दन प्रेमानेही हात वर करतो आणि दाबण्यासाठीही हात वर करतो. आपल्याला कोणता हात हवा आहे, याचा विचार, आज भांडण करणाऱ्यांनी करावा. राजाला फार काळ नाराज ठेवणे म्हणजे उद्या आपल्यावरच संकट ओढावणे आहे, याचे भान ठेवावे.
राजाची इच्छा अशी आहे की, पुढील पाच वर्षे तुम्ही राज्य करा. ते तुम्ही कसे करता हे आम्ही बघू. नीट केले तर त्याचे चांगले फळ मिळेल. आपआपसात भांडून, शिव्या-शाप देत केले तर त्याचेही फळ मिळेल. चांगल्या-वाईटाचे फळ मिळणारच.
राज्य करण्यापूर्वीच जनतारुपी राजाने त्यांना सत्तेचे अधिकार दिले, ती मंडळी आपआपसात भांडत बसली आहेत. तू मोठा की मी मोठा? मुख्यमंत्री तू होणार की मी होणार? सत्तेत आम्हाला सहभाग किती मिळणार? 50% देता की नाही बोला? न दिल्यास आमचे इतर मित्र आहेत, त्यांना बरोबर घेऊ आणि राज्य करु.
जनता हे सर्व पाहते आहे. आपण ज्यांना राज्य करण्यासाठी निवडून दिले, ते अजूनही मंत्रीमंडळही बनवित नाहीत. एकमेकांवर कुरघोडया करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतारुपी राजाचा विचार केल्यास या राजाला स्थिर सरकार पाहिजे आहे, काम करणारे सरकार पाहिजे आहे, भ्रष्टाचार न करणारे सरकार पाहिजे आहे, जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे सरकार पाहिजे आहे.
चित्र काय दिसते? परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक मंदी आहे. रोजगार कमी झाले आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होत चालल्या आहेत आणि ज्यांनी राज्य करायचे ते मंत्रीमंडळ बनविण्यापूर्वीच भांडण करीत बसले आहेत. लग्न होण्यापूर्वीच होणाऱ्या नवरा-बायकोने कडाक्याचे भांडण करायला सुरुवात केली तर पुढे त्यांचा संसार कसा होणार? हे कुणी सांगण्याची गरज नाही.
राजा नाराज आहे. मोठया अपेक्षेने त्याने दुसऱ्यांदा राज्य करण्याचे बळ दिले. त्याचा आदरपूर्वक स्वीकार करुन, आपआपसात बसून, मार्ग काढून, राज्याचा गाडा आतापर्यंत चालायला पाहिजे होता. तसे काही झालेले नाही. राजाच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की, पुन्हा संधी देऊन आपण काही घोडचूक तर केली नाही ना? अपात्र लोकांच्या हातात सत्ता दिलेली नाही ना? तो नाराज आहे आणि चिंतित आहे.
सत्ताप्राप्तीसाठी नको त्या लोकंची संगत करण्याचे मनसुबे काहीजणांच्या मनात आहेत. जनादेश म्हणजे राजाची इच्छा असे करण्याची अनुमती देत नाही. परंतु राजाला फाटयावर मारुन जे करु नये, ते करण्याचे धाडस काहीजण करु इच्छितात. तसे झाले तर तो राजाचा विश्वासघात होईल. आणि विश्वासघातक्याला राजा क्षमा करीत नाही. महाराष्ट्रातील एका फार मोठया नेत्याची प्रतिमा विश्वासघातकी अशी झालेली आहे. त्याला राजाने कधीही मोठे बळ दिलेले नाही, आताही दिलेले नाही. विश्वासघाताचा मार्ग खड्डयात घेऊन जाणारा असतो. नको त्यांची संगत करुन राजलक्ष्मी काही काळ प्राप्त करता येईल.
शील विकून प्राप्त केलेली राजलक्ष्मी फार काळ राहत नाही. एका राजाने दानात आपले शील दिले. थोडया वेळाने सरस्वती त्याच्या घरातून गेली. तिला जाताना राजाने विचारले,''तू मला का सोडून चाललीस?'' ती म्हणाली,'जेथे शील तेथेच मी राहते.'' नंतर काही काळानंतर राजलक्ष्मी घरातून निघाली. राजाने तिलाही तोच प्रश्न विचारला. तिने उत्तर दिले,''जेथे शील तेथे मी राहते.'' जनतारुपी राजाची इच्छा आपले शील ठेवून राज्य करावे अशी आहे.

-रमेश पतंगे