सर्वसमावेशी व्यासपीठ

04 Nov 2019 14:53:01

 

जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या पुरुष-महिलेपासून ते गरीब, श्रीमंत, उच्चशिक्षित, अर्धशिक्षित, शहरी, ग्राामीण अशा वेगवेगळया थरांतील लोकांना ह्या सोशल मीडियाने ओळख दिली, त्यांना व्यासपीठ दिले. एक असे व्यासपीठ, जिथे ओळखी, वशिले, पैसा यांच्यापेक्षा तुमच्यातील गुणवत्ता महत्त्वाची होती.


 

 1980च्या दशकात अमेरिकेने त्यांच्या महासंगणकाचा परवाना भारतास देण्यास नकार दिला आणि स्वदेशी बनावटीची भारतीय संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी C-DACची स्थापना झाली. पुढे डॉ. विजय भटकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने अमेरिकेच्या 'क्रे' या महासंगणकापेक्षा कमी खर्चात परंतु अठ्ठावीस पट शक्तिशाली अशा 'परम' सुपरकॉम्पुटरची निर्मिती केली व संगणक निर्मितीत भारत स्वायत्त झाला. 

 

पुढल्या पाच वर्षांतच भारतात इंटरनेट सेवाही उपलब्ध झाली आणि भारताच्या संगणक क्रांतीची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली गेली. काही कालावधीतच विदेश संचार निगमने इंटरनेटद्वारे देशातल्या लहान-मोठया शहरांना आभासीरित्या जोडले. भारतात इंटरनेट सेवा उपलब्ध होऊन तीन वर्षे झाली नाहीत, तोवर याहूच्या इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिसने जगभरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. विनाखर्च आंतरराष्ट्रीय कॉल, कुठल्याही प्रकारच्या डिजिटल डेटाचे जगभरात वितरण किंवा गप्पागोष्टी करण्यासाठी चॅट रूम्स, तसेच समोरील व्यक्ती पाहण्यासाठी वेब कॅमने जग ह्या इंटरनेटच्या जाळयात कायमचे ओढले गेले व भारतात गल्लोगल्ली इंटरनेट सायबर कॅफेजचे पेव फुटले. 

वर्षा-दोन वर्षांपूर्वी कॉलेजात आपल्याबरोबर शिकणाऱ्या मुलीला साधे नाव विचारायला धजावणारा तरुण आता चॅट रूममधल्या अनोळखी व्यक्तींना बिनधास्तपणे वय, लिंग, पत्ता विचारून संवाद साधू लागला. त्याशिवाय आबादुबी, लगोरी, क्रिकेटने दुमदुमणारे गल्लीबोळ अचानक शांत झाले, सायबर कॅफेतल्या अंधाऱ्या खोल्यांत ऑनलाइन गेमिंगमध्ये बालपण हरवले. ह्या संवादांच्या अथवा आभासी मनोरंजनाच्या दालनांनी जग जवळ आले, मात्र कुटुंब काहीसे विसकळीत, एकाकी झाले!

 ऑफिसातल्या टेबलांवरही टाइपरायटर, कॅल्क्युलेटर, फोनऐवजी चौकोनी राखाडी खोके व इंग्लिश मुळाक्षरांच्या पट्टया दिसू लागल्या. टेबलावरच्या धूळ खात पडलेल्या फायली डेस्कटॉपच्या स्क्रीनवर विखुरल्या. संगणक, नोकरी मिळवण्यासाठीच नव्हे, तर आहे ती नोकरी टिकवण्यासाठीही अपरिहार्य झाला. कॉम्पुटर इंजीनिअरिंग हा नवा शैक्षणिक पर्याय थेट अमेरिकेत 'सेटल' होण्याचा खात्रीचा मार्ग बनला. गल्लोगल्ली कॉम्प्युटर क्लासच्या जाहिरातीत 'इथे इंटरनेट, ई-मेल शिकवले जाईल' असे ठळक अक्षरात लिहिले जाऊ लागले. ह्या निर्जीव यंत्राशी सवांद साधण्यासाठी वेगवेगळया भाषा 'रचण्याची' व ती शिकण्याची चुरस लागली. ह्यात इंग्लिश भाषेला प्राधान्य मिळाले, मराठी व इतर प्रादेशिक भाषा मागे पडत गेल्या, मातृभाषेतून शिक्षण काहीसे गौण मानले जाऊ लागले. 

इंग्लिशची अक्षरओळख अपरिहार्य झाली. जग जवळ येऊ लागले तसे सरकारी देणगीवर चालणाऱ्या शाळांपेक्षा नावाने 'इंटरनॅशनल' असलेल्या इंग्लिश शाळांना पालक पसंत करू लागले. मात्र सोशल मीडियावरच्या आभासी मूक संवादात, लोकांचे नजरेला नजर देऊन करण्यात येणारे संभाषण कौशल्य हळूहळू फिके पडू लागले.

पुढे गूगलने तर जगभरातील ज्ञात असलेल्या माहितीचा पेटाराच आपल्या सगळयांसमोर उघडला. ह्या 'सर्च विंडोच्या' माध्यमातून सर्वांना जैविक उत्पत्तीपासून आकाशगंगेपर्यंत अवघ्या ब्रह्मांडाचे दर्शन होऊ लागले. देश-विदेशची संस्कृती, इतिहास, नवे शोध, राजकीय सामाजिक घडामोडी ह्याचे जणू एक वैचारिक मंथन घडू लागले.

 पण ह्या सगळयाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध झाल्यावर सोशल नेटवर्किंग साइट्सनी आपले हातपाय भारतभर पसरले, त्यानंतर! याहू, ऑर्कुटची जागा तत्काळ प्रतिसाद मिळवून देणाऱ्या फेसबुक, ब्लॉग, टि्वटर यांनी घेतली. मैत्रीचे दालन पुन्हा एकदा नव्या वेशात आपल्या समोर आले. 

अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे व्यासपीठ बनले. आपल्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडी ते राजकीय उलाढाली, मनातील कोलाहल ते वैचारिक सखोल मांडणीची हक्काची जागा म्हणजे हे सोशल नेटवर्किंग. या सोशल नेटवर्कने अनेक सामान्य तसेच कसलीही सबळ पार्श्वभूमी नसलेल्या अनेक घरातून निवेदक, लेखक, अभिनेते, चित्रकार, नर्तक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यवसायिक... अगदी म्हणाल ते निर्माण केले. कालपर्यंत गल्लीत कोणाला माहीत नसलेली व्यक्ती रातोरात देशपातळीवर गाजू लागली.



-
माहितीचा महासागर

- मोफत शिक्षण व अध्ययनाची संधी

- कलेच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ

- दोन समविचारी अनोळखी व्यक्तींमध्ये मैत्रीसाठी कारणीभूत

- आपत्तींमध्ये शेकडो मदतीचे हात

- आपल्या परिघाबाहेरील क्षेत्रांविषयी व्यक्त होण्याची संधी

- सरकारकडून असलेल्या अपेक्षा, प्रस्ताव मांडण्याचे सामान्य जनतेचे व्यासपीठ

 

तर सोशल नेटवर्क हे नुसतेच माहितीचे अथवा गप्पा मारण्याचे नव्हे, तर नवनव्या भाषा, वाद्य, नृत्य, स्पर्धा परीक्षांचे मोफत शिक्षण व अध्ययनाचे अग्राणी ठिकाण बनले. मोठमोठया महाविद्यालयांचा ऑनलाइन ग्रांथसंचय जगभरातील वाचकांसाठी उपलब्ध झाला. घरबसल्या देशविदेशातील प्रेक्षणीय स्थळेच नव्हे, तर समुद्राच्या तळाशी, पृथ्वीच्या गर्भात काय दडलेय हे पाहणे सहज शक्य झाले. पाककलेत रस असणाऱ्या माझ्यासारख्या खवय्यांना देशविदेशच्या पाककृती चुटकीसरशी उपलब्ध झाल्या. 

देशविदेशातील खाद्यसंस्कृती, तिथल्या भाषा, जीवशैली, पेहराव ह्याविषयी कुतूहल निर्माण झाले, अनुकरण केले जाऊ लागले. कित्येकांना सोशल मीडियावर ह्याविषयी वाचताना, व्यक्त होताना रोजगार-व्यवसायाची नवी दिशा लाभली. ऑनलाइन शॉपिंगच्या नावाने अब्जावधी रुपयांची नवी बाजारपेठ उपलब्ध झाली.

जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या पुरुष-महिलेपासून ते गरीब, श्रीमंत, उच्चशिक्षित, अर्धशिक्षित, शहरी, ग्राामीण अशा वेगवेगळया थरांतील लोकांना ह्या सोशल मीडियाने ओळख दिली, त्यांना व्यासपीठ दिले. एक असे व्यासपीठ, जिथे ओळखी, वशिले, पैसा यांच्यापेक्षा तुमच्यातील गुणवत्ता महत्त्वाची होती. 

 

पंधरा-वीस वर्षांपूर्वी या देशातील वृत्तपत्रे, मासिके, प्रकाशन संस्था, इलेक्ट्रॉनिक मीडिया - थोडक्यात ज्याला आपण पारंपरिक व्यासपीठे म्हणू शकतो, ती - प्रतिष्ठित मंडळींनी आपल्या प्रभावाच्या जोरावर ताब्यात ठेवली होती, त्या वर्तुळात प्रवेश करणे हे सामान्य माणसांसाठीच नव्हे, तर भल्याभल्यांसाठी चक्रव्यूह भेदण्यापेक्षा कठीण होते.

 
वर्तमानपत्रात, मोठमोठया मासिकांमध्ये छापले/बोलले जाते ते म्हणजे सत्य, ह्या सामान्य माणसाच्या भोळयाभाबडया समजाला खऱ्या अर्थाने सुरुंग लागला तो सोशल मीडियामुळे! ह्या इंटरनेटच्या माध्यमाने वस्तुस्थिती आणि बातमी यातली तफावत उघड करून वाचकांपर्यंत सत्य पोहोचवणे सहज शक्य झाले. लोकशाहीचा पाया असलेल्या निवडणुकीत सोशल मीडिया 'गेम चेंजर' ठरू लागले. टि्वटरसारख्या माध्यमातून राजकीय नेते, अधिकारी सामान्य जनतेशी थेट जोडले गेले. सरकारकडून असलेल्या अपेक्षा, प्रस्ताव सामान्य जनता ह्या व्यासपीठावर मांडू लागली. 

 

 

सोशल नेटवर्कमुळे नेते, अभिनेते, साहित्यिक, पत्रकार कुणाचेही गैरवर्तन, चुकीचे खोटे वक्तव्य सामान्य जनतेच्या तडाख्यातून आता वाचत नाही. कालपर्यंत पाकीट घेऊन खोटी बातमी लावणाऱ्या तथाकथित पत्रकाराचा बुरखा गल्लीबोळात बसलेली सामान्य व्यक्ती पुराव्यानिशी फाडते, तथाकथित विचारवंतांच्या विचारांमागचा छुपा समाजविघातक अजेंडा एखादी अभ्यासू व्यक्ती उघड करते आणि देशप्रेम, विवेकबुध्दी असलेले हे 'नेटिझन्स' अशा अभ्यासू व्यक्तींच्या प्रामाणिक प्रयत्नांना आपापल्या परीने पाठिंबा दर्शवतात.

सोशल नेटवर्कच्या माध्यमातून जेव्हा अशा सजग/अभ्यासू व्यक्तींच्या कृत्याला/मतांना समाजमान्यता मिळते, सकारात्मक जनमत तयार होते, तेव्हा पारंपरिक व्यासपीठांवर वर्षानुवर्षे ताबा ठोकून बसलेल्या संस्थानिकांना अचानक अस्वस्थ वाटायला सुरुवात होते. त्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय अशी अनुभूती होते ती याचमुळे! यातूनच त्या सामान्य व्यक्तीचे मनोधैर्य खच्ची करून त्याची परखड मते दाबण्यासाठी त्याला हिणवले जाते, शिव्या दिल्या जातात. स्वतःच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा असा चुकीचा वापर करून इतरांची गळचेपी करताना हे प्रस्थापित अनेकदा दिसतात. 

सोशल नेटवर्कची आणखी एक बाजू म्हणजे आपले व्यक्तिगत आयुष्य खुलेपणाने सोशल मीडियावर मांडणाऱ्यांना प्रेमाने प्रतिसाद देताना जसे लोक दिसतात, तसाच ह्या माहितीचा गैरफायदा घेतला जाऊन, लुबाडले गेल्याच्याही घटना काही वेळा समोर येतात. आर्थिक मदत मागणे व त्याची परतफेड न करणे, ब्लॅकमेल करून शारीरिक संबंधांची मागणी करणे, अश्लील फोटो, मेसेज पाठवून मानसिक छळ करणे, श्रीमंतीचा बनाव करून लग्नसंबंध प्रस्थापित करणे असे प्रकार घडतात.

तर दुसरीकडे ह्याच सोशल मीडियामुळे जिवाभावाचे मैत्रही जोडले गेले आहेत. दोन अनोळखी व्यक्तींमध्ये पराकोटीचा वितंडवाद घालून देणारे हे आभासी जग दोन समविचारी अनोळखी जिवांना एकही करते. शाळेच्या वाटेवरून अचानक बेपत्ता झालेले लहान मूल सोशल मीडियामूळे सुखरूप घरी आणून सोडले जाते. रोज आपल्या पोस्टमधून हसरी खेळकर वाटणारी व्यक्ती अचानक ह्या आभासी जगाचा प्रत्यय आल्याने निराश होऊन आत्महत्येचा निर्णय घेते आणि त्या जिवाला वाचवण्यासाठी हेच आभासी जग आटोकाट प्रयत्न करते. दूर परदेशी राहणाऱ्या लेकीचे सुख ह्या इंटरनेटच्या माध्यमातून आज एखादा म्हातारा डोळे भरून पाहतो. जगाच्या दोन टोकांना स्थायिक झालेले सुहृद व्हिडिओ कॉलिंगमुळे सुखदुःखात कायम साथ देत राहतात. तेवढेच का, तर नुकत्याच झालेल्या पूरग्रास्त परिस्थितीमध्ये सोशल नेटवर्कच्या माध्यमातून कोटयवधी रुपयांची मदत संपूर्ण महाराष्ट्रातून गोळा झाली, हे सुखद आहे. 


-
समाजमाध्यमांवरील माहितीचा गैरफायदा घेऊन फसवणुकीचे प्रकार

- प्रस्थापितांकडून सर्वसामान्यांना हिणवण्याचे, अभिव्यक्तीची गळचेपी करण्याचे प्रकार

- समाजविघातक माहितीचा, अफवांचा वेगाने प्रसार

 

अर्थात आपल्या सर्वांसाठी अद्यापही हे माध्यम नवीन असल्यामुळे अनेकदा होऊ नये त्या चुका घडत आहेत. परंतु एखादा सामान्य रिक्षाचालक सरकारच्या धोरणांवर सोशल नेटवर्कवर हिरिरीने बोलतो, कुणी सामान्य गृहिणी भारतीय रात्रभर जागून चांद्रयानाचे प्रक्षेपण बघते व त्यावर लिहिते, तसेच आर्ट्स शिकलेली एखादी सामान्य व्यक्ती वैज्ञानिक लेखांचा अभ्यास करून त्यावर माहितीपर लिखाण करते व सोशल मीडियाला केवळ करमणुकीचे साधन न मानता महितीच्या महासागरात सूर मारून आपल्या वैचारिक कक्षा रुंदावते, तेव्हा खात्री पटते की सोशल मीडियासारखे दुधारी शस्त्र वापरताना आपल्या हातून काही चुका होतील. पण आपण माणसे आहोत, आपल्या चुकांमधून आपण हळूहळू शिकतो आहोत, ते सगळे सकारात्मक आपण सर्व पुढेदेखील शिकू. स्वतःला सकारात्मक बदलू, अधिक प्रगतिशील दिशेकडे जाऊ.
 

वैयक्तिक अनुभव सांगायचा म्हटला, तर सोशल मीडियाच्या ह्याच आभासी जगाने मला वास्तव मैत्रीचा अत्यंत सुखद पैलू दाखवला. समाजात द्वेष पसरवू पाहणाऱ्या समाजकंटकांविरोधातील लढाईत हजारो अनोळखी लोकांनी अनेक प्रकारे मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. वैयक्तिक ओळखपाळख नसताना कुणी माझ्या सुरक्षेसाठी पत्रव्यवहार केले, तर कधी गाठभेट किंवा विशेष बोलचाल नसूनही माझ्या गंभीर आजारपणात मला भेटण्यासाठी अत्यंत दूरवर आले. कुठलेही सख्खे नाते नसताना अंतःकरणातून आलेल्या शुभेच्छांचे, आशीर्वादांचे फळ म्हणूनच आज मी हा लेख लिहू शकलो, एवढे नक्की.

 (समाजमाध्यम लेखक)


Powered By Sangraha 9.0