मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते.
1955चा काळ. राणीखेत या प्रदेशात 'रंगीन रातें' या चित्रपडाचे चित्रीकरण चालू होते. चित्रपटाचा नायक शम्मी कपूर. तेव्हा तो नवोदित होता. त्याच्यासमोर होती त्या वेळची प्रसिध्द नटी गीता बाली.
तेथील निसर्गरम्य वातावरण, त्याला शोभेशी चित्रपटात असलेली सुंदर गाणी, प्रेमकथा या पार्श्वभूमीवर ती आली, तिने पाहिले, ती जिंकली आणि हा पठ्ठया प्रेमात पडला. कसलेही दडपण न ठेवता त्याने सरळ तिथेच गीताला मागणी घातली. काही महिने वाट पाहण्यात गेले आणि जेव्हा तिचा होकार मिळाला, तेव्हा घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी मुंबईतील बाणगंगा येथील एका देवालयात पहाटे चार वाजता पुजाऱ्याला उठवून लग्न केले. नंतर घरच्यांचा आशीर्वाद घ्यायला घर गाठले. एका सिनेमात शोभेल असा हा प्रसंग. खात्री आहे की जेव्हा गीताने होकार दिला, तेव्हा याने जंगली या चित्रपटासारखीच 'याहू' आरोळी ठोकली असणार.
जशी शम्मी कपूरची प्रेमकहाणी सरळ आणि प्रामाणिक, तसेच त्याचे चित्रपट. त्यात श्रीमंत आणि गरीब यातील झगडा असायचा. शम्मीच्या वाटयाला श्रीमंत मुलाची भूमिका यायची. एवढा गोरागोमटा आणि धट्टाकट्टा, गरीब म्हणून शोभलाच नसता. सुंदर, गुणी पण गरीब नायिका, घरातून होणारा विरोध, तोंडाला लावायला खलनायक आणि या सर्वांच्या समवेत असायची सुरेल गाणी.
ही गाणी नायिकांच्या सुंदरतेची स्तुती करणारी. त्यांनी केवळ स्तुतीच केली नाही, त्यांना हृदयात बसवले, त्यांची पूजा केली, त्यांना लाडावून ठेवले, त्यांचा आदर केला, अफाट प्रेम केले आणि त्या प्रेमाने त्यांना जिंकले. चित्रपटसृष्टीत नायकाला जिथे नायिकेकडून 'अब हमें आपके कदमों मे यूं रहना होगा' हे गाणे ऐकायची सवय आहे, त्या जमान्यात शम्मी 'एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है वो कहने दो' सहज सांगून गेला.
जंगली या सिनेमाची कथा एका वाक्यात सांगता येईल - एका करारी, कडक, अरसिक माणसात केवळ प्रेमामुळे घडलेला बदल.
शेखर (शम्मी) परदेशातून परत येऊन वडिलांचा व्यवसाय ताब्यात घेतो. लहानपण एका करारी, शिस्तप्रिय आईबरोबर गेलेले असल्याने स्वभाव काहीसा आक्रमक आणि उध्दट.
तो काश्मीरला गेलेला असताना तेथील स्थानिक डॉक्टरची मुलगी राजकुमारीशी (सायरा बानू) त्याची भेट होते. तिचे हसणे, तिचे मार्दवी बोलणे याचा त्याला सुरुवातीला रागच येतो. चित्रपटात मात्र काही असे प्रसंग घडतात की राजकुमारी शेखरला बदलवण्याची जबाबदारी घेते. त्याचा संताप, त्याचे दुर्लक्ष करणे, ओरडणे याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. आतापर्यंत ज्या मुलींचा शेखरला अनुभव असतो, ज्या माणसांना त्याने पाहिलेले असते, त्याहून ही मुलगी वेगळी असते. तिची निरागसता, तिचे अनाघ्रात सौंदर्य, तिची आश्वासकता, तिचे आर्जव, तिचा अवखळपणा या साऱ्याच गोष्टी शेखरला आकर्षित करून घेतात. प्रेमाची ओळखही नसलेला शेखर राजच्या प्रेमात आकंठ बुडतो.
प्रेमाचा रस्ता मात्र सरळ नसतो. फुलांच्या पायघडयांवर चालताना काटयांचाही सामना करावा लागतो. शेखरची आई राजचा अपमान करते. पैशासाठी आपल्या मुलाला जाळयात अडकवल्याचा आरोप करते. तिच्या दुखावलेल्या मनावर फुंकर घालताना शेखर म्हणतो,
एहसान तेरा होगा मुझ पर
दिल चाहता है वो कहने दो
मुझे तुमसे मोहब्बत हो गयी है
मुझे पलको की छाँव में रहने दो
प्रेमात कृतज्ञतेला जागा असते का? खरे तर प्रेम समान पायावर असावे, मग त्या दोघांची समाजात जागा कुठेही असो. एकाची गरज जेवढी तीव्रतेने आहे, तेवढीच जर दुसऱ्याची नसेल, जर दोन्हीकडची ओढ सारखी नसेल, तर एकासाठी ते कृतज्ञतेचे आणि दुसऱ्यासाठी उपकाराचे ओझे होते. पण इथे अहंकाराला जागा नाही. ती निष्पाप आहे, हे त्याला माहीत आहे. आईला उलटून बोलणे जरी त्याला जमत नाही, तरीही तिचा अपमान त्याला सहन होत नाही. आपल्यात तिने जो बदल घडवून आणला, त्याची त्याला जाणीव आहे. एका अहंकारी माणसाच्या मनाला प्रेमाचा स्पर्श करण्याची जादू तिने केली आहे, याबद्दल तो कृतज्ञसुध्दा आहे.
तिचा राग हा काही रूठे रूठे पियाचा हा लटका राग नाही, म्हणून तो विनवतो,
तुमने मुझको हँसना सिखाया
रोने कहोगे रो लेंगे अब
ऑंसूँ का हमारे गम ना करो
वो बहते हैं तो बहने दो
आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारी अनेक माणसे असतात. या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या लोकांसाठी बरेच काही करतो, त्यांनी केलेले पाहतो, मनातून सुखावतो, पण ते सुख त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही. त्यांचे असणे एवढे गृहीत धरलेले असते की मनातल्या भावना मनात राहतात.
काळ कुणासाठीही थांबत नाही. दिवसाच्या उदरात काय दडले असते, ते सांगता येत नाही. जवळच्या माणसांशी साधलेला संवाद ही खरे तर सर्वात मोठी भेट असते. नाते टिकवणारी रेशीमगाठ असते.
मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते. यातला मोहब्बत हा शब्द तर रफीजींनी किती वेगवेगळया तऱ्हांनी गायला आहे.
याच चित्रपटातले 'चाहे कोई मुझे जंगली कहे' हे गीत अतिशय प्रसिध्द आहे. तरीही चित्रीकरण, शब्द, सूर आणि अभिनयाच्या अंगांनी विचार केला, तर हे गीत बाजी मारून जाते. याच गीतात लक्षात येते की, एका जंगली माणसाला प्रेमाने पूर्ण बदलवले आहे. ह्या गीतातील प्रेमाचा उघड इजहार इतका हळुवार आहे की नायिकेचा रागसुध्दा त्या सुरांनी वितळतो.
हे गीत फक्त रफीजींच्या आवाजात रेकॉर्ड होणार होते. त्या सुरांची मोहिनीच एवढी अफाट की परत लताजींच्या आवाजात रेकॉर्ड करायचा मोह शंकर-जयकिशन यांना टाळता आला नाही.
आईच्या हट्टापुढे नमून शेखर, राजशी लग्न न करण्याचे वचन देतो खरा, पण त्याच वेळी ती सोडून कुणाशीही लग्न न करण्याची शपथ घेतो. अशा प्रियकरावर जीव ओवाळून टाकावासा कुणाला वाटणार नाही! प्रेमाचे हे उदात्त दर्शन दिपवून टाकणारे. नवल नाही की नायिकासुध्दा त्या सुरांत सूर मिळवताना म्हणते,