राजकारण पोरखेळ नसतो, हे पुन्हा एकदा सिध्द झालं. शनिवारी पहाटे महाराष्ट्राच्या राजकरणात जी घटना घडली, त्यातून अशा अनेक गोष्टी सिध्द झाल्या आहेत. उदाहरणार्थ, स्वाभिमान स्वत्व टिकवतो परंतु, स्वाभिमानाची जागा अहंकाराने घेतली की घात होतो. हा घात अन्य कुणी करण्याची गरज नसते, आपण स्वतःच स्वतःचा घात करत असतो. शिवसेनेच्या रूपाने हेच दिसून येतं. तब्बल तीन-तीन दशकं भाजपने शिवसेनेशी युती केली, शिवसेनेच्या कुरबुरी - रुसवेफुगवे सांभाळून घेत ती युती टिकवली. परंतु, शिवसेना सुधारण्याऐवजी आणखी बिघडत बहकत गेली. मात्र त्यावेळी आपल्यासमोर असलेला भाजप हा मोदी आणि शहांचा पक्ष आहे, हे मात्र शिवसेना विसरली. गेल्या पाच वर्षांत सेनेचे शेकडो अपराध भाजपने माफ केले. पोरगं आज सुधारेल - उद्या सुधारेल म्हणत वाट पाहिली. अखेर संयमाचा कडेलोट झाला आणि मग जे काही व्हायचं ते झालंच. अचानक 'सर्जिकल स्ट्राईक' झाला आणि सारा पोरखेळ क्षणात समाप्त झाला.
या सगळयात कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे ते देवेंद्र फडणवीस यांचं. अर्थात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं! ज्या संयमाने त्यांनी ही सर्व परिस्थिती हाताळली त्याला तोड नाही. विधानसभेचा निकाल लागला आणि भाजपविरोधकांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जणू एक मोठी मोहीमच सुरू केली. मग वेगवेगळया 'थिअरीज' मांडल्या जाऊ लागल्या. देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये कसे एकाकी पडले आहेत, केंद्रीय भाजपनेच कसं फडणवीस यांना एकटं पाडलं आहे, उध्दव ठाकरे - शरद पवारांनी निवडणुकीच्या आधीपासूनच ठरवून कसं फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला भाग पाडलं, 'पवारसाहेबां'नी भाजपला कसा इंगा दाखवला वगैरे वगैरे. मग पध्दतशीर 'मीडिया ट्रायल' होऊ लागली. त्याचसोबत शिवसेना, कॉंग्रेस - राष्ट्रवादीचं 'महाशिवआघाडी'चं/ 'महाविकासआघाडी'चं सरकार स्थापन होणार, अमुक मुख्यमंत्री होणार, अमुक उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होणार इत्यादी. देवेंद्र फडणवीस आणि भाजप या सगळयात शांत राहिले. शिवसेना, उध्दव ठाकरे - संजय राऊत, कॉंग्रेस - राष्ट्रवादी, माध्यमं, समाजमाध्यमांवरील स्वयंघोषित राजकीय विश्लेषक, सर्वांची टीका सहन करत राहिले. आणि, योग्यवेळी भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेतृत्वाने मिळून असा काही 'सर्जिकल स्ट्राईक' केला, की भलेभले मी मी म्हणणारे वाहून गेले. शनिवार, दि. 23 नोव्हेंबरची सकाळ महाराष्ट्राच्या चांगलीच लक्षात राहील. मोजकी वीस-तीस माणसं वगळता बहुतेकांची सकाळ ही धक्क्यानेच झाली असेल. अर्थात, काहींची सुखद धक्क्याने तर काहींची दुःखद. शपथविधीनंतर शनिवारी दुपारी शरद पवार व उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या दोघांची व दोघांच्या आजूबाजूला बसलेल्यांची देहबोली, त्यांचं बोलणं पाहिल्यावर कुणाला किती, कसे धक्के बसले असतील, ते लक्षात येतं.
अजित पवार यांनी पक्षाला अंधारात ठेवून, मला विश्वासात न घेता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं शरद पवार म्हणाले. शिवाय, 54 आमदारांच्या सह्यांची वेगळयाच कारणासाठी केलेली यादी अजितदादांनी दाखवली असल्याचेही शरद पवार म्हणाले. आता यानंतर राष्ट्रवादीकडून अजित पवारांवर कारवाई होईल, त्यांना व त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांना पक्षातून काढून टाकण्यात येईल, अजित पवार गट राष्ट्रवादी सोडून वेगळा काही गट किंवा पक्ष वगैरे स्थापन करेल, किंवा या सगळयातील काहीच होणार नाही, किंवा याहून अजून काहीतरी वेगळंच होईल. राज्याच्या सध्याच्या राजकारणात काहीच अशक्य नाही. परंतु, या सगळयातून हे मात्र सिध्द झालं की दहा-बारा जागा वाढल्यामुळे लगेच शरद पवारांच्या राजकारणाचं कोडकौतुक करायला सुरुवात झाली असली तरीही, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर पवारांच्या राजकारणाच्या मर्यादा पुन्हा एकदा सिध्द झाल्या आहेत. याशिवाय, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते धनंजय मुंडे हेही या सगळया चित्रात कुठेच नव्हते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. किंबहुना, निवडणुकीच्या वेळी चांगलेच चर्चेत असलेले हे दोन्ही नेते, अजित पवार आणि धनंजय मुंडे, निकालानंतर शिवसेनेसोबत सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू झाल्यानंतर जणू गायबच झाल्यासारखे वाटत होते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. कॉंग्रेस - राष्ट्रवादी मिळून गेले पंधरा-वीस दिवस नुसतेच बैठक-बैठक खेळत असताना अजित पवार त्यात शरीराने तर दिसत होते परंतु, मनाने दिसत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात अचानक कुठे बिनसलं हा प्रश्न निर्माण होतो. किंबहुना बिनसायला आधीपासूनच सुरुवात झाली होती आणि आता केवळ ते उघडपणे स्पष्ट झालं, हाही प्रश्न आहे. याची बीजं कदाचित लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीमध्ये आणि निकालात आहेत, असा एक मोठा मतप्रवाह आहे. माढा मतदारसंघातून शरद पवारांनी स्वतः उभं राहण्याबाबत सुरुवातीला हवा करण्यात आली. मग कुटुंबातून कितीजणांनी उभं राहायचं म्हणून पवारांनी अप्रत्यक्षपणे मी की पार्थ पवार असा प्रश्न पक्षात उभा केला. पार्थ पवारांना निरुपायाने उमेदवारी द्यावी लागत आहे, अशाप्रकारचा छुपा संदेश पक्षात पोहोचवण्यात आला. या सगळया कालावधीत पवार कुटुंबात अजितदादा आणि शरद पवार-सुप्रिया सुळे अशा दोन बाजूंत जोरदार खटके उडाले असल्याचंही म्हटलं जातं. या सगळयाची परिणती पार्थ पवार पराभूत होण्यात झाली. अर्थात, त्यांचा पराभव तसाही होणारच होता परंतु, त्यात राष्ट्रवादीअंतर्गतही विशिष्ट गटाकडून खतपाणी मिळाल्याचं दिसून आलं. याशिवायही वेळोवेळी अजित पवारांचे पंख छाटण्याचे प्रयत्न झाले. त्यातून पुढे शरद पवारांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने अजित पवारांचं आमदारकीच्या राजीनाम्याचं नाटय घडलं. राष्ट्रवादीमध्ये सर्व आलबेल असल्याचं पवार कुटुंबिय कितीही सांगत असले तरी वास्तव काही वेगळं असल्याचं जाणवत होतं. त्यावर अजित पवार रातोरात उपमुख्यमंत्री झाल्याने शिक्कामोर्तब झालं इतकंच.
आता 30 नोव्हेंबरपर्यंत भाजपच्या या नव्या सरकारला बहुमत सिध्द करावं लागेल. तोपर्यंत काय घडतंय, यावर राज्याच्या राजकारणाची पुढील वाटचाल स्पष्ट होईल. शरद पवार - उध्दव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगोलग काँग्रोस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. तीन पक्ष एकत्रित यायचं म्हणत होते, पैकी