‘तपस्या’ ते ‘समर्पण’सेवादर्शनाचा विस्तारलेला कॅनव्हास

16 Nov 2019 13:26:53

 

‘तपस्या’ या मालिकेद्वारे महाराष्ट्रातील सेवा कार्याचे दर्शन घडवल्यानंतर आरुषा क्रिएशन्स ही संस्था त्याच धर्तीवर ‘समर्पण’ ही हिंदी मालिका सुरू करत आहे. देशभरातील विविध संस्थांच्या सेवा कार्याचा परिचय करून देणारी ही मालिका दूरदर्शनवर 17 नोव्हेंबरपासून दर रविवारी सकाळी 10 वाजता प्रदर्शित होणार आहे.

आजच्या व्यावसायिक युगात सामाजिक क्षेत्रालाही व्यावसायिकतेचा स्पर्श झाला आहे. किंबहुना हजारो सामाजिक संस्था केवळ अनुदान-देणग्या यांच्या अपेक्षेने उभारल्या जातात. न जाणो कित्येक संस्था केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहेत. त्यामुळे सामाजिक संस्थांच्या विश्वासार्हतेबाबत शंकेचे वातावरण दिसते. या नकारात्मक वातावरणातही सामाजिक जाणिवेने जनसेवेलाच ईश्वरसेवा मानून त्या कामी आपले आयुष्य पणाला लावणारे ध्यासपंथी आणि त्यांच्या संस्था आशेचे किरण ठरत आहेत. अशा संस्था संख्येने कमी असल्या, तरी समाजातील महत्त्वाच्या समस्यांवर सकारात्मक उत्तर शोधण्याचे काम त्या करताना दिसतात. या संस्था सुरू करणारे आणि त्यांचे कार्यकर्ते या कामात आपले सर्वस्व वाहून देत असल्याचे दिसते. त्यांच्या समर्पणातूनच सेवा कार्याचे यज्ञकुंड धगधगत राहिले आहे. कोणत्याहीं प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणार्‍या या संस्था आहेत. मात्र त्यांचे काम लोकांसमोर आले, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि या यज्ञकुंडातून अनेक ज्योती तेवत राहतील या आशावादाने ‘आरुषा क्रिएशन्स’ ही निर्मिती संस्था सातत्याने प्रयत्न करत राहिली.

खरे तर निर्मिती क्षेत्र हे पूर्णपणे व्यावसायिक क्षेत्र आहे. मात्र व्यावसायिक फायद्याचा विचार न करता चांगले काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरुषा क्रिएशन्स आणि तिचे निर्माते एकनाथ सातपूरकर करत असलेली धडपड कौतुकास्पद आहे. सातपूरकरांची संवेदनशील वृत्ती आणि सामाजिक जाणीव त्यासाठी कारणीभूत आहे. यापूर्वी सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार्‍या ‘तपस्या’ या मालिकेच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित झाले. महाराष्ट्रातील विविध सेवाभावी क्षेत्रांत काम करणार्‍या संस्थांचा परिचय करून देणारी ही मालिका होती. तिची कल्पना कशी सुचली? याविषयी सातपूरकर सांगतात, “आरुषा क्रिएशन्सने सुरुवातीला काही व्यावसायिक डॉक्युमेंटरींची निर्मिती केली होती. त्यात काही सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांच्या डॉक्युमेंटरींचाही समावेश होता. झारखंडमधील नवभारत जागृती केंद्र या संस्थेच्या डॉक्युमेंटरीचं चित्रीकरण चक्क नक्षलवादी भागात झाले होते. चित्रीकरणादरम्यान त्या टीमवर नक्षलवादी हल्लाही झाला होता. तरीही टीमने डॉक्युमेंटरीचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. तोपर्यंत त्या संस्थेचे काम फार कुठे प्रसिद्ध नव्हते. या डॉक्युमेंटरीला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. तिच्या सीडीच्या प्रकाशनाच्या वेळी विलासराव देशमुख यांनी 5 लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. डॉक्युमेंटरी पाहून अनेकांनी संस्थेला मदत केली होती.

या अनुभवानंतर आमच्या टीमच्या अनौपचारिक गप्पांमध्ये या माध्यमाच्या ताकदीविषयी चर्चा झाली. जर या माध्यमाद्वारे एखाद्या संस्थेचे सकारात्मक कार्य प्रकाशात येेऊन तिला अशा प्रकारे चांगला प्रतिसाद मिळत असेल, तर महाराष्ट्रात अशा अनेक संस्था आहेत, ज्यांचे काम प्रकाशात येण्याची गरज आहे. त्यातूनच आम्हाला ‘तपस्या’ची कल्पना सुचली.”


 
एकनाथ सातपूरकर,निर्माते, आरुषा क्रिएशन्स 

2009 साली दूरदर्शनवर ही मालिका सुरू झाली. 52 भागांच्या या मालिकेत सामाजिक क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणार्‍या संघ परिवारातील आणि परिवाराबाहेरील 50 संस्थांचा परिचय करून देण्यात आला. ‘तपस्या’ मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेच्या एकत्रित डीव्हीडीचं लोकार्पण करण्यात आलं. सरसंघचालक मोहनजी भागवत या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व 50 संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘तपस्या’च्या यशानंतर अधिक मोठ्या कॅन्व्हासवर हा उपक्रम हाती घेण्याची कल्पना सातपूरकरांना सुचली. महाराष्ट्राप्रमाणेच अखिल भारतीय स्तरावरील संस्थांसाठी अशाच प्रकारची हिंदी मालिका करण्याची चर्चा झाली. गेली 3 ते 4 वर्षे ‘आरुषा’ची टीम ‘समर्पण’ या हिंदी मालिकेच्या निर्मिती प्रकल्पावर काम करत आहे. त्यासाठी ग्रामविकास, शिक्षण, गोसेवा, वनवासी कल्याण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रात काम करणार्‍या देशभरातील 1000-1500 सामाजिक संस्थांचा डेटा तयार करण्यात आला. प्रत्येक राज्यातील 3-4 संस्थांची निवड करून त्यांचा परिचय या मालिकेत करून देण्यात येणार आहे. अर्थात यातही संघ परिवारातील अनेक संस्थांचा समावेश आहे. ‘समर्पण’ मालिकेचे दहा भाग तयार आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड तसेच दिल्ली या राज्यांतील संस्थांचा समावेश असणार आहे. यांपैकी काही संस्थांविषयी उदाहरणदाखल सांगायचे, तर बंगळुरू येथील ‘अरुण चेतना’ ही संस्था दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी काम करते. तसेच कर्नाटकातील हिंदू सेवा प्रतिष्ठानद्वारे अनाथ, निराधार मुलांसाठी ‘नेल्ले’ (नेल्ले म्हणजे घर) हा प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पाची बंगळुरूत सात केंद्रे आहेत. त्यांपैकी चार केंद्रे मुलांसाठी, तर तीन केंद्रे मुलींसाठी आहेत. सर्व केंद्रांत मिळून सुमारे 250 निराधार बालकांची सर्व प्रकारची देखभाल, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते. महाराष्ट्रात सोलापुरातील ‘उद्योगवर्धिनी’ ही संस्था स्त्री-सक्षमीकरणाच्या यशस्वी प्रयोगासाठी ओळखले जाते. या आणि अशा अनेक संस्थांचा प्रवास या मालिकेद्वारे उलगडणार आहे.

दूरदर्शनने ही मालिका स्वीकारली असून 17 नोव्हेंबरपासून दर रविवारी सकाळी 10 वाजता ही मालिका प्रदर्शित होणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणारा पहिला भाग ‘समर्पण का करीत आहोत’ हे सांगणारा, म्हणजेच ही संकल्पना उलगडून सांगणारा असणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या भागाचे निवेदन केले आहे. तसेच अभिनेते-लेखक अभिराम भडकमकर यांनी पटकथालेखन केले आहे. शिवाय मनोज जोशी, परेश रावल, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर आदी मंडळीदेखील ‘समर्पण’च्या वेगवेगळ्या भागांत निवेदक म्हणून दिसतील.

https://www.youtube.com/watch?v=9gReQsuql0g 

एकूण 52 भागांची ही मालिका असणार असून या प्रकल्पाच्या वेगवेगळ्या कामांत मोठी टीम गुंतलेली आहे. उदय जोगळेकर आणि ऋषिपाल गढवाल यांनी मालिकेसाठी संशोधन कामाचा भार सांभाळला आहे, तर प्रसाद पत्की, चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या मालिकेच्या शीर्षक गीतालाही दिग्गजांचा परीसस्पर्श आहे. अशोक पत्की यांनी त्यासाठी संगीत दिले असून सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांच्या आवाजात ते गीत ऐकायला मिळणार आहे. त्याशिवाय संघाचा सेवा विभाग आणि राष्ट्रीय सेवा भारती (दिल्ली) ही शिखर संस्था या मालिकेच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करत आहे.

हे ‘समर्पण’ देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या सामाजिक जाणीवा जागृत करेल, नुसत्याच प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा उत्तरांचा शोध घेण्याची वृत्ती निर्माण करेल अशी आशा आहे.

नुसतंच सामाजिक संस्थांचं काम मांडण्यापेक्षा यातील सेवाभाव समाजात पोहोचवणं आणि त्यात सहभागी होण्यासाठी लोकांना प्रेरित करणं हा या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश आहे, ज्यामुळे अशा कामांच्या देशभरात अनेक आवृत्त्या तयार होऊ शकतील.

 -एकनाथ सातपूरकर,निर्माते, आरुषा क्रिएशन्स

 
 
Powered By Sangraha 9.0