हा देश म्हटला की अफगाणिस्तानापासून ते ब्रह्मदेशापर्यंत एक विशाल आणि अखंड प्रतिमा मनात उभी राहते, ती आहे भारतमाता. हे तिचे विशाल रूप संघाने निर्माण केलेले नाही. ते आपल्याला हजारो वर्षांच्या परंपरेने, वारसा हक्काने प्राप्त झालेले आहे. हे सनातन हिंदुराष्ट्र आहे, त्याच्या सर्व वैभवाने प्रकट व्हायचे असेल तर त्याचा प्राण असलेला आध्यात्मिक विचार हा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रकट झाला पाहिजे. केंद्रात राष्ट्रीय विचाराचे सरकार असणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, पण ते अंतिम पाऊल नाही. आपण अनेक पावले चालत आलो आहोत, परंतु अनेक मैल अजून चालायचे आहे.
गाय दि मापूसाँ हे फे्रंच लघुकथाकार होऊन गेले. त्यांचा कालखंड 1850 ते 1893 असा आहे. लघुकथाकारांतील ते फार श्रेष्ठ लघुकथाकार समजले जातात. त्यांची एक सुंदर लघुकथा आहे, त्याचे शीर्षक आहे - 'The peice of string' (सुतळीची गुंडी).
ही कथा एका सामान्य शेतकऱ्याची आहे. तो आठवडी बाजारासाठी निघालेला होता. रस्त्याने चालता चालता त्याला सुतळीची गुंडी रस्त्यात पडलेली दिसली. ती घेण्यासाठी तो खाली वाकणार, इतक्यात त्याचे लक्ष त्याच्याशी शत्रुत्व करणाऱ्या माणसाकडे गेले. (कथेत या दोघांची फ्रेंच नावे आहेत, ती उच्चरायला आणि समजायला कठीण असल्यामुळे ती येथे दिली नाहीत). शेतकऱ्याने खाली वाकून थोडा जमिनीशी चाळा केला आणि सुतळीची गुंडी खिशात टाकली.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक
बाजारहाट करून जवळच्या खाणावळीत तो बसला असताना त्याला दवंडी ऐकू आली की, एका श्रीमंताची पाचशे फ्रँक असलेली पैशाची थैली हरवली आहे. ज्या कुणाला सापडेल त्याने ती आणून द्यावी, त्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल.
काही वेळानंतर बातमी अशी आली की, श्रीमंताला पैशाची पिशवी सापडली आहे. एका माणसाने प्रामाणिकपणे त्याला आणून दिली आहे. विषय इथे संपायला पाहिजे. चर्चा सुरू झाली की, या शेतकऱ्याने त्या माणसाकडे पैशाची पिशवी कशी पोहचविली? काही जणांनी या बाबतीत त्याला विचारले. त्याच्या हुशारीची तारीफ केली. तो म्हणाला, ''असे काही झालेले नाही.'' तेव्हा लोक म्हणाले, ''तुला सांगायचे नसेल तर नको सांगू.'' तो आपल्या घरी आला.
जानेवारी 30ला गांधीजींची हत्या झाली. हत्या करणारा हिंदू निघाला. हिंदू महासभेचा सदस्य निघाला. पं. नेहरू आणि त्यांच्या साथीदारांनी हत्येचा आळ संघावर टाकला. गांधीहत्येत संघाचा बादरायण संबंध नव्हता. (बादरायण याचा अर्थ एक माणूस एका गावी गेला. त्याला दुसऱ्याच्या घरी जायचे होते. ओळख नव्हती. आपला घनिष्ठ संबंध आहे हे सांगण्यासाठी तो म्हणाला, ''माझ्या रथाचे चाक बोरीच्या लाकडाचे आहे आणि तुझ्या दारातही बोरीचे झाड आहे. असा आपला संबंध आहे.'')
गांधीजी महात्मा होते. करोडो लोकांची त्यांच्यावर भक्ती होती. त्या करोडो लोकांना वाटले की, गांधीहत्येत संघाचा हात असावा. 1950 साली मी शाखेत जाऊ लागलो. तेव्हा माझे वय सहा वर्षांचे असेल. गांधी खून वगैरे विषय न समजण्याचे वय. आमचे एक शेजारी होते, धनाजी मिस्त्री त्यांचे नाव. ते मला म्हणायचे, ''तुम्ही गांधी खूनवाले आहात.'' कोण गांधी आणि खून म्हणजे काय, ते मला समजत नव्हते. दोन-तीन पिढया हे वार संघस्वयंसेवकांना सहन करावे लागले. खूप वर्षांनंतर मापूसाँ यांची वरील कथा मी वाचली आणि नि:ष्पाप माणसावर आळ आल्यानंतर त्याला काय काय सहन करावे लागते, हे मला समजले.
गाय दी मापूसाँ यांच्या कथेतील शेतकरी नैराश्याने मेला. संघाचा जन्म नैराश्यात मरण्यासाठी झाला नाही. संघाचा जन्म सत्याच्या प्रस्थापनेसाठी झालेला आहे. धर्माच्या स्थापनेसाठी झालेला आहे. हे ज्यांना समजले, त्यांनी ज्ञानदेवाप्रमाणे क्षमाशीलता धारण करून समाजात काम करणे चालू ठेवले. आज आपले कार्य लोकांना पटणार नाही, समजणार नाही, गैरसमजाचे ते शिकार झालेले आहेत, विपरीत विचारांनी त्यांच्या मनात घर केलेले आहे. परंतु ही परिस्थिती कायम राहणार नाही, त्यात बदल होईल.
परिस्थितीसंबंधी असे म्हटले जाते की, कोणतीही एक अवस्था कायमस्वरूपी राहत नाही. वर्षभर उन्हाळा, वर्षभर पावसाळा अशी परिस्थिती सामान्य परिस्थितीत नसते. कधी कधी पावसाळयात पाऊस धो-धो पडतो. परंतु महिनाभर धो-धो पडत राहिला आहे, असे कधी होत नाही. प्रत्येकाच्या मर्यादा असतात. माणसांचेदेखील असेच आहे. ज्या पिढीच्या मनात संघाविषयी सर्व काही खोटे भरविले गेले, भरविणारी माणसेदेखील मोठी होती. ही मोठी माणसे काळाच्या पडद्याआड गेली. त्यांच्या विचाराला बळी पडलेली पिढीदेखील काळाच्या पडद्याआड गेली.
संघाच्यादेखील तीन पिढया काम करून गेल्या आहेत. या पिढया पेरत गेल्या. पहिल्या पिढीने पेरले, दुसऱ्या पिढीने त्याला खतपाणी घातले, वाढणाऱ्या रोपाचे रक्षण केले आणि तिसऱ्या पिढीने त्याचे वृक्षात रूपांतर होताना पाहिले. संघबीजाची मुळे हळूहळू समाजजीवनात फार खोलवर गेलेली आहेत. आता ही मुळे तेथून काढणे, तेच तेच आरोप उगाळीत बसून लोकमानस भ्रमित करणे शक्य नाही. हे ज्यांना समजते, त्यांना शहाणे म्हणायचे आणि ज्यांना समजत नाही, त्यांना राहुल गांधी म्हणायचे.
संघाने एक सत्य सांगितले की, हे हिंदू राष्ट्र आहे. जेव्हा डॉक्टरांनी हे सत्य सांगितले, तेव्हा ते अनेकांच्या डोक्यावरून गेले. काही जण कुत्सितपणे हसले. काही जणांनी डॉक्टरांना वेडयात काढले. भारतात मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारशी, जैन, बौध्द, शीख अशा वेगवेगळया धर्मांचे लोक राहत असताना त्याला हिंदू राष्ट्र कसे म्हणायचे? हे राष्ट्र असल्यास ते सर्वांचे आहे. एका धर्मीयांचे राष्ट्र म्हणणे चूक आहे. अन्य धर्मीयांना कमी लेखणे आहे. हा मागास विचार आहे. प्रतिगामी विचार आहे. एवढेच नाही, तर धर्माच्या आधारे देशाचे तुकडे करणारा आहे. काही जणांनी सांगायला सुरुवात केली की, हिंदू समाजात हिंदू नावाचा प्राणी नसतोच, असतात त्या जाती. ब्राह्मण आणि ब्राह्मणांच्या अनेक जाती, क्षत्रिय-क्षत्रियांच्या अनेक जाती, वैश्य-वैश्यांच्या अनेक जाती, शूद्र आणि शूद्रांच्या अनेक जाती, शेवटी अस्पृश्य आणि त्यांच्या अनेक जाती. जातीत न मोडणाऱ्या अनेक जमाती, ज्यांना आदिवासी म्हटले गेले. हिंदू नसलेल्या समाजाचे हिंदू राष्ट्र कसे होणार? असाही प्रश्न अनेक जणांनी केला.
डॉक्टरांनी ज्या हिंदुराष्ट्र सत्याची अनुभूती घेतली आणि जे अनुभूत ज्ञान त्यांच्या सहवासात आलेल्या सहकाऱ्यांत संक्रमित केले, त्यांच्यापुढे असले कुठलेही प्रश्न कधी उपस्थित झाले नाहीत. आपल्या देशाची परंपरा अशी आहे की, सत्याची प्रस्थापना पुस्तकी ज्ञानातून होत नाही, त्याला अनुभूती लागते. अनेक प्रवचनकार, बुवामहाराज ज्ञानदेवांचे अध्यात्म, तुकारामांचे अध्यात्म फार सुंदर शब्दांत सांगत असतात. पण त्यापैकी कुणीही ज्ञानदेव अथवा तुकाराम नसतो. त्यांच्याकडे अनुभूत ज्ञान नसते. विद्यापीठात नामदेव अध्यासन, ज्ञानदेव अध्यासन अशी अध्यासने असतात. तेथे संतांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो. त्यावर काही जण पीएच.डी. मिळवितात, काही जण उत्तम ग्रंथ लिहितात. या कुणाकडेही ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम यांचे अनुभूत ज्ञान नसते, ते शब्दज्ञानी असतात. यामुळे त्यांचा जनजीवनावरचा प्रभाव जवळजवळ शून्यवत असतो.
अनुभूत ज्ञान असलेला कोणत्याही वाद-चर्चेत कधीही पडत नाही. तो आपली साधना करीत राहतो. त्याला सत्याची जशी अनुभूती झाली आहे, त्या भाषेत तो मांडत राहतो. त्याला पटले त्याचेही भले होवो आणि ज्याला पटले नाही, त्याचेही भले होवो, अशा समत्व बुध्दीने तो काम करीत राहतो.
संघाची हिंदुराष्ट्राची संकल्पना पुस्तकी नाही, ग्रांथिक नाही, तर्क-वितर्काची नाही, ती प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आहे. ज्यांची सर्व हयात जाडजूड ग्रंथ वाचण्यात जाते, ग्रंथांवर भाष्य करण्यात जाते आणि या ग्रंथाच्या आधारे ग्रंथ लिहिण्यात जाते, अशी मंडळी संघाच्या हिंदुराष्ट्र संकल्पनेवर जे बोलतात, त्यावरून असे म्हणावे लागते की तुम्ही संघज्ञानाच्या बाबतीत अजून पहिलीची परीक्षादेखील पास केली नाही.
वयोमानाप्रमाणे अनेक ज्येष्ठ संघकार्यकर्ते कालवश होतात. नुकतेच मुंबईचे ज्येष्ठ संघकार्यकर्ते भास्करराव मुंडले यांचे निधन झाले. भास्करराव कुणी तत्त्वज्ञ नव्हते, विद्वान नव्हते, वादविवादपटू नव्हते, परंतु चोवीस तास संघ जगणारे संघयोगी होते. संघ जगायचा म्हणजे काय, तर जे बोलू त्याप्रमाणे आचरण करू. समग्र हिंदू समाज माझा आहे आणि त्याच्यावर मला निरपेक्ष प्रेमच करायचे आहे. भास्करराव असे प्रेम करत जगले. त्यांच्या भाषणाने कुणालाही संघकामाची प्रेरणा नाही मिळाली, परंतु त्यांच्या आत्मीय व्यवहाराने शेकडो कार्यकर्ते संघाशी जोडले गेले, हा आहे संघ. तो ग्रंथात पकडता येत नाही. काही जण करतात, पण त्यांचे ग्रंथ माझ्यासारख्या संघस्वयंसेवकाच्या अंतःकरणाला आणि बुध्दीलाही स्पर्श करू शकत नाहीत.
अशा संघाविषयी आणि हिंदू राष्ट्राविषयी अकलेचे तारे तोडणारी विधाने एखादा निवृत्त न्यायाधीशसुध्दा करतो, तेव्हा त्याच्या संघअज्ञानाबद्दल कीव येते. राजेंद्र सच्चर हे दिल्ली हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश होते. हायकोर्टाचा न्यायाधीश होणे हा मोठा सन्मान आहे आणि त्याचप्रमाणे न्यायशास्त्रातील पारंगततेची ती एक पावती आहे. राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सरकारने मुसलमानांच्या स्थितीची माहिती गोळा करण्यासाठी समिती नेमली. त्यांनी अहवाल तयार केला. सच्चर आयोगाचा अहवाल म्हणून तो प्रसिध्द आहे. या अहवालात त्यांनी मुसलमान समाजातील गरिबी, शिक्षण, आर्थिक मागासलेपण यांचा आढावा घेऊन त्यांच्या विकासासाठी आरक्षण आणि काही आर्थिक तरतुदी करण्याच्या शिफारशी केल्या.
काँग्रेसला अशा प्रकारचा अहवाल पाहिजे होता. मुसलमान त्यांच्या दृष्टीने मतबँक आहे. तिला प्रसन्न ठेवायचे असेल तर धर्माच्या आधारे सवलती द्यायला पाहिजेत. आपली राज्यघटना त्यासाठी अनुमती देत नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून आपल्याला पाहिजे तो अहवाल लिहून घेणे आवश्यक होते. राजेंद्र सच्चरसारखे न्यायमूर्ती एका पायावर तयार असतात.
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे सच्चर महाशय म्हणतात, ''2019 साली भारत हिंदुराष्ट्र आहे, अशी घोषणा संघ करील. लोकसभा निवडणुका 2019 साली आहेत. दोन वर्षांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर बसविणे या घटनेकडे फार जागरूकपणे पाहिले पाहिजे. अशा वेळी भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट केली पाहिजे. असे जर केले नाही, तर त्यांना अप्रामाणिक म्हणावे लागेल आणि धर्मनिरपेक्ष लोकांवर अन्याय करणारी घटना ठरेल.''
राजेंद्र सच्चर यांचा उल्लेख करताना आपल्या देशातील तथाकथित मुख्यधारेचा मीडिया 'न्यायमूर्ती, 93 वर्षांचे, लोकशाहीची आणि राज्यघटनेची चिंता असणारे' अशी विशेषणे लावतात. वाचकाच्या मनावर त्याच नकळत दडपण येते. माणूस मोठा वाटू लागतो. अशा विशेषणांना आपण बळी पडता कामा नये. जो माणूस सच्चर आयोग लिहू शकतो, तो माणूस यापेक्षा वेगळे काही बोलू शकत नाही. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की, अशी विचारधारा असलेला माणूस हायकोर्टाचा प्रमुख न्यायाधीश कसा काय झाला? आमच्या व्यवस्थेत काही गडबड आहे का?
असेच दुसरे मोठे नाव फली नरीमन यांचे आहे. ते भारतातील थोर घटनातज्ज्ञ आहेत. पारशी आहेत. मी जेव्हा संविधानाचा गंभीर अभ्यास सुरू केला, तेव्हा नरीमन यांच्या पुस्तकांनी मला मोठे मार्गदर्शन केले. त्यांचे 'स्टेट ऑफ नेशन, बिफोर मेमरी फेड्स' आणि 'गॉड सेव्ह द सुप्रीम कोर्ट' ही पुस्तके राज्यघटनेचे फार उत्तम ज्ञान करून देतात, त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे.
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर फली नरीमन म्हणतात, ''हिंदुराज्याची ही सुरुवात आहे. राज्यघटना धोक्यात आली आहे. आदित्यनाथ यांच्या नियुक्तीमागचे हेतू आपण समजून घ्यायला पाहिजे. पंतप्रधान काहीही म्हणोत, आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदावरची नियुक्ती धार्मिक राज्याच्या प्रचाराची घंटा आहे. एका पुजाऱ्याची मुख्यमंत्रिपदावर नियुक्ती करून नरेंद्र मोदी यांनी हिंदुराज्याची सुरुवात केली आहे.''
नरीमन यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करूनही नम्रपणे म्हणावेसे वाटते, 'मि. नरीमन, तुम्ही घटनातज्ज्ञ आहात, पण संघाविषयी म्हणायचे तर तुम्ही पहिल्या इयत्तेतदेखील नाही आहात. योगी आदित्यनाथांसारखा एक संन्यासी मुख्यमंत्री झाल्याने हिंदुराज्य निर्माण होत नाही, उलटपक्षी आणखी काही वर्षांनंतर जर ते मुख्यमंत्री नसतील, तर हिंदुराज्य संपले असेही होत नाही. एका व्यक्तीभोवती हिंदू राज्याची कल्पना करणे, ही तर्कशास्त्राच्या दृष्टीने फॅलेसी (घोडचूक) आहे.'
भाजपाचे सरकार 2014 साली पूर्ण बहुमताने केंद्रात सत्तेवर आले, तेव्हा अनेकांना वाटले की भाजपा भारताला हिंदुराष्ट्र घोषित करणार. महाराष्ट्रातून एक दिवाळी अंक निघतो. त्या दिवाळी अंकाने 'संघाचे हिंदुराष्ट्र' या विषयावरच अनेकांचे लेख मागविले. माझ्याकडूनही लेख मागविला. भाजपाचे सरकार आल्यामुळे हिंदुराष्ट्र प्रत्यक्षात येणार काय? असा काहीसा त्यांचा विषय होता. त्या लेखात मी म्हटले की, हे हिंदुराष्ट्र आहे ही घोषणा संघाने 1925 सालीच केलेली आहे, आता ती करण्याचे काही कारण नाही. भाजपाच्या विजयाशी तिचा काही संबंध नाही. भाजपा पराभूत असतानादेखील हे हिंदुराष्ट्रच होते आणि भाजपा सत्तेवर आल्यानंतरदेखील हे हिंदुराष्ट्रच राहणार आहे. पं. नेहरू पंतप्रधान असताना हे हिंदू राष्ट्रच होते आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग असतानादेखील हे हिंदुराष्ट्रच होते. हिंदुराष्ट्राची संकल्पना पक्षातीत आहे.'
राष्ट्र कुणाला निर्माण करता येत नाही, ते निर्माण व्हावे लागते. राष्ट्राच्या निर्मितीची प्रक्रिया हजारो वर्षे चालू राहते. राष्ट्र ही राजकीय संकल्पना नाही. ती भावनिक संकल्पना आहे. एका भूप्रदेशात लोक राहतात, त्या भूप्रदेशाशी त्यांचे भावनिक नाते निर्माण होते. हजारो वर्षे एका भूमीत राहिल्यामुळे भूमीमाता आणि आपण तिचे पुत्र किंवा संतान अशी भावना निर्माण होते. भूमीतील नद्या, पर्वत, वृक्ष, जमीन या सर्वांविषयी आत्मीयता निर्माण होते. ती भावविश्वाचा एक भाग बनते. अशी अनेक रूपांत मातृत्व पाहण्याची आपली परंपरा आहे. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी या आमच्यासाठी केवळ पाणी देणाऱ्या नद्या नसतात, त्या आमच्यासाठी माता असतात. नदीचा उल्लेख माता या शब्दानेच केला जातो. तिची प्रतिमा बनवून तिची पूजा केली जाते. ही पध्दती आसामपासून कच्छपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे.
नदी मातेच्या रूपात कशी प्रकट होते, याच्या भावकथा अनेक आहेत. कृष्णाचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला. जन्मतःच त्याला घेऊन वसुदेव यमुनेतून निघाले. यमुनेला पूर आला होता. पण तिने वाट करून दिली. जन्मलेल्या बालकाच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी ती प्रकट झाली, अशी कथा वर्षानुवर्षे सांगितली जाते. ती आपल्या भावविश्वाचा भाग बनते. तिथे तर्कवाद करीत कुणी बसत नाही. भावनेच्या घरात बुध्दीचे काम नाही.
म्हटले तर नर्मदा ही नदी इतर नद्यांसारखीच आहे. परंतु भारतातील कोणत्याही नदीची परिक्रमा केली जात नाही. तो सन्मान नर्मदेला आहे. तिला माता नर्मदा म्हणतात. हजारो वर्षांपासून ही परिक्रमा चालू आहे. या परिक्रमेत भाग घेणारे एकमेकांची भाषादेखील जाणत नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. परिक्रमा करणाऱ्या कोणावरही अत्याचार होत नाही. त्याला लुटले जात नाही. स्त्रीवरदेखील कसलाही अनाचार होत नाही. हे आहे आपले भावविश्व.
एका भावविश्वाने हा सगळा देश जोडला गेलेला आहे. राम मनोहर लोहिया म्हणत असत की, राम-कृष्ण आणि शिव यांच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी भारत बांधला गेलेला आहे. डॉ. बाबासाहेब सांगून गेले की, सांस्कृतिक एकतेच्या बाबतीत भारताची बरोबरी करील असा देश जगात नाही. हिंदुराष्ट्र निर्माण करणे म्हणजे या सर्व गोष्टी निर्माण कराव्या लागतात आणि संघाचा तर असा मुळीच दावा नाही की संघ स्थापनेनंतर या गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे.
भारतात प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी इंग्रज तरुण परीक्षा देऊन येत असत. अशा विद्यार्थ्यांपुढे मॅक्सम्युलर यांची 'इंडिया ः व्हॉट कॅन इट टीच अस?' या विषयावर भाषणे झाली. इंग्रज माणूस स्वभावाने साम्राज्यवादी असतो. साम्राज्यवादी दुसऱ्याला तुच्छ समजतो. राज्य करण्यासाठी माझा जन्म झाला आहे, असे त्याला वाटते. असे वाटणारे सगळे इंग्रज विद्यार्थी मॅक्सम्युलरचे भाषण ऐकण्यास बसले होते. (या भाषणाचे वरील शीर्षकाचे पुस्तक उपलब्ध आहे.)
मॅक्सम्युलर भारताचे वर्णन करताना म्हणतात, ''(सारांश आणि भावानुवाद) - पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ज्याचे वर्णन करावे लागेल तर अशी जर कोणती भूमी असेल, तर ती भारत आहे. निसर्गाने या भूमीवर लयलूट केली आहे. माणसाचे मन ही माणसाला उत्कृष्ट देणगी असते. या मनाचा समग्र विकास भारतात झाला आहे. मानवी जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या समस्यांवर येथे खोलवरचे चिंतन झालेले आहे. नुसते चिंतन करून ते थांबले नाहीत, तर समस्यांवर उपायदेखील शोधले आहेत. प्लेटो, कांट, यांचे ज्याने अध्ययन केले आहे, तेदेखील विचारांच्या अध्ययनासाठी भारताकडे आकृष्ट झाले आहेत. आपण युरोपातील लोक ग्रीक आणि रोमन यांच्या वैचारिक वारशावर जगत असतो. आपण सर्व सेमेटिक वंशाचे आहोत आणि त्यात ज्यू वंशाचेदेखील येतात. जर आपल्याला आपले आंतरिक जीवन अधिक परिपूर्ण करायचे असेल, अधिक व्यापक करायचे असेल, अधिक वैश्विक करायचे असेल, तर आपल्याला भारताकडेच वळावे लागेल. तसेच जर आपल्याला मनुष्यजीवन खरोखरच सार्थक करायचे असेल केवळ याच जीवनाचा विचार नाही तर पारलौकिक जीवन अर्थपूर्ण करायचे असेल तर आपल्याला भारताकडेच वळावे लागेल.
इंग्लंडचे संविधान नीट समजून घेण्यासाठी, इंग्लंडचा सांविधानिक इतिहास वाचावा लागतो. त्यासाठी ब्लॅक स्टोन, डायसे, बॅनथेम आदींचे लेखनही वाचावे लागते. संविधान आणि ब्रिटन राष्ट्र वेगळे करता येत नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ब्रिटिश राष्ट्र म्हणजे संविधान कसे विकसित होत गेले, याचा थोडक्यात इतिहास सांगणारे Martin Loughlin यांचे The British Constitution हे सुंदर पुस्तक आहे. राजा ही येथे एक संस्था आहे. संसद, मंत्रीमंडळ, न्यायपालिका, पारंपरिक कायदे, परंपरा या सर्वांनी मिळून ब्रिटिश राष्ट्र तयार होते. त्याची लिखित घटना नाही. म्हणजे आपल्यासारखे कलमांचे जाडजूड पुस्तक नाही. परंपरेने आलेले कायदे, पार्लमेंटने केलेले कायदे आदी सर्व एकत्र केले, तर कुणी सांगावे चार मजली इमारतीएवढा तो ग्रंथ तयार होईल. राष्ट्र असे परंपरेने उभे राहते.
आपली परंपरा कोणती आहे? आपली परंपरा अध्यात्माची आहे. राजा, राज्य, राज्यसंस्था, तिचे कायदे आपल्याकडेही होते. परंतु आपण या सर्व विषयांना इंग्लंडप्रमाणे एकमेव महत्त्व दिले नाही. समाज चालण्यासाठी न्यायनिवाडा करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी, राज्यसंस्थेची गरज आहे. राज्यसंस्थेने तेवढेच काम करावे. परंतु त्याच्या पलीकडे मनुष्यजीवन आहे, मनुष्य हा काही राजकीय प्राणी नाही, ही झाली ऍरिस्टॉटलची भाषा. राजकीय प्राणी म्हटला की राज्य आले, सत्ता आली, सत्तेशी एकनिष्ठता आली, सत्तेचा कायदा आला, कायदा करण्याची बंधने आली, अशा शेकडो गोष्टी सुरू होतात.
पॉल ब्रॅन्टन नावाचा इंग्रज तरुण भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधार्थ भारतात आला. 1898 साली जन्मलेल्या पॉल ब्रॅन्टनने तीन-चार वर्षे भारतात सर्वदूर प्रवास केला. महर्षी रमण यांच्या सांनिध्यात तो दीर्घकाळ राहिला. त्याला काही आध्यात्मिक अनुभूती आली. भारताच्या या आध्यात्मिक ठेव्याविषयी तो म्हणतो, ''एका महान अस्तित्वाने मानव हा महानतेशी जोडला गेला आहे आणि त्या अस्तित्वाने त्याच्या आईपेक्षाही जास्त प्रमाणात त्याचे पोषण केले आहे. त्याच्या शहाणपणाच्या क्षणात त्याला हे कळू शकते...
क्वॉन्टम विज्ञान आणि भारतीय आध्यात्म ब्रह्माडांच्या व्युप्तत्तीविषयी सारखेच सांगत असले, तरी दोघांत एक मूलभूत फरक आहे. असीमित घनता असलेल्या मूलद्रव्यात स्फोट का झाला, हे क्वॉन्टम सांगत नाही. आपले आध्यात्म सांगते की, प्रथम ते एकच होते. त्याच्या मनात विचार आला. याचा अर्थ जे एक होते त्याला मन होते. मन फक्त सजीव प्राण्याला असते, पदार्थाला मन नसते. मन म्हणजे जाणीव, मन म्हणजे चेतना. म्हणजे सृष्टिनिर्मिती होत असतानाच एकाच वेळेला पदार्थ आणि चेतना यांची निर्मिती झाली. चेतना म्हणजे शरीरात असलेल्या रासायनिक प्रक्रिया नव्हे. तिचे अस्तित्व पदार्थासारखे स्वतंत्र आहे. पदार्थशास्त्राचे नियम आहेत, चेतनेचेही नियम आहेत. त्याचा शोध घेण्याचे शास्त्र म्हणजे अध्यात्म.
तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधः कस्य स्विध्दनम्'
ज्याप्रमाणे इंग्लंड राष्ट्र म्हणज{ त्याचे अलिखित संविधान, तसे भारत म्हणजे त्याचे आध्यात्म. या अध्यात्मालाच 'सनातन धर्म' असे म्हणतात. धर्म म्हणजे एक ईश्वर, एक ग्रंथ, एक प्रेषित, एक प्रकारची धार्मिक कर्मकांडे हा अर्थ आपला नाही. आपला धर्माचा अर्थ होतो - सृष्टीचे संचालन करणारे शाश्वत नियम. मानवा-मानवाचे संबंध संचलित करणारे शाश्वत नियम, या शाश्वत नियमांचे पालन करणे म्हणजे धर्माचारण करणे. उदा., हिंसा करू नये, असत्य बोलू नये, क्रोधाच्या आहारी जाऊ नये, हे झाले माणसामाणसांत व्यवहार करण्याचे नियम. ते शाश्वत आहेत. उपनिषदांपासून ते भगवान गौतम बुध्द आणि सर्व संत आपआपल्या परीने या नियमांचे पालन करायला सांगतात. याप्रमाणे जगणे म्हणजे धर्म जगणे होय. हा सनातन धर्म, हा भारताचा आत्मा आहे.
उत्तरपारा येथील भाषणात योगी अरविंद म्हणाले, ''सनातन धर्म हाच आपल्यासाठी राष्ट्रवाद आहे. सनातन धर्माबरोबरच हिंदुराष्ट्राचा जन्म झाला आहे, त्याच्यासोबत ते पुढे जात आहे, वृध्दिंगत होत आहे. जेव्हा सनातन धर्माचे पतन होते, तेव्हा राष्ट्रही घसरणीला लागते आणि जर सनातन धर्म लयाला जाऊ शकत असेल, तर तेसुध्दा लयाला जाईल. सनातन धर्म हाच राष्ट्रवाद आहे. मला हाच संदेश तुम्हाला द्यावयाचा आहे.'' सनातन धर्म आणि राष्ट्रवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
प्रत्येक राष्ट्राचे एक जीवनध्येय असते. इंग्लंडपासून आपण सुरुवात करू. इंग्लिश राष्ट्राचे जीवनध्येय विश्वाला संसदीय पध्दती राजवट विकसित करून देण्याचे आहे. माणूस समाजात राहतो आणि समाजाला नियमात बांधून ठेवावे लागते. नियमात बांधून ठेवताना व्यक्तिविकासाला भरपूर वाव द्यावा लागतो. राज्याची सार्वभौम सत्ता अबाधित ठेवून व्यक्तीच्या सार्वभौम जीवनाला यथोचित स्थान द्यावे लागते, ते इंग्लंडने करून दाखविले आहे. अमेरिकेचे वैश्विक लक्ष्य आहे जगाला 'लिबर्टी' देण्याचे. लिबर्टीचा एक अर्थ होतो 'स्वातंत्र्य' आणि दुसरा अर्थ होतो 'मुक्तता'.
भारताचे - म्हणजे हिंदुराष्ट्राचेदेखील वैश्विक लक्ष्य आहे, विश्वाला मानव धर्माची शिकवण देण्याचे. जगात माणसेच माणसाला मारत असतात. म्हणजे चैतन्याकडून चैतन्य धारण करणाऱ्याची हत्या होते. हा अधर्म आहे. तो सांगून कुणी ऐकत नाही. आज जगभर महात्मा गांधी यांचे नाव शांतिदूत, शांतीचा महासागर म्हणून घेतले जाते. त्यांच्याबद्दल चांगले लिहिले जाते, बोलले जाते. चांगले लिहायला आणि बोलायला कुणाचे काही जात नाही. माणसे तशी वागतात का? याचे उत्तर नकारात्मक द्यावे लागते.
भारताचा, म्हणजे हिंदुराष्ट्राचा आध्यात्मिक विचार प्रत्यक्ष लोकजीवनात जेवढया मोठया प्रमाणात येईल, तेवढया मोठया प्रमाणात सर्व सामाजिक प्रश्नांना, जातिभेदांना, अस्पृश्यतेला, आणि उपासनापंथांतील भेदांना (ज्यांना आमचे सेक्युलर पंडित 'धर्मभेद' म्हणतात) मूठमाती मिळेल. भारतात राहणारे - मग त्यांची उपासना पध्दती कोणतीही असो, तो चर्चमध्ये जाणारा ख्रिश्चन असो, मशिदीत जाणारा मुसलमान असो, अग्यारीत जाणारा पारशी असो, सर्वच हिंदू आहेत. हिंदुराष्ट्राचे अंग आहेत. सर्वांचा वंश एक आहे. सर्वांची भारतमाता एकच आहे. सर्वांची संस्कृती एक आहे. 1947 सालानंतर जो भारत निर्माण झाला आहे, त्या खंडित भारताची सर्वांची राज्यघटना एक आहे. सर्वांची राज्यपध्दती एक आहे. सर्वांना समान सामाजिक, राजकीय, धार्मिक अधिकार आहेत.
सांप्रतचा कालखंड राजकीय एकता, राष्ट्रीय एकतेशी एकरूप करण्याचा कालखंड आहे. त्या मार्गामध्ये अनेक अडचणी आहेत. भारतात मुसलमानांची संख्या फार मोठी आहे. इंग्रजांनी त्यांच्यात भेद निर्माण केले. नेहरू-काँग्रेसने हे भेद आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांच्या मनात हिंदूंविषयी भीती निर्माण केली. त्याला मुसलमान बळी पडले. काश्मीरमध्ये घटनेच्या विरोधात जाऊन त्यांच्यासाठी सोयी केल्या. काश्मिरी मुसलमानांना भारतापासून अलग काढले, एकात्मता होऊ दिली नाही. भारतात राहणारा मुसलमान अरबी संस्कृतीच्या गुलामीत जगतो. अरबस्तानात शरीर भाजणारे ऊन असते, म्हणून शरीर झाकणारे कपडे घालावे लागतात. पुरुषांचे कपडेही तसेच असतात आणि स्त्रियांना बुरख्यात राहावे लागते. भारताची स्थिती वेगळी आहे. येथे उष्ण, दमट, अतिदमट, थंड हवामान आहे. हवामानाप्रमाणे पोशाख हवा. त्याचा धर्माशी काय संबंध? धर्माचा संबंध मनुष्य आणि परमेश्वर यांच्याशी येतो. या गुलामीतून भारतातील मुसलमानांना मुक्त व्हावे लागेल. आणि या मुक्तीचा लढा त्यांचा त्यांनाच द्यावा लागेल, इतर कुणीही हा लढा लढू शकत नाहीत.
आपल्या प्राचीन वाङ्मयात समन्वयाने आणि सुखाने जगण्याच्या अनेक कथा आहेत, त्यातील ही एक कथा. एका अरण्यात एक हरीण पाणी पिण्यासाठी तळयावर जात असे. तेथे एक कासव होते. त्या दोघांची मैत्री झाली. एक कावळादेखील तिथे भक्ष्याच्या शोधार्थ येत असे. त्या तिघांची नंतर मैत्री झाली. ते आपआपसात सुख-दुःख वाटून घेऊ लागले. चांगल्या गोष्टी परस्परांना देऊ लागले.
एके दिवशी एका पारध्याने तळयाच्या काठी जाळे लावले. पाणी पिण्यास आल्यानंतर हरीण त्यात सापडले. ते कासवाच्या लक्षात आले. कासव त्याला म्हणाले, ''तू घाबरू नकोस, पारधी येण्यापूर्वी मी तुझी सुटका करतो.'' त्याने जाळे कुरतडायला सुरुवात केली. कासवाची गती हळू असते, पण त्याने न थकता काम सुरू ठेवले. सकाळी पारधी तळयाकडे येण्यास निघाला. कावळयाने ते पाहिले. तो त्याच्या डोक्यावर शिटला. हा अपशकून झाला असे वाटून पारधी घरी गेला. थोडा वेळ घरात थांबून तो मागील दाराने निघाला. कावळा बसलेलाच होता. त्याने त्याच्या डोक्यावर चोच मारली. पुन्हा पारधी घरात गेला.
असे दोन-तीनदा झाले. शेवटी पारधी तळयाकडे आला. तोपर्यंत कासवाने जाळे कुरतडत आणले होते. परंतु अतिश्रमाने तो तेथेच थांबला. पारधी आल्यानंतर हरीण पळून गेले. पारध्याने कासवाला पकडले. हरीण नाही तर कासव, असे म्हणून तो त्याला पिशवीत टाकून जाऊ लागला. हरणाने ते पाहिले. मित्राला सोडविण्यासाठी तो मेल्याचे सोंग करून रस्त्यात पडला. पारध्याने कासवाची पिशवी जमिनीवर टाकली आणि दबकत दबकत तो हरणाकडे गेला. कावळयाने येऊन पिशवीचे तोंड उघडून टाकले. कासव वेगाने पळून तळयात गेले. हरणाला पारध्याची चाहूल लागताच ते उठले आणि वेगाने पळून गेले.
कासव, कावळा, हरीण म्हणजे एक जलचर आहे, एक आकाशात उडणारा आहे आणि एक जमिनीवर राहणारा आहे. तिघेही जण जर बंधुभावाने राहू शकतात, तर बुध्दी आणि भावना असलेला माणूस एकत्र का राहू शकत नाही? हा कथाकाराने न विचारलेला प्रश्न आहे.
या राष्ट्राचा, राष्ट्रीय विचार करणारे सत्तेवर आल्यामुळे सत्तेच्या माध्यमातून जे करता येण्यासारखे आहे, ते करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे, काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व संपवून टाकले आहे, कुणी आपली छेड काढल्यास त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. सत्ता आपले राष्ट्रीय तेज प्रकट करते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.
तेवढयाने समाधान मानण्याचे कारण नाही. हे सनातन हिंदुराष्ट्र आहे, त्याच्या सर्व वैभवाने प्रकट व्हायचे असेल तर त्याचा प्राण असलेला आध्यात्मिक विचार हा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रकट झाला पाहिजे. सामाजिक जीवनात समरसतेच्या माध्यमातून, आर्थिक जीवनात आर्थिक न्यायाच्या माध्यमातून आणि उपासना पध्दतीच्या जीवनात समन्वयाच्या माध्यमातून, जातीजमातींच्या संदर्भात स्वीकार, समन्वय, आणि सन्मान या माध्यमांतून तो प्रकट केला पाहिजे. केंद्रात राष्ट्रीय विचाराचे सरकार असणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, पण ते अंतिम पाऊल नाही. आपण अनेक पावले चालत आलो आहोत, परंतु अनेक मैल अजून चालायचे आहे.
रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेत सांगायचे, तर
The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
आपण नियतीशी करार केलेला आहे - राष्ट्रतेज जागृत करण्याचा. काटयाकुटयाची वाट तुडवत येथवर प्रवास झालेला आहे, परंतु थांबता येणार नाही. अंतिम ध्येयाचे स्मरण विसरता येणार नाही. म्हणून चिरनिद्रा जेव्हा कधी घ्यायची असेल तेव्हा घेऊ, अनेक मैलांची वाटचाल करतच राहायची आहे.. रॉबर्ट फ़्रॉस्टच्या कवितेचा हा भावार्थ आहे.