***किरण क्षीरसागर***
कुणी म्हणत होतं, तो चालत चालत खाली घोंगावणाऱ्या वादळात दिसेनासा झाला.
कुणी म्हणत होतं, तो प्रवेशद्वारातून बाहेर पडून वर आजपर्यंत कुणीच न गेलेल्या पर्वतरांगेकडे चालत गेला होता.
कुणी तर म्हणत होतं की तो नव्यानं खोदलेल्या हौदात प्रवेश करून नाहीसा झाला.
पण काका निघून गेला होता हे नक्की!
कायमचा!
गिरिपर्वताचा पायथा धुळीच्या वादळात दिसेनासा झाला होता. पर्वतासमोर विस्तीर्ण मैदानावर फिकट करडया रंगाचा धुळीचा जाडसर पडदा पसरला होता. सायंकाळकडे झुकणाऱ्या, मळभ साचल्या वातावरणाने त्या चित्राच्या रूक्षपणात आणखी भर टाकली होती. संपूर्ण तोंड झाकलेल्या कापडी मास्कमधून आयुषमानचे डोळे सृष्टीचं ते निरस, कोरडं रूप पाहत होते. तो पर्वताच्या जवळपास मध्यावर असलेल्या गुहेच्या तोंडाजवळ बसला होता. आयुषमानने तोंडावरचा मास्क खाली खेचला. त्याच्या चेहऱ्याला बाहेरची उष्ण हवा जाणवली. त्याने पाण्याचे दोन घोट घशात सारले. आयुषमानने मास्क पुन्हा चढवत नजर वादळात रोवली. समोरच्या स्थिर चित्रात वादळाची हलकीशी हालचालच काय तो जिवंतपणा आणत होती. बाकी सगळं जग स्तब्ध झाल्याप्रमाणे चिडीचूप होतं. त्या दृश्याकडे पाहता पाहता आयुषमानची आठवणींची गुंतवळ सुटू लागली.
दोन दिवसांपूर्वी गुहेच्या प्रवेशद्वारावर बसलेला असताना क्षितिजावर वादळाची रेघ दिसली होती. त्याने समूहप्रमुख विश्राम यांच्याकडे बातमी पाठवून पुढच्या दोन दिवसांत गुहा सोडण्याच्या तयारीत राहण्याची सूचना केली होती. पर्वताच्या पोटात माणसांची ती वस्ती जेव्हा नुकतीच नांदू लागली होती, तेव्हा धुळीच्या वादळांनी आसमंत कोंदटून जाई. माणसं गुहेत गुदमरत. बाहेर धावत. धडपडत. तशा झालेल्या कित्येक चेंगराचेंगरीत शेकडो माणसं-मुलं गतप्राण झाली होती. तेव्हापासून धुळीच्या वादळांसाठी गुहेच्या तोंडावर पहारे बसवण्यात आले. वादळाची चाहूल लागताच सारी वस्ती गुहेच्या बाहेर येऊन पर्वतावर शक्य तितक्या वर चढून जात असे. मग धुळीचा जोर ओसरेपर्यंत सारी माणसं काही दिवसांपर्यंत बाहेर उघडयावर राहत. ते राहणंही भयावह होतं. दिवसाचं मळभ दाटलेलं आकाश आणि रात्रीची हाडं गोठवणारी प्रचंड थंडी अशी हवामानातील मोठी तफावत सहन होण्यापलीकडची होती. अशा स्थितीत बाहेर जाणारी म्हातारी माणसं बहुधा पुन्हा गुहेत परततच नसत.
आतादेखील सभोवती दबा धरून बसलेलं मृत्यूचं ते रूप पाहून आयुषमानच्या मनात कालवाकालव होत होती. वस्ती निर्माण झाली, तेव्हा झालेल्या पहिल्या अपघातात आयुषमानचे आईवडील मरण पावले होते. एकटेपणाचा तो सल त्याच्या मनात लहानपणापासूनच होता. म्हणूनच आयुषमानने कळत्या वयात आल्यानंतर पहाऱ्याच्या कामांमध्ये गुंतवून घेतलं होतं. वादळाच्या वाटेवर डोळे रोखून बसताना त्याला आईवडिलांच्या जवळ बसल्याचा भास होत असे.
आयुषमान पंचावन्न वर्षांचा होता. गुहेत राहण्याचा मोठा अनुभव त्याच्या गाठीशी होता. तो पहाऱ्यावर बसला की त्याला दिसायचा तो अथांग पसरलेला रखरखीत भूप्रदेश. स्तब्ध, निश्चल, उजाड! त्या प्रचंड मैदानावर उमटलेले कधीकाळच्या नद्यांचे सुकून गेलेले ओहोळ, शुष्क वैराण जमीन, दूरवर उभे असलेले दगडांचे उघडेबोडके डोंगर, नावाला माती अंगावर घेतलेले पर्वत, सैरावैरा वाहणारे वारे आणि अध्येमध्ये उठणारी धुळीची वादळं यापलीकडे बाहेर पाहण्यासारखं काहीच नव्हतं.
पृथ्वीभोवती पडलेल्या विविध वायूच्या आवरणांमुळे सूर्य सदानकदा झाकलेलाच असायचा. चोवीस तास मळभ दाटलेलं म्लान वातावरण. शंभरेक वर्षांपूर्वी प्रदूषणाचा कहर झाला आणि निसर्गाने माणसाला स्वत:च्या भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली. उभ्या पृथ्वीवर निसर्गाने तांडव केलं. आधी शेती नापीक होत गेली. त्यावर 'उपाय' म्हणून रसायनांचा वारेमाप वापर झाला. त्यामुळे जमीन मृत्युपंथाला लागली. वृक्षतोडीमुळे पाऊस कमी होत होताच. उष्णताही वाढू लागली. तापमानाचा पारा पराकोटीने वाढला. माणसं-प्राणी आणि लक्षावधी वृक्षराजी होरपळून मरण पावले. वनस्पती, प्राणी, कीटक, पक्षी याच्या असंख्य जाती नामशेष होत गेल्या. संशोधक, निसर्गसंवर्धक, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते.. न जाणे कितीतरी मंडळींनी सरकार, उद्योजक आणि सामान्य जनता यांच्या कानीकपाळी ओरडून धोक्याचा इशारा दिला. पण माणूस स्वत:च्या मस्तीत मश्गूल होता. तो जागा होईपर्यंत वेळ टळून गेली होती. उत्तर ध्रुवावरचा जवळपास सगळा बर्फ समुद्रात मिसळला. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली. शेकडो शहरं बुडाली. उष्णतेमुळे जगभरातील नद्या-तलाव मरण पावत गेले. सगळं ऋतुमानच पालटलं. ओझोनच्या आवरणाची दुर्दशा झाली. वाढलेल्या प्रचंड उष्णतेने इलेक्ट्रॉनिक उपकरणांची वाताहत झाली. वीज वाहून नेण्याची, निर्माण करण्याची प्रक्रिया खंडित होत गेली. भरीत भर म्हणून माणसाने सोडलेले यच्चयावत सर्व उपग्राह निकामी झाले. सगळं दळणवळण बंद पडलं. संपर्क तुटला. जगात हलकल्लोळ माजला. जमीन, हवा, पाणी सगळया दिशांनी माणसाची कोंडी झाली. माणूस स्वत:च्या अस्तित्वावर उभ्या राहिलेल्या प्रश्नचिन्हाचं उत्तर शोधण्यात खर्ची पडत गेला. माणसाकडे ज्ञान तसं खूप होतं, मात्र ते बहुतांशी हार्डडिस्कमध्ये जपलं होतं. त्यामुळे सगळया संगणक प्रणालींनी मान टाकली, तेव्हा माणसाची अवस्था क्षणार्धात अश्मयुगात पोहोचल्यासारखी झाली. सबंध मानवजात जिवंत राहण्याची धडपड करू लागली. संशोधकांच्या कागदांमध्ये उरल्यासुरल्या सूचना उकरून काढल्या गेल्या. परिस्थिती किती चिघळणार आहे याचा आपापल्या पातळीवर अंदाज लावला जाऊ लागला. जगाच्या एखाद्या कोपऱ्यात कुणाला उत्तर सापडलं असलंच तरी त्याची कुणालाच कल्पना नव्हती. येणारही नव्हती.
पृथ्वीचं वाढलेलं तापमान ही केवळ सुरुवात होती. परिस्थती आणखी बिकट होत गेली. सुकलेल्या जमिनीवरून वेगवान वादळी वारे सुरू झाले. धुळीच्या जोरदार वादळांनी जोर धरला. आधी केवळ रिकामी झालेली गावं-शहरं उद्ध्वस्त झाली. जगात सर्वत्र वाळवंटासारखी स्थिती निर्माण झाली. जगभरातील सगळयाच माणसांनी-प्राण्यांनी उष्णतेवर मात करण्यासाठी उत्तरेच्या शीत प्रदेशांकडे स्थलांतर सुरू केलं. त्या प्रवासात पिढयाच्या पिढया मरण पावल्या. माणसाने उष्णतेपासून वाचण्यासाठी भूस्तराखाली, पर्वता-डोंगराच्या पोटामध्ये आश्रय घेतला. विस्थापित माणसांची एक तुकडी पन्नास वर्षांपूर्वी एका पर्वतरांगेच्या आडोशाला आली. त्यांना त्यातील एका पर्वताच्या मध्यावर आढळलेल्या अवाढव्य गुहेत माणसांनी बस्तान मांडलं. जगात सगळीकडे पाण्याची वानवा होती. मात्र पर्वतरांगेच्या माथ्यावर पडणारा थोडाफार बर्फ वितळून त्याचा प्रवाह दगडांच्या पोटातून पाझरत, गुहेच्या आतून वाहायचा. माणसांच्या त्या समूहाला पाण्याचं वरदान मिळालं. त्यांनी त्या पर्वताला 'गिरी' नाव देत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
गिरीपर्वताच्या पोटात हजारभर माणसं येऊन राहिली. पण शेकडो मैलांचा झालेला प्रवास, औषधांचा तुटवडा, बदललेलं हवामान आणि धुळीची वादळं यांमुळे आता काही शेकडा माणसं उरली होती. त्यातल्याच कुणा जाणकाराने संस्कृतमधलं नाव सुचवलं आणि त्यांच्या वस्तीनं 'गिरिमण्डल' हे नाव धारण केलं.
''आयुषमानऽऽऽ''
त्याला दिलेल्या आवाजाने आयुषमान भानावर आला. मागे समीप उभा होता.
''तुम्हाला बैठकीला पाचारण केलंय.''
काहीतरी विशेष असल्याखेरीज बैठकीचं निमंत्रण येणार नाही हे आयुषमान ओळखून होता. त्याने सामान आवरायला सुरुवात केली.
''मुलाचं प्रशिक्षण कसं चाललंय?'' आयुषमानने जागेवरून उठता उठता विचारलं.
''चाललंय'' समीप आवाजातला त्रास लपवत म्हणाला, पण आयुषमानला ते जाणवलं.
''त्याला सुरुवातीला थोडं जड जाणारच! पण हेच तर त्यांचं शिकण्याचं वय असतं. मी तुला कसं शिकवलं होतं ते विसरलास का? या हवामानाला आणि स्थितीला आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा जास्त सरावलेली असते.'' आयुषमानने त्याला समजावलं.
''पण आयुषमान, तो फक्त नऊ वर्षांचा आहे.'' समीप दुखऱ्या आवाजात म्हणाला.
आयुषमानने एक उसासा सोडला. ''कळतंय रे मला! पण काय करायचं? सृष्टीचं बदललेलं हे चक्र आपल्या जिवावर उलटलंय. आपल्याला जुळवून घेतलंच पाहिजे. आपली पुढची पिढी जगली पाहिजे समीप! भावी आयुष्य मिळवण्यासाठी त्यांच्या बालपणाची ही अशी किंमत आपल्याला आणि त्यांना चुकवावीच लागणार!''
थोडा वेळ नुसताच उष्ण वारा वाहत राहिला.
''पश्चिमेकडे पहाऱ्यावर कोण आहे?'' आयुषमानने विषय बदलंत म्हटलं.
''भैरव आहेत.''
''आणि शिकारीला गेलेली मंडळी?''
''ती केव्हाची आली आहेत.'' समीप उत्तरला.
''ती आली आणि मला कळवलंही नाही?'' आयुषमानच्या भुवया वर गेल्या. तो सुरक्षा दलाचा प्रमुख होता. पहारा, शिकार, संरक्षण, प्रशिक्षण, नियंत्रण अशा सर्व गोष्टी त्याच्या अखत्यारीत येत होत्या.
''आयुषमान, आजची बैठक शिकाऱ्यांच्या गटानेच बोलावलीय.'' समीपनं काहीसं चाचरत म्हटलं.
आपल्याला न विचारता अशी तातडीने बैठक बोलावणं याचा अर्थ बाहेर नक्कीच काहीतरी वेगळं घडलंय, हे आयुषमानने ओळखलं. समीपला पहाऱ्यावर उभं करून आयुषमान वेगाने पावलं उचलत बैठकीच्या जागेच्या दिशेने चालू लागला.
त्याच्या पायाखालचा दगडांमध्ये खोदलेला ओबडधोबड रस्ता गिरिमंडलच्या मध्यभागाकडे जात होता. पन्नास वर्षांच्या काळात गिरिमंडलचा आतील दगड फोडून गुहेचा आकार, उंची वाढवली होती. अजूनही ते काम ठिकठिकाणी सुरू होतं. त्याचे मंद प्रतिध्वनी कानावर पडत होते. गिरिमंडलात जागोजागी जनावरांच्या चरबीत जळणारे दिवे आणि आवश्यक तिथे मशाली ठेवण्यात आल्या होत्या. गरज असेल तेव्हाच दिवे पेटवावेत असा गिरिमंडलचा दंडक होता. पर्वत उतारावर तुरळक भागात काही खाण्यायोग्य वनस्पती उगवत होत्या. त्यांची निगा राखून त्याची गुहेतील कोठारामध्ये साठवण करण्यात येत असेल. पाण्याचा प्रवाह सर्वांना वापरायला मिळे, मात्र तोदेखील गिरिमंडल सुरक्षा दलाच्या देखरेखीखाली!
''धड्धड्ऽऽऽ''
दगडांनी भरलेली एक छोटीशी हातगाडी आवाज करत त्याला आडवी गेली. आयुषमान थबकला. त्याने वर पाहिलं तर चेतन आणि जयेश गाडी ओढत होते. आयुषमानला पाहून चेतन थबकला.
''बाबा तुम्हालाच शोधत होते.''
''हो. समीपने मला निरोप दिला.'' चेतन पुढे निघणार तेवढयात आयुषमानने त्याला बोलावलं. चेतन त्याच्या समोर येऊन उभा राहिला. तो आयुषमानच्या कमरेलाच लागत होता. काळयाभोर टपोऱ्या डोळयांनी तो आयुषमानकडे पाहत होता. आयुषमान गुडघ्यावर बसला. त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याने विचारलं.
''काय रे? काम फार जडय का?''
''नाही!'' चेतन लाजत म्हणाला.
''तुझा बाबा म्हणत होता तुला त्रास होतो म्हणून.''
''नाही नाही!'' चेतन झटक्यात म्हणाला. ''सगळी मुलं करतातच की. मीही करतो. पण हे दगड घेऊन जाण्याचं काम पहिल्यांदाच करतोय ना, म्हणून जरा अंग दुखतं एवढंच. पण जयेश असतो ना सोबत माझ्या.'' आयुषमानने दुरूनच जयेशकडे पाहिलं. जयेशसुध्दा चेतनच्याच वयाचा होता. आयुषमानने त्यांना जायला सांगितलं आणि तो पुन्हा झपझप चालू लागला.
आयुषमान गिरिमंडलमधील लहान मुलांच्या काम करण्याचा व्यवस्थेबद्दल नेहमीच संभ्रमित राहिला होता. त्याला मुलांकडून कामं करून घेणं व्यक्तिश: आवडायचं नाही. गिरिमंडल वसलं, त्या काळात स्थलांतरी झालेली कित्येक लहान मुलं हवामानच्या बदलाला बळी पडली होती. मात्र नव्याने जन्माला येणारी पिढी तुलनेने सोशिक होती. त्यांच्यातला तो घटक हेरून लहान मुलांनी कमी वयातच काटक, कणखर, कामसू व्हावं, त्यांना लहान वयात जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी त्यांना बालवयापासून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसा तो चुकीचाही नव्हता. कारण ते प्रशिक्षण मुलांना खूपच उपयोगाचं पडलं होतं. पर्वतावरील हवेत ऑक्सिजन विरळ होता. शरीर लवकर थकायचं. अशा स्थितीत मुलांची शरीरं काटक-चपळ आणि अधिक कार्यक्षम करण्याचं आव्हान आयुषमानने आणि त्याच्या पूर्वीच्या दलप्रमुखांनी सक्षमतेने निभावलं होतं. त्या प्रशिक्षणातून घडलेल्या मुलांनी, तरुणांनीच गिरिमंडलचं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं. पण तरीदेखील आयुषमान मनातून चुकचुकत होता. अर्थात इलाज नव्हता. गिरिमंडलातील स्थिती पाच दशकांनंतरही सहज जगण्यालायक झाली नव्हती. संसाधणं तुटपुंजी होती. पाणी, नैसर्गिक-कृत्रिम प्रकाश, अन्न अशा अनेक गोष्टींच्या वापरावर मर्यादा होती. पाच दशकं उलटली, तरी तिथे राहणाऱ्या लहानापासून-मोठयांपर्यंत प्रत्येकाची जिवंत राहण्याची लढाई सुरूच होती. त्यांना ती दररोज लढावी लागे. लोकांना त्यांची कामं आणि कामाचे तास ठरवून दिलेले होते. त्यांचा सारा दिवस केवळ आणि केवळ अस्तित्वाच्या लढाईसाठी जुंपलेला होता. आपण साऱ्यांनी जिवंत राहण्यासाठी वर्षानुवर्षं परिश्रम घ्यावेत आणि बाहेर घोंघावणाऱ्या वादळाने एका फटक्यात होत्याचं नव्हतं करावं, हा विरोधाभास आयुषमानला डाचत होता. तो मनातल्या मनात डुचमळत चालत राहिला.
000
उंच छताखाली वर्तुळाकार बसलेल्या त्या सर्वांची कुजबुज आयुषमानच्या कानी दुरूनच पडली. पायाखालच्या दगडात गोलाकार आकारात खोदलेल्या त्या जागेभोवती छतापर्यंत पोहोचणारे खांब होते. त्यामुळे वरच्या उंच छताचा भार सावरला जात होता. संपूर्ण गिरिमंडलाची रचनाच तशी होती. उंच ओबडधोबड खांबांमधून जाणारे लहानमोठे रस्ते असंच गिरिमंडलचं स्वरूप होतं. पश्चिमेकडे असलेल्या प्रवेशद्वाराच्या अगदी विरुध्द टोकाला तेवढंच मोठं प्रवेशद्वार खोदलेलं होतं. तसंच शक्य तिथे पर्वताच्या भिंतींना मोठया खिडक्या पाडण्यात आल्या होत्या. त्यामुळे गिरिमंडलचा आतील विस्तार मोठा असला, तरी हवेची अडचण जाणवत नसे. पण सर्वत्र अंधार दाटलेला असे. प्रकाशासाठी जनावरांच्या चरबीत जळणाऱ्या, किंवा पर्वतावर सापडणाऱ्या वनस्पतीच्या तेलाच्या दिव्यांचा वापर करावा लागे. आतादेखील त्या जागेत असलेल्या खांबांवर मंद प्रकाशाचे दिवे तेवत होते. त्यांच्या उजेडात लाकडाच्या वर्तुळाकार फूटभर उंचीच्या चकत्यांवर बसून सर्व जण समूहप्रमुख विश्राम यांच्याशी चर्चा करत होते. त्यांच्या चेहऱ्याची एक बाजू अंधारात होती आणि त्यावर हलकी नाराजी दिसत होती. त्यांच्या शेजारी त्यांची कन्या आणि गिरिमंडलची वैद्य म्हणून नव्याने जबाबदारी स्वीकारलेली शाल्मली, गिरिमंडलच्या अन्नसाठयाच्या पुरवठयावर देखरेख करणारे बसवराज, मुलांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी पाहणारे दिपेश, त्यासमवेत फारूख, दिनकर, माधव अशी काही वयोवृध्द मंडळी बसली होती. आयुषमान येताच विश्राम यांनी उठून त्याचं स्वागत केलं. शाल्मलीने त्याच्याकडे पाहून आदराने मान झुकवली. आयुषमानने सर्वांना अभिवादन केलं. त्याने बसता बसता शिकारी दलाचा प्रमुख शिरापकडे नजर टाकली. तो अस्वस्थ भासत होता.
विश्राम बोलू लागले.
''गिरिमंडलची निर्मिती झाल्यापासून समूहाच्या रचना आणि नियंत्रणासाठी सुरू झालेल्या या बैठकीला मोठी परंपरा आहे. ही बैठक नेहमीच समूहप्रमुखांनी बोलावली आहे, मात्र आज प्रथमच हा दंडक मोडीत निघाला. आज आपल्या शिकारी गटाने कोणताही विचारविनिमय न करता सर्वांना थेट बैठकीचं बोलावणं धाडलं.'' विश्राम शिरापकडे एक कटाक्ष टाकण्यापुरते थांबले आणि पुन्हा बोलू लागले.
''शिराप यांनी आणलेली बातमी निश्चितच वेगळी आहे, मात्र बैठकीच्या नियमांप्रमाणे आपण आधी गिरिमंडलच्या विविध मुद्दयांवर...''
''आम्हाला पर्वताच्या पश्चिमेकडे एक माणूस सापडलाय.'' हिंदकळणारं भांडं लवंडून पाणी सांडावं तसं शिराप बोलून गेला आणि क्षणार्धात शांतता पसरली. मग हलकी कुजबुज उठत गेली. शिरापच्या शब्दांनिशी सर्वांमधून आश्चर्यमिश्रित कुतूहलाची लाट दौडत गेली होती.
पाच दशकं लोटली. गिरिमंडलचा बाहेरच्या जगाशी कसलाच संपर्क नव्हता. गिरिमंडलचा कोणी माणूस ना कधी बाहेर गेला, ना कोणी कधी बाहेरून गिरिमंडलात आला. ते सगळेच मृत्यूशी झगडण्यात एवढे व्यग्रा होते की बाहेरच्या जगाचा वेध घेण्याचा विचारदेखील त्यांच्या मनाला शिवला नव्हता. त्या साऱ्यांसाठीच बाहेरचं जग मृतवत होऊन गेलं होतं. तिथून कधी काळी कुणी आपल्याकडे येईल ही त्यांच्यासाठी कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती. त्यामुळेच सगळे जण शिरापने उच्चारलेल्या त्या साध्या शब्दांचा अर्थ लावण्यात गढले होते.
शिरापच्या शब्दांनी विश्राम यांचं बोलणं खंडित तर केलं होतंच, पण ती महत्त्वाची बातमी सांगण्याची संधीदेखील हिरावून घेतली होती. त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी रागात रूपांतरित होत होती. आयुषमानच्या नजरेतून ते सुटलं नव्हतं. त्याने त्याकडे दुर्लक्ष करत उत्सुकतेनं विचारलं.
''जिवंत आहे?''
शिरापने मानेनेच होकार दिला. आयुषमानने सोडलेला निःश्वास साऱ्यांनी ऐकला. विश्राम यांची नजर झटक्यात आयुषमानकडे वळली. ''आयुषमान, बैठकीच्या नियमांचा...''
''माफ करा समूहप्रमुख! मात्र ही वेळच अशी आहे. नाहीतर तुमचं बोलणं मी असं मधेच तोडलं नसतं.'' शिरापने अपराधी स्वरात म्हटलं. त्यावर विश्राम काही बोलणार, इतक्यात दिनकर यांचा अनुभवी स्वर उमटला.
''शिराप म्हणतोय ते बरोबर आहे. आपल्यासाठी ही अभूतपूर्व घटना आहे. या समूहाच्या पन्नास वर्षांच्या काळात हे प्रथमच घडतंय.''
दिनकरांसारख्या वडीलधाऱ्या व्यक्तीने शिरापच्या म्हणण्याला दुजोरा दिल्यामुळे विश्राम मनातल्या मनात चरफडत गप्प बसले. मग प्रसंगावरचं नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी शिरापला आदेश दिला. ''शिराप, जरा सविस्तर सांग.''
शिराप बोलू लागला. ''आज पहाटे पर्वतरांगेवर शिकारीसाठी आम्ही बाहेर पडलो. आम्ही पश्चिमेकडील उतारावरून खाली उतरत होतो''
''पश्चिमेकडे?'' पांढऱ्या भुवयांखालचे डोळे मोठे करत माधव यांनी आयुषमानकडे पाहिलं. ''आयुषमान, तुम्ही गिरिमंडलपासून एवढया दूर जाऊ लागलाय? हे धोकादायक आहे! पर्वताखाली जमिनीलगतची हवा कशी आहे हे तुम्हाला पुरतं ठाऊक आहे. तरीही?''
''हो! धोका आहेच.'' आयुषमानने त्यांच्या बोलण्याचा रोख जाणून म्हटलं. ''पण आपल्याकडे फारच कमी पर्याय उरले आहेत. पूर्वी पर्वतरांगांवर सापडणारे लहान लहान प्राणीदेखील आता दुर्मीळ होऊ लागलेत. पर्वताच्या पायथ्याकडे जाण्यावाचून गत्यंतर उरलेलं नाही. मात्र आम्ही पुरेशी सावधगिरी बाळगूनच खाली जातो.'' आयुषमानने शिरापकडे पाहत त्याला नजरेनेच पुढे सांगण्याची खूण केली.
''आम्ही पश्चिमेकडच्या उतारावरून खाली जात होतो.'' शिराप पुन्हा बोलू लागला. ''पूर्वेकडचं वादळ पर्वतावर पोहोचण्याच्या आत आम्हाला मागे फिरायचं होतं. आम्ही पायथ्यापासून थोडं वर अंतरावर चालत होतो. तेव्हा आम्हाला उतारावर तो माणूस आडवा पडलेला दिसला. त्याच्या शेजारी दोन मोठया झोळया पडल्या होत्या. आम्ही बराच वेळ दूर उभे राहून पाहत राहिलो. आम्हाला वाटलं, तो मेलेला आहे. खूप वेळानंतर आम्हाला त्याच्या पोटाची हालचाल दिसली. मग आम्ही त्याला उचलून गिरिमंडलात आणलं.''
''कुठे ठेवलाय त्याला?'' माधव विचारते झाले.
विश्राम उभं राहत म्हणाले, ''उत्तरेकडच्या खोबणींमध्ये!''
000
दगडी भिंतीच्या खिडकीतून आलेला मावळतीचा म्लान उजेड उन्हाने रापलेल्या चेहऱ्यावर पडला होता. काळयाझार चेहऱ्यावरच्या पांढऱ्या दाढीचे केस वाऱ्यावर किंचित हलत होते. तो शांतपणे निजला होता. त्याच्या कपाळावर आणि पोटावर लावलेला लेप सुकून त्यामध्ये बारीक भेगा पडल्या होत्या. कमरेवर पांघरलेलं छोटं वस्त्र सोडलं, तर त्याचं सारं शरीर अनावृत्त होतं. धूळमातीने माखलेलं ते शरीर श्वासागणिक संथपणे वरखाली होत होतं.
वसुंधरा हातात पाण्याचं पसरट भांड घेऊन लहान लहान पावलांनी त्या खोबणीत आली. मागोमाग शाल्मलीने प्रवेश केला. नव्याने आणलेल्या त्या माणसाचं शरीर पुसून घेण्यासाठी शाल्मलीना सहकार्य करण्याचं काम वसुंधराकडे आलं होतं. तिच्या बालसुलभ मनाला जेवढी उत्सुकता वाटत होती, तेवढीच ती घाबरलीदेखील होती. तिने आवाज न करता पाण्याचं भांडं त्या माणसाच्या शेजारी ठेवलं. शाल्मली पलीकडे उभे राहिली. वसुंधराने कपडा पाण्यात भिजवला आणि तो त्या माणसाच्या खांद्यावर ठेवून हळूच दाबला. कापडाच्या सूक्ष्म रेघांमध्ये अडवलेलं पाणी मोकळं होऊन मातकट त्वचेवरून वाहू लागलं. गढूळ पाण्याची धार वसुंधराच्या पायाजवळून वाहत गेली. शाल्मली त्याचे पाय स्वच्छ करत होती. वसुंधरादेखील लवकरच त्याचं अंग पुसून घेण्यात गढून गेली. म्हणूनच त्याने त्याचे सुरकुतलेले डोळे किलकिले केल्याचं तिच्या ध्यानात आलं नाही. मधेच तिची नजर सहज त्याच्या चेहऱ्यावरून फिरली आणि त्याचे उघडे डोळे पाहून ती जोराने दचकली. शाल्मली झटकन तिच्याजवळ आली. तो वृध्द चेहरा भिरभिरत्या नजरेने इतस्तत: पाहत होता.
''मी शाल्मली. तुम्ही सुरक्षित आहात. ही गिरिमंडल वसाहत आहे. आमच्या काही लोकांना तुम्ही बाहेर बेशुध्दावस्थेत आढळलात.'' शाल्मली थोडा वेळ थांबून त्या व्यक्तीच्या डोळयांकडे पाहत राहिली. शाल्मलीच्या बोलण्यानंतर तो किंचित निश्चिंत झाल्यासारखा वाटला.
''कसं वाटतंय तुम्हाला आता?'' तिने पुन्हा विचारलं.
''चांगलं वाटतंय.'' त्याचे ओठ पुटपुटले. मग तो हातावर भार देत जागेवर उठून बसला. ''पाणी मिळेल?''
''हो! वसुंधरा, यांना पाणी दे. मी इतरांना कळवून येते.'' शाल्मली बाहेर निघून गेली. वसुंधराने भांडभर पाणी आणून त्या माणसाच्या हातात दिलं. त्यानं गटागटा पाणी पिऊन भांडं खाली ठेवलं. वसुंधरा त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्यानेही क्षणभर तिच्याकडे रोखून पाहिलं. मग चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये एक मोठ्ठं प्रसन्न हास्य पसरलं. त्यानं ओठांचा चंबू करत म्हटलं.
''काय गं ए पिल्लूऽऽ!''
ते ऐकून वसुंधरा डोळे बारीक करून खळखळून हसू लागली. तिचं हसणं त्या खोबणीत विलसत राहिलं.
000
शंतनू, जयेश आणि मिहीर सर्वांची वाट पाहत बसले होते. रात्रीच्या जेवणाची वेळ होत आली तरी वसुंधरा, चेतन, अपूर्वा, समीर कुणाचाच पत्ता नव्हता. गिरिमंडलातील सर्वांचं जेवण एकाच जागी होत असे. त्यामुळे ते सगळे वेगवेगळयां कामांमध्ये असले, तरी दिवसातून किमान दोन वेळा त्यांची भेट होत असे. पण आज त्यांना इतरांपेक्षा वसुंधराला भेटण्याची उत्सुकता होती. ती नव्याने आलेल्या त्या माणसाच्या खोबणीत काम करत होती. त्यामुळे तिला चटकन भेटावं आणि खूप खूप प्रश्न विचारावेत असं त्या दोघांना आतुरतेने वाटत होतं.
आजूबाजूला इतर मुलं जमत होती. त्यांची हलक्या आवाजातील कुजबुज आसपास भरून राहिली होती. त्या विभागावर देखरेख करणारा वत्सल सर्व मुलांना बसवत होता. त्याचे सहकारी दुपारच्या जेवणानंतर धुऊन सुकवलेल्या पत्रावळया मांडत होते. तेवढयात वसुंधरा, अपूर्वा, चेतन आणि समीर तिथे येऊन पोहोचले.
''अगं, किती उशीर? इथे बस.'' शंतनू तिला शेजारी जागा करून देत म्हणाला.
सगळयांसमोर पत्रावळया वाढल्या गेल्या.
''मग काय झालं आज तिकडे? कसाय तो माणूस? काही बोलला का?'' शंतनूनू प्रश्नांचा रतीब ओतला. वसुंधरा हसली.
''त्याला शुध्द नव्हती. मी आणि शाल्मली त्याचं अंग पुसायला गेलो तेव्हा ते अचानक उठून बसले.''
''त्याने काही केलं नाही ना तुला?'' अपूर्वानं डोळे मोठे करत विचारलं.
''नाही नाही! तो तसा चांगला आहे.''
पत्रावळीवर जेवण वाढलं होतं. ओळीने मांडलेल्या रांगांमध्ये सगळी मुलं जेवत होती. शेजारच्या कक्षामध्ये मोठया माणसांची जेवणं सुरू होती. सगळयांचे हात जेवणात गुंतले असले तरी लक्ष वसुंधरा काय सांगते त्याकडे लागलं होतं. शंतनूनेदेखील घास तोंडात सरकवताना विचारलं.
''चांगला म्हणजे नेमकं काय? काय केलं त्यांने?'' त्याची उत्सुकता ओसांडून जात होती.
''म्हणजेऽऽऽ'' वसुंधरा आठवत म्हणाली. तिला काय सांगावं ते सुचेना. ''म्हणजे तो हसला!'' वसुंधराच्या चेहऱ्यावर स्मित होतं.
''हसला? का हसला?'' - समीर.
''का असं काही नाही. सहज हसला तो.'' वसुंधराचं बोलणं मागच्या रांगेतील मुलं जेवण थांबवून वळून वळून ऐकत होती.
''आणि तो मला पिल्लू म्हणाला.'' वसुंधराने मजा वाटल्यासारखं म्हटलं.
''काय? पिल्लू म्हणाला! पिल्लं तर प्राण्यांची असतात. हाऽ हाऽऽ हाऽऽऽ'' समीर जोराने हसला. त्याचं बोलणं ऐकून चेतन, वसुंधरा, अपूर्वा आणि आजूबाजूची बरीच मुलंदेखील हसू लागली. त्यांचा गलका ऐकून वत्सल तिथे आला.
''कोण हसतंय ते जेवताना?'' त्याने हळूच दटावलं. सगळी मुलं झटक्यात शांत झाली. शांतपणे जेवू लागली.
''लवकर जेवण करून झोपायला चला. उद्या सकाळी कोणाला लवकरची कामं नेमून दिली आहेत?''
काही मुलांचे हात वर झाले. ''हाऽ! मग चला आवरा लवकर.'' वत्सल निघून गेला.
मागच्या रांगेतल्या एकीने म्हटलं, ''ही आपली मोठी माणसं फारच कमी वेळा हसतात, नाही का?''
''हो ना! म्हणूनच तो माणूस हसला तेव्हा मला खूप मजेशीर वाटलं. तो बोललासुध्दा असं काहीसं वेगळंच.'' वसुंधराने तोंडाचा चंबू करत बोलण्याचा प्रयत्न केला. ते पाहून मुलं दबक्या आवाजात पुन्हा खिदळली. जयेश पानावर झुकून वल्लरीकडे पाहत म्हणाला.
''ए वसुंधरा! आम्हाला भेटायचंय त्याला.''
000
गिरिमंडलच्या पूर्वेकडील खोबणीतून आत प्रवेश केला की उजवीकडे मोठा कक्ष होता. तिथे खिडक्यांची संख्या जास्त असल्यामुळे भरपूर वारा आणि उजेड असायचा. वसाहतीबद्दलच्या महत्त्वाच्या बैठका तिथेच होत. विश्राम यांनी शाल्मलीकडून आदल्या रात्री निरोप आल्यानंतर वसाहतीतील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना सकाळी बैठक असल्याबद्दल कळवलं होतं. तसे सर्व जण तिथे जमले होते. कक्षामध्ये खूप साऱ्या चकत्या ठेवण्यात आल्या होत्या. बरीच मंडळी त्यावर बसली होती. विश्राम त्या कक्षामध्ये कायमस्वरूपी बांधलेल्या दगडी आसनावर बसले होते. त्यांच्या समोर आयुषमान, शाल्मली, माधव, दिनकर, फारूख, वत्सल, बसवराज, दिपेश अशी सर्व महत्त्वाची मंडळी बसली होती. काही वेळातच एका माणसाच्या पाठोपाठ त्याने कक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्या येण्याने कुजबुज थांबली. त्याने सर्वांवरून नजर फिरवली. त्याचा चेहरा प्रसन्न होता. ओठांवर हलकं स्मित होतं. त्याची शरीरकाठी बारीक असली तरी तो उंच होता. त्याचा चेहरा आणि विशेषतः डोळे पाहिले, तर त्याला जगाचा बराच अनुभव असावा हे ध्यानी येत होतं. पांढऱ्या दाढीमुळे त्याचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसत होतं. तो कालपेक्षा बराच हुशारलेला वाटत होता. त्याने गळयापासून पायापर्यंत सैल अंगरखा घातला होता. गळयाभोवती मफलर घ्यावा तसा एक कपडा घेतला होता. त्याचे कपडे काल कुणीतरी स्वच्छ धुऊन आणून दिले होते. त्याने त्याची झोळी मागितली, मात्र ती बैठकीनंतर त्याला मिळेल असं सांगण्यात आलं होतं. तो येऊन उभं राहताच शाल्मली उभी राहिली. तिने त्याला बसण्याची जागा दाखवली. त्याने त्या जागेकडे जाता जाता सर्वांना मान झुकवून, डोळे किंचित मिटून अभिवादन केलं. त्याच्या वावरण्यात सहजता होती. एकदोन चेहऱ्यांवर हलकं हसू उमटलं. तो माणूस आयुषमानपासून काही अंतरावर असलेल्या चकतीवर बसला. आयुषमान त्याच्याकडे टक लावून पाहत होता. त्या माणसाची फिरत असलेली नजर आयुषमानच्या डोळयांना येऊन भिडली. काही क्षण तशीच राहिली. आयुषमानला कसलासा स्निग्ध भाव जाणवला. तो हसला. त्या माणसानेदेखील तेवढंच प्रसन्न हास्य केलं.
विश्राम यांनी बोलायला सुरुवात केली.
''आपल्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची वार्ता तुम्हा सर्वांना माहीत आहे. आपल्या साऱ्यांच्याच मनात त्यांच्याबद्दल प्रश्न आहेत. त्यांना जाणून घेणं आणि त्यांच्याबद्दल निर्णय घेणं असा आजच्या या बैठकीचा हेतू आहे.''
''माझी चौकशी सुरू होण्यापूर्वी मला तुमचे आभार मानायचे आहेत.'' कोपऱ्यातून आलेल्या त्या आवाजाबरोबर सगळयांच्या माना त्याच्याकडे वळल्या. डोळयांत किंचित मिश्कील छटा घेऊन सस्मित चेहऱ्याने तो उभा राहिला. त्याच्या आवाजाचा पोत आकर्षक होता. ऐकत राहावा असा. उच्चार सुस्पष्ट होते. शब्दोच्चारांना लय भासत होती. त्याने सर्वांकडे पाहत हात जोडले. ''नमस्कार. तुम्ही साऱ्यांनी मला मरणाच्या दाढेतून वाचवलंय. याबद्दल शाल्मली तुमचे विशेष आभार.'' शाल्मलीने विनयतेनं हसून प्रतिसाद दिला. ''एका समूहासोबत स्थलांतर करताना वादळाच्या तडाख्यात मी सापडलो. वाचलो, मात्र त्यांच्यापासून दुरावलो. आश्रयाच्या शोधात फिरत असताना माझी शुध्द गेली. जेव्हा शुध्दीवर आलो तेव्हा एका गोड मुलीचा चेहरा माझ्यासमोर होता.''
''तुम्ही इतर माणसांना पाहिलंय?'' माधव यांनी विचारलं.
''हो! मी अनेक वर्षं वेगवेगळया समूहांसमवेत राहिलोय.'' तो उत्तरला.
''म्हणजे बाहेर अजूनही लोक जिवंत आहेत!'' फारूख यांच्या बोलण्यात कसलीशी आशा जाणवत होती.
''पण स्थलांतरं तर केव्हाची थांबली आहेत.'' विश्राम यांनी म्हटलं.
''नाही. ही मूळ स्थलांतरं नव्हेत. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो, तिथला पाण्याचा साठा आटून गेला, त्यामुळे आम्ही दुसऱ्या जागेत स्थलांतर करत होतो.''
''तुम्ही कुठे राहात होतात?'' आयुषमानने विचारलं.
''मला नेमकं सांगता येणार नाही. पण ते ठिकाण दक्षिणेकडे असावं, कारण पाण्याच्या शोधात आम्ही उत्तरेकडे निघालो होतो. आम्ही दहा दिवस चालत होतो, तेव्हा वादळाने आम्हाला गाठलं.''
''तुम्ही राहत होतात, ती माणसं कधी होती? मूळची कुठली होती? तुमच्या राहण्याची पध्दत कशी होती?'' दिनकर यांनी प्रश्न केला.
''त्या गोष्टी आपण बोलूच, आधी तुमचं नाव तरी कळू द्यात.''
''मला सर्व जण काका म्हणतात. आधी एक नाव होतं, पण पृथ्वीवरच्या नव्या वसाहती निर्माण झाल्यापासून कुणी मला नावाने हाक मारलीच नाही. तुम्हीदेखील मला 'काकाच' म्हणा! तसाही मी वयानं तुमच्यापेक्षा जरा मोठाच आहे.'' तो माणूस मिश्कील हसत म्हणाला. शाल्मलीला त्याचं मनमोकळं वागणं आवडत होतं. समोर बसलेल्या बहुतेकांची कमीअधिक फरकाने तीच भावना होती. त्याने प्रश्नाला दिलेली बगल विश्रामना आवडली नाही.
''हो! पण तरीही एकदा नाव कळू द्या की!''
''ते नाव भूतकाळात जमा झालंय. वर्तमानाने मला 'काका' ही नवी उपाधी दिलीय असं समजा. काका म्हणून आवाज दिला तरी पुरे.'' एवढं बोलून 'काका' खाली बसला. त्याने त्या कृतीतून चौकशी संपल्याचे संकेत दिले होते. विश्रामना ते फार खटकलं. पण फारूख उभे राहिल्याबरोबर त्यांना शांत राहणं भाग पडलं.
''आपण काकांचं..'' फारूख यांनी हलकं स्मित करत काकाकडे पाहिलं. त्यानेदेखील मान डोलावून होकार दिला. ''तर आपण काकांचं बोलणं ऐकलं.'' फारूख पुन्हा बोलू लागले.
''मला ही देवाची कृपा वाटते की त्याने एवढया खडतर परिस्थितीतही या माणसाला आपल्यापर्यंत पोहोचवलं. आता त्यांची काळजी घेणं आणि त्यांना आपल्यात सामावून घेणं ही आपली जबाबदारी आहे.''
सर्वांनी एकमताने मान डोलावली. तिघा जाणकार वृध्दांनी जवळ जाऊन काकाची विचारपूस सुरू केली. इतर लोकांनीदेखील त्यांच्याभोवती कोंडाळं केलं. विश्राम यांना उगाचच त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटत राहिलं.
000
शाल्मली काकांसह गिरिमंडलच्या रस्त्यावरून चालली होती. बैठकीपेक्षा त्यानंतरची अनौपचारिक बोलणी फार वेळ सुरू राहिली. काकांना सध्या आयुषमानच्या राहण्याच्या जागेशेजारी ठेवावं असे विश्राम यांनी आदेश दिले. त्यायोगे त्या नव्या माणसावर नजर राहील असा त्यांचा विचार होता. मात्र आयुषमान ज्या आपलेपणाने त्याच्या शेजाऱ्याचं स्वागत करायला पुढे सरसावला, ते पाहून विश्राम यांना कसनुसं झालं. दोन झोळयांपलीकडे काकांचं काहीच सामान नव्हतं. ते जागेवर ठेवल्यानंतर शाल्मलीने त्यांना गिरिमंडल फिरवून आणायची जबाबदारी स्वीकारली. गिरिमंडलचा अंतर्गत भाग, प्रशासकीय कक्ष, खोबणी, पाणीपुरवठयाची व्यवस्था, अन्नपुरवठा, पर्वत उतारावरील वनस्पती, आरोग्य विभाग अशा इत्यंभूत गोष्टी दाखवल्या. ते सारं दाखवत असताना शाल्मली काकांच्या अनुभवविश्वात डोकावून पाहत होती. काकांकडे बाहेरच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही जगांचा मोठा अनुभव होता. पुन्हा त्यांना बोलण्याची चांगली हातोटी होती. त्यामुळे अगदी साधी बाबसुध्दा ते खुमासदार पध्दतीनं सागत. शाल्मलीला त्यांचं बोलणं, त्यांचा सहवास आवडत होता.
ते दोघे चालत चालत गिरिमंडलच्या विस्तारासाठी सुरू असलेल्या खोदकामाजवळ येऊन पोहोचले. शाल्मलीला वसुंधरा नजरेस पडली. तिने खुणेनेच तिला जवळ बोलावलं. वसुंधरा काकांकडे पाहत हळूहळू चालत तिच्याजवळ आली. काकांनी डोळे मोठ्ठे करून ओठांचा चंबू केला आणि म्हटलं,
''काय गं ए पिल्लू!''
वसुंधरा पुन्हा खळखळून हसली, पण लागलीच तिने इकडेतिकडे पाहत हसणं आवरतं घेतलं. काकांनीसुध्दा आसपास पाहिलं. एकदोन मोठी माणसं त्यांच्या दिशेने पाहत होती. मग ती कामात गुंतून गेली.
''इथे काय करतेयस?'' शाल्मलीने विचारलं.
''जयेशच्या हाताला लागलं होतं. लेप घेऊन आले होते.'' वसुंधराने काकांकडे तिरक्या नजरेने पाहता पाहता म्हटलं.
''जयेश कोण? तुझा मित्र?''' काकांनी विचारलं.
''नाही! सहकारी. त्याला भेटायचं तुम्हाला. तो इथेच आहे. ते पाणी साठवण्यासाठी दगड खोदतायत ना, आज तिथे तो दगड वाहून नेण्याचं काम करतोय!'' वसुंधराने उत्साहाने म्हटलं. काकांनी शाल्मलीकडून तिथल्या लहान मुलांच्या प्रशिक्षणाबद्दल ऐकलं होतं. त्यांनी शाल्मलीला मुलांना भेटता येईल का असं विचारलं. तिनं होकार दिला.
''जेवणाची वेळ झालीय. आपण थेट तिकडेच जाऊ या का? सगळेच भेटतील.'' वसुंधराच्या सूचनेवर काकांनी मान डोलावली. शाल्मली वसुंधराला सूचना देऊन तिच्या विभागाकडे निघून गेली. काका वसुंधरासोबत चालू लागले.
''काय गं पिल्लू, तुझं नाव काय?''
पिल्लू शब्द ऐकून वसुंधराला पुन्हा मजा वाटली. ''माझं नाव वसुंधरा.''
''व्वा!'' काकांच्या तोंडून उद्गार निघाला. त्यांच्या डोळयांसमोरून खूप खूप वर्षांपूर्वी पाहिलेलं जंगल, समुद्र, हिरवंगार डोंगर असं बरंच काही तरळून गेलं.
''तुला तुझ्या नावाचा अर्थ माहितीय का?''
''नाही.''
''तुझ्या नावाचा अर्थ म्हणजे पृथ्वी!''
वसुंधरा काही क्षण शांतपणे चालत राहिली. ''हे असं वाईट नाव का ठेवलंय माझं?'' ती हिरमुसून म्हणाली.
''वाईट कायय त्यात?'' काकांनी विचारलं.
''आणि नाहीतर काय? सगळी मोठी माणसं म्हणतात की पृथ्वी खराब झालीय. तिच्यावर ना झाडं आहेत, ना पाणी आहे. हे असल्या वाईट जागेचं नाव मला का दिलंय?'' मोठाल्या डोळयांनी प्रश्न केला. तसे काका हसले.
''अगं वेडाबाई! खरोखरची पृथ्वी अशी नाहीच मुळी! ती तर वेगळीच जम्माडी गंमत आहे.'' काका डोळे मोठ्ठे करत म्हणाले तशी वसुंधरा उत्साहाने म्हणाली, ''मला सांगा ना ती गंमत!''
काका उगाचच मोठयाने खाकरले आणि मोठयाने बोलू लागले.
''ही खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा ही पृथ्वी आता दिसते तशी नव्हती. खूप गोंडस आणि हिरवीगार होती''
काका आणि वसू बोलत बोलत चालले होते. मधूनच वसुंधराचे उद्गार, टाळया ऐकू येत होतं. त्या दोघांचा आवाज दूर दूर जात राहिला.
खांबांना लावलेल्या दिव्यांची वात उगाचच मोठी झाल्यासारखी भासली.
गिरिमंडलचा कुठलासा दगड अलगद पाझरू लागला होता.
000
पत्रावळया सर्वांच्या समोर मांडल्या होत्या खऱ्या, पण साऱ्यांचे हात थांबलेले होते. वसुंधराच्या नावाचा अर्थ ऐकून सगळेच चाट पडले होते.
''एवढयाशा नावात एवढं सगळं?'' अपूर्वाने नेहमीप्रमाणे डोळे मोठे करून विचारलं. वसुंधराला स्वत:च्या नावाचा अर्थ सांगताना फार मजा आणि अभिमान वाटत होता. जवळपास प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर उत्साह होता. काका ही व्यक्ती अल्पावधीत सबंध गिरिमंडलच्या कुतूहलाचा विषय झाली होती. त्यामुळे काका सगळया लहान मुलांबरोबर बसले असले तरी त्यांना निव्वळ पाहण्यासाठी मोठी माणसं आसपास घुटमळत होती.
''काका तुम्ही एवढे दिवस कुठे होतात?''
''तिकडे लहान मुलं असतात का?''
''तुमचं वय किती?''
''तुम्ही कधी हत्ती पाहिलाय का?''
''काका, पुन्हा पाऊस पाडायचा असेल तर काय करायचं?''
मुलांचे एकामागोमाग एक प्रश्न काकांवर येऊन आदळत होते. काका कधी खरीखुरी, तर कधी गमतीशीर उत्तरं देत होते. हास्याचे फवारे उडत होते. मध्येच समीर म्हणाला,
''हे काय काका? तुम्ही फक्त वसुंधराला गंमत सांगितली. आम्हालाही सांगा ना!''
''हो हो काका! आम्हालाही ऐकायचीय नवी गंमत.'' सगळया मुलांनी समीरच्या मागणीत आवाज मिसळत जोराने म्हटलं.
''ठीकय. ठीकय.'' काका सर्वांना शांत करत म्हणाले. ''सांगतो. पण सगळयांनी ऐकता ऐकता पटापट जेवायचं. चालेल?''
''होऽऽऽ'' म्हणत सगळयांनी पटापट घास तोंडात भरले.
''तरऽऽऽ कशाची गंमत सांगावी बरं...'' असं म्हणत काका आजूबाजूला पाहू लागले. ''हाऽऽऽ तुम्हाला लाकूडतोडयाची गोष्ट माहितीय का?''
''नाही!'' चेतनने म्हटलं.
''तर तुमची ही मोठी माणसं जसा दगड तोडतात ना, तसाच एक लाकूड तोडणारा माणूस होता. त्याला लाकूडतोडया म्हणत. फार पूर्वी जेव्हा जंगलं होती, तेव्हा त्यामध्ये सुकलेली झाडं असायची. लाकूडतोडया ती झाडं तोडायचा.''
पत्रावळींवरचे हात पुन्हा थांबले. डोळे मोठे करत सगळी मुलं गोष्ट ऐकू लागले. गोष्ट रंगत गेली. गरीब लाकूडतोडयाची कुऱ्हाड विहिरीत पडताना ती दचकली, आकाशातून देवी खाली आल्यानंतर आश्चर्यचकित झाली, लाकूडतोडयाचा प्रामाणिकपणा पाहून खूशदेखील झाली. गोष्टीमध्ये 'कुऱ्हाड म्हणजे काय हो काका?', 'सोनं-चांदी काय असतं?'' असे प्रश्न उमटत होते. काका मोठया कौशल्याने गोष्टीचा सूर सुटू न देता उत्तरं देत होते. त्यांच्या समोर बसलेल्या टपोऱ्या डोळयांमागे अलगद काहीतरी घडत होतं. बाहेर सूर्यासमोरचा ढग दूर सरकला होता. पर्वातसमोरच्या मैदानावर खूप दिवसांनी ऊन पडलं होतं.
000
दिवसभराच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी समूहप्रमुखांच्या कक्षात सगळे जमले होते. विश्राम दिवसभरात घडलेली कामं जाणून घेत होते. त्यामध्ये बदलांची, सुधारणांची सूचना करत होते. आयुषमान आणि त्याचा साहाय्यक आवश्यक त्या गोष्टींची नोंद करून घेत होते.
''आज सगळा दगड वाहून बाहेर टाकला गेला नाही का?'' विश्राम यांनी विस्तार विभागाच्या प्रमुख वल्लरी यांना प्रश्न केला.
''नाही. आज सूर्य लवकर झाकोळला गेला. दिवसही लहान होऊ लागला आहे आणि जेवणाच्या वेळेनंतर मुलं आज उशिरा कामावर आली. त्यामुळे दगड वाहण्याचं काम थोडं कमी झालं.'' वल्लरी म्हणाल्या.
''मुलं उशिरा आली? सगळी? का?''
''ते काका आज जेवणाच्या वेळी तिथे आले होते.'' वत्सलने पुढे होत म्हटलं.
''मुलांशी बोलत होते. त्यामध्ये बराच वेळ गेला.''
''हे असं कामात कसूर करून कसं चालेल?'' विश्राम यांनी प्रश्न केला.
''पण सगळी मुलं प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिथे येतात. आवश्यक आहे ते त्यांना सराव मिळणं, त्यांच्याकडून काम करून घेणं हे दुय्यम आहे.'' आयुषमान म्हणाला.
''हो! पण वेळेवर येणं-जाणं आणि अपेक्षित वेळेत काम पूर्ण करण्याचा अंदाज येणं या गोष्टीदेखील सरावामध्येच येतात.'' विश्राम यांनी ताडकन उत्तर दिलं. आयुषमान गप्प बसला. मग विश्राम काहीतरी विचार करून आयुषमानला म्हणाले,
''तू जरा त्यांच्याशी बोलून घे. इथले संकेत, नियम आणि कामाच्या पध्दती त्यांना कळतील तर बऱ्या.'' आयुषमानने होकार दिला.
''पाणी साठवायच्या हौदाचं काम कुठपर्यंत आलं?'' विश्राम यांनी पुढचा प्रश्न केला.
वल्लरी बोलू लागल्या. ''हौदाचं काम पूर्ण होत आलंय. पूर्वी तिथे फार अंधार होता, म्हणून कामाची गती मंदावली होती. आपण छतावर एक तिरपी खिडकी काढल्यापासून मुबलक उजेडात वेगाने काम सुरू झालंय. काही दिवसांत तो हौद तयार होईल. पाण्याच्या मुख्य प्रवाहातून काढलेला एक लहान कालवा तयार आहे. हौद तयार होताच तो कालवा सुरू करता येईल.''
''उत्तम!'' विश्राम प्रसन्नतेने म्हणाले, ''आपण आखलेल्या योजनेप्रमाणे सगळं घडतंय. हिवाळा सुरू होऊन पर्वतरांगेवरचा बर्फ गोठण्यापूर्वीच आपले सगळे हौद पाण्याने भरून जातील आणि आपण नव्याने खोदलेला हौद क्षमतेच्या पातळीवर सर्वात मोठा ठरेल.'' वल्लरी अभिमानाने म्हणाल्या.
000
आयुषमानने त्या रात्री काकांना गाठलं. जेवणानंतर दोघे फिरत फिरत पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ जाऊन बसले. हवेत जाणवणाऱ्या रात्रीच्या गारव्याची पातळी दिवसागणिक खालावत होती. दोघे जण अंग चोरून उभे होते.
''काका, दुपारी म्हणे तुमच्या गप्पा रंगल्या होत्या मुलांबरोबर?''
''हो ना! मुलं गोड आहेत. बोलकीसुध्दा! किती प्रश्न विचारतात! थोडं वळण दिलं ना की कमाल गोष्टी करू शकतील बघ!'' काका दूर अंधारात पाहत म्हणाले. ढगाळलेल्या आकाशातून रात्रीच्या चांदण्या दिसत नव्हत्या. सगळा नुसता गर्द काळा रंग.
''मी तुम्हाला तेच सांगणार होतो काका! या वसाहतीच्या स्वत:च्या काही पध्दती आहेत. नियम आहेत. काही संकेत तर काही प्रघात पडून गेले आहेत. तुम्ही त्या समजून घेतलं तर चांगलं ठरेल. आज तुमच्या गप्पांमध्ये मुलं रंगून गेली आणि कामावर उशिरा पोहोचली. वरिष्ठांना ती गोष्ट खटकली. तुम्ही जरा या गोष्टींचा विचार करा.'' आयुषमानने विनंतीवजा आवाजात म्हटलं.
काकांनी आयुषमानकडे पाहत नजरेनेच होकार दिला.
''मला तुमची रचना कळत नाही. मुलांना प्रशिक्षण देणं ठीक, पण निदान त्यांच्या कामाच्या जागा पाहा. किती अंधार असतो तिथे? अशा वातावारणाचा माणसाच्या मनावर परिणाम होतो.''
''काका, आपल्याकडे दिवे जाळण्यासाठी इंधन अपुरं आहे.''
''मग निदान त्यांच्या कामाच्या जागा तरी बदला. आणि ती मुलं राहतातदेखील वेगळी? त्यांना आईवडिलांचा सहवास नाही ही गोष्ट खटकत नाही का तुम्हाला?''
काकांनी आयुषमानच्या मनातली नको ती तार छेडली होती. त्याच्याकडे त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नव्हतं.
''तुमचा मुद्दा योग्यय काका, पण तुम्ही परिस्थिती जाणता. सगळयांना समूहाच्या अस्तित्वासाठी होईल तितका वेळ द्यावाच लागतो. लहान मुलं असलेले आईबाप कामावर असले की त्यांचं काय? असा प्रश्न फार पूर्वीच उभा राहिला होता. त्यावर उत्तर म्हणून मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेणारा विभाग अस्तित्वात आला. पण आम्ही दिवसातून एक वेळा आईवडिलांची आणि मुलांची भेट घडवतोच. तो नियमच आहे.''
''दिवसातून एक वेळा? ते काय एकवेळचं जेवण आहे का? नुसती भेट नाही, सहवास लागतो मुलांना. कशी वाढणार ती? कशी जगणार ती?''
''काका, या स्थितीत जगण्यापेक्षा जिवंत राहणं महत्त्वाचं आहे, नाही का?''
काकांना काहीतरी बोलायचं होतं. पण ते गप्प राहिले. मग शांतपणे अंधाराला पाठ करून ते झोपण्याच्या जागेकडे चालत गेले.
000
काकांनी झाडांच्या सालींपासून आणि तंतूंपासून वस्त्र तयार करण्याच्या विभागात काम सुरू केलं. वय झालं असलं तरी त्यांचे डोळे तीक्ष्ण होते. ते अगदी पहाटे उठून काम सुरू करायचे. मधेच एक चक्कर टाकून वेगवेगळया ठिकाणांवर गुंतलेल्या मुलांना भेटून यायचे. काकांनी जेवणाच्या ठिकाणी जाणं बंद केलं असलं, तरी मुलांनी चटकन जेवण उरकून कामावर जाण्याआधी काकांना भेटण्याची पध्दत सुरू केली. मुलांना काकांकडून रोज नवनव्या गोष्टी ऐकण्याचा छंद जडला. ससा आणि कासव, कोल्हा आणि द्राक्षं, टोपीवाला आणि माकड, कुठलातरी राजकुमार आणि त्याची राजकन्या, बोलणारे प्राणी-पक्षी अशा कित्येक बहारदार गोष्टी मुलांच्या कानावर पडत होत्या. काकांच्या सांगण्याच्या तऱ्हेमुळे मुलांना त्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायला आवडत. गोष्टींच्या दरम्यान येणारे निरनिराळे संदर्भ मुलांना गोंधळात टाकायचे. मग प्रश्नांचा भडिमार व्हायचा. काका त्यांना उत्तरं देताना पृथ्वीचा इतिहास, पुराण, तंत्रज्ञान, समाजजीवन यांची माहिती देत जायचे. मुलांसाठी ते गोष्टींपेक्षा आश्चर्यकारक असायचं.
काका गिरिमंडलमध्ये हळूहळू प्रसिध्द होत होते. लहान मुलांमध्ये अधिकच. रोज रात्री सगळी कामं संपून जेवण उरकल्यानंतर काकांच्या झोपण्याच्या जागी शंभर एक लहान मुलांची मैफल जमायची. काकांनी बोलावं आणि मुलांनी मन लावून ऐकावं अशी प्रथाच पडून गेली. ज्या रात्री काकांनी गोष्टींमध्ये परी आणली, त्या दिवशी यच्चयावत मुलांना झोप लागली नव्हती. रात्रीच्या गोष्टींच्या मैफली लांबू लागल्या. चंद्र, गणपती, समुद्रातले मोठे मासे, घोडागाडया, ढगांच्या दुलईवर धावणारे शुभ्र घोडयांचे रथ, खाऊचे महाल... काकांच्या गोष्टीत काय नसायचं! प्रत्येकाला किती ऐकू आणि किती नको असं होई. एके रात्री काकांच्या गोष्टीत जादूच्या वस्तू आल्या आणि समस्त मुलं वेडावली. काकांना साच्यापलीकडे जाऊन बसल्या बसल्या नव्या गोष्टी तयार करण्याची हातोटी होती. त्यांच्या गोष्टीत समोर बसलेली मुलं पात्रं म्हणून येत. मुलं गोष्टींत आणखीनच गुरफटून जात.
काका कधीतरी गोष्ट सांगता सांगता त्यांच्या झोळीतून वेगवेगळया गोष्टी बाहेर काढायचे. मग त्याची एक नवीनच गोष्ट सुरू होई. काचेचं भिंग, परस्परांना चिकटणारे दगड, तुटक्या नळीत पाहिल्यानंतर जवळ दिसणाऱ्या वस्तू अशा अनोख्या वस्तू पाहिल्यानंतर मुलांना काकांच्या गोष्टीतली जादू खरी वाटू लागे.
बाहेरच्या निसर्गाला कोरड पडली असली, तरी काकांच्या बैठकीत मुसळधार पाऊस पडत होता. पाण्याचं तोंड न पाहिलेली जमीन सगळं पाणी आत खोलवर मुरवून घेत होती. साठवत होती. हळूहळू जमीन हिरवीगार आणि माती मऊसूत होत चालली होती.
000
हौदाचं काम पूर्ण झालं. सगळयांच्या उपस्थितीत समूहप्रमुखांच्या हस्ते नवा कालवा हौदाला जोडण्यात आला. विश्राम यांनी सर्वांना संबोधून बोलताना ''कालवा जोडण्याचा खरा मान तिघा जाणकारांचा, मात्र ते पाच दिवसांच्या ध्यानात असल्याने ती जबाबदारी मी पार पाडली'' असं आवर्जून सांगितलं. सर्वांनी टाळयांच्या गजरात ते काम पूर्ण करणाऱ्यांचं अभिनंदन केलं. विशिष्ट लयीत टाळया वाजवून सर्वांचं अभिनंदन करणाऱ्या मुलांचं खूप कौतुक झालं. उत्साहाने सळसळणारी मुलं आणि त्यांच्या मागे उभे असलेले काका सर्वांच्याच नजरेत भरून राहिले होते. मुलं नेहमीच काम करत असली तरी त्यांच्यात या तऱ्हेचं चैतन्य कधी पाहायला मिळालं नव्हतं. हौद सुरू होताच काकांनी त्यावर दगडात असलेली खिडकी झाकण्याची सूचना केली. त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन रोखता येईल, असं ते म्हणाले. ती कल्पना सर्वांनाच पसंत पडली.
कार्यक्रमानंतर सर्व जण समूहप्रमुखांच्या कक्षात आले. इतर कामांचे हालहवाल समजून घेताना विश्राम जाणीवपूर्वक सर्व मुलं, त्यांचं प्रशिक्षण यांबद्दल प्रश्न विचारत होते. सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. काकांची रोज रात्रीची मैफल विश्राम यांच्या कानावर गेली होती. वल्लरी यांना मुलांच्या कार्यक्षमतेत सकारात्मक बदल जाणवत होता. त्यांना तो काकांचा परिणाम असावा असं वाटत होतं.
काकांचा विषय निघताच सगळे जण आपसूक त्यांच्याबद्दल बोलत राहिले. वस्त्रालयात काकांच्या सूचनांमुळे सुधारलेल्या गोष्टी, त्यांची मुलांशी आणि मोठयांशी बोलण्याची पध्दत, त्यांनी सांगितलेले किस्से.. बरंच काही सांगितलं गेलं. एकुणात लोकांना काकांचं कौतुक वाटत होतं.
''काल माझ्या मुलाने - शंतनूने मला चक्क छोटी कुऱ्हाड आणून दिली.'' दिलीप अभिमानाने म्हणाले. विश्राम लक्ष देऊन ऐकू लागले. ''त्याने दगड तासून, सुकल्या झाडाच्या दांडीत तो दगड बसवून ती सुंदर कुऱ्हाड बनवली होती. मी विचारलं तर मला म्हणाला की, मी मोठं होऊन तो गोष्टीतला लाकूडतोडया होणार आहे.'' असं म्हणून दिलीप आणि आजूबाजूला बसलेले सगळेच हसू लागले.
दिलीप थोडं गंभीर होत म्हणाले, ''तो सतत त्या काकांचं आणि त्यांच्या झोळीतल्या वेगवेगळया वस्तूंचं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं कौतुक करत असतो. मला वाईट वाटतं. मला आता जाणवतंय की मी शंतनूला फार वेळ देत नाही. मी तर त्याला कधीच गोष्ट सांगितलेली नाही. आमच्या रोजच्या कामापलीकडे गप्पादेखील होत नाहीत.'' दिलीप खेदपूर्वक आवाजात बोलत होते.
''ही गोष्ट वाईट वाटण्याची नाही, विचार करण्याची आहे.'' विश्राम यांचा मोठयाने आलेला आवाज ऐकून सगळेच दचकले. आयुषमान, शाल्मली, सगळेच त्यांच्याकडे पाहू लागले.
''आपण आपल्या मुलांना वेळ देत नाही ही वाईट वाटण्याची नव्हे, तर अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे. ती पिढी जिवंत राहण्यासाठी आपण करत असलेली ती धडपड आहे. तुम्ही आज जिवंत आहात, ते तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी असाच त्याग केला म्हणून. आपल्या पूर्वजांनी पूर्ण विचारांती घेतलेला तो निर्णय आहे.'' आयुषमानने चमकून शाल्मलीकडे पाहिलं. आजच्या बैठकीला तिघं जाणकार माणसं नव्हती. कदाचित त्यामुळे, पण विश्राम यांचा आवाज चढल्यासारखा वाटत होता.
''तो मुलांना खोटया गोष्टी सांगतोय. त्यातला धोका तुमच्या कुणाच्याच ध्यानात येत नाही? आपण मुलांना वास्तवाशी जुळवून घ्यायला, त्यावर मात करायला शिकवतो आहोत आणि हा माणूस त्यांना कल्पनेच्या जगात रमवतोय? मी तुम्हाला विचारतो - आपल्या सभोवताली असलेली परिस्थिती पाहिल्यानंतर आज आपल्याला वास्तवाचं भान हवंय का कल्पनेच्या भराऱ्या? सांगा! आणि त्या कल्पनेतून मुलं काय बनवतायत, तर हत्यारं!''
''आपली गिरिमंडल वसाहत टिकली, वाढली त्यामागे आपल्या पूर्वाजांनी आपल्याला दिलेलं हे भान कारणीभूत आहे. कल्पना करणं, गोष्टी सांगणं मोठी गोष्ट नाही. पण आपण हा मार्ग जाणीवपूर्वक निवडला आहे. यामध्ये एकवेळ कल्पनारम्यतेचा आनंद नसेल, पण जिवंत राहण्याची शाश्वती नक्की आहे.''
विश्राम यांना बोलून दम लागला होता. त्यांचे कठोर बोल ऐकून सर्व जण स्तब्ध झाले. दिलीप यांनादेखील आपणं चुकीच्या पध्दतीने विचार करत वाहवत गेलो, असं वाटलं. आयुषमान गप्प होता. शाल्मलीदेखील काही बोलत नव्हती. जाणकार तर हजरच नव्हते. सर्वांनी मौन पाळलेलं पाहून विश्राम एक पाऊल पुढे सरकले.
''या समूहाचा प्रमुख म्हणून मी आज्ञा करतोय की यापुढे त्या व्यक्तीचा मुलांशी असलेला संवाद ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी काकांना बैठकीत बोलावून घ्यावं.'' एवढं बोलून विश्राम तडक चालू पडले. आयुषमानला त्या बैठकीचा रोख काय असणार त्याचा अंदाज आला. त्याने दोन दिवसांनंतर पुन्हा जमण्याची घोषणा करत बैठक बरखास्त केली.
000
आयुषमान तुटक उत्तर देत कामाचं निमित्त करून निघून गेला, तेव्हाच काकांना ही बैठकीची घटना काहीशी वेगळी असल्याचा अंदाज आला होता. तत्पूर्वी शाल्मली काकांशी बोलण्यासाठी आली. पण काय बोलावं याबाबत तिच्या मनात गोंधळ झाला होता. तिने काकांना मुलांशी न बोलण्याचा अस्पष्ट सल्ला दिला, पण काकांना तो अगदी स्पष्ट कळला. त्यांनी गोड हसण्यापलीकडे काहीच म्हटलं नाही. मुलांनादेखील काकांना कसल्याशा गंभीर बैठकीसाठी बोलावलंय याचा सुगावा लागला. पण त्याच दिवशी काकांनी आपण एक मोठ्ठी जादू करणार असल्याची घोषणा केली आणि मुलांचं लक्ष बैठकीऐवजी त्या जादूवर खिळलं. रात्री नेहमीप्रमाणे मैफल जमली. काकांची जादूची कल्पना सगळयांना खूप आवडली. विशेष त्या जादूमध्ये सगळयांचीच मदत लागणार होती. काकांच्या जादूत आपलं काम आहे या विचाराने प्रत्येकालाच आपला भाव वधारल्यासारखा वाटत होता. काकांनी प्रत्येकाला कामं वाटून दिली. त्या रात्रीची त्यांची मैफल नेहमीपेक्षा जास्त लांबली
000
दिवस उगवला तो मळभ घेऊनच.
विश्राम यांच्या कक्षाच्या खिडक्यांमधून ना वारा वाहत होता, ना धड उजेड आत येत होता. आत जमलेले सगळे घामाघूम झाले होते. विश्राम नेहमीच्या दगडी आसनावर बसले होते आणि सगळे जण त्यांच्या ठरलेल्या जागांवर. काका तेवढे सर्वांसमोर उभे होते. सस्मित. प्रसन्न. अगदी नेहमीसारखे. त्यांनी आसन नाकारलं होतं.
''तुम्हाला वसाहतीचा निर्णय मान्य आहे का?'' विश्राम यांनी काकांना पुन्हा विचारलं. आयुषमान, शाल्मली, वल्लरी सगळे जण काकांच्या होकाराची मनोमन अपेक्षा करत होते. पण त्यांच्या मनाला जी भीती वाटत होती, काका तेच म्हणाले.
''नाही!''
शाल्मलीने मान खाली घातली. आयुषमान मनातल्या मनात डुचमळला. विश्राम यांच्या ओठांची रेष कुणाला न कळेल अशी किंचित हलली.
''काका, तुम्हाला याचा परिणाम ठाऊक आहे का?''
''हो!'' काका कणखरपणे विश्राम यांच्याकडे पाहत म्हणाले. ''तुम्ही गिरिमंडलमधून मला निष्कासित कराल.'' काकांच्या चेहऱ्यावर स्मित दिसत होतं. ते पाहून विश्राम गोंधळले.
''माझं मुलांशी बोलणं तुम्हाला धोकादायक वाटतं. मात्र यामध्ये तुम्हाला तुमच्या समाजाच्या किंवा वसाहतीच्या रचनेतला फोलपणा जाणवत नाही का?'' त्या प्रश्नावर सगळे जण निरुत्तर होते.
''नाही!'' विश्राम म्हणाले. ''तुम्ही तुमच्या गोष्टींमधून त्यांच्यासमोर असं जग उभं करताय, जे अस्तित्वात नाही. तुम्ही अशा गोष्टींबद्दल सांगताय, ज्या आता उरलेल्या नाहीत. आमच्या मुलांनी जे त्यांना कधीच मिळणार नाही, अशा गोष्टींच्या कल्पना आणि आदर्श डोळयांसमोर ठेवायचे का? तुम्ही त्यांच्या मनात किती ढवळाढवळ करताय याची कल्पना आहे का तुम्हाला? परवा दगड वाहून नेणाऱ्यांपैकी एक मुलाने - चेतन त्याचं नाव - दगडात स्वत:चं आणि त्याच्या मित्राचं चित्र कोरलं. आम्ही मुलांना ज्या पध्दतीने घडवू पाहतोय, त्याच्या हे अगदी विरुध्द आहे.''
''अहो, पण मुलं जशी घडतायत तशी त्यांना घडू द्या ना! तोच तुमच्या उद्याच्या समृध्दीचा मार्ग ठरेल.''
''अजिबात नाही. आम्ही आता ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत कला किंवा अशा कविकल्पना जोपासणं गिरिमंडलला परवडण्यासारखं नाही. आम्ही महत्प्रयासाने आमची भावी पिढी''
''हो होऽ जिवंत ठेवलीय. पाठ झालंय मला ते.'' काकांनी मोठयानं विश्राम यांना मध्येच तोडलं. विश्राम यांचे डोळे संतापाने लाल झाले. काका पोटतिडकीनं बोलू लागले.
''तुम्हाला सर्वांना तुमच्या मुलांचं, तुमच्या भावी पिढीचं जिवंत राहणं महत्त्वाचं वाटतं. पण माझ्या लेखी तुम्ही आजचं मरण उद्यावर ढकलताय. तुम्हाला भले वाटत असेल की तुम्ही जिवंत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही तीळ तीळ मृतावस्थेत जाताय. तुमचं हे असं कोरडं राहणं आणि त्या मुलांनादेखील कोरडं ठेवणं तुमचाच जीवनरस शोषून घेणारं ठरतंय. माणसाने अश्मयुगापासून खूप प्रगती केली. पण तो माणूस तेव्हा झाला, जेव्हा त्याला भावना, संवेदना कळल्या. त्याने मनातल्या कल्पनांना-विचारांना महत्त्व दिलं आणि त्या व्यक्त करण्यासाठी भाषा निर्माण झाली. तुम्ही तर मानवी प्रगतीचा मूळ पायाच बाजूला टाकून दिलाय. ही मुलं उद्याची संवेदनशील, कल्पक माणसं म्हणून मोठी व्हायला हवीत. तुमच्यासारखे भावनाशून्य कातळ नव्हेत! तुमच्यासाठी जिवंतपणा महत्त्वाचा असेल, पण माझ्यासाठी जगणं अधिक महत्त्वाचं आहे.'' काका बोलायचे थांबले.
आयुषमान श्वास रोखून काकांचं बोलणं ऐकत होता. त्याचे डोळे पाणावले होते. शाल्मलीने काका बोलत असेपर्यंत डोळयांची पापणी लवली नव्हती. सर्व उपस्थितांची शरीरं किंचित ताणाखाली होती. विश्राम यावर काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.
विश्राम काकांकडे एकटक पाहत राहिले.
''निष्कासन आज रात्री ताबडतोब होईल.'' विश्राम काकांकडे कटाक्षही न टाकता उठून निघून गेले. आयुषमानच्या डोळयातून एक थेंब गालावर पडला. तो वाहण्याच्या आधीच त्यानं स्वत:ला सावरलं. तो आणि शाल्मली काकांसमोर जाऊन उभे राहिले. काका त्या दोघांच्याही डोळयांत खोल पाहत राहिले. मग त्यांनी आयुषमानच्या खांद्यावर अलगद हात ठेवला.
''माणसं जपली पाहिजेत हे बरोबर! पण त्यासाठी त्यांचं माणूसपण जपणं फार महत्त्वाचं असतं.'' आयुषमानला डोळयातलं उरलंसुरलं पाणी बंड करून बाहेर पडेल अशी भीती वाटली. त्यानं चटकन पापण्या मिटल्या. एक उष्ण कढ आतल्या आत जिरत राहिला. त्याने डोळे उघडले, तेव्हा काका निघून गेले होते.
000
काका रात्रीच केव्हातरी निघून गेला होता.
कुणी म्हणत होतं, तो चालत चालत खाली घोंगावणाऱ्या वादळात दिसेनासा झाला.
कुणी म्हणत होतं, तो प्रवेशद्वारातून बाहेर पडून वर आजपर्यंत कुणीच न गेलेल्या पर्वतरांगेकडे चालत गेला होता.
कुणी तर म्हणत होतं की तो नव्यानं खोदलेल्या हौदात प्रवेश करून नाहीसा झाला.
पण काका निघून गेला होता हे नक्की!
कायमचा!
बातमी कळली त्या रात्री सगळी मुलं मैफलीच्या जागेवर जमली होती. आयुषमान काळजीने त्यांना पाहत होता. शाल्मलीही आली होती. पण कुणीच बोलत नव्हतं. रडत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत सगळे जण तसेच बसून होते. अखेर समीर, वसुंधरा, जयेश उठले. त्यांच्यापाठोपाठ सगळे जण उठून न निघून गेले. आयुषमानला त्यांचा तो समंजसपणा फार अस्वस्थ करत होता.
सगळे निघून गेले, तेव्हा त्यानं पाहिलं. काका झोपण्याच्या जागेजवळ लेपाने भरलेली एक वाटी ठेवली होती.
000
दुसऱ्या दिवसापासून सर्व कामं नित्यनेमाने सुरू झाली. विश्राम यांनी आयुषमानला सर्व लहान मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. तसाही तो काळजीने पहाऱ्यांऐवजी मुलांच्या कामाच्या ठिकाणीच घुटमळत होता. त्याने त्याची आणखी काही माणसं कामाला लावली होती. पण मुलांनी त्या सर्वांना चक्रावून टाकलं. मुलं उदास नव्हती. गप्प नव्हती. ती परस्परांशी, सर्व मोठया माणसांशी छान बोलत होती. त्यांचे सर्व व्यवहार उत्साहात पार पाडत होती. आणि त्या जोडीला त्यांची जी कुजबुज त्याच्या कानी पडली, त्यामुळे तर तो अधिकच भांबावला.
''काका येणारय!''
दिवसागणिक ती कुजबुज वाढत होती आणि मुलांमधला उत्साहदेखील. मुलांची आपापसात कसलीशी तयारी सुरू होती. पण आयुषमानला त्याचा अंदाज येत नव्हता. काका बाहेर कसा गेला याची पक्की माहिती कुणालाच नसली, तरी बाहेरच्या वातावरणात तो वाचणं कठीण आहे असं त्या साऱ्यांचं एकमत होतं. त्याचं जाणं सर्वांना अस्वस्थ करून गेलं होतं. मात्र आता ''काका येणार आहे'' ही उठलेली कुजबुज त्यांना अधिकच त्रस्त करत होती. बरं, मुलं कामं तर सगळी व्यवस्थित करत होती, त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीवरून जाब विचारता येत नव्हता. विश्राम यांच्या कक्षात यावर मोठी चर्चा झाली. मात्र आयुषमानने त्यांना या गोष्टींचा अर्थ सांगण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. तसं त्याने अनेक मुलांशी बोलण्याचा, त्या गोष्टीचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीच काही बोललं नाही. शेवटी त्याने वसुंधराला विचारलं, तर ती समंजसपणे त्याच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली, ''आपण आता थेट काकांनाच भेटू!''
संपूर्ण गिरिमंडलातील वातावरण रहस्यमय होऊन गेलं होतं. मोठी माणसं मुलांशी किंचित बिचकून वागत होती. एके दिवशी सकाळी मुलांनी जाहीर केलं - 'आज आम्ही काम करणार नाही. आज काका येणारय!'
झालं! समस्त गिरिमंडल सगळं काम सोडून मुलांमागे धावलं. मुलं नेहमीपेक्षा नीटनेटके कपडे घालून बाहेर पडत होती. त्यांची पावलं नव्या हौदाकडे वळली. विश्राम, आयुषमान साऱ्यांना बातमी गेली. ते सारे त्वरेने हौदाजवळ पोहोचले.
मुलांनी हौदाला गराडा घातला होता. त्या अंधाऱ्या जागेत मुलांची ती गूढ कृती सर्वांनाच अचंबित करत होती. जागा नवी असल्याने तिथल्या भिंतीत खिडक्या खोदलेल्या नव्हत्या. खांबांवर लावलेले काही दिवे प्रयत्नपूर्वक अंधार दूर सारत होते. जमा झालेली सारी माणसं मुलांपासून दहा हात दूर अंतरावर थबकली. त्यांची सुरू असलेली कुजबुज मंदावत गेली. सगळं शांत झालं. वातावरणात अदृश्य भार जाणवत होता.
आणि मग काहीतरी घडू लागलं
मुलांच्या रांगेतून वसुंधरा, चेतन आणि शंतनू पुढे आले. चेतन आणि शंतनू तिथे असलेल्या एकमेव खिडकीकडे गेले. वसुंधरा हौदात उतरली. शंतनूने पुढे केलेल्या हातावर चेतन उभा राहिला. त्याने खिडकीवरचं कापडाचं आच्छादन बाजूला केलं. प्रकाशाचा मोठ्ठा झोत हौदातल्या पाण्यावर पडला. पाण्यात वसुंधरा उभी होती. तिने हातातला कपडा बाजूला केला. त्याखाली दोरी बांधलेला आरशाचा मोठा तुकडा होता. वसुंधराने तो अलगद पाण्याखाली धरला. अपूर्वाने त्याचं दुसरं टोक काठावरच्या एका दगडाला बांधलं. प्रकाशाची किरणं पाण्यात शिरत होती. वसुंधरानं तो आरसा त्या किरणांवर पाण्याखाली तिरपा धरला. सूर्यकिरणं आरशावर आदळली. पाण्यातून बाहेर झेपावली आणि गिरिमंडलचा आसमंत प्रथमच उजळून निघाला. तिथे जमलेल्या सर्वांच्या तोंडून ''आहऽऽ'' असा उद्गार बाहेर पडला. गिरिमंडलच्या त्या छताने प्रथमच उजेड पाहिला. तिथल्या खांबांना प्रथमच त्यांचं अस्तित्व जाणवलं. सगळे जण गिरिमंडलच्या छतांची उंची, तिथल्या खांबांची घडण प्रथमच पाहिल्यागत बघू लागले. समीर पुढे झाला. त्याने हौदातल्या पाण्यात हात बुडवून ते जोरात हलवलं. पाण्यात छोटया लाटा निर्माण झाल्या. त्याच्या सावल्यांनी छताला स्पर्श केला. सगळं गिरिमंडल त्या पाणसावल्यांनी सजीव झाल्यासारखं हलू लागलं. सारे जण अनिमिष नजरांनी छायाप्रकाशाचा तो अभूतपूर्व खेळ पाहत होते.
वसुंधराच्या चेहऱ्यावर हसू होतं. डोळयांत पाणी दाटलं होतं. समीर, शंतनू, चेतन, अपूर्वा साऱ्यांचेच डोळे पाझरू लागले होते. वसुंधराच्या तोंडून शब्द बाहेर पडला.
''काका आला!''
चेतनने तिच्याकडे पाहून मान डोलावत आनंदानं म्हटलं, ''काका आला!''
मग एकामागोमाग एक साऱ्या मुलांनी हर्षभऱ्या स्वरात त्याचा पुनरुच्चार करायला सुरुवात केली. सगळया मुलांनी परस्परांचे हात पकडले होते. त्यांची शरीरं आनंदानं गदगदत होती. डोळे पाझर फुटल्या पान्ह्यासारखे गळत होते.
शाल्मली आनंदभरल्या डोळयांनी त्या साऱ्या प्रकाराकडे पाहत होता. आयुषमान डोळयांमधली आसवं पुसत आनंदाने मोठयाने चित्कारला. त्याच्या चित्काराने तिथं उभ्या असलेल्या साऱ्यांच्याच अदृश्य साखळया तुटून पडल्या. त्या साऱ्यांच्या टाळया, चित्कार आणि आरोळयांनी गिरिमंडलचा कोपरा न कोपरा निनादत गेला. सगळी मुलं मोठया माणसांकडे पाहत होती. आनंदाने ओरडणारे त्यांचे आईबाबा त्यांना प्रथमच एवढे आपले वाटत होते.
विश्राम यांचा चेहरा गोंधळलेलाच होता. ''या साऱ्याचा त्या काकाशी काय संबंध?''
''त्याचं नाव प्रकाश होतं.'' शेजारी उभा असलेला आयुषमान विश्राम यांच्याकडे ढुंकूनही न पाहता म्हणाला. माधव, फारूख आणि दिनकर तिघे जाणकार डोळे मोठे करून तो प्रसंग पाहत होते. त्यांनी विश्रामकडे पाहत म्हटलं.
''विश्राम, तू वाईट माणूस नाहीस. मात्र या वेळी तू चुकलास. नव्याचा, आपल्या परीघाबाहेरच्या गोष्टींचा स्वीकार करण्यात कमीपणा कसला? मोठी चूक झाली आपली. आता सुधारू या. काकाने योग्यच सांगितलं होतं. आपण नुसतेच जिवंत आहोत. आता जरा ते सुंदरही करू या.''
विश्राम खालमानेने हौदातलं हिंदकळणारं पाणी पाहत होते. हातात हात गुंफलेल्या मुलांच्या डोळयांत अजूनही छतावरच्या पाणसावल्या तरळत होत्या.
किरण क्षीरसागर
9029557767