संघटित हिंदू शक्तीचे दर्शन घडवणारा उत्सव

05 Oct 2019 15:53:59

 'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' अशी एक म्हण आहे. त्याचा अनुभव आपण सर्व जण घेत असतो. दसरा सणाला जसे धार्मिक महत्त्व आहे, तसे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. रा.स्व. संघाचे दसरा संचलन या सामाजिकतेचे प्रतीक आहे. संघाचे संचलन हे हिंदू समाजाच्या आत्मविश्वासाचे आणि समूहभावनेचे प्रतीक असते. आम्ही संघटित आहोत, शक्तिशाली आहोत आणि संघर्षाचा प्रसंग आला तर आम्ही त्याचा मुकाबला करण्यास सिध्द आहोत, हेच संघाचे दसरा संचलन हिंदू समाजाला सांगत असते. 



विजयादशमी, दशहरा, दसरा हा सण भारतभर साजरा केला जातो. आश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापना झाली की पुढे नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवाची सांगता विजयादशमीने होत असते. प्रत्येक प्रांतात वेगवेगळया प्रकारे साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला केवळ धार्मिक, आध्यात्मिक पार्श्वभूमी नाही. काही तज्ज्ञांच्या मते हा उत्सव नवसर्जनाचा आहे, तर काहींच्या मते हा परमविजयाचा उत्सव आहे. प्रभू रामचंद्रांपासून ते सम्राट अशोकापर्यंत अनेक महापुरुषांचा इतिहास या तिथीशी जोडलेला आहे. याच तिथीला सामाजिक पैलू जोडण्याचे काम मागच्या शतकात दोन महापुरुषांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र परिवर्तन याच तिथीला केले आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी याच तिथीचे महत्त्व लक्षात घेऊन असंघटित, आत्मग्लानीत बुडालेल्या, परचक्र पराभव हीच आपली नियती आहे असे मानून जगणाऱ्या हिंदू समाजाला ताठ मानेने आणि समूहभावनेने भर रस्त्यातून एका शिस्तीत चालायला शिकवले ते विजयादशमीच्या संघसंचलनाच्या माध्यमातूनच. आणि म्हणून विजयादशमीला जसे धार्मिक महत्त्व आहे, तसेच सामाजिक महत्त्वही आहे. हे सामाजिक महत्त्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. काळाच्या कसोटीनेही समूहभावनेला आणि हिंदू समाजाच्या आत्मविश्वासपूर्ण संचलनाला मान्य केले आहे.

संघाच्या सुरुवातीच्या काळात डॉ. हेडगेवारांनी छोटया बालांना सोबत घेऊन विजयादशमीच्या मुहूर्तावर जेव्हा नागपूरमध्ये शिस्तबध्द संचलन केले असेल, तेव्हा स्थानिक नागपूरकरांनी या छोटया स्वयंसेवकांच्या शिस्तीचे कदाचित कौतुक केले असेलही; पण या बाल स्वयंसेवकांनी हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचे, आत्मविश्वासाचे द्वार खुले केले आहे आणि हे द्वार दिवसेंदिवस अधिक विस्तीर्ण होणार आहे, याचा अंदाज मात्र अजिबात आला नसेल. पण वटवृक्षाच्या बीजातच वटवृक्ष सामावलेला असतो, हे युगद्रष्टया डॉ. हेडगेवारांना माहीत होते आणि म्हणूनच संघव्यवहारात समूहभावना व्यक्त करणाऱ्या संघसंचलनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


चार हिंदू एका दिशेने आणि एका गतीने जाऊ शकत नाहीत ही पुरातन धारणा. खचलेल्या आणि आत्मविस्मृतीच्या गर्तेत बुडालेल्या हिंदू समाजाला एका समान मानसिकतेत आणून एकरसतेचा अनुभव देत हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागवायचा असेल, तर समग्र हिंदू समाजापुढे तसा आदर्श निर्माण करावा लागेल आणि तो दिवसेंदिवस अधिक प्रबळ करावा लागेल. हिंदू समाज परंपरा म्हणून आपआपल्या घरात विजयादशमीला शस्त्रपूजन करतोच. पण तेच सार्वजनिक स्वरूपात आणि मध्यवर्ती ठिकाणी झाले, तर आत्मविस्मृतीत हरवलेला हिंदू समाज जागा होईल, आपण कोणत्याही क्षणी संघर्षाला तयार आहोत ही भावना उद्दीपित होईल अशा विशाल परिप्रेक्ष्यात डॉ. हेडगेवारांनी विचार केला आणि तो संघसंचलनाच्या रूपाने व्यवहारात आणला.

संघजीवनात काम करताना अनेक वेळा उपेक्षेचा आणि आपदांचा सामना करावा लागतो. अशा वेळी तटून राहण्याचे आणि येणाऱ्या प्रंसगाला तोंड देण्याचे बळ संचलनातून मिळत असते, असा स्वयंसेवकाचा अनुभव असतो. हा अनुभव का येतो? मी एकटा नाही, संपूर्ण हिंदू समाज माझ्यासोबत आहे याची अनुभूती त्याला संचलनातूनच मिळते. एरवी *एक तासाच्या शाखेतून जी ऊर्जा मिळते, ती अधिक गतिमान आणि परिणामकारण करण्यास, स्वयंसेवकास कार्यप्रवण करण्यास संघाचे संचलन कारणीभूत ठरत असते. कारण संघसंचलन ही स्वयंसेवकाची मानसिकता घडवणारी एक प्रक्रिया आहे आणि ती दीर्घकालीनही आहे. सातत्य आणि समूहभावना अबाधित ठेवत हिंदू समाज कोणत्याही क्षणी आपल्या आत्मशक्तीचे प्रकटीकरण करू शकतो, हा विश्वास जागवण्याचे काम संघसंचलनाने केले आहे.* मागील अनेक वर्षांपासून नागपूर येथील विजयादशमी उत्सवातील सरसंघचालकांच्या भाषणाकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे, त्यामागे हेच कारण आहे. संघटित हिंदू समाजाचे आत्मभान समजून घेताना संघाचे वर्धिष्णू रूप संचलनाच्या रूपाने अनुभवण्यासाठी अनेक संघप्रेमी दसरा संचलनाची वाट पाहत असतात.

संघ व्यवहारात एकूण सहा उत्सव आहेत आणि त्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. तरीही समाजमन भारून टाकणारा व हिंदू समाजाच्या आत्मविश्वासाची प्रचिती देणारा उत्सव म्हणून विजयादशमीच्या संचलनाची आणि उत्सवाची वेगळी नोंद घ्यायला हवी.


Powered By Sangraha 9.0