सामाजिक संदेश देणाऱ्या तरल जाहिराती

विवेक मराठी    04-Oct-2019
Total Views |

 'चितळे बंधू' हे नाव त्यांच्या वैशिष्टयपूर्ण पदार्थांच्या बरोबरीने आज आणखी एका कारणासाठी चर्चेत आहे. ते कारण म्हणजे, सामाजिक संदेश देणाऱ्या त्यांच्या तरल जाहिराती. 'नात्यातला गोडवा जपतो आम्ही!' ही टॅगलाईन असलेल्या या जाहिराती समाजमाध्यमांमध्ये लाखोंची पसंती मिळवत आहेत. स्वत:च्या उत्पादनांची थेट जाहिरात न करताही, 'ब्रँड व्हॅल्यू' कशी वाढवता येते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एक प्रकारचं सीमोल्लंघनच आहे.

 

 
 सध्याच्या तयार आणि जंक फूडच्या, विविध संरक्षक रसायनांच्या माऱ्यात नैसर्गिकता हरवलेल्या खाद्यपदार्थांच्या जत्रेत, हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या निरनिराळया कुझीन्सच्या स्पर्धेत त्याहून अलग असं एक नाव विश्वासाने मागची सुमारे 80 वर्षे उभं आहे. ते म्हणजे पुण्यातील सुप्रसिध्द 'चितळे बंधू मिठाईवाले'. घटस्थापनेच्या दिवशी चितळेंच्या पुण्यातील बाजीराव रोडवरील दुकानात श्री. केदार चितळे यांची या लेखासाठी भेट घ्यायला गेले तेव्हा तिथली गडबड बघून गेल्या गेल्या म्हटलं, 'आज जास्त गर्दीच्या दिवशी तुमचा वेळ घेतेय.' त्यावर अतिशय हसतमुखाने स्वागत करून म्हणाले, 'नाही ! हे तर 365दिवस असंच असतं.' 365 दिवस म्हटल्यावर जरासं आश्चर्य वाटलं. अर्थात त्यावरून दु. 1 ते 4 'दुकान बंद' अशा समाज माध्यमांमध्ये फिरत असलेल्या विनोदावरून सुचलेलं काही मी काही वेळ मनातच ठेवलं. कारण मिठाई वा खाद्यपदार्थ हा बोलण्याचा प्रमुख विषय नव्हता.
 

पदार्थांच्या ब्रँडव्यतिरिक्त 'चितळे ग्रुप' हे नाव सध्या अजून एका गोष्टीसाठी चर्चेत आहे. फसव्या जाहिरातींच्या महाजालात, भीती घालणाऱ्या, ऑॅफर आणि डिस्काउंटचे आमिष दाखवणाऱ्या, वैयक्तिक माहिती हाताळून खाजगीपणात घुसखोरी करणाऱ्या जाहिरातींच्या भडिमारात चितळयांच्या आंबावडीसारख्या सौम्य, मधुर, मऊसूत आणि सुखावणाऱ्या लघुचित्रपटांसारख्या जाहिराती या सध्या युटयूब आणि इतर समाज माध्यमांमध्ये गाजत आहेत. प्रेक्षकांना जाहिरातींच्या पलीकडे खूप काही अधिक देणाऱ्या, बघताना तत्काळ प्रेक्षकांशी भावनिक नाळ जोडणाऱ्या या लघुफिती दोन्ही ब्रँडचं साधर्म्य दाखवणाऱ्या आहेत. अकृत्रिमता अर्थात शुध्दता आणि सात्विकता हे ते साधर्म्य!


 श्री. केदार चितळे

 

'चितळे बंधू' नाव अपरिचित नाही! अविरत कष्टाने वाढवलेल्या त्यांच्या व्यवसायाची सुरुवात भिलवडी येथील 1939 साली श्री. बी.जी. चितळे यांनी सुरू केलेल्या दुग्धव्यवसायाने झाली. नंतर अतिरिक्त दूध व त्याच्या उपउत्पादनांमुळे 1950 साली पुण्यात श्री. रघुनाथ चितळे यांनी पहिलं दुकान सुरू केलं. लागोलागच 1954 साली त्यांचे लहान बंधू श्री. राजाभाऊ चितळे यांनी डेक्कनला दुसरं दुकान सुरू केलं आणि मिठाईबरोबरच इतर पदार्थही करण्याचा वेग वाढला. बाकरवडीचं नाव घेतल्यावर आज लोकांना पुणे आणि चितळे आठवतात, दुकानांसमोरच्या रांगा आठवतात आणि 'बाकरवडी संपली' अशा पाटया आठवतात, त्यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. 1977 साली जेव्हा बाकरवडी बनवणे सुरू केले तेव्हा दिवसाला 200 किलो बाकरवडी बनत असे. आज त्यांच्याकडे एकूण पाच फॅक्टरीजमधून तासाला 200 किलो अशी एकूण साडेसात टन बाकरवडी रोज बनते. दूध आणि दुधाचे पदार्थ, निरनिराळया मिठाया आणि विविध प्रकारचे नमकीन पदार्थ हा पुणेकरांच्या व एकूणच मराठी माणसाच्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग मागच्या 80 वर्षांच्या कालावधीत झाला. आज या कुटुंबाची चौथी पिढी याच व्यवसायात असून संपूर्ण कुटुंब एकत्र कार्यरत आहे. 2 मोठी दुकाने आणि 20 फ्रान्चायजीजद्वारे हा व्यवसाय बाजारात भक्कम पाय रोवून उभा असून त्याच्या ब्रँडिंगसाठी तशी भडीमार करणाऱ्या जाहिरातींची आवश्यकता नाही. तरीही या जाहिरातींच्या माध्यमातून चितळे बंधूंचं नाव चर्चेत राहत आहे. या जाहिरातींमधून दिसणाऱ्या त्यांच्या उत्पादनांपेक्षाही त्यातून दिल्या जाणाऱ्या सामाजिक संदेशांमुळे चर्चा होते आहे. या जाहिराती चितळे ब्रँडमध्ये व्हॅल्यू अडिशनचं काम करत आहेत.

या फिल्म्स करण्यामागची भूमिका सांगताना केदार चितळे म्हणाले, ''कनेक्टिंग पिपल अशी tagline घेऊन लोकांपर्यंत पोहोचावं असं वाटत होतं. ती लाईन जरी वापरता आली नाही तरी लोकांशी अजून जोडलं कसं जाता येईल असा विचार केला. जर भावनिक कंटेंट आणि त्याला जोडून आमचे उत्पादन असं एकत्रित काही केलं तर ते लोकांना पटकन अपील होईल असं वाटलं. प्रयोग म्हणून एखादी करून बघू अशा विचाराने सुरू केली आणि पहिल्याच फिल्मपासून लोकांना त्या आवडायला लागल्या. नंतर एकूण 7 फिल्म्स केल्या. बऱ्याच फिल्म्स 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितल्या आहेत. नुकतीच रक्षाबंधनसाठी केलेली फिल्म सुमारे 5 लाख लोकांनी बघितल्याचे युटयूब रेकॉर्ड दाखवत आहे. काही फिल्म्स झाल्यावर वाटलं की आपण केवळ मध्यमवयीन ग्राहकांना समोर ठेवून करत आहोत. मग आम्ही वेब सिरीजमधील लोकप्रिय युवा कलाकार घेऊन 'पहिली भेट' ही फिल्म केली. या फिल्म्समधील कंटेंट एवढा उत्तम आहे की कोणत्याही प्रकारचा प्रचार न करताही या फिल्म्स लोकांपर्यंत फेसबुक, व्हॉटसऍप माध्यमांतून पोहोचल्या.''

 ''या जाहिरातींचं लेखन दिग्दर्शन वरूण नार्वेकर या ख्यातनाम कलाकाराचं आहे. ते आम्हाला काही संकल्पना ऐकवतात, त्यातली आम्ही आमच्या ब्रँडला अनुरूप असेल असं कथानक एकत्र चर्चा करून ठरवतो. कोणत्याही स्वरूपातला भडकपणा आम्ही टाळतो. लोकांना तोच तोचपणा वाटायला नको म्हणून आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्ताने केलेली आउटडोअर फिल्म यामध्येही नार्वेकरांचे खूप कष्ट आहेत. ती फिल्म इतकी भावली की मुंबईतील एका एसटी चालकाने तो आणि 20 चालक असे एकत्र जाऊन मिठाई खरेदी केल्याचे आणि फिल्म आवडल्याचे पत्र लिहून कळवले. आम्ही प्राथमिक चर्चा केली तेव्हा काही संकल्पना या जाहिरातबाजी करणाऱ्या किंवा प्रामुख्याने प्रॉडक्टची जाहिरात करणाऱ्या होत्या. आम्हाला हे करायचं नव्हतं. कारण चितळेंचं उत्पादन लोकांना माहिती आहे. उत्पादनाची जाहिरातबाजी करायचीच नाही ही आमची भूमिका होती. आम्हाला फक्त कंपनी म्हणून ब्रँडिंग करायचं होतं. त्यामुळे आमची tagline सुध्दा 'नात्यातला गोडवा जपतो आम्ही!' अशी आहे. आमचे उत्पादन अगदी कमी वेळ दिसतं, कधीकधी तर फिल्मच्या अगदी शेवटी 5 सेकंद दिसतं. उत्पादनाचा भडीमार नाही म्हणूनच या जाहिराती लोकांना अधिक भावल्या.

या फिल्म्सचं वैशिष्टय बघितल्यावरच लक्षात येतं. एक सामाजिक बांधिलकी जपणारं असं कथानक, प्रांजळ संवाद, सौम्य संगीत आणि त्यात सुमित राघवन, हृषीकेश जोशी, अश्विनी गिरी अशा अनेक उत्तम कलाकारांचा अभिनय यामुळे या फिल्म्स लक्षात राहतात. 'पेरला देव मी' अथवा 'मातीचं स्वप्न' अशा फिल्म्सच्या माध्यमातून सामाजिक जाणीवा जागृत करणारी कृती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. अर्थातच उपदेशांच्या मात्रेपेक्षा तिचा परिणाम अधिक आहे. लेखक वा कलाकार यांची उक्ती आणि कृती यात एकसंघता असेल तर ती एक परिपूर्ण कलाकृती होते. त्याप्रमाणेच कोणत्याही अभिनिवेशाशिवाय जाहिरातींमार्फत, फिल्म्समार्फत ती दाखवताना मूळ व्यवसायातल्या गुणवत्तेमध्ये किंचितही तडजोड न करण्याची सामाजिक बांधिलकी जपली जाणे ही एकवाक्यता 'चितळे' या ब्रँडच्या यशाचं गमक असावं.

 

'नात्यातला गोडवा जपतो आम्ही!' असं प्रत्येक फिल्म म्हणते. पार्टीनंतर नवऱ्याने बायकोसाठी आवर्जून राखून ठेवलेले गुलाबजाम, 'स्थळ' म्हणून ऑॅनलाईन बोलत असताना सगळया विरुध्द आवडीनिवडीनंतर बाकरवडीने जुळलेली तार, शाळेत पेन हरवल्यानंतर चूक लक्षात आली म्हणून न ओरडता बर्फी भरवणारे वडील हे सगळे हा गोडवा जपतात. आज चार पिढया सर्व चितळे कुटुंब एकत्र व्यवसाय करत आहे. कुटुंब म्हणून नात्यातला गोडवा जपण्याबरोबरच त्यांचे कर्मचाऱ्यांशीही आपुलकीचे संबंध असतात. कर्मचाऱ्यांबरोबर स्वत: जातीने कुटुंब सदस्य पहाटेपासून उभे असतात. केदार चितळे म्हणतात, ''फार कमी ठिकाणी असं दिसतं की कामाच्या ठिकाणी मालक स्वत: हजर आहेत. दुकान उघडण्यापासून ते बंद करेपर्यंत मी, वडील, काका असे कोणी ना कोणी हजर असतो. त्यामुळे एक आपुलकीची भावना राहते. त्यातून कायदेशीर गोष्टी जसं की ओव्हर टाईम, प्रोव्हीडन्ड फंड, बोनस हे वेळच्या वेळी दिल्याने कर्मचाऱ्यांना एक विश्वास वाटतो. आमचा मुख्य धंदा दुधाचा असल्यामुळे आमचा व्यवसाय पहाटे साडेतीन चारपासून चालू होतो. त्यामुळे दुपारी दोन तास आम्ही कर्मचाऱ्यांसाठी दुकान बंद ठेवतो.''

सामाजिक बांधिलकीच्या धाग्याला जोडून घेऊन पुन्हा एकदा या जाहिरातींमधून दिसणारा नात्यातला गोडवा प्रत्यक्ष कौटुंबिक पातळीवर आणि कर्मचाऱ्यांबरोबरही जपला जातोय. हे उक्ती आणि कृतीमधलं साधर्म्य, एकसंघता हीच या यशस्वी ब्रँडची गुरुकिल्ली!

 

- विभावरी बिडवे