कर्तृत्ववान स्त्रियांची गाथा सांगणारे पुस्तक

09 Jan 2019 12:56:00

 

सन 1800 ते 2000 ह्या दोनशे वर्षांत विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आणि सांस्कृतिक भारताच्या उभारणीत खारीचा वाटा उचलणाऱ्या बारा कर्तृत्ववान स्त्रियांची गाथा प्रसिध्द लेखिका व 92व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी 'त्यांची झेप त्यांचे अवकाश' या पुस्तकातून मांडली आहे.

'त्यांची झेप त्यांचे अवकाश' या डॉ. अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या पुस्तकात चित्र, नृत्य, गायन, साहित्य, वैद्यक, शिक्षण, उद्योग, वकिली, राजकारण अशा विविध क्षेत्रांत स्वतःचे कर्तृत्व सिध्द करणाऱ्या कर्तबगार महिलांचे दर्शन होते. वैद्यकीय क्षेत्रात अद्वितीय काम केलेल्या डॉ. हेमवती सेन यांची हृदयस्पर्शी कथा यात आहे. एका बालविधवेच्या, डॉक्टर होण्यापासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या दुर्लक्षित प्रवासाचे दर्शन होते. काही काळ पुण्यात शिक्षण झालेल्या भारतातल्या पहिल्यावहिल्या महिला वकील कार्नेलिया सोराबजी यांची कहाणी चटका लावून जाते. बेंगलोर नागरत्नम या देवदासी महिलेची कथा तितक्याच ताकदीने मांडली आहे. एका कलावंतिणीने बाजारू समाजापासून दूर राहत मेहनतीच्या, बुध्दिमत्तेच्या आणि प्रतिभेच्या जोरावर देवदासीसारख्या रूढीविरोधात पुकारलेला एल्गार स्मरणात राहणारा आहे. मुस्लीम महिलांच्या शिक्षणाविषयी अद्वितीय कार्य केलेल्या रूक्केय्या शेखावत हुसेन यांची कथा वाचनीय आहे. रूक्केय्या समाजसेविका म्हणून जितक्या जागरूक होत्या, तितक्याच लेखिका म्हणून सजग होत्या. त्यांच्या वाटयाला आलेले कडू-गोड अनुभव लक्षात घेण्यासारखे आहेत.

भारतीय राजकारणातील कर्तबगार महिला राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे चरित्र विविधांगी स्वरूपाचे आहे. भारतीय कला-परंपरांच्या पुनरुज्जीवनासाठी कमलादेवींनी दिलेले योगदान स्पृहणीय आहे. एका सशक्त, लढाऊ महिलेच्या व्यक्तिगत जीवनात आलेला संघर्ष विलक्षण आहे. भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी मोलाचे योगदान दिलेल्या रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या चरित्रातून एका सुसंवादी कलानुभवांचे दर्शन घडते. सिध्देश्वरीदेवींची कथा विलक्षण आहे. अशिक्षित असलेल्या महिलेने संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलेच आहे, शिवाय उर्दू, हिंदी, पर्शियन आणि इंग्लिश या भाषांवर मिळवलेले प्रभुत्व यावरून त्यांचे मोठेपण लक्षात येते. चित्रकलेत स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या अमृता शेरगिल यांची जीवनकहाणी जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. अमृता यांच्याजवळ नुसतीच चित्रकला नव्हती, तर एकूणच माणूस म्हणून त्यांचे जगणे किती मोलाचे होते, हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नूर इनायत खान हिची कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी आहे. दुसऱ्या महायुध्दात इंग्रजांच्यावतीने जर्मनीविरुध्द काम करणारी ही भारतीय मुस्लीम महिला. ब्रिटिश गुप्तहेर खात्यात मोलाचे योगदान देणाऱ्या या महिलेचा यातनामय अंत कसा झाला, हे वाचताना अंगावर शहारे येतात. कर्नाटक संगीत क्षेत्रातील प्रख्यात गाियका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांचा संगीत प्रवास सांगत असताना लेखिकेने त्यांच्या 'समर्पण'भावाचे गुणवर्णन केले आहे. 'नौटंकी' या लोककलाप्रकारात देदीप्यमान असे काम केलेल्या नौटंकीवाली गुलाबबाई यांच्या चरित्रातून पुरुषी जगाकडून नागवल्या गेलेल्या कर्तबगार स्त्रीचे दर्शन घडते. स्वतंत्र भारतातल्या श्रेष्ठ संगीतकारांची पिढी घडवण्याचे काम केलेल्या महान वादक अन्नपूर्णादेवींची कहाणी संवदेनशील आहे.

दोनशे वर्षांपूर्वी समाजातील सामाजिक स्थिती साधारण होती. स्त्रिया घराबाहेर निघत नव्हत्या. शिक्षणापासून वंचित होत्या. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रियांच्या जाणिवांविषयी सुधारक बोलू लागले होते, लिहिते झाले होते. त्यामुळेच स्त्री शिक्षणाची चळवळ उभी राहिली. या चळवळीमुळे विविध प्रांतांतील स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या, लिहित्या झाल्या, त्यांच्यात आत्मभान येऊ लागले. त्याचे प्रत्यंतर म्हणजे या पुस्तकात आलेले  स्त्रियांचे दर्शन होय.

ह्या पुस्तकातील सर्व स्त्रिया वेगवेगळया प्रांतांतून, स्तरांतून आलेल्या आहेत. अनेक संकटाशी सामना करत त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनंी स्वतःचा विकास केला आहे. देशाचे कल्याण व्हावे हेच त्यांचे ध्येय आहे. यातील अनेक स्त्रियांचे चरित्र काही काळ दुर्लक्षित होते. या सर्व स्त्रिया वेगळया वाटा चोखाळणाऱ्या आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात डोंगराएवढे काम उभे केलेले आहे. असे असतानाही ह्या स्त्रियांचे चरित्र साहित्यातून म्हणावे तितके प्रकट झालेले नाही. आमच्या साहित्यिकांनी ह्या स्त्रियांना उपेक्षित का ठेवले? हा एक संशोधनाचा विषय आहे, असो.

लेखिका अरुणा ढेरे यांनी या सर्व स्त्रियांचा अभ्यास करून त्यांचे चरित्र पुस्तकातून समोर आणले आहे. या सर्व कर्तबगार महिलांचे विविध पातळयांवरचे अनुभव वाचल्यानंतर हृदयातील स्पंदने जागी होतात. पुस्तकाची भाषा ओघवती असून वाचताना कंटाळा येत नाही. त्यामुळे सर्व कथा मनाला स्पर्श करतात. कर्तबगार महिलांच्या यशोगाथा सांगणारे हे प्रेरणादायक पुस्तक पद्मगंधा प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले असून प्रत्येकाच्या संग्र्रही असलेच पाहिजे.

 

पुस्तकाचे नाव - त्यांची झेप त्यांचे अवकाश

लेखिका - अरुणा ढेरे

प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन, पुणे

पृष्ठसंख्या - 183

मूल्य - 170/- रुपये.

 

Powered By Sangraha 9.0