चंदन शेतीचा मराठवाडा पॅटर्न

30 Jan 2019 18:34:00

 

 दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाडयात शेती करणे अवघड बनत चालले आहे. अशा परिस्थितीत शेतीत काळानुरूप बदल करून शेतकरी दुष्काळाशी झुंज देताना दिसतात. ना तोडण्याची, ना वाहतुकीची, ना विक्रीची परवानगी असलेल्या दुर्लक्षित चंदन शेतीचा पर्याय निवडून शेतकरी बांधव चंदन लागवड करून आपल्या स्वप्नांचे मनोरे रचत आहेत. तब्बल 1200 शेतकऱ्यांनी चंदन लागवड केली आहे. चंदन शेतीचा परिमळ मराठवाडयाला नव्या दिशेने घेऊन जाणारा आहे.

साधारणतः मराठवाडा म्हटला की डोळयासमोर दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष उभे राहते. काही वर्षांपासून पर्जन्यमान घटत चालले आहे. त्यातच पाणीपातळीही खोलवर गेली आहे. इथली माती चांगली असूनही पाण्याअभावी उत्पादन पुरेसे होत नाही. जे काही पिकते त्यालाही मिळणारा भाव मातीमोल असल्यामुळे शेती संकटात सापडली आहे. परिणामी उत्पादन खर्च वाढून शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबत चालला आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे मराठवाडयात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कर्जमाफीमुळे शेतीचे आणि शेतकरी आत्महत्येचे प्रश्न सुटत नाहीत, हे वास्तव आपण पाहिले आहे. अनेक ग्रामस्थांनी उपजीविकेचे मार्ग बदलले आहेत. शेतीपुढे अशी विविध आव्हाने उभी आहेत. या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता या भागातील काही जिद्दी शेतकरी विकसित करत आहेत. काही गावांनी, काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटांशी सामना करत काही सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. जालना जिल्ह्यातील कडवंची ह्या गावाने जलक्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. पावसाचा प्रत्येक थेंब साठवून शेतीत बदल घडवून आणला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ह्या गावाने सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. अशा अनेक गावांची उदाहरणे सांगता येतील. हे बदल नुसत्या मराठवाडयातल्या शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहेतच, शिवाय संपूर्ण महाराष्ट्राने अनुकरण करावे असे आहेत. सध्या या भागातील गावागावात चंदन शेतीबद्दल बोलले जात आहे, चर्चा केली जात आहे. असंख्य शेतकरी स्वयंप्रेरणेने, शासनाची कोणतेही मदत न घेता चंदन शेतीची लागवड करताना दिसत आहेत.

 चंदन शेतीचा दरवळ

सुवासिक गुणधर्मामुळे चंदनाच्या झाडाला विशेष असे महत्त्व आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व तेलंगण या राज्यांत चंदनाचे वृक्ष मोठया प्रमाणात आढळतात. त्यानंतर मराठवाडयात व विदर्भात हे वृक्ष कमी-अधिक प्रमाणात आढळतात. महाराष्ट्रात चंदनाची झाडे तशी दुर्मीळ आहेत. चंदन शेतीमध्ये असे कोणते शास्त्र आहे की शेतकऱ्यांना हे पीक शाश्वत वाटत आहे, ह्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता खूप काही सकारात्मक गोष्टी समोर आल्या. चंदन शेती 'शाश्वत' पीक असून याकडे जास्तीत जास्त शेतकरी वळावेत यासाठी मराठवाडयातील शेतकरी चंदन लागवड करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जालना, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड व लातूर ह्या आठही जिल्ह्यांत चंदन शेतकरी आढळतात. जालना व लातूर जिल्ह्यात चंदन शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तब्बल 1200 शेतकरी चंदन शेतीशी जोडले गेले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून चंदन शेतीसाठी झटणारे शेतकरी विलास दहीभाते यांचे हे म्हणणे आहे. दहीभाते यांच्या मार्गदर्शनाखाली 650हून अधिक शेतकऱ्यांनी चंदन शेतीची लागवड केलीआहे. मराठवाडयात 2 हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्र चंदन लागवडीखाली आल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. चंदनाच्या तोडीवर, विक्रीवर आणि वाहतुकीवर सरकारची बंधने असताना इथल्या शेतकऱ्यांनी चंदन शेती करून मोठे धाडस दाखविले आहे.

 

माजी प्राध्यापकाने जोपासली 16 एकरांची चंदनाची बाग

  काही माणसे सेवेतून निवृत्त होऊनही काही तरी आगळेवेगळे करून दाखविण्याची धडपड करीत असतात. त्यातील एक चिरतरुण व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. विठ्ठलराव यशवंतराव जाधव होय. 2001 साली विठ्ठलराव प्राध्यापकपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी आपले उर्वरित जीवन शेतीत व्यथीत केले. आज त्यांनी 16 एकरावर चंदनाची शेती फुलविली आहे. वयाच्या एेंशीकडे झुकलेले विठ्ठलराव जाधव मोठया तन्मयतेने चंदन बागेची जोपासना करत आहेत.

 

शेतकरी विठ्ठलराव जाधव

विठ्ठलराव हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील खसगी गावाचे. त्यांची गावातच वडिलोपार्जित 28 एकर शेती आहे. शेताच्या बांधावर नैसर्गिकरित्या उगवलेली चंदनाची अनेक झाडे आहेत. ह्या झाडांकडे कुणाचे लक्ष नसल्याने ती चोरीला जात. चंदन जर चोरीला जात असेल तर ते मौल्यवान असणार, याची जाणीव त्यांना झाली. बाजारात चंदनाला मिळणाऱ्या भावाची खात्री त्यांनी करून घेतली. त्यानंतर त्यांनी मनात चंदन शेतीची खूणगाठ बांधली. 2001 साली ते प्राध्यापकपदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी चंदन शेतीचा अभ्यास केला. बंगळुरू येथील 'वूड सायन्स ऍंड टेक्नॉलजी' या चंदन संशोधन केंद्रात जाऊन चंदन शेतीची रीतसर माहिती घेतली. बंगळुरू येथून चंदनाची रोपे आणून चार वर्षांपूर्वी जून महिन्यात 16 एकरावर लागवड केली. गेल्या चार वर्षांपासून चंदन शेतीत ते मिश्र पिके घेत आहेत. त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत आहे. सर्व चंदन झाडांची वाढ अत्यंत उत्साहवर्धक आहे. चंदन चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी मोठया झाडाभोवती पाच फूट उंचीपर्यंत खडक, माती, दगड टाकून घेतले.

''सध्या शेती मोठया संकटात सापडली आहे. चांगला पाऊस पडला तर चांगले पीक येते. पण यातून समाधानकारक भाव मिळेल असे नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या, कमी पाण्यात येणाऱ्या या पिकाकडे वळावे. आजच्या काळात चंदन शेती ही सर्वांत फायदेशीर आहे'' असा सल्ला विठ्ठलराव जाधव देतात.

    

पोषक वातावरण व गुणवत्ता

मराठवाडयातल्या चंदनाला एवढे महत्त्व आहे की इतर राज्यांमधल्या चंदनापेक्षा उत्कृष्ट चंदन म्हणून ओळखले जाते. मराठवाडयातल्या चंदनाला अनेक शास्त्रज्ञांनी पसंती दिली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत इथल्या चंदनातून मिळणारे उत्पादन अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इथले कोरडे हवामान. कोरडया हवामानात उत्कृष्ट चंदन येते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे अत्यल्प पाण्यात किफायशीर चंदन शेती करता येते. चंदन शेतकरी विलास दहिभाते यांनी मराठवाडयातल्या चंदन लागवडीचे फोटो म्हैसूर सँडल कंपनीला पाठविल्यानंतर त्यांना इथल्या पोषक वातावरणाची/हवामानाची माहिती मिळाली. मराठवाडयात जितक्या लवकर चंदन वाढते, तितक्या लवकर इतर राज्यांत वाढत नाही.

विशेष म्हणजे या भागातल्या चंदनात तेलाची टक्केवारी जास्त आढळून आली आहे. बंगळुरू येथील चंदन संशोधक डॉ. अनंत पद्मनाभन व श्री श्री श्रीखंडमूर्ती यांच्या मतानुसार, मराठवाडयाच्या चंदनातून एका क्विंटलच्या गाभ्यातून तीन ते साडेतीन लीटर तेल निघते. हे प्रमाण जगातल्या कुठल्याच चंदनामध्ये नाही. त्यामुळे इथल्या चंदनाला जागतिक मान्यता मिळत आहे. कंपनीने असा निर्वाळा दिल्यानंतर दहिभाते यांनी चंदन लागवड वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या भागात श्वेतचंदन व रक्तचंदन या दोन जातीपैंकी श्वेतचंदनाची लागवड मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. श्वेतचंदन हे 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकते. त्यामुळे  या जातीमध्ये रोग सहन करण्याची क्षमता आहे. चंदनावर काही वेळेला बुरशी येते. योग्य औषधे दिल्यास ती नाहीशी होते. श्वेतचंदनाच्या खोडापासून तेल काढले जाते. अगरबत्ती, सुंगधी उटणे, साबण याबरोबरच औषधनिर्मितीसाठी या तेलाचा उपयोग उपयोग होतो.

या भागात गेल्या तीन-चार वर्षांपासून चंदन लागवड होत आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी चंदनाची लागवड केली, त्या चंदनाची उंची बारा ते सोळा फुटांपर्यंत गेली आहे. आता या झाडाखाली बसून चार माणसे जेवण करू शकतात, एवढी मोठी सावली तयार झाली आहे. त्यामुळेच इथले हवामान आणि वातावरण चंदन लागवडीसाठी पोषक ठरते आहे. कोरडवाहू व काळया मातीत चंदनाची लागवड करता येते. जमीन जर निचऱ्याची असेल, तर हे झाड अधिक चांगल्या प्रमाणात येते. पाच # पाच अंतरावर चंदनाची लागवड करता येते. एकरी दोनशे झाडे बसतात. महिन्यातून दोन ते तीन वेळा पाणी दिले, तर झाड तग धरून राहते. कोणत्याही रासायनिक फवारणीविना चंदनाच्या झाडाची वाढ होते. शिवाय शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून डाळिंब, शेवगा, कडुलिंब, सीताफळ, आंबा, पेरू, तुती, कडीपत्ता ह्या फळबागा लावता येतात. ह्या फळबागा का? तर चंदन हे परजीवी आहे. ह्याला स्वतःची पांढरी मुळे नाहीत. स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. त्यामुळे चंदनात आंतरपीक घेणे अधिक फायदेशीर ठरते. सातव्या वर्षी चंदनाचा गाभा तयार होतो. पूर्ण गाभा तयार होण्यासाठी 15 वर्षे लागतात. हलक्या व मुरमाड जमिनीत 10 ते 12 वर्षांत चंदनाचा गाभा तयार होतो. काळी जमीन असेल तर 15 वर्षे लागतात. एका झाडातून 10 ते 15 किलो गाभा मिळतो. म्हैसूर सँडल कंपनीच्या बाजारभावानुसार एका किलोस 8,300 रुपये भाव आहे. साधारणपणे एका एकरामध्ये दोनशे झाडे बसतात. पंधरा वर्षांनंतर एक झाड 80 हजार रुपये मिळवून देते. या लागवडीसाठी एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो. कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून चंदन शेतीकडे पाहिले जात आहे. अनेक अभ्यासू शेतकरी, होतकरू तरुण शेतकरी आता चंदन शेतीकडे वळत आहेत.

नवे आयाम, नवी क्षितिजे

बदलते हवामान, लहरी पाऊस आणि प्रदूषण याचाही कृषी क्षेत्रावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत शाश्वत व पारंपरिक पध्दतीचा अवलंब केला, तर कृषी क्षेत्राला चांगले दिवस येतील याच उद्देशाने मराठवाडयातले शेतकरी पीकपध्दतीत बदल करताना दिसत आहेत. ऊस, कापूस, तूर, सोयाबीन ही मराठवाडयातील महत्त्वाची पिके समजली जातात. तशातच ऊस हे पाण्यावर आधारित पीक समजले जाते. त्यामुळे दुष्काळी भागात हे पीक घेणे मोठे जोखमीचे आहे. प्रगतीचा वेग वाढवायचा असेल तर काहीतरी वेगळे केले पाहिजे, ह्याच हेतूने काळाची पावले ओळखणारे शेतकरी नवे क्षितिज पादाक्रांत करू पाहत आहेत. चंदन शेतीची ही नवी संकल्पना रुजविणारे हे शेतकरी केवळ एका गावापुरते, तालुक्यापुरते, जिल्ह्यापुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण मराठवाडाभर आहेत. चंदन शेतकऱ्यांना घनसांगवी तालुक्यातील दहिगव्हाण ह्या छोटयाशा गावातील शेतकरी विलास दहिभाते या तरुण शेतकऱ्याचे योग्य दिशादर्शन, योग्य मार्गदर्शन लाभत आहे. कोणतेही तांत्रिक ज्ञान न घेता, कोणतेही प्रशिक्षण न घेता शेतकरी चंदन शेतीत उतरत आहेत, ही एक मोठी जमेची बाजू आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यवस्थापनात यशकथा दडली आहे. काळाप्रमाणे बदल केले तरच शेती टिकू शकते, ह्याची प्रत्येक शेतकऱ्याला जाणीव झाली आहे.

 

...तर शेतकरी आत्महत्या थांबतील

चंदन हे दुष्काळग्रस्त भागात जलद गतीने वाढणारे एकमेव झाड आहे. जगभरात चंदन लवकर येण्याचे ठिकाण म्हणून मराठवाडयाचा दुष्काळी भाग मान्यता पावत आहे. चंदन शेतीतून शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान होत नाही. उलट करोडपती होण्याचे स्वप्न दाखविणारे हे पीक आहे. त्यामुळे मराठवाडयातील शेतकऱ्यांनी चंदन शेती अंगीकारले तर भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबतील. म्हणजेच दुष्काळी मराठवाडयाला चंदन शेती वरदान ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणार आहे.

विलास दहिभाते, चंदन लागवड
शेतकरी आणि मार्गदर्शक

 

आताची नवी पिढी सकारात्मक दृष्टी ठेवून, जगाचा अभ्यास करून चंदन शेतीकडे वळत आहे. चंदन चोरीला जातं म्हणून ते लावू नका? असे जर कोणी म्हणत असेल तर त्याचे मत खोडून काढा. कारण चोरांनी, एटीएम फोडले म्हणून बँक कधी एटीएम केंद्र बंद करीत नाही. सोन्याच्या दुकानात चोरी होते, ते दुकान बंद करायचे का? चंदन चोरीला जाते म्हणून ते लावायचे नाही का? चंदन चोरीला जाऊ नये म्हणून सीसीटीव्हसारखे तंत्रज्ञान बांधावर लावावे. त्यामुळे चोरीला आळा बसेल. येणाऱ्या काळात श्रीमंतीची व्याख्या बदलणार आहे. तुमच्या शेतात कोणत्या प्रकारचे झाडे आहेत. यावरून शेतकऱ्यांची श्रीमंती मोजली जाणार आहे. त्यामुळे या झाडाचे महत्त्व ओळखले पाहिजे. सरकारने चंदन शेतीला आर्थिक अनुदान नाही दिले तरी चालेल पण चंदनावर जे निर्बंध आहेत ते दूर करावेत.

   

लातूर जिल्हा चंदन शेतीसाठी अग्रेसर आहे. लातूर जिल्ह्यात जवळपास तीनशेहून अधिक हेक्टरवर आज चंदन शेती केली जात आहे. औसा, निलंगा, चाकूर, अहमदपूर व लातूर या तालुक्यांत चंदन शेतकरी मोठया प्रमाणात आहेत. औसा तालुक्यातील उजळंब गावातील दिलीप गोपाळराव जाधव ह्या शेतकऱ्याने दीड एकरात चंदनांची शेती फुलविली आहे. चंदन हे निर्सगाला बाधक नाही, चंदनाला मिळणारा बाजारभाव लक्षात घेऊन ही शेती प्रत्यक्षात आणली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यामुळे लातूर जिल्ह्यात जाधव यांच्या चंदन शेतीची चर्चा आहे. चंदन शेतीबरोबर तीन एकरात बांबूची लागवड केली आहे. चंदन व बांबू ही शेतकऱ्यांची शाश्वत पिके आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे, असे आवाहन दिलीप जाधव यांनी केले.

लातूर तालुक्यातील पाखर सांगवी येथील शेतकरी धनंजय नागनाथ राऊत ह्या शेतकऱ्याने मोठया जोमाने चंदन शेती केली आहे. औसा तालुक्यातील बुदडा गावातील सागर कारंजे ह्या तरुण शेतकऱ्याने साडेचार एकरावर तब्बल 1150 चंदनाची झाडे लावली आहेत. तीन वर्षांपूर्वी लावलेल्या ह्या झाडांची उंची आठ ते दहा फुटापर्यंत गेली आहे. आधुनिक पध्दतीने शेती करता यावी, यासाठी त्यांनी विलास दहिभाते ह्यांच्या मार्गदर्शनाखाली चंदन शेती केली आहे. साडेचार एकरावरील हिरवेगार चंदन पाहून कारंजे यांना चंदन शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी परिसरातील शेतकरी येत असतात. मराठवाडयासारख्या दुष्काळी भागात चंदन शेतीचा विचार मोठया प्रमाणात रुजतो आहे, हे कारंजे यांच्या चंदन शेतीवरून लक्षात येते. चंदन शेतीबद्दल राज्य सरकारने सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे सागर कारंजे यांनी सांगितले. निलंगा तालुक्यातील होसूर गावातील दत्तात्रय बगदुरे ह्या शेतकऱ्याने तब्बल बारा एकारावर चंदन शेती केली आहे. बगदुरे ह्याच्या चंदन शेतीचा दरवळ शेजारील कर्नाटक राज्यात पोहोचला आहे. कर्नाटकातील शेतकरी ही शेती पाहण्यासाठी येत असतात.

घनसांगवी तालुक्यातील खालापुरी गावातील बाबासाहेब पिराजी गायकवाड ह्या तरुण शेतकऱ्याने मोठया मेहनतीने चंदनाची लागवड केली आहे. बाबासाहेब यांची 16 एकर शेती आहे. ते ऊस, कापूस, तूर ही पिके घेत. कोणत्याही पिकातून आजपर्यंत नफा मिळत नव्हता. त्यांना तीन वर्षांपूर्वी चंदन शेतीची माहिती मिळाली. घरातील सदस्यांनी चंदन शेतीला विरोध केला. ही शेती आपल्या फायद्याची नाही, असे सांगून हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी मोठया कल्पकतेने तीन वर्षांपूर्वी दीड एकरात चंदनाच्या 412 झाडाची लागवड केली. त्यासाठी म्हैसुरू येथील चंदन रोपवाटिकेमधून त्यांनी चंदनाची रोपे आणली. तीन एकरासाठी साठ हजार रुपये खर्च आला. चंदनात कडुलिंबाची लागवड केली आहे. चंदनाची आणि कडुलिंबांची उंची 15 ते 20 फुटांपर्यंत गेली आहे. बाबासाहेबांची चंदन शेती पाहण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी येत असतात. चंदन शेतीतून आपण भविष्यात कोटयधीश होऊ, असा विश्वास बाबासाहेबांना वाटत आहे. ''आपर्यंत मी पारंपरिक पध्दतीने शेतीकडे पाहत होतो. ऊस पिकापासून आपण श्रीमंत होऊ शकतो असा भाबडा आशावाद उराशी बाळगून शेतात राब राब राबत होतो. चंदन हे उसापेक्षा कमी पाण्यात जास्त आर्थिक उत्पन्न देणारे पीक आहे, याची खात्री पटली आणि चंदन शेतीकडे वळलो. चंदन शेतीमुळे माझी आर्थिक उन्नती नक्कीच होईल'' असे बाबासाहेब गायकवाड यांनी सांगितले.

खालापुरी गावापासून थोडया अंतरावर जोगलादेवी हे गाव आहे. ह्या गावातील शेतकरी भीमराव भानुदास बळते यांनी एक एकरात चंदनाची 180 झाडे लावली आहेत. तीन वर्षांपूर्वी लावलेल्या ह्या झाडांची उंची वीस फुटांपर्यंत गेली आहे. चंदनात डाळिंबाची लागवड केली आहे. डाळिंबातून त्यांना मोठा आर्थिक मोबदला मिळाला आहे. आंतरपिकातून वर्षभराचा खर्च भागविता येतो. शेतकऱ्यांचे हे अनुभव जगण्याचे शाश्वतपण घेऊन येतात, तेव्हा बदललेल्या वाटा सुंदर वाटायला लागतात, हे चंदन शेतकऱ्यांच्या अनुभवातून लक्षात येत आहे. चंदन शेतीसारख्या अवघड वाटेवरून जात असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कुठेही ताण व भीती वाटत नाही.

नव्या संकल्पना, वेगळी स्वप्ने घेऊन विश्वात प्रवेश केले की, कोणत्याही संकटाची भीती राहत नाही. चंदन शेतकऱ्यांना आता कशाची भीती राहिली आहे. नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने सर्व शेतकरी नवे क्षितिज कवेत घेऊ पाहत आहेत.


बाजारपेठेतील संधी

चंदनाची बाजारपेठ जगभर पसरली आहे. विशेष म्हणजे भारतीय चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. जगातील तुलनेत भारतीय चंदनाच्या झाडात सुगंधाचे व तेलाचे प्रमाण जास्त आहे. नुसत्या चंदनाच्या लाकडाची किंमत सहा ते सात हजार रुपये प्रतिकिलो आहे, यावरून चंदनाची बाजरातील मागणी लक्षात येते. चीन, जपान, सिंगापूर, हाँगकाँग, अरब राष्टे्र ह्या देशांत चंदनाला मोठी मागणी आहे. भारतात म्हैसुरू, बंगळुरू, उटी, कोईम्बत्तूर, हैदराबाद, कन्नोज, थिरुवनंतपुरम, कानपूर, कोलकाता या शहरांत चंदनाच्या वस्तूंचे कारखाने आहेत. चंदनाच्या लाकडापासून विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. त्याचबरोबर चंदनाच्या तेलालाही प्रतिलीटर लाखोंच्या घरात दर मिळतो. पंधरा वर्षांनंतर एका झाडापासून 80 हजार ते 1 लाख रुपये मिळतात. डॉ. अनंत पद्मनाभन यांच्या मते 15 वर्षांत हेक्टरी 6 कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते.

'म्हैसूर सँडल' ही भारतातील सर्वात जुनी कंपनी आहे. ह्या कंपनीत चंदनापासून साबण व इतर सौंदर्यप्रसाधने व वस्तू तयार केल्या जातात. या कंपनीत चंदनाला मोठी मागणी आहे. सध्या पुरेसे चंदन उपलब्ध नसल्यामुळे कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे विलास दहिभाते यांनी सांगितले. कंपनीला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्यांनी हे अनुभवकथन केले. दोनशे वर्षांपूर्वी म्हैसूर सँडल कंपनी तीन शिफ्ट्समध्ये चालायची. शंभर वर्षांपूर्वी ही कंपनी एक शिफ्टमध्ये आली. त्यानंतर पन्नास वर्षांपूर्वी पंधरा दिवसांवर आली. गेल्या वीस वर्षांपासून ही कपंनी केवळ नि केवळ महिन्यातून दोन दिवस चालते. याचे मुख्य कारण म्हणजे चंदनाचे कमी झालेले प्रमाण होय. गेल्या दोन वर्षांत म्हैसुरू, बंगळुरू परिसरात जितके चंदन होते, ते सर्व चंदन विविध चंदन कंपन्या घेत राहिल्या, नवीन चंदन लावण्यासाठी ना कंपन्यांनी प्रोत्साहन दिले, ना सरकारने. परिणामी दुर्मीळ झाड म्हणून आज चंदनाकडे पाहिले जात आहे. कर्नाटक, तेलंगण व तामिळनाडू या राज्यांमध्ये चंदन तस्करीचे प्रमाण वाढले आहे. 'म्हैसूर सँडल कंपनी' पुन्हा सुरळीत चालायची असेल, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान एक एकर तरी चंदन लागवड करावी, एवढे करूनही कंपनी तीन शिफ्टमध्ये येण्यासाठी तीनशे वर्षे जातील. याचे कारण पूर्ण चंदन येण्यासाठी पंधरा वर्षे लागतात. कंपनीची तूट भरून काढण्यासाठी वरील कालावधी लागणार आहे. जगात सर्वांत चांगले चंदन येण्याची भूमी मराठवाडा व विदर्भ आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी चंदन शेतीचा पर्याय निवडावा, असा आश्वासक विचार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विलास दहिभाते यांना दिला. त्यामुळे दहिभाते यांचा चंदन शेतीबद्दलचा आत्मविश्वास वाढला. घनसांगवी तालुक्यातील तीर्थपुरी येथे त्यांनी 'कृष्णकमल चंदन नर्सरी' सुरू केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर चंदनाची रोपे देऊन मराठवाडयात चंदन शेतीचे जाळे निर्माण केले आहे. 'म्हैसूर सँडल कंपनी' इथल्या शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. शिवाय काही चंदन शेतकरी एकत्रित येऊन गट तयार करून 'चंदन ऑइल कंपनी' सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. चंदनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. संपूर्ण देशाला चंदन पुरविण्याची क्षमता मराठवाडयातील शेतकरी निर्माण करत आहे. उत्पादनाची विश्वसनीयता मिळत गेल्याने चंदन शेतीबद्दल शेतकऱ्यांची खात्री वाढत आहे.

 राजाश्रयाची आणि लोकाश्रयाची गरज

चंदनाचे महत्त्व अनेक ग्रंथांमध्ये विशद करण्यात आले आहे. राजेमहाराजे आणि उच्चभ्रूंपासून आणि आजच्या सामान्य नागरिकांपर्यंत चंदनाचा वापर गेला आहे, पुढेही केला जाणार आहे. चंदनाच्या लागवडीवर आणि वाहतुकीवर अनेक प्रकारची कायदेशीर बंधने असल्यामुळे लोक चंदनाच्या शेतीपासून दूर राहतात. चंदन लागडीसाठी सरकारची कोणतीही परवानगी लागत नसली, तरी शेतकऱ्यांना उत्पादनाची विक्री करताना मोठी अडचण होते. महाराष्ट्र वृक्षतोड नियमन कायद्यानुसार चंदनाच्या तोडीवर बंधन घातले गेले आहेत. हा कायदा शेतकऱ्यांना जाचक वाटत आहे. आज चंदनाच्या तोडणीवर, वाहतुकीवर, विक्रीवर पूर्णपणे निर्बंध आहेत. चंदनाची झाडे सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तलाठयांपासून ते वन अधिकाऱ्यापर्यंत पाय झिजवावे लागतात. त्यामुळे शेतकरी ह्या शेतीकडे वळत नाहीत. महाराष्ट्रातील चंदन हे 'रेड झोन' मध्ये मोडत असले, तरी आज हे झाड 'ग्रीन झोन'मध्ये येण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. सध्या चंदनाची राज्यात मोठया प्रमाणात लागवड होत असताना महाराष्ट्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. राज्य सरकारने कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र-तेलंगण राज्यांच्या धर्तीवर चंदनाला राजाश्रय मिळवून द्यावा, चंदन लागवड सातबाऱ्यावर घ्यावी, चंदन झाडाची तोडणी, विक्री आणि वाहतुकीचे नियम शिथिल करावे, चंदन वृक्ष लागवड करावी, संवर्धन करावे, या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी चंदन शेतकऱ्यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या 'आयुष्यमान' विभागाने चंदन लागवडीसाठी परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना एकूण लागवडीवर 75 टक्के सवलत दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाने शेतकऱ्यांच्या मुलींसाठी 'चंदनकन्या' ही योजना सुरू केली आहे. ह्या योजनेत चंदनकन्या योजनेसाठी 1 ते 10 वर्षे वयाची मुलगी नोंदणी करू शकतात. या शेतकऱ्यांना मुलीच्या नावे लागवडीसाठी चंदनाची 20 झाडे दिली जातात. ही झाडे शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर लावायची आहेत. यासाठी सर्व मदत निःशुल्क करण्यात आली आहे.

अलीकडे चंदन शेतीचा मोठया प्रमाणात वापर होऊ लागला आहे. चंदन शेतीमुळे पर्यावरण संतुलन राहते, पीक उत्पादनाचा खर्च कमी होतो, शुध्द हवा मिळते, प्रतिकूल हवामानात होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळेच चंदन शेतीची ही संकल्पना बहुपयोगी ठरत आहे. मराठवाडयाचा चंदन शेतीचा हा आगळावेगळा पॅटर्न आर्थिक सुबत्तेकडे घेऊन जाणारा आहे.

9970452767

Powered By Sangraha 9.0