संमेलनाला राजकारणाचे ग्रहण

12 Jan 2019 15:02:00

  एका विशिष्ट विचारसरणीला असलेला विरोध जेव्हा द्वेषमूलक बनतो, तेव्हा सारासार विवेक हरवलेली सुबुध्द माणसेही संकुचित होतात. कळत-नकळत एका नकारात्मक 'गटाचा' भाग बनतात. एखाद्या गोष्टीला दुसरीही काही बाजू असू शकते याचा विचार करण्याची गरज मग अर्थातच राहत नाही. यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावरून जो काही वाद निर्माण केला गेला, तो राजकारणापेक्षाही एका गटाचा 'वैचारिक' दहशतवाद होता. 

 केवळ एका आणि एकाच पदाधिकाऱ्याच्या बेजबाबदार निर्णयांमुळे आपण उगीच 'संघटित कारस्थानाची' हाकाटी पिटत सगळया संमेलनालाच वेठीला धरतो आहोत आणि संपूर्ण वातावरणच कलुषित करतो आहोत, एवढेही भान मग या एका गटाला उरले नाही. निषेधावर न थांबता थेट बहिष्काराचे अस्त्र बाहेर काढले गेले. अवघ्या एकाच दिवसात खरी परिस्थिती उघड झाली. ज्या घटनेला सरकारी असहिष्णुता म्हणून रंगवले गेले त्या घटनेशी सरकार किंवा कोणत्याही संस्थांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, तर एका 'विद्वानाची' ती आततायी कृती होती हे जेव्हा स्पष्ट झाले, तेव्हा अर्थातच वेळ निघून गेली होती. प्रसारमाध्यमांच्या नादाला लागून वेळी-अवेळी लढायांचे बिगुल वाजवले की अशी फजिती होते. पुढे ना कुणी शत्रू, मागे ना कुणी सैन्य, अंगावर झगा मात्र सेनापतीचा ! 

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड  झालेल्या डॉ. अरुणा ढेरे यांच्याबद्दल सामान्य मराठी रसिकाच्या मनात वसत असलेला सुप्त आदरभाव आणि खूप वर्षांनी अशा विद्वान आणि लोकप्रिय व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली भरणाऱ्या या संमेलनाला आता कोणतेही गालबोट लागता कामा नये, ही समाजाच्या सर्वच स्तरांतून व्यक्त झालेली तीव्र प्रतिक्रिया या दोन गोष्टींमुळे संमेलन वादग्रस्त बनवणाऱ्या मंडळींचे सगळेच कारनामे एकेक करून उजेडात आले.

गेली काही वर्षे साहित्य संमेलन सामान्य वाचकांपासून आणि रसिकांपासून दुरावले जात होते. खर्च नेहमीसारखाच प्रचंड होत होता, पण जनमानसात ज्यांच्या सर्वस्पर्शी साहित्याबद्दल आदर आहे अशी साहित्यिक मंडळी या संमेलनांपासून दूर राहणेच पसंत करीत होती. अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुका हे या दुराव्याचे मुख्य कारण. हे ओळखण्याचा समंजसपणा अखिल भारतीय साहित्य महामंडळ या आयोजक संस्थेने दाखवला आणि निवडणुकीच्या मार्गाने होणारी अध्यक्षांची निवड बंद करून सर्वसहमतीचा मार्ग निवडला. समस्त मराठी रसिकांनी स्वाभाविकच या धोरणाचे मनस्वी स्वागत केले.

डॉ. अरुणा ढेरे यांनी या मराठी सारस्वताच्या मेळयाचे एकदा तरी सारथ्य करावे, अशी बहुसंख्य मराठी वाचकांची सुप्त इच्छा होतीच. या वर्षी या नव्या प्रक्रियेमुळे ती सहज पूर्ण झाली. मराठी महामंडळाच्या विविध घटक व संलग्न संस्थांनी त्यांच्या नियुक्तीवर एकमताने संमती साधली. मराठी विश्वाने या नियुक्तीचे मनभरून स्वागतही केले. एरव्ही कुणाच्याही निवडीवरून जे वादविवाद कायमच होत असतात, त्याची पुसटशी छायाही अरुणाताईंच्या निवडीवर पडली नाही. या सकारात्मक घटनेचे पडसाद महामंडळापर्यंत पोहोचलेच असणार. विचारी साहित्यिक कार्यकर्त्यांना खरे तर ते कितीतरी आश्वासक वाटायला हवे होते. या जुळून आलेल्या समन्वयी सुरांचे संगीत साहित्याच्या प्रसाराला आणि भाषेच्या प्रभावाला एका वेगळया उंचीवर नेऊ शकते, या दृष्टीने संमेलनाच्या कार्यक्रमाची आणि वर्षभर चालणाऱ्या  उपक्रमांची आखणी करणे महामंडळाकडून अपेक्षित होते.

स्वत: अरुणाताई यांनी कोणा एका विचारधारेला कधीही बांधील न राहता शोधक वृत्तीने विविधांगी लिखाण केले आहे. त्यांचे हे अप्रचारी असणे हाच त्यांच्या साहित्याच्या सर्वस्पर्शित्वाचा केंद्रबिंदू आहे. लोक आणि अभिजात या दोन्ही परंपरांचा आढावा घेत त्यांनी समाजाच्या सर्वच स्तरांमधील सुप्त जाणिवांवर नेमका प्रकाश टाकलेला आहे. कविता, कथा, समीक्षा, चरित्रे, ललित अशा विविध साहित्यप्रकारांतून त्यांनी मराठी वाचकांच्या अभिरुचीला भूतकाळातील घटनांशी आणि व्यक्तींशी सहजतेने जोडले आहे. महात्मा फुले यांचे घनिष्ठ सहकारी आणि सत्यशोधक चळवळीचे आधारस्तंभ असलेले डॉ. विश्राम रामजी घोले यांचे चरित्र त्यांनी अनेक तपशील परिश्रमाने जमवून सिध्द केले आहे. या लेखिकेला मिळालेली सर्वमान्यता ही त्यांच्या निष्पक्ष संशोधन कार्याची, समतोल लिखाणाची आणि सम्यक विचारांची फलश्रुती आहे.

पण तरीही त्यांची अध्यक्षपदी निवड होताच काही मंडळींच्या मनात वेगळा विचार सुरू झाला.

खरे तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही अत्यंत जुनी परंपरा असलेली संस्था आहे. महाराष्ट्रात व बृहन्महाराष्ट्रात तिच्या घटक आणि संलग्न संस्था आहेत. पण ही शिखर संस्था मात्र अनेकदा त्या त्या वेळेस असलेल्या अध्यक्षांच्या मर्जीप्रमाणे चालते. समाजाच्या सर्वच क्षेत्रांना गिळंकृत करणारे राजकारण येथेही भरपूर प्रमाणात आहेच. महामंडळात या ना त्या स्वरूपात सक्रिय असलेला एक गट गेली अनेक वर्षे पध्दतशीरपणे साहित्य संमेलनांच्या अध्यक्ष निवडीत पडद्यामागून सूत्रे हलवीत असे. अरुणाताईंच्या निवडीने निर्माण झालेले गट-तटविरहित असे सकारात्मक वातावरण विधायकतेकडे वळवण्याऐवजी यापैकी कुणाला तरी ते वादग्रस्त बनवून सरकारविरोधाकडे नेणे अधिक सोईचे वाटले असावे.

संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सेहगल यांचे नाव मंडळाच्या बैठकीत नव्हे, तर वैयक्तिक स्तरावर नक्की केले गेले. या नावाला मुळात एक वादग्रस्त पार्श्वभूमी आहे. इंग्लिश भाषेत लिखाण करणाऱ्या या बाईंनी मोदी सरकार सत्तेवर येताच घेतलेली एकांगी भूमिका आणि सरकारचा निषेध करीत परत केलेले पुरस्कार हा सगळाच मामला मुळात कधीच सरळ नव्हता. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारला त्याच्या कार्यावरून न जोखता पूर्वग्रहांवरून बदनाम करण्याची मोहीम ज्यांनी चालवली, त्यात या बाई आघाडीवर होत्या. त्यांना उद्घाटनाला बोलावले, तर त्या आपला जुनाच राजकीय अजेंडा राबवण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करतील हे उघड होते. किंबहुना त्याच उद्देशाने त्यांना बोलावण्याचा घाट घातला गेला. वास्तविक हे संमेलन कोणत्याही साहित्यिक वा राजकीय वादात न अडकता बऱ्याच वर्षांनी सुरळीत होण्याचा संभव असताना एका कमालीच्या वादग्रस्त व्यक्तीला उद्घाटक म्हणून निमंत्रण जाणे हीच एका कारस्थानाची नांदी होती.       

निमंत्रण पाठवणे, एका किरकोळ स्थानिक संघटनेच्या मागणीवरून ते रद्द करणे, विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी एकाच पदाधिकाऱ्याकडून केल्या जाणे, बाईंनी थेट मुख्यमंत्र्यांवर त्याचे खापर फोडणे, त्यांचे कुणालातरी पूर्वीच प्राप्त झालेले उद्घाटनाचे भाषण ताबडतोब मराठीत अनुवादित होणे, ते तितक्याच जलदगतीने विशिष्ट माध्यमांवर प्रसिध्द होणे, काही खासगी वाहिन्यांनी मग दिवसभर संमेलनाविरोधात अक्षरश: मोहीम चालवणे, ठरावीक बहाद्दरांनी बहिष्काराची हाक देणे, कोण कोण बहिष्कार घालते आहे त्यांचे फोटो झळकावून या कृत्याला एका मोठया शौर्याचा मुलामा देणे, मोदी आणि फडणवीस कसे हुकूमशहा आहेत याच्या चर्चा घडवून आणणे हे नाटकाचे पुढील सर्व अंक मग शिताफीने एका पाठोपाठ एक पार पडले. हे एक मोठे कारस्थान असेल असे नाही, पण काय होऊ शकते याचा अंदाज घेत कुणीतरी एक-दोघांनी केलेल्या या गोष्टी आहेत हे नक्की. हुकूमशाहीची आणि असहिष्णुततेची हाकाटी पिटली की स्वत:ला उदरतावादी म्हणून सिध्द करायला उतावळे झालेले काही महाभाग हे नाटक मग उत्स्फूर्तपणे पुढे नेतात. आपण किमान झाल्या प्रकारची शहानिशा करावी, माध्यमे जे सांगताहेत, त्यापेक्षाही काही वेगळे घडले असू शकते त्याची माहिती मिळवावी असे यापैकी कुणालाही वाटत नाही, या वेळेसही वाटले नाही!


खूप वर्षांनी एका प्रतिभासंपन्न आणि वाचकप्रिय साहित्यिकेच्या अध्यक्षतेखाली भरणारे संमेलनच गारद होते आहे, हे पाहून अस्वस्थ झालेल्या सामान्य मराठी तरुणांनी समाजमाध्यमातून या सर्व गोष्टींचा बुरखा फाडायला सुरुवात केली. ही कृती विलक्षण उत्स्फूर्त होती. बहिष्काराच्या बाष्कळ आवाहनाकडे दुर्लक्ष करीत संमेलनाला साहित्यिक वा वक्ता म्हणून उपस्थित राहणाऱ्या अनेक निमंत्रितांनी आपला निषेध नोंदवला, पण आततायी भाषा केली नाही. यवतमाळ येथील स्थानिक आयोजन समितीने महामंडळाच्या अध्यक्षांना चांगलेच फैलावर घेतले. निमंत्रण रद्द करण्याचा मसुदा त्यांनीच लिहिला हे ठणकावून सांगितले. खरा सूत्रधार कोण हे उघड होताच वातावरण झपाटयाने बदलू लागले. जी माध्यमे अहोरात्र बहिष्काराची भाषा बोलत होती, ती अचानक थंडावली. सरकारने यात आपली कोणतीही भूमिका नाही हे स्पष्ट केले. दबाव वाढत गेला आणि अखेरीस या अध्यक्ष महोदयांना आपल्या कृत्यांची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा लागला. 

एक वाद निर्माण झाला आणि कुणी एकाने राजीनामा दिल्याने तो शमला, इतके हे प्रकरण नक्कीच साधे नाही.

आवतीभोवती घडणारी प्रत्येक गोष्ट विचारसरणींच्या संघर्षाला नेऊन बांधणे धोकादायक आहे. जीवनाचे प्रत्येक अंग आणि व्यवहाराचा प्रत्येक कोपरा जर अशा वैचारिक संघर्षांनी व्यापला, तर केवळ अनागोंदी माजेल. डाव्या तत्त्वज्ञानाची भुरळ पडलेल्या अनेकांना समन्वयापेक्षाही सतत संघर्ष हवा असतो. निखळ व्यक्ती आणि निव्वळ साहित्य म्हणूनही ते साहित्यिकाचा अथवा त्याच्या लिखाणाचा विचार करू शकत नाहीत. पूर्वग्रहांचा चश्मा लावला की हा आजार होतोच. अत्यंत एकारलेल्या भूमिकेसाठी प्रसिध्द असलेल्या नयनतारा सेहगलांना बोलावणे हे याच मानसिकतेचे लक्षण आहे.

उद्घाटनाचे म्हणून जे भाषण प्रसिध्द करण्यात आले आहे, त्यात कोणत्या साहित्यिक मूल्यांची चर्चा आहे वा भाषेच्या समृध्दीची कोणती दिशा त्यात दाखवली आहे? अथपासून इतिपर्यंत त्यात एकारलेपणा आहे. एका विचारधारेला लक्ष्य करून केलेली प्रताडना आहे. रस्तोरस्ती निष्पापांच्या कत्तली होत आहेत अशी बेफाम भाषा आहे. हिंसा समर्थक तथाकथित विचारवंतांची पाठराखण आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसेचे समर्थन आहे. साहित्यिकाने राजकीय भूमिका घेतलीच पाहिजे असा उद्दाम आग्रह आहे. बेछूट आरोप आहेत आणि भारत हा असहिष्णुतेने ग्रासलेला कसा भयकारी देश आहे याचे वर्णन आहे. हे सर्व लिहिताना एका मोठया नैतिक भूमिकेचा आव आणायला लेखिका विसरत नाही. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन भरते आहे, अशा अरुणा ढेरे यांच्या साहित्याबद्दल मात्र या भाषणात एक शब्दही नाही. भाषांच्या संवर्धनाबद्दलची भूमिकाही नाही किंवा हिंदी-मराठी अनुबंधांची दखलही नाही. निव्वळ राजकीय पूर्वग्रहांनी ओतप्रोत भरलेले निवेदन!

त्यांचे हे भाषण वादग्रस्त ठरणार, ही खात्री असूनही त्यांना बोलावण्याचा घाट का घातला गेला? याचे उत्तर विशिष्ट विचारसरणी आणि पूर्वग्रह यांनी व्यापलेल्या मानसिकतेत आहे. 'सा विद्या या विमुक्तये' - जे सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करते ते खरे ज्ञान - अशी ज्ञानाची व्याख्या केली जाते. या वादग्रस्ततेला खतपाणी घालणारे हे या बंधमुक्त करणाऱ्या ज्ञानदर्शनापासून मैलोगणती लांब आहेत.

दिलेले निमंत्रण रद्द करणे हे सभ्यपणाचे लक्षण नक्कीच नाही. पण निमंत्रण देणारी आणि ते मागे घेणारी व्यक्ती किंवा गट एकच आहे. या प्रकाराशी दुसऱ्या कुणाचा काडीचाही संबंध नाही, हे आता पूर्ण स्पष्ट झाले आहे. एकतर सेहगलांच्या संभाव्य भाषणाने निर्माण होणारे वाद आपल्याला आटोक्यात आणता येणार नाहीत असे या मंडळींना त्यांचे आधीच मिळालेले भाषण वाचून पुरते उमगले असावे व निमंत्रण मागे घेण्यासाठी दिखाऊ कारणांचा शोध घेतला गेला असावा. कारण भाषण प्रथम पडले ते यांच्याच हातात. अन्यथा निमंत्रण रद्द करणे आणि सत्ताधारी पक्षावर त्याचे खापर फोडणे हीच मुळात पूर्वयोजना असू शकते. इतक्या मोठया व्यापक प्रमाणावर तयारी सुरू असणाऱ्या संमेलनात कुणीतरी स्थानिक गट कोणत्यातरी संबंध नसलेल्या कारणांसाठी उद्घाटकांना बोलावू नका अशी धमकी देतो आणि ताबडतोब निमंत्रण रद्द केले जाते, हा खुलासा पटण्यासारखा नाहीच नाही.

खरा गंभीर प्रश्न तर यानंतरच उभा राहतो.

वाचकांच्या पसंतीची दाद मिळवणाऱ्या साहित्यिकांचा खरेच आपल्या प्रतिभेवर विश्वास नसावा का? सरकारच्या वा महामंडळाच्या हुकूमशाहीचा डांगोरा पिटला जाताच काही लेखक-कवींना त्याच्या सुरात सूर मिसळण्याची इतकी घाई का झाली? असहिष्णुता दाखवीत निमंत्रण रद्द करणे ही कोणतीच संघटित कृती नव्हती. ना सरकारची, ना महामंडळाची. मग आपले लोकशाही प्रेम दाखवायला काही साहित्यिक मंडळी इतकी उतावळी होत थेट बहिष्काराची भाषा का बोलू लागली? स्वत:च्याच प्रतिभेवर अविश्वास की स्वत:च्या प्रतिमेची जपणूक? लोक आपल्याला एका विचारसरणीच्या दावणीला बांधतील याची इतकी भीती की आपणच आपला एक दांभिक कळप करतोय, याचेही भान मग राहत नाही. ही साधनशुचिता फसवी आहे. सेहगलांच्या जागी कुणा एका हिंदुत्ववादी प्रतिभावंताला बोलावले असते, तर ते आमंत्रण रद्द करा म्हणून हीच मंडळी बाह्या सरसावून पुढे आली असती. अग्रलेख मागे घेणाऱ्या संपादकाने अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल शिरा ताणून बोलावे हाच एक मोठा विनोद आहे. बहिष्कार घालणार म्हणून ज्यांचे फोटो झळकले ते सर्वच दांभिक असतील असे नाही, पण आपल्या या उतावळेपणामुळे वातावरण अधिकच कलुषित होते आहे व सगळे संमेलनच वादाच्या भोवऱ्यात सापडते आहे, याची या मंडळींना जाणीवही नसावी का?

या संपूर्ण प्रकरणात काही माध्यम-वाहिन्यांची भूमिका अत्यंत आक्षेपार्ह होती. त्या त्या वाहिन्यांचे संपादक, संचालक वा निर्माते स्वत:ला सोईचे असेच सत्य जर मांडत राहिली, तर समाज एक होऊच शकणार नाही. वास्तविक साहित्यप्रेम ही जातिभेदापलीकडे नेणारी भावना आहे. साहित्याच्या प्रसारातूनच उद्याची पिढी मुळे घट्ट रोवून उभी राहणार आहे. अशा साहित्यिक उपक्रमांचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येक सामाजिक संस्थेची जबाबदारी आहे. खासगी वाहिन्याही त्याला अपवाद नाहीत. पण ज्या भडक पध्दतीने या तथाकथित वादाचे चित्र रंगवले गेले, सरकारवर निशाण साधले गेले आणि बहिष्काराचे आवाहन करण्यात अहमहमिकेने काही वाहिन्यांनी पुढाकार घेतला, ते सर्व उबग आणणारे होते.    

शेवटी मुद्दा येतो तो सहिष्णुता ही सापेक्ष असावी का?

मराठी साहित्याच्या प्रांतात वा समग्र सांस्कृतिक क्षेत्रात असे वाद नवे नाहीत.

थोर कथाकार पु.भा.भावे जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले, तेव्हा पुण्यात भरलेल्या संमेलनातील त्यांचे अध्यक्षीय भाषण उधळून लावण्यात आजच्या अनेक सहिष्णू शिष्यांच्या वैचारिक घराण्यांचाच हात होता! डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षांत पुण्यात टिळक स्मारक मंदिरात भरलेल्या समारोप सभेस पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वि.ग. भिडे यांनी जाऊ नये, असा फतवा काढणारे कोण होते? डॉ. आनंद यादवांना अध्यक्ष असूनही संमेलनस्थळी पाऊलही ठेवता आले नाही, तेव्हा किती साहित्यिक फणा काढून उभे राहिले? सेहगलबाईंच्या जे.एन.यू.मधील लाडक्या कॉम्रेडनी आजवर कितीतरी हिंदुत्ववादी नेत्यांना वा अभ्यासकांना आपल्या परिसरात यायला बंदी घातली होती. तस्लिमा नसरीन या लेखिकेला वारंवार धमक्यांना आणि अपमानांना तोंड द्यावे लागते, त्याबद्दल सेहगलबाई एक अक्षरही काढत नाहीत. त्यामुळेच या सगळया नाटकाचा पायाच ठिसूळ आणि हेतू चिकटलेला आहे.

असे वाद होत राहतील आणि विरूनही जातील. पण  समाजमानसावर या वादातून उमटणारे व्रण दीर्घकाळ टिकतात. साहित्यिक म्हणून आपली बांधिलकी प्रथम आपल्या लिखाणाशी, ते लिखाण वाचणाऱ्या समाजाशी आणि मुख्य म्हणजे स्वत:शी असली पाहिजे. छुपे राजकीय विचार घेऊन भूमिका ठरवल्या की साहित्यातले सर्जकत्वच हरवते. विविध विचारधारांशी सलगी असणे गैर नाही, पण विचारधारेला सोयीची अशी एकांगी भूमिका घेत वावरले की व्यक्तींचे गट व गटांचे कळप बनतात. समाज पुढे नेणाऱ्या साहित्य चळवळींना असे वाद वा असे गट मारक आहेत, ही याहीपूर्वी अनेकदा सिध्द झाले आहे. यवतमाळ येथील संमेलनाच्या या वादाने पुन्हा हेच अधोरेखित केले आहे.

9989395570

 

Powered By Sangraha 9.0