गणेशाच्या स्वागतासाठी सजल्या फूल मंडया

06 Sep 2018 16:30:00

***नेहा जाधव***

गणरायाच्या स्वागतात आणि नंतर त्याच्या पुजेत फुलांचे असलेले महत्त्व आजही अबाधित आहे. श्रावणापासूनच विविधरंगी फुलांनी, पत्रींनी, तोरणांनी फुलांच्या मंडया सजू लागतात. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. या मंडयांमध्ये लक्षावधी रुपयांची उलाढाल होत असते. कित्येकांना रोजगार मिळतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील एल्फिन्स्टन रोड येथील 'स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई' आणि 'दादर फूल मंडई' या मंडयांचा घेतलेला वेध.

भारतीय संस्कृतीतील विविध सण-उत्सव यांचा साज वाढवण्यात सगळयात महत्त्वाची भूमिका बजावतात ती फुले. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपात ही फुले आपल्या उत्सवांचे साक्षीदार होतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांची माळ सुरू होते ती श्रावणापासून. त्यामुळे तेव्हापासूनच फुलांची मागणी वाढू लागते. मोठमोठया शहरांमध्ये फुलांची स्वतंत्र आणि भलीमोठी बाजारपेठ असणे हे फुलांना असलेल्या प्रचंड मागणीचे द्योतक आहे. त्यामुळे श्रावण आणि पुढचे 4 महिने हे बाजार रंगीबेरंगी सुगंधी फुलांनी नुसते दरवळत असतात.

मुंबईत एल्फिन्स्टन रोड आणि दादर या दोन ठिकाणी फुलांचे मोठे बाजार आहेत. 'स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई' आणि 'दादर फूल मंडई' या त्या दोन सुप्रसिध्द मंडया.

स्वस्त दरात फुलांची खरेदी करण्यासाठी मुंबईकर दादरच्या फूल मार्केटला पसंती देतो. मात्र या फूल मार्केटलाही पुरवठा करणारी फुलांची मोठी मंडई म्हणजे एल्फिन्स्टनची स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई. गणेशोत्सवाच्या काळात या दोन्ही बाजारात मोठया प्रमाणात फुलांची उलाढाल होते.

स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई

पूर्व मुंबईतील एल्फिन्स्टन रोड म्हणजेच आताचे प्रभादेवी, पश्चिम मुंबईतील परळचा पूर्व भाग, एल्फिन्स्टन आणि दादरच्या मध्यभागी असलेली ही फुलांची मंडई. एका लांबलचक सभागृहासारखा पसरलेला हा फुलांचा बाजार. 1986मध्ये प्लाझा थिएटरच्या मागच्या बाजूला असणाऱ्या या मंडईचे स्थलांतर दादर स्टेशनजवळ झाले. त्यानंतर इथल्या जागेच्या अपुऱ्या सोयीमुळे 1998मध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कामगार मैदानाजवळ 'स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे' या नावाने मंडईची स्थापना केली. या ठिकाणी एकूण साडेसहाशे गाळे आहेत. गणपतीच्या काळात इथे तुडुंब गर्दी असते. इथे इतर वेळी होलसेल विक्री होत असली तरी गणेशोत्सवादरम्यान किरकोळ - अगदी 2-3 किलो फुलांचीही विक्री केली जाते. या बाजाराचे काम दिवसभर चालूच असते, पण खरे कामकाज रात्री 12च्या पुढे चालू असते.

गणपतीच्या काळात झेंडू, शेवंती, जास्वंद, रजनीगंधा, चाफा, मोगरा, चमेली, गुलाब ही फुले, तसेच शमी, बेल, दूर्वा, तुळस या पत्रींना विशेष मागणी असते. गणपतीत कंठी, तर नवरात्रीत वेणी जास्त विकली जाते. या बाजारात मिळणारी सर्व फुले पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बारामती, बंगळुरू, बेळगाव, गुजरात, डहाणू, वसई या भागातून येतात. सांगली, सातारा, कोल्हापूरहून गोंडा (झेंडू) येतो. बंगळुरू, बेळगाव, वसईमधून मोगरा आणि शेवंती येते. डहाणू आणि गुजरातमधून लिली येते. इथे परदेशी फुले फारशी मिळत नाहीत. गुलाबाच्या फुलांचे मात्र अनंत प्रकार विक्रीला असतात. पश्चिम महाराष्ट्रातून झेंडू, शेवंती, कलकत्ता गोंडा, पिवळा गोंडा, लाल गोंडा येतो. इथे वेगवेगळया प्रकारची फुले तर असतातच, त्याचबरोबर केळीची पाने, दूर्वा, कडुनिंब, आंब्याची पाने, शमी, बेल अशा पूजेसाठी वा धार्मिक कार्यासाठी आवश्यक ती पत्रीही मिळते. ही पत्री आदिवासी भागातून येते. या मंडईतून दररोज प्रभादेवीचा सिध्दिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी या देवस्थानांना हार जातात.

 जरी या वर्षी सरकारने प्लास्टिक-थर्माकोल बंदी आणली असली, तरी प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आलेली नाही. त्यामुळे ताज्या फुलांना प्लास्टिकची फुले हा पर्याय आजही आहेच. फुले महाग असतात आणि नाशिवंतही, या कारणामुळे प्लास्टिकच्या फुलांची जास्त खरेदी होते. त्यामुळे आमच्यापेक्षा शेतकऱ्याचे जास्त नुकसान होते. त्यामुळे सरकारने प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आणावी, ही विनंती.

- मनोज पुंडे

अध्यक्ष, स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई

 

दादर फूल बाजार

दादर स्थानकाच्या पश्चिमेला डाव्या हाताला आणि कविवर्य केशवसुत पुलाच्या खाली फूल विक्रेत्यांची जी रांग दिसते, तोच दादरचा सुप्रसिध्द फूल बाजार. दादर हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असल्याने इथे संपूर्ण मुंबईतून ग्राहकांची गर्दी असते. गर्दीचे दुसरे कारण म्हणजे सर्वसामान्य ग्राहकाला परवडतील असे दर. पहाटे पाच वाजल्यापासून इथल्या कामाची धांदल सुरू होते. गणपतीच्या काळात इथे गर्दी असतेच, तर सर्वात जास्त गर्दी होते ती नवरात्रीत गोंडयाच्या अर्थात झेंडूच्या माळा घेण्यासाठी. या बाजारात जास्त माल हा सुटया फुलांचा असतो. ही फुले किलोच्या दरात विकली जातात. संपूर्ण महाराष्ट्रातून - ठाणे, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांतून इथे फुले आयात केली जातात. या बाजारात 'कट पीस' म्हणजेच ज्यांचे देठ मोठे तसेच रंगीबेरंगी अशी फुलेही मिळतात. यामध्ये प्रामुख्याने विविध जातींचे व रंगांचे गुलाब, डबल डिलाईट पीस, पिटूनिया, फ्लॉक्स, स्नॅप ड्रॅगन, पीस लिली अशी नेहमीच्या फुलांपेक्षा वेगळी आणि महागडी फुलेही इथे मिळतात. इंदौर, कर्नाटक या भागांतून ही फुले आणली जातात. बाजारात दर दिवसाला फुलांचे 30-40 ट्रक येतात. गणपती-नवरात्रीच्या काळात 50-60 ट्रक येतात. शेतकऱ्यांकडूनही थेट 20-22 ट्रक विक्रीस येतात.

दादर बाजारात इतर बाजारातील फुलांपेक्षा जास्त फुले विकली जातात, म्हणून इथला माल शिल्लक राहून खराब होण्याची शक्यता कमी असते. गणपतीच्या काळात फुलाचे भाव वाढतात. त्यामुळे रोज 50 रुपयाला 4 किंवा 5 मिळणारे गजरे, सणांच्या काळात 100 रुपयाला 5 मिळतात. एरव्ही चाफ्याची 10 रुपयाला 4 मिळणारी फुले 50 रुपयाला 5 मिळतात. नवरात्रीच्या काळात वेणीला सगळयात जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे 50 रुपयाला एक अशी वेणी विकली जाते. उत्सवाच्या काळातही गुलाबाच्या फुलांच्या तसेच केळीच्या पानांच्या किमतीत फारसा चढउतार होत नाही. दादरच्या फूल बाजारात हाराला लागणाऱ्या फुलांची विक्री होत असली, तरी विकल्या जाणाऱ्या गजऱ्यांमुळे जास्त नफा होतो. येथे गजरा विकणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग आहे. दिवसाला जास्त नफा गजरा विक्रेत्यांच्या खरेदीमुळे होतो. गजऱ्याची फुले घाऊक दरात विकली जातात. प्रामुख्याने मोगऱ्याला, चाफ्याला जास्त मागणी असल्यानेही गजऱ्याचे दर वाढलेले असतात.

 गणपतीमध्ये फुलांची मागणी वाढलेलीच असते. परंतु या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे फुलांचे उत्पन्न भरपूर आहे. त्यामुळे फुलाला पाहिजे तसे मार्केट मिळालेले नाहीये. यंदा गेल्या वर्षीच्या अर्ध्या भावात फुले उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतल्या  गिऱ्हाइकांना या वर्षी स्वस्त फुले मिळणार आहेत.

- राजेंद्र हिंगणे

स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई

वर्किंग पर्चेस प्रेसिडेंट

 

 

फुलांचे भाव  

गणपतीच्या काळात फुलांची वर्षभरापेक्षा जास्त उलाढाल होत असली, तर त्याचा नफा-तोटा ऋतुचक्रावर अवलंबून असतो. या वेळी पाऊस जास्त पडल्यामुळे फुले मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या वेळी फुलांची आवक जास्त असते, त्या वेळी ती स्वस्त होतात. परंतु जर अतिवृष्टी झाली, तर  शेतकऱ्यापासून ते ग्राहकांपर्यंत साखळीतील प्रत्येकाचे नुकसान होते. पुरवठा नसल्यामुळे फुलांचे भाव तर वाढतातच आणि उत्सव असल्यामुळे ग्राहकांनाही मिळेल त्या भावात फुले खरेदी करावी लागतात.

त्यातही काही विशिष्ट फुलांची - सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांची आवक कमी झाली, तर ग्राहक चढया भावात खरेदी न करता प्लास्टिकच्या फुलांचा पर्याय निवडतो. यामुळे शेतकरी, व्यापारी दोघांचे नुकसान होते. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्याला बसतो.  

याव्यतिरिक्त वाहतूकदार, धाग्यांचे विक्रेते, गजरे विक्रेते, पत्री किंवा रानफुले घेऊन येणारे पाडयांवरचे आदिवासी या सर्वांचा या साखळीत अंतर्भाव होतो. त्यामुळे फुलांचे भाव वाढले की संपूर्ण साखळीवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

एकूणच सण-उत्सवाच्या काळात फुलांच्या बाजारात जी उलाढाल असते, त्यावर अनेकांची उपजीविका अवलंबून असते. ही उलाढाल कमी-जास्त जरी झाली तरी दर गणेशोत्सवासाठी आणि अन्य सर्वच सणांसाठी या फुलांच्या बाजारपेठा सजलेल्या असतात.

Powered By Sangraha 9.0