महालय संकल्पना

27 Sep 2018 12:52:00

श्राध्द हा हिंदू धर्मशास्त्रातील एक जटिल आणि गहन असा विषय आहे. एका छोटया लेखात या विधीचा साकल्याने विचार करणे शक्य नाही. त्यामुळे प्रातिनिधिक रूपात विषयाचा परिचय करून देण्याचा हा अल्प प्रयत्न.

हिंदू धर्मसंस्कृतीमधील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे धार्मिक आचार. नामकरण, मुंज, विवाह अशा विधींच्या जोडीनेच हिंदू जीवनप्रणालीत श्राध्दविधीचे महत्त्व विशेषत्वाने आहे.

श्रध्देने केले जाते ते श्राध्द होय. श्राध्दाच्या विविध व्याख्या धर्मशास्त्रकारांनी सांगितल्या आहेत. त्यामध्ये दिवंगत पूर्वजांच्या प्रती श्रध्दा व्यक्त करण्यासाठी देश काळ आणि पात्रता विचारात घेता ब्राह्मणाला काही देणे याला श्राध्द म्हणतात. श्राध्दामध्ये दिवंगत व्यक्तीला अनुसरून पिंडदान केले जाते. ब्राह्मणांना व गरजू व्यक्तींना भोजन व दान दिले जाते. अशी एकूण 96 प्रकारची विविध श्राध्दे करणे विहित मानले जाई. आता या सर्व श्राध्दविधींचे आचरण करणे काळाच्या ओघात शक्य नसले, तरी व्यक्तीच्या निधनानंतर केले जाणारे श्राध्द, वर्षश्राध्द असे काही निवडक श्राध्दविधी आजही समाजात केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे महालय श्राध्द.

भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि काही कौटुंबिक गणपतींचे विसर्जन होते. काही कुटुंबांमध्ये अनंताची पूजा श्रध्देने केली जाते. प्रौष्ठपदी पौर्णिमा गणेश विसर्जनाची धामधूम संपविते आणि दुसऱ्या दिवशी सुरू होतो पितृपक्ष. भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काल हिंदू धर्मपरंपरेत पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सर्वसामान्यपणे शुभ कार्य करीत नाहीत, त्याविषयी बोलणी करीत नाहीत आणि खरेदीही करीत नाहीत!

महालयाचा काळ

वस्तुतः मध्ययुगात आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे आणि भाद्रपद महिन्याच्या अखेरीस संपत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवला जात होता, असे सिध्देश्वरशास्त्री चित्राव यांनी नोंदविले आहे.

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी 'हिस्टरी ऑॅफ धर्मशास्त्र' या आपल्या ग्रंथात नोंदविले आहे की आषाढ महिन्यातील पौर्णिमेपासून पुढे पाच कक्ष, म्हणजे भाद्रपद कृष्ण पक्षात महालय श्राध्द करावे. या वेळी सूर्य कन्या राशीत असतो आणि दक्षिणयान मध्यात आलेले असते. याला गजछाया असेही म्हटले जाते.

 या काळात महालय करणे न जमल्यास आश्विन अमावास्येला दिवे लावून हे श्राध्द करावे. या श्राध्दात विश्वेदेव तसेच धुरिलोचन नावाच्या पितरांना पिंडदान केले जाते.

महालय श्राध्दाचा गौण काळ आश्विन शुध्द प्रतिपदेपर्यंत मानण्यात आला आहे.

दक्षिणायनात स्वर्गातील देवांची रात्र असते, पण त्या वेळी पितृलोकात दिवस असतो, असा एक धर्मशास्त्रीय संकेत प्रचलित आहे. त्यामुळे दक्षिणायनात पितरांना संतुष्ट करावे असेही संदर्भ आढळतात.

धर्मसिंधू या ग्रंथातही काशीनाथशास्त्री उपाध्ये यांनीही कन्या राशीस्थित रवी हा प्रशस्ती संपादक असल्याने या काळात महालय करायला पुष्टी दिली आहे.

(याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथांत विपुल चर्चा आढळते, तरी येथे केवळ निवडक संदर्भच नोंदविले आहेत. जिज्ञासूंनी याविषयी अधिक माहिती अवश्य घ्यावी.)

महालयाचे वेगळेपण - वसुधैव कुटुंबकम।

महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते, म्हणून हा काल शुभ मानला जात नाही!

महालय श्राध्दात आपण आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण-पूजन पिंडरूपाने करतो. यामध्ये आपले दिवंगत आई-वडील, आजी, आजोबा, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण, अन्य नातेवाईक या सर्वांना उद्देशून पिंडदान करतो. आपण विविध गुरूंकडून आयुष्याभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे असे आपले गुरू आणि शिष्य जे निधन पावले असतील त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या, एवढेच नव्हे, तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तींना उद्देशून आपण हे श्राध्द करतो. अनेक लोकांवर निधनानंतर कोणताही संस्कार केला जात नाही. त्यांच्याप्रतीही आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या नकळत झाडे तोडली जातात, कीड-मुंगी-कीटक आपल्या हातून नकळत मारले जातात. त्यांचीही आठवण आपण या वेळी करतो. सारांश, आपल्या जवळचे असोत वा दूरचे असोत, हे विश्वचि माझे घर या न्यायाने आपण महालय श्राध्दात सर्वच दिवंगत लोकांचे स्मरण करतो. चारही दिशांना असलेल्या ज्ञात-अज्ञात अशा सर्वांसाठी श्रध्देने पुष्प अर्पण करण्याचे हे दिवस. तसेच माझ्या कुटुंबाचा 'वंशवृक्ष' आठवण्याची संधी. त्या निमित्ताने कुटुंबाचेही संघटन!

ज्या काळात समाजात विधवा महिलांचे स्थान निम्न दर्जाचे होते, त्या काळात पती जिवंत असताना सुवासिनी असताना मृत्यू येणे हे महिलेच्या सामाजिक आयुष्यात फार महत्त्वाचे होते. त्यामुळे अर्थातच सवाष्ण गेलेल्या महिलेसाठी अविधवा नवमीचा स्वतंत्र दिवस योजला गेला असावा.

जसे गणपती, गौरी यानिमित्ताने सर्व घर एकत्र येते, त्याचप्रमाणे श्राध्दविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने आपल्याला आपला वंशवृक्ष समजतो. त्या निमित्ताने आपण कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती करून घेतो. त्यांनी केलेली विशेष कामे, समाजासाठी व कुटुंबासाठीचे त्यांचे योगदान याबद्दल आपल्याला माहिती मिळते. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने आपलाही आत्मविश्वास वाढतो व आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून आपल्यालाही प्रेरणा मिळत राहते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या समाजाची मदत घेत असतो, त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही या निमित्ताने व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते. निसर्गातील पशु-पक्षी, झाडे यांचेही निसर्गचक्रात महत्त्वाचे स्थान असते. त्यांच्यामुळेही आपल्या नकळत का होईना, आपण चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य जगत असतो. त्यांच्याविषयी आपुलकी व्यक्त करण्याचे माध्यम म्हणूनही महालयाकडे पाहता येऊ  शकेल.

आधुनिक काळातही असे अनुभवास येते की या काळात सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणे पितृपक्षात शक्यतो टाळले जाते. शुभ कार्याची चर्चाही या काळात केली जात नाही. खरे म्हणजे आपले दिवंगत पूर्वज या काळात पृथ्वीलोकात येऊन आपल्या सर्व गोष्टींचे अवलोकन करीत असतील, तर आपल्या कार्याला त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत असा विचार का करू नये ?

भारतातील संस्कृती कृषी आधारित आहे. त्यामुळे शेतीची कापणी होऊन पहिले पीक हाती आल्यावर मगच कदाचित कृषिवलाला आर्थिक स्थिरता मिळे, ज्यामुळे तो काही आवर्जून खरेदी करू शकत असे. पण ज्या काळात पिके अजून शेतातच कापणीसाठी वाट पाहत उभी आहेत, त्या काळात खरेदी करणे टाळणे इष्ट असावे. त्यातूनच कदाचित या काळात खरेदी करू नये असा संकेत रूढ झाला असावा.

ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे, त्या आपल्या पूर्वजांचे आपल्या वंशजांसाठी आशीर्वाद असावेत असा सकारात्मक विचार आपण करायला हवा. श्राध्द म्हणजे श्रध्देने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. त्यामुळे पितृपक्षात सर्व दिवंगत पूर्वजांच्या सामूहिक स्मरणाची संधी अवश्य घ्यावी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

आधुनिक वेगवान काळात महालय श्राध्द विधिपूर्वक करणे शक्य झाले नाही, तरी आपल्या कुळातील तसेच ज्ञात-अज्ञात अशा दिवंगत व्यक्तींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना गरजूला दान देण्याची, समाजाच्या आणि पर्यावरणाच्या हितार्थ उपक्रमाला हातभार लावण्याची किंवा आपल्या शक्ती-बुध्दीनुसार आणि आवडीनुसार कोणत्यातरी विधायक उपक्रमाला हातभार लावण्याची संधी श्रध्दापूर्वक अवश्य घ्यावी.

9422059795

 

Powered By Sangraha 9.0