हदार भागात अरब (मुस्लीम आणि ख्रिश्चन) वस्ती अधिक आहे. हदारमधील सगळीच घरे, इमारती खूप जुन्या आणि इस्रायलमध्ये मिळणाऱ्या खास येरूशलाई या दगडाच्या आहेत. त्यांच्या जुनाटपणातही एक प्रकारचे सौंदर्य आहे. 'वादी निसनास' हा हदारमधीलच एक भाग. वादी म्हणजे अरब भाषेत दरी. वादी निसनास हा भाग एका दरीसारखा चिंचोळया आणि अरुंद गल्लीत आहे.
जेव्हा आपण कोणत्याही नवीन शहरात जातो, तेव्हा आपल्याला आवश्यक गोष्टी जिथे मिळतात ती ठिकाणे आणि तिथे कसे जायचे हे माहीत होणे म्हणजे शहराची ओळख होण्यास सुरुवात होणे. पण ही अशी ओळख होतानाच तुम्हाला जेव्हा त्या शहराचे वैशिष्टय - कोणत्या वस्तू कुठे चांगल्या मिळतात, कोणत्या वस्तू कुठे स्वस्तात मिळतात हे समजायला लागले की तुम्ही त्या शहरातलेच एक बनून जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. पुणेकरांना कशी तुळशीबाग आणि रविवार पेठ ओळखीची आहे, तसेच हैफामध्ये राहणाऱ्यांना हदार. हदार हा अरब शब्द आहे. सुरुवातीच्या दिवसात भारतीय वस्तू/पदार्थ/धान्य कुठे मिळतील? असे विचारले, तेव्हा एका सुरात उत्तर मिळाले - 'ईस्ट-एन्ड-वेस्ट, हदार'. तेव्हापासून हदारला जाण्याचे ठरवलेले होते, पण वेळच मिळत नव्हता. शेवटी बँकेचे खाते उघडायला बँकेच्या मुख्य शाखेत जावे लागले, तेव्हा हदारला जाणे झाले. हैफामध्ये इतर कुठेही न दिसलेले गरीब लोक मला इथे दिसले. एक-दोघांना तर शेकल मागताना पाहिले. पण आपल्याकडच्यासारखी गरिबी इथे नाही. इस्रायलमध्ये सरकारकडून सोशल वेलफेअर फंडाच्या माध्यमातून 60च्या पुढे असलेल्यांना, काही डिसेबिलिटी असलेल्यांना पेन्शन मिळते. हदारमधील मुख्य रस्त्यावरून अगदी सहजच फेरफटका मारत असताना अचानक एका रस्त्याच्या सुरुवातीलाच 'ईस्ट-एन्ड-वेस्ट'चे दर्शन झाले. आत गेल्यावर सम्राट आटा, बेसन, तांदळाची पिठी, हल्दीरामचे पॅकेटस, चकल्या, शेव, घी, लोणची, लिज्जत पापड, उदबत्ती, सोसायटी चहा अशा सगळयाच वस्तू दिसल्या आणि मन एकदम हरखून गेले. पटकन तीन-चार वस्तू घेतल्या आणि पैसे देण्यासाठी काउंटरला गेले. तिथे जवळच मला श्रीगणेशाची अतिशय सुबक मूर्ती दिसली. म्हणून काउंटरवरच्या माणसाला मूर्तीची किंमत विचारली, तर म्हणाला, ''ही मूर्ती विकण्यासाठी नाही.'' 'ईस्ट-एन्ड-वेस्ट'मध्ये भारतीय आणि चिनी पदार्थ/वस्तू मिळतात. मग मी माझा मोर्चा हर्टझल स्ट्रीटकडे वळवला. सगळीकडे दुकानांत सेल वगैरे लागलेले दिसले. त्यांच्या नवीन वर्षाचा सण अगदी तोंडावर होता. हर्टझल स्ट्रीट म्हणजे हैफामधील लक्ष्मी रोड. सगळी विविध कपडयांची दुकाने, ड्रायफ्रूट्सची दुकाने, हॅट्स, फर्निचर, ऍन्टीक्स इत्यादींची दुकाने, हुक्का पार्लर्स-कसीनो, छोटी-मोठी रेस्टॉरंट्स, कॅफे, इलेक्ट्रिकच्या वस्तूंची दुकाने, दागिने आणि बरेच काही या हर्टझल स्ट्रीटवर आहे.
हदार भागात अरब (मुस्लीम आणि ख्रिश्चन) वस्ती अधिक आहे. हदारमधील सगळीच घरे, इमारती खूप जुन्या आणि इस्रायलमध्ये मिळणाऱ्या खास येरूशलाई या दगडाच्या आहेत. त्यांच्या जुनाटपणातही एक प्रकारचे सौंदर्य आहे. 'वादी निसनास' हा हदारमधीलच एक भाग. वादी म्हणजे अरब भाषेत दरी. वादी निसनास हा भाग एका दरीसारखा चिंचोळया आणि अरुंद गल्लीत आहे. पण ही गल्ली खूप मोठी आहे. पूर्ण अरब भाग असल्याने इथे अधूनमधून भोसकल्याचे किंवा गोळी मारणे यासारखे गुन्हेदेखील घडत असतात. इथे मुसलमान आणि ख्रिश्चन अशा दोघांचीही घरे, दुकाने, भाजी मंडईसुध्दा आहे. हदारमध्ये 'फलाफल जॉर्ज' या दुकानातील फलाफल खाल्याशिवाय आमचा वीकएन्ड चालू होत नसे. नियमित जाण्याने त्या मालकाशी आमची छान ओळख झाली होती. एकदा गंमतच झाली. आम्ही वादी निसनासमध्ये भाजी घ्यायला गेलो होतो. तिथे फलाफल जॉर्जसमोरच मला एक अरब जोडपे शिंगाडे आणि रताळी भाजताना दिसले. मी त्यांना शिंगाडयांची किंमत विचारली. त्या भागात मार्केटमध्ये कुणाला शक्यतो इंग्लिश फारसे येत नाही. सगळे अरब भाषा किंवा हिब्रूच बोलतात. त्यांची मुलगीदेखील तिथेच बाजूला उभी राहून भाजलेले शिंगाडे आणि रताळी बांधून द्यायला त्यांना मदत करत होती. मला पाहताच ती एकदम आश्चर्यकारक उद्गार काढून ''हिंदी, हिंदी'' असे म्हणाली. मी लगेच होकार दिला. मला वाटले, ह्या मुलीला हिंदी येते की काय! पण तिने लगेच तिची दोन बोटे तिच्याच डोळयांपाशी दाखवून पुन्हा माझ्या चेहऱ्याजवळ आणली आणि हिब्रूमध्ये किंवा अरब भाषेमध्ये काहीतरी बोलायला लागली. मला फक्त स्वरा, कतरीना, करण इ. नावे समजली. मी तिला पुन्हा विचारले, ''डू यू वॉच हिंदी मूव्हीज?'' पण तिचे काही उत्तर नाही. मग ती ''टीव्ही टीव्ही'' असे म्हणाली. मग मी विचारले, ''तू टीव्हीवर हिंदी सिनेमा पाहातेस का?'' तरी तिचे उत्तर नाही. मग मी गोंधळले. तिला इंग्लिश येत नव्हते. पण तिला मला काहीतरी सांगायचे होते, हे नक्की. मग तिने बाजूच्याच फलाफल जॉर्जमधील, इंग्लिश बोलणाऱ्या एका मुलीला बोलावले आणि माझ्याशी बोलायला सांगितले. ती मुलगी मला विचारते, ''आर यू टर्किश?'' मी नाही म्हणाले आणि भारतीय असल्याचे सांगितले. पण पुढे काही बोलायच्या आता त्या मुलीच्या काउंटरला खूप गिऱ्हाईक असल्याने तिला परत जायला लागले. शेवटी मी कंटाळून निघणार, तेवढयात त्या अरब मुलीने माझ्याकडे पाहून ''फेसबुक? फेसबुक?'' असे विचारले. मी ''हो'' म्हणून मान डोलावली. मग तिने लगेच आत जाऊन तिचा फोन आणला आणि मला फेसबुकवर एक फोटो दाखवला. एका हिंदी सिरियलमधला दोन मुलींचा फोटो असावा. त्यातली स्वरा नाव असलेले कॅरेक्टर रंगवणारी एक अभिनेत्री... माझा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्यासारखा दिसतो, असे तिला म्हणायचे होते, हे मला शेवटी एकदाचे समजले. प्रश्न असा की मी मालिका पाहत नसल्याने ती नक्की कोणत्या मालिकेबद्दल बोलत होती, ते मला समजले नाही. हा असला परदेशातला पहिलाच पण अतिशय अनपेक्षित अनुभव होता. एकमेकांची भाषा अजिबात समजत नसतना एका टीव्ही मालिकेमुळे त्या मुलीला माझ्याशी काही बोलावे असे वाटले, सांगावे असे वाटले. मला गंमत आणि आश्चर्य वाटले की त्या अरब मुलीला हिंदी भाषा समजत नसली, तरी ती नक्कीच झी-टीव्हीवरच्या हिंदी मालिका बघत असणार. त्यातून तिलाच काय, जितके लोक ह्या मालिका, सिनेमे पाहत असतील, त्यांच्यापर्यंत भारतीय संस्कृती (जर व्यवस्थित दाखवली तर) पोहोचत असणार. किती प्रभावी माध्यम आहे हे मालिकांचे... सांस्कृतिक, धार्मिक सगळे अडथळे पार करून जगाच्या पाठीवर कोणाच्याही मनाला थेट भिडते.
वादी निसनास हे हैफामधील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. तिथे लोकांनी अगदी काही वर्षांपूर्वी तयार केलेली भित्तिकला आहे. काही वैशिष्टयपूर्ण रस्ते आणि जिने आहेत. अरब मार्केट्समध्ये सगळया गोष्टी घाऊक भावात आणि स्वस्त मिळतात. तिथून जवळच माई-मार्केट हे एक सुपर मार्केट आहे. हदारमधील रस्त्यांवर फलाफलची छोटी दुकाने दिसतात. फलाफल मिळतात त्या दुकानांच्या बाहेर लोक उभे राहूनच फलाफलची मजा घेत असतात. तसेच बकलावा ही खास अरब मिठाई मिळण्याची दुकानेही या ठिकाणी आहेत. जागोजागी लोकांना बसण्यासाठी दगडी आणि लाकडी बाकडी ठेवलेली आहेत. याच रस्त्यांवरून जाताना मधूनच हुक्के मिळण्याची मोठमोठी दुकाने, तसेच हुक्का पार्लर्सही दिसतात. सगळीकडे मध्य-आशियाई आणि युरोपियन संस्कृतीचा संगमच दिसून येतो. हर्टझलवरून पायऱ्यांनी खाली उतरले की तालपीयाद मार्केट लागते. इथल्या मंडईत तर अगदी आपल्याकडच्या महात्मा फुले मंडईत गेल्यासारखेच वाटते. आपल्याकडे मंडईत कसे भाजीवाले ओरडत असतात, तसेच तिथेही मार्केटमध्ये भाजीवाले ओरडत असतात. सगळयाच गोष्टी घाऊकमध्ये, त्यामुळे स्वस्तात मिळतात. तालपियाद मार्केटमध्ये इथियोपियन वस्तूंची खूप दुकाने दिसतात. इथेच ड्रायफ्रूट्सचे ओपन मार्केट आहे. विविध ड्रायफ्रूट्सचे ढीगच्या ढीग लावलेले असतात आणि किलोच्या भावाने विक्री चालू असते. इथे या दुकानांमध्ये चॉकलेट्सचीसुध्दा घाऊक भावाने विक्री होते. सगळीकडे विविध प्रकारच्या चॉकलेट्सचे आणि कँडीजचेदेखील ढीग आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नातील चॉकलेटचा बंगला इथे प्रत्यक्षात बनवला जाऊ शकतो, इतक्या विविध प्रकारची चॉकलेट्स, गोळया यांचे ढिगारे असतात. ही इस्रायली अरब मार्केटची खासियत आहे. तालपियाद मार्केटपासून वर हर्टझल स्ट्रीटला चढून आले की अल्ट्रा-ऑॅर्थोडॉक्स ज्यूंचा भाग चालू होतो. तिथे सगळीकडे काळे लांबलचक कोट घातलेले, काळी मोठी टोपी आणि कानाच्यापाशी रुळणारे केसांचे पीळ, भली मोठी दाढी, काहींच्या डोक्यावर काळया यमुल्का, काही नुसतेच दोऱ्या लोंबणारे पांढरे सदरे घातलेले पुरुष, तसेच अशाच वेषातील छोटी मुले, पायघोळ स्कर्ट घातलेल्या आणि डोक्याला विशिष्ट प्रकारचे कापड गुंडाळलेल्या किंवा केस पूर्ण झाकणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या टोप्या घातलेल्या स्त्रिया दिसतात. हेच गेऊला नेबरहुड.
गेऊलापासून पुढे चढण चढत वर गेले की रूपिन भाग लागतो. खाली दरीत ग्रँड कॅनिऑॅन हा सहा मजली मॉल दिसतो. हैफा शहर हे माउंट कार्मेलच्या पर्वतरांगांमध्येच वसलेले आहे. त्यामुळे त्या शहराची रचना हीच चढ-उताराची आहे. हिब्रू भाषेत 'हार' म्हणजे पर्वताचे शिखर आणि 'हॉफ' म्हणजे समुद्रकिनारा. हैफा युनिव्हर्सिटीकडील भाग हार कार्मेलमध्ये मोडतो, तर हॉफ कार्मेल म्हणजेच भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याचा भाग. हदार नेमके हार कार्मेल आणि हॉफ कार्मेल यांच्या मध्येच येते. हदारमधून पुढे आणखी खाली गेले की हैफामधील सर्वात जुना भाग जर्मन कॉलनी येते. जर्मन कॉलनीत अधिकाधिक वास्तव्य ख्रिश्चन लोकांचे आहे. बरीच वेगवेगळी चर्चेसदेखील या भागात आहेत. तिथून पुढे गेले की हैफामधील अतिशय महत्त्वाचा भाग - 'बेन-गुरिअन स्ट्रीट' लागतो. या बेन गुरियन स्ट्रीटवर खूप हॉटेल्स आणि पर्यटक मार्गदर्शन केंद्रेदेखील आहेत. बेन गुरियन स्ट्रीट म्हणजे हैफामधील एमजी रोड. इथूनच पुढे हायफा पोर्ट, तसेच बाट-गालीम समुद्रकिनाऱ्याकडे आणि स्टेला मारीस टेकडीकडे जाता येते. हदार भागामध्ये खूप जुनी चर्चेस आणि बंद पडलेली सिनेगॉग्ज आहेत. 1948 साली झालेल्या हायफा बॅटलच्या साक्षीदार यातील अनेक इमारती आहेत. काही इमारतींवर तोफगोळे पडल्याची चिन्हेदेखील दिसतात. गेऊला आणि हदार यांच्यामध्ये मसादा स्ट्रीट लागते. हे बोहेमियन तसेच आर्टिस्टिीक लोकांचं नेबरहुड आहे. इथे बरीच जुनी पब्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. मसादा स्ट्रीटवर सगळीकडे भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत. हैफामध्ये अशा प्रकारे चढ-उताराची भौगोलिक स्थिती असल्याने विविध भागांत ये-जा करण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. त्या पायऱ्यांना वेगवेगळी नावे आहेत. मसादा स्ट्रीटवरच अशाच एका ज्युईश डच तत्त्वज्ञाच्या नावाच्या 'स्पिनोझा स्टेअर्स' आहेत. हदारमधील अनेक गल्ल्यांमध्ये फिरताना आपण एका प्राचीन पार्श्वभूमी असलेल्या शहरात फिरतो आहोत याची जाणीव कायम होत असते. तिथेही इमारतींचे नूतनीकरण करून त्यांचा वापर वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. काही ठिकाणे थोडीशी डागडुजी करून राहण्यायोग्य होतात, तर काही इमारतींना जमीनदोस्त करूनच तिथे नवीन इमारत बांधणे असा व्याप चालू आहे. त्यातही जिथे जिथे घराच्या आसपास असलेल्या बागांमध्ये संत्री, सफरचंदे, पेरू, बदाम, खजूर अशा फळांनी लगडलेली वृक्षराजी दिसते. विशेष म्हणजे रस्त्यावरून सहज तोडता येत असली, तरी तिथे ही फळे झाडावरच टिकलेली असतात. कोणी चोरून नेत नाहीत. हदारमधून फिरत असताना आपल्याला अरब संस्कृतीचे दर्शन होतेच आणि हैफाच्या इतर भागातून फिरताना ज्यू संस्कृतीचे दर्शन होते.
aparnalalingkar@gmail.com