भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे
मुलतानचे जुने नाव होते कश्यपपूर. कश्यपपूरची हकीकत सुरू होते ती प्राचीन काळातील कश्यप ॠषींपासून. कश्यप ॠषींचा एक मुलगा होता हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू या प्रांताचा राजा होता. त्याची राजधानी होती कश्यपपूर. भागवत पुराणात आपल्या माहितीतली हिरण्यकश्यपूची कथा येते. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. तो सतत वासुदेवाचे नाव घेत असे. हिरण्यकश्यपूने आपल्या वैऱ्याची भक्ती करणाऱ्या प्रल्हादाला मारायचे अनेक प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळी भक्तकैवारी विष्णूने प्रल्हादाला जीवघेण्या संकटातून वाचवले. सरतेशेवटी विष्णू नरसिंहाचे रूप धारण करून स्तंभातून प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूचा वध केला.
सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/
भक्तराज प्रल्हादाने आपल्या राजप्रासादात नरसिंहाचे मंदिर बांधले असे सांगितले जाते. मुलतानचे प्रल्हादपुरी नरसिंह मंदिर प्रसिध्द होते. अगदी परवापरवापर्यंत या मंदिरात पूजाअर्चा चालत असे. फाळणीनंतर येथील पुजाऱ्यांनी मंदिरातील मूळ नरसिंह मूर्ती हरिद्वारला नेली. आज मुलतानच्या किल्ल्यात नरसिंह मंदिराचे भग्न अवशेष पाहायला मिळतात.
मुलतानचे आणखी एक मंदिर प्रचंड लोकप्रिय होते. सूर्याचे आदित्य मंदिर. या मंदिराची गोष्ट कृष्णाशी जोडलेली आहे. कृष्ण आणि जांबुवती यांचा मुलगा सांब. या सांबाला एकदा महारोग झाला. त्या रोगाच्या निवारणार्थ त्याने सूर्याची उपासना आरंभली. मित्राच्या अर्थात सूर्याच्या वनात, मैत्रवन येथे त्याने बारा वर्षे उग्र तपश्चर्या केली. तेव्हा सूर्यदेवाने प्रसन्न होऊन सांबला रोगमुक्त केले. अत्यंत आनंदित झालेल्या सांबने कश्यपपूर येथे सूर्याचे 'आदित्य मंदिर' बांधले. पुढे कश्यपपूर नगराचे नाव 'सूर्याचे मूळ स्थान' यावरून 'मूलस्थान' आणि नंतर 'मुलतान' असे झाले.
वैदिक काळात मित्र, वरुण, अग्नी, इंद्र आदी देवतांची उपासना केली जात होती. या देवतांना यज्ञात हवी देऊन पूजत असत. मंदिर/चैत्य बांधले असले, तरी देवतांची मूर्ती स्थापन करायची पध्दत प्रचलित नसावी. त्यामुळे सांबने बांधलेल्या आदित्य मंदिरात सूर्याची मूर्ती आली ती पर्शियामधून. पर्शियन सूर्योपासकांनी प्रेमाने व भक्तीने सूर्याला, म्हणजेच मित्राला मानवी रूप दिले होते. पर्शियामधील मित्राच्या पुजाऱ्यांना पाचारण करून मुलतानच्या आदित्य मंदिरात सूर्यमूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. भारतात पर्शियाचे मित्रपूजक मॅगा बरीच शतके सूर्याची प्रतिष्ठापना करत असत. मॅगांच्या पर्शियन प्रभावाने सूर्यमूर्तींनी पर्शियन झगा, कमरेला कुस्ती - म्हणजे पारसी जानवे व पायात उंच बूट घातलेले दिसतात! अनेक वर्षे भारतातील सूर्यदेव सुटाबुटात हिंडला! नंतरच्या काळात सूर्यमूर्तीवर भारतीय संस्कार झाले, तेव्हा सूर्यमूर्तीचे सूट-बूट गेले आणि दोनऐवजी चार हात आले.
मुलतानचे सूर्यभक्त दर रथसप्तमीला रथोत्सव साजरा करीत असत. सूर्याची प्रतिमा सात घोडयांच्या रथातून मिरवत नेत असत. या उत्सवाचे वर्णन सांब पुराणात आहे, तसेच 11व्या शतकातील अल-बरुनीनेदेखील या यात्रेचे वर्णन केले आहे.
सातव्या शतकात शवान झांग या चिनी यात्रेकरूने आदित्य मंदिराबद्दल भरभरून लिहिले आहे. येथील डोळे दिपवणारी, सूर्याची रत्नजडित सुवर्णमूर्ती, मंदिराला भेट देणारे देशोदेशीचे सूर्यभक्त यांचा तो उल्लेख करतो. दहाव्या शतकात आलेल्या अबू झैदने लिहिले आहे की, सूर्यभक्त अनेक महिने प्रवास करून या मंदिरात येत असत. तर अबू इशाकने लिहिले आहे की भक्त लोक सूर्याला सोने अर्पण करत असत. आज आपण जसे तिरुपतीच्या मंदिराचे वैभव पाहतो, तसे वैभव आदित्य मंदिराने कैक शतके मिरवले.
आठव्या शतकात मुहम्मद बिन कासीमने, तर 11व्या शतकात मुहम्मद गझनवीने सूर्य मंदिर व नरसिंह मंदिर लुटले. नंतरच्या काळात मुलतानमध्ये राज्य करणाऱ्या अरबांनी बरीच वर्षे सूर्याची मूर्ती ओलीस धरली होती. हिंदू राजाने मुलतानवर आक्रमण केले की, ही मूर्ती तोडू अशी धमकी देऊन त्यांनी मुलतानची सत्ता राखली. पुढे गझनवी, घुरी, तुघलक, तैमूर आणि मुघल यांनी मुलतानवर राज्य केले. एकोणिसाव्या शतकात जेव्हा महाराजा रणजितसिंगने मुलतान ताब्यात घेतले, तेव्हा त्याला नावालासुध्दा सूर्य मंदिर सापडले नाही.
या आदित्य मंदिरासाठी प्राण वेचणाऱ्यांमध्ये आणि सूर्योपासना करणाऱ्यांमध्ये आजच्या पाकिस्तानी लोकांचे पूर्वज होते. आपले पूर्वज कोण होते, त्यांचे कार्य काय, आपला वारसा काय आणि आपण कोण आहोत हे विचार कधीतरी पाकिस्तानी मनाला खुपतील. त्या वेळी अशा आदित्य मंदिरांच्या कथा एक नवीन वळण घेतील, यात शंकाच नाही.