राष्ट्रभानाची अटल प्रभा

25 Aug 2018 14:28:00

संघस्वयंसेवकाचे ध्येय काय असते? व्यवहार काय असतो? या प्रश्नांची उत्तरे अटलजींच्या जीवनात पाहावयास मिळतात. सहज स्नेहशील स्वभावाने त्यांनी अनेकांना जोडले आणि त्यांच्या भावविश्वात 'राष्ट्र प्रथम' या संकल्पनेचे सहजतेने बीजारोपण केले. यांची ठळक उदाहरणे म्हणजे दिल्लीच्या श्रध्दांजली सभेत फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांनी केलेली भाषणे होत. या व्यक्ती अटलजी ज्या संघकुळाचा अभिमान धरतात त्यापैकी नाहीत. त्या अटलजींच्या पक्षाच्या विरोधी गटातील आहेत. पण त्यांच्याशी अटलजींचा राजकारणापलीकडचा स्नेह होता आणि राष्ट्रहिताशी संबंधित विषयांवर सर्वांचे समान मत निर्माण करण्यात अटलजी यशस्वी झाले होते.

जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मृत्यूचा सामना करावा लागतो. मग तो मनुष्य असो अगर या विश्वातील  कोणताही जीवजंतू, त्याला मरण चुकत नाही. मरणानंतरही जे अमर होतात, अटल होतात, ते आपल्या आयुष्यात कसे जगले हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय होतो. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे आमच्या पिढीसाठी असेच अभ्यासाचा, चिंतनाचा विषय आहेत, हे दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेने दाखवून दिले आहे. 16 ऑॅगस्ट 2018 रोजी अटलजींनी या जगाचा निरोप घेतला. 17 तारखेला त्यांचा देह पंचतत्त्वात विलीन झाला. या दोन दिवसात अटलजींच्या स्मृती जागवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. जगभरात त्यांच्या निधनाचे पडसाद उमटले. मलेशिया या देशाने आपला राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून अटलजींना मानवंदना दिली. सायबर टॉवरला अटलजींचे नाव देऊन यथोचित सन्मान केला. भारताचे माजी पंतप्रधान म्हणून त्यांना हा सन्मान मिळणे स्वाभाविकच होते. आपल्या देशातही अशाच प्रकारे विविध माध्यमांतून अटलजींच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर 21 तारखेला अटलजींना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी एक सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''अटलजी आयुष्यभर देशासाठी, देशवासीयांसाठी जगले. आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक आहे.''

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत म्हणाले की, ''अटलजी ज्या क्षेत्रात होते, त्या क्षेत्राचा आता वटवृक्ष झाला आहे. विपरीत परिस्थितीत त्यांनी कामाला सुरुवात केली. माझ्या तरुणपणी मी त्यांची खूप भाषणे ऐकली. सरकार्यवाह असताना त्यांना अनेक वेळा भेटलो. अटलजींचे कर्तृत्व सर्वज्ञात आहे. इतके मोठे व्यक्तित्व, तरीही सर्वांप्रती प्रेमभावना, संघर्ष हीच ओळख असणाऱ्या राजकारणात प्रदीर्घ काळ असूनही सर्वांशी मैत्री, देशाच्या सर्वोच्च पदी पोहोचूनही  विनम्रता, सर्वसामान्य माणसाविषयी असणारी संवेदनशीलता ही त्यांची गुणवैशिष्टये होती. संघाचा एक स्वयंसेवक सार्वजनिक जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात गेला, तर तो कसा वागेल याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे अटलजी होत. आपल्या ध्येयपथावर अविचल राहून प्रवास करणारे, सर्वांना मित्र करणारे अटलजी होते. अटलजींचे शब्द आणि जीवन यांच्यात एकरूपता होती.''

अटलजींचे सहकारी आणि जनसंघ ते भाजपा अशी प्रदीर्घ वाटचाल ज्यांच्यासह केली, त्या लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितले की, ''आमची 65 वर्षांची मैत्री होती. संघकार्य आणि राजकारण याच्या व्यतिरिक्त आम्ही एकत्र चित्रपट पाहायचो, पुस्तके वाचायचो, त्यावर चर्चा करायचो. मला राजकारणाचे धडे देणाऱ्यांमध्ये अटलजी सर्वात आघाडीवर आहेत. मी आज जो काही आहे तो अटलजींमुळेच आहे.'' अटलजींच्या स्वयंसेवकत्वासंदर्भातही त्यांनी विचार मांडले. अटलजी स्वत:ला संघकुळाचा असल्याबाबत धन्य मानत असत. त्याच संघकुळाची ध्वजा मोदी, भागवत आणि अडवाणी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे या तिघांच्याही भाषणाचा केंद्रबिंदू अटलजी आणि भारतमाता असाच असणार, हे स्वाभाविक होते. 'राष्ट्र प्रथम' हा भाव प्रत्येक व्यक्तीच्या मनात जागला पाहिजे आणि त्यांची योग्य पध्दतीने अभिव्यक्ती झाली पाहिजे, ही संघाची अपेक्षा प्रत्येक स्वयंसेवक आपापल्या क्षेत्रात साकार करण्याचा प्रयत्न करत असतो. अटलजी राजकीय क्षेत्रातील संघस्वयंसेवक होते. जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास झाला होता आणि या प्रवासात त्यांनी संघाशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. संघसंस्कार कधी विसरले नाहीत. अटलजींचे राजकारणातील मित्र त्यांना म्हणत, ''तुम्ही चांगले आहात पण तुमची विचारधारा चांगली नाही.'' त्यावर अटलजींचे उत्तर असे, ''ज्या अर्थी फळ चांगले आहे, त्या अर्थी झाडही उत्तम असणार हे तुम्ही समजून घ्या.''

दीर्घकाळ राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक पक्ष, अनेक नेते यांच्याशी अटलजींचा संबंध आला. त्यांच्याशी मतभेद झाले, पण मनभेद होणार नाहीत यांची त्यांनी कायम काळजी  घेतली. राजकारणापलीकडची मैत्री आणि या मैत्रीतून राष्ट्रहिताचा विषय अधिक सघन करण्यावर अटलजींनी भर दिला. आपली वाणी, आपला व्यवहार यातून त्यांनी स्वयंसेवकत्व जपले.

संघस्वयंसेवकाचे ध्येय काय असते? व्यवहार काय असतो? या प्रश्नांची उत्तरे अटलजींच्या जीवनात पाहावयास मिळतात. सहज स्नेहशील स्वभावाने त्यांनी अनेकांना जोडले आणि त्यांच्या भावविश्वात 'राष्ट्र प्रथम' या संकल्पनेचे सहजतेने बीजारोपण केले. यांची ठळक उदाहरणे म्हणजे दिल्लीच्या श्रध्दांजली सभेत फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांनी केलेली भाषणे होत. या व्यक्ती अटलजी ज्या संघकुळाचा अभिमान धरतात त्यापैकी नाहीत. त्या अटलजींच्या पक्षाच्या विरोधी गटातील आहेत. पण या त्यांच्याशी अटलजींचा राजकारणापलीकडचा स्नेह होता आणि राष्ट्रहिताशी संबंधित विषयांवर सर्वांचे समान मत निर्माण करण्यात अटलजी यशस्वी झाले होते. आपल्या भाषणात फारूख अब्दुल्ला म्हणाले, ''माझ्या देशवासीयांनो, आज आपण येथे अटलजींचे स्मरण करण आहोत. आज ते पंतप्रधान नाहीत, पण लाखो हृदयाचे मालक आहेत. त्यांनी हिंदुस्थानच्या लाखो लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ते स्थान ताकदीच्या जोरावर नाही, तर प्रेमामुळे निर्माण झाले होते. त्यांच्या प्रेमात खूप मोठी ताकद होती. त्यांचे हृदय विशाल होते. ते कुणात भेदभाव करत नसत. तू छोटा, मी मोठा अशी त्यांची दृष्टी नव्हती. धर्म, प्रांत यांच्याशी त्यांना काही घेणे-देणे नव्हते. ते जाणून होते की, या देशाचे उत्थान करायचे असेल तर आपण सर्वांनी मिळून ते केले पाहिजे. मला आठवते, जेव्हा कारगिलची लढाई झाली तेव्हा ते बॉर्डरवर गेले होते. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना बॉर्डरवर न जाण्याचा सल्ला दिला होता. पण तरीही ते गेले. आजूबाजूला गोळीबार चालू होता. ते म्हणाले होते, ''भारताला कोणी हरवू शकत नाही; आम्हाला पराजित करू शकेल अशी ताकद अजून निर्माण झाली नाही'' असे त्यांच्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे हात हालवत हसत अटलजी बोलले होते. कारगिलच्या पहाडाकडे हात करत ते म्हणाले, ''तुम्ही जी चूक केलीत त्याचा तुम्हाला पश्चात्ताप होईल.'' ते ठाम होते, अटल होते. ते म्हणत, ''हा देश तुझाही आहे, माझाही आहे, आपला सर्वांचा आहे. आपण सर्वांनी मिळून त्याची उभारणी करायची आहे. हृदयाला हृदय जोडून देश उभा करायचा आहे. त्याशिवाय देश उभा राहणार नाही.'' असे समजू नका अटलजी येथे नाहीत, त्यांचा आत्मा आपल्यासोबत आहे. ते आपल्याकडे पाहत आहेत की आपण त्यांचे हे स्वप्न पूर्ण करतोय का? जेव्हा पोखरण झाले तेव्हा आम्ही त्या विस्फोटस्थानी अटलजींसोबत गेलो होतो. मी अटलजींना विचारले, ''हे कशासाठी?'' तेव्हा त्यांनी सांगितले होते, ''त्याचा गैरवापर आपण करणार नाही, पण दुनियेला आज हे सांगण्याची गरज आहे की, आमच्याकडे ताकद आहे. आम्ही मुकाबला करू शकतो.'' भारतवासीयांना जर अटलजींच्या स्मृती चिरंतन ठेवायच्या असतील, तर त्यांच्या संकल्पनेतील देश उभा करा, जो मैत्रिभावाने परिपूर्ण असेल. सगळे जग त्यासाठी भारताकडे येईल. या भूमीत अटलजी निर्माण झाले. अल्लाला एकच प्रार्थना करतो की जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत अटलजींनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याची ताकद मला मिळो. माझ्याबरोबर घोषणा द्या, बंधूंनो, भारत माता की जय!'' फारूख अब्दुल्लांनी 'भारत माता की जय', 'जय हिंद' अशा घोषणा देऊन आपल्या भाषणाचा शेवट केला. त्या वेळी ते खूपच भावविवश झाले होते.

मेहबूबा मुफ्ती यांनीही अटलजींच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ''अटलजी हे खूप विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. जम्मू काश्मीरच्या लोकांच्या दृष्टीने अटलजी देवदूत होते. ते असे पंतप्रधान होते, नेते होते, ज्यांनी काश्मिरी जनतेच्या भावना समजून घेतल्या. त्यांनी काश्मिरी जनतेवर विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वास जिंकला. ही सोपी गोष्ट नाही. सर्वसाधारणपणे काश्मिरी जनतेबाबत खूप मोठया प्रमाणात गैरसमज होते, पण अटलजींनी आपल्या कारकिर्दीत त्यात बदल घडवला आणि काश्मिरी जनतेला देशाशी जोडले.

2002 साली काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर झाल्या. त्या वेळी अटलजींची मुफ्तीजींशी भेट झाली. त्यांनी विचारले, ''काय म्हणतात काश्मिरी लोक?'' ''ते म्हणतात, दिल्लीने काय निर्णय घेतला आहे?'' ''म्हणजे?'' अटलजीनी विचारले. तेव्हा त्याला उत्तर देताना मुफ्तीजी म्हणाले, ''दिल्लीने काय निर्णय घेतला आहे, कोणत्या जमातीचा मुख्यमंत्री बनवला जाणार आहे?'' या संवादानंतर अटलजीनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली, ''काश्मीरमध्ये निवडणुका मुक्त वातावरणात होतील.''  निवडणुका झाल्या. काश्मीरमध्ये पहिल्यांदा जनतेच्या पसंतीचे  सरकार आले. अटलजींनी काश्मिरी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले. अटलजींची दुसरी आठवण त्या काळातली आहे, जेव्हा पीडीपी आणि काँग्रेस यांचे सरकार काश्मीरमध्ये अस्तित्वात आले होते. मुफ्तीजी पाकिस्तानचा विषय घेऊन अटलजींना भेटले. काश्मीरचा प्रश्न मानवतेच्या मुद्दयावर सोडवण्यावर त्यांचा भर होता. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ते लाहोरला गेले. अटलजींचे व्यक्तित्व असे प्रभावी होते की, पाकिस्तानच्या लष्करशहालाही मान्य करावे लागले की युनोत झालेला भारत-पाक करार हा कालसुसंगत नाही. तो सोडून देऊन नव्याने विचार करायला हवा. हा होता अटलजींचा प्रभाव. हे होते त्यांच्या स्वभावाचे वैशिष्टय. त्यांनी आम्हाला एक मार्ग दिला आहे. आपण दोस्त बदलू शकतो, शेजारी आपण बदलू शकत नाही. सर्व प्रकारच्या समस्या मानवतेच्या मार्गाने सोडवण्यासाठी त्यांनी दिशा दिली. अटलजींच्या आठवणीने प्रत्येक काश्मिरी आज रडतो आहे. अटलजी भलेही भाजपाचे नेते असतील, पण ते आम्हा सर्वांचे पंतप्रधान होते. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आपण सर्वांनी जाणे हीच त्यांना खरी श्रध्दाजंली असणार आहे.'' राजकारणापलीकडचे पण राष्ट्र प्रथम मानणाऱ्या अटलजी यांचे शब्दचित्र मेहबूबा मुफ्ती यांच्या भाषणातून साकार झाले.

 माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एका खासगी वाहिनीला अटलजींविषयी श्रध्दांजलीपर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ''अटलजी त्यांच्या प्रज्ञा, संयम आणि व्यवहारचातुर्य यासाठी ओळखले जातात. विदेशी नेत्यांशी संवाद साधण्याची त्यांची एक वेगळीच शैली होती. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा ते पहिल्या एनडीए सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते, त्या वेळचा एक किस्सा मला आठवतोय. 1977-78मधली घटना आहे. मी यूएईमध्ये राजदूत होतो. त्या वेळी ते काही कारणास्तव यूएई दौऱ्यावर आले होते. पण जेव्हा ते तेथील नेत्यांशी बोलत होते, तेव्हा त्यांनी एका समस्येवर वेगळयाच पध्दतीने मार्ग काढला. त्यावेळी ते म्हणाले, ''आमच्या देशात संपत्ती म्हणजे हातावरचा मळ असते. त्यामुळे आपण ती धुऊन टाकली पाहिजे.'' समोरची व्यक्तीही संस्कृतिप्रिय होती. त्या व्यक्तीने प्रतिक्रिया देताना म्हटले, ''आमच्या संस्कृतीत याबाबत अधिक योग्य प्रकारे बोलले जाते की, संपत्ती ही बोटीतील पाण्यासारखी असते. ती जर काढून टाकली नाही, तर बोट बुडते.'' त्यानंतर त्यांच्यामध्ये खूपच चांगला संवाद झाला. कोणालाही चांगल्या प्रकारे कळतील असे दृष्टान्त देत संवाद साधण्याची त्यांची शैली होती. पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. ही त्यांच्या अजोड संवादकौशल्याला दिलेली सगळयात मोठी दाद होती. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व दुर्मीळ असते.'' 

अटलजींच्या श्रध्दांजली सभेत अनेक क्षेत्रांतील मान्यवरांच्या बोलण्यातून अटलजींच्या जीवनातील अनेक प्रसंग, त्यांची स्वभाववैशिष्टये पुन्हा समोर आली. अटलजींचे जीवन राष्ट्रसमर्पित होते, राष्ट्र हा त्यांचा ध्यास आणि श्वास होता. फारूख अब्दुला, मेहबूबा मुफ्ती आणि हमीद अन्सारी यांनी त्याच ध्यासाचा, श्वासाचा घेतलेला अनुभव आपल्या भाषणातून मांडला असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अटलजींच्या ध्यासात आणि श्वासात राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण झाले ते संघसंस्कारात. संघाच्या शाखेत मिळालेली ही शिदोरी त्यांनी आयुष्यभर जपली, स्वत:ला त्या शिदोरीवर परिपुष्ट केलेच, तसेच आपल्याबरोबर अनेकांना त्या शिदोरीची लाभ दिला.

9594961860

Powered By Sangraha 9.0