इस्राएल छळाकडून बळाकडे

20 Aug 2018 16:22:00

राष्ट्रप्रेमाने ओथंबलेला एक प्रेरणादायक प्रवास!!

नाना पालकर हे त्यांच्या संघसमर्पित सेवाकार्यासाठी ओळखले जातात, पण त्यांनी अनेक विषयांवर अभ्यासू लेखनही केले. 'इस्राएल छळाकडून बळाकडे' हे पुस्तक त्यांच्या अशाच अभ्यासू लेखनाचे उदाहरण आहे. राष्ट्रप्रेम हाच ज्या राष्ट्राचा आत्मा आहे, अशा या इस्रायलचा निर्मितीप्रवास नानांनी या पुस्तकात कशा प्रकारे मांडला, हे उलगडून सांगणारा लेख.

नाना पालकरांनी 1966 साली इस्रायलवर लिहिलेले 'इस्राएल छळाकडून बळाकडे' हे पुस्तक म्हणजे राष्ट्रप्रेमाने ओथंबलेला एक प्रेरणादायक प्रवासच आहे. नानांनी ज्यू लोकांचा आद्यपुरुष अब्राहम याच्यापासून आधुनिक इस्रायलचा राष्ट्राध्यक्ष डॉ. हाइम वाइझमनपर्यंतच्या 4000 वर्षांच्या रक्तरंजित प्रवासाची, संघटित शौर्याची आणि साहसी पुनरुत्थानाची कहाणी एकूण सतरा प्रकरणांत अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे.

सुरुवातीच्या पाच प्रकरणांत ज्यू धर्माच्या स्थापनेपासून ते ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर ज्यू लोकांचे पॅलेस्टाइनमधून झालेले पलायन हा जवळजवळ 2020 वर्षांचा इतिहास दिलेला आहे. त्यापुढील पाच प्रकरणांत ज्यूंचा इतरत्र कशा प्रकारे छळ झाला, याचा अतिशय वेदनेने भरलेला इतिहास आहे. प्रकरण दहा ते प्रकरण पंधरामध्ये ज्यूंच्या इंग्रजांशी, तसेच इतर युरोपातील आणि अरब शक्तींशी संघर्षाची कहाणी दिलेली आहे. प्रकरण सोळा व सतरामध्ये ज्यू लोकांची शौर्यगाथा, साहसी वृत्ती, अतोनात देशभक्ती याचे वर्णन आहे. पुस्तक वाचताना असे कुठेही जाणवत नाही की नानांनी इस्रायलला कधीच प्रत्यक्ष भेट दिलेली नाही. सगळे तपशील अत्यंत अचूकपणे आणि अभ्यासाने मांडल्यामुळेच हे शक्य झालेय. त्या काळात हे पुस्तक इतके लोकप्रिय झाले की आत्तापर्यंत त्याच्या सात आवृत्त्या निघालेल्या आहेत. नेमके 1967 सालीच नाना स्वर्गवासी झाल्याने त्यांना आपल्या या पुस्तकाचे इतके भरघोस यश पाहण्याचे भाग्य लाभले नाही.

'दुधामधाचा देश' या पहिल्याच प्रकरणात त्यांनी सध्याचे इस्रायल आणि पूर्वीचे पॅलेस्टाइन या दोन्हीचे यथासांग वर्णन केलेले आहे. त्यांचे भौगोलिक स्थान, परिसरातील समुद्र (भूमध्य समुद्र, लाल समुद्र), तळी-सरोवरे (मृत समुद्र, गॅलेलीचा समुद्र), नद्या (जॉर्डन नदी), हवामान, शेतीची उत्पादने, वनसंपदा (पाईन वृक्ष, टॅमारिस्क, कॅरोब, ऑॅलिव्ह, खजूर), वाळवंटी प्रदेश (नेगेव्हचे वाळवंट, सिनाई वाळवंट), पर्वतराजी (माउंट हारमोन, झिऑॅन टेकडी, माउट सिनाई), पठारी प्रदेश (गॅलेली, समारिया, ज्युडिआ), दऱ्या-खोरी (जॉर्डनचे खोरे, जेझ्राईल दरी) अशी सर्व माहिती आपल्याला तपशिलात मिळते. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष आणि मेहनतीशिवाय फळ नाही असे जरी असले, तरी त्याला ज्यू लोक 'दुधामधाचा प्रदेश' म्हणायचे, कारण त्याच्या तुलनेत आजूबाजूचा वाळवंटी प्रदेश आणि इजिप्तमध्ये त्यांनी भोगलेली प्रचंड गुलामगिरी. या सगळयाच्या तुलनेत पॅलेस्टाइनचा हा प्रदेश मेहनती ज्यू लोकांसाठी वरदानच. आजूबाजूच्या वाळवंटी प्रदेशाच्या तुलनेत उपलब्ध तळी ही एखाद्या समुद्रासारखीच भासतात, असा मार्मिक तर्क नानांनी मृत समुद्र आणि गॅलेलीचा समुद्र यांविषयी लिहिला आहे. इस्रायलची भाग्यरेषा जॉर्डन नदीच्या अत्यंत चिंचोळया पात्रामुळे तिचे वर्णन गमतीने 'एक पूर आलेला ओढा' असे करतात. मी हे सर्व प्रत्यक्ष पाहिलेले असल्याने नानांच्या प्रत्यक्षानुभूती देणाऱ्या सिध्दहस्त लेखनाचे आणि भाषासामर्थ्याचे दर्शनच घडते.

 'मोझेसचे जीवनकार्य' या द्वितीय प्रकरणात, अब्राहम या त्यांच्या मूळ पुरुषापासून ज्यू धर्माची सुरुवात कशी झाली याची माहिती दिली आहे. अरबांप्रमाणेच ज्यू हेदेखील सेमगोत्रीय म्हणजेच सेमाईट लोक होत. त्यामुळेच अरब आणि ज्यू दोन्ही लोकांमध्ये उंच बांधा आणि उठावदार नाक अशी शारीरिक ठेवण आढळते. त्यांची सुरुवात उत्तर अरबस्थानातून झाली. जीवनास स्थैर्य आणण्यासाठी त्यातीलच काही युफ्रेटिस आणि टायग्रिस नद्यांच्या खोऱ्यांत जाऊन राहिले आणि तिथे त्यांनी वैभवसंपन्न राज्य स्थापन केले. त्यालाच बॅबेलिऑॅन असे म्हणतात. पुढे त्यातीलच काही टोळया पॅलेस्टाइनच्या किनारपट्टीला येऊन राहिल्या. त्याच केननाईट आणि फिनीशियन किंवा फिलीस्तीन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आजच्या सीरियाला पूर्वी आराम म्हणत. तिथे काही सेमाईट टोळया स्थायिक झाल्या. त्यांना आरामाईट किंवा आरमेनियन म्हटले जाऊ लागले. यांनाच हिब्रू असे म्हणतात. त्यामुळे बॅबेलिऑॅनमधील लोक, कॅनेनाईट, फिलीस्तीन, अरब, आरामाईट आणि ज्यू हे सगळे एकाच वंशाचे लोक. यांनाच अब्राहमच्या इस्रायल या मुलाच्या नावावरून इस्रेलाइट किंवा आताच्या भाषेत इस्रायली असेही म्हणतात. हे लोक इजिप्तमध्ये जाऊन गुलाम झाले आणि नंतर त्या गुलामगिरीतून आणि मागासलेपणातून त्यांना मोझेसने दशादेश प्रचलित करून बाहेर काढले. हा सगळा अतिप्राचीन वंशवेलीचा इतिहास नानांनी फारच रंजक पध्दतीने मांडला आहे. 'राष्ट्रीयत्वाचा उदय' या तिसऱ्या प्रकरणात याच ज्यूंना पुढे मोझेसने पॅलेस्टाइन प्रदेशात शिरून तेथील फिलीस्तीनी आणि कॅनेनाईट लोकांचा पाडाव करून स्वत:ला प्रस्थापित करण्यास सांगितले. याच काळात त्यांच्यामध्ये ज्यू वंशाचे एक राष्ट्र अशी भावना उदयास आली. त्यातीलच मोझेसच्या कुळातील सॅम्युअल हा त्यांचा पहिला राजा झाला. त्यानंतर सॉल डेव्हिड आणि डेव्हिडपुत्र सॉलोमन यांनी अनुक्रमे ज्यू राष्ट्राचे नेतृत्व केले. याच काळात त्या प्रदेशात व्यापारात मोठी वाढ होऊन वैभवसंपन्नता आणि पक्की दगडी घरे उदयास आली. 'कलह नि घसरगुंडी' या चौथ्या प्रकरणात सॉलोमननंतर ज्यू राष्ट्रात जे कलह निर्माण झाले आणि त्यानंतर त्या राष्ट्राला उतरती कळा लागून ते पुन्हा पारतंत्र्यात फेकले गेले, याची कथा दिलेली आहे. या सर्व इतिहासात हे दिसून येते की पूर्वी ज्यू लोक हेदेखील मूर्तिपूजक होते. त्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या पूजा, बळीचे विधी वगैरे अस्तित्वात होते. पण नंतर त्यांना मूर्तिपूजा करावयाची नाही, परमेश्वराचे (येशोहाचे) नावदेखील उच्चारायचे नाही अशी तत्त्वे सांगितली गेली. या सगळयांच्या एकेश्वरवादाकडील प्रवासाची आणि सध्याच्या ज्यू, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या विचारसरणीतील साम्यस्थानांची जाणीव या प्रकरणातून होते. जेव्हा ज्यू लोकांचे राष्ट्र ऐन भरभराटीत होते, त्या वेळी स्थैर्य असलेल्या इतर राष्ट्रांप्रमाणेच तिथेदेखील विद्वान, धर्मगुरू, मुनी यांच्या वास्तव्यामुळे आणि राजांच्या पुढाकारामुळे ग्रंथसंपदांची निर्मिती हिब्रू भाषेत झाली. या प्रकरणातून एक लक्षात येते की ज्यूंच्या मंदिरांत भ्रष्टाचाराची वाढ झाल्याने ज्यू लोकांचे वैभव नष्ट होईल अशी भविष्यवाणी या ग्रंथांमधून आढळते, जी पुढे सत्य ठरलेली आहे. यातीलच एका धर्मग्रंथात असेही भाकीत आहे की या ज्यू राष्ट्राच्या अंताच्या वेळी एक मेसाया येईल आणि पॅलेस्टाइनमध्ये स्वर्गतुल्य, पुण्यप्रद, वैभवसंपन्न आणि शांतिमय ज्यू राष्ट्राची पुन्हा स्थापना होईल. 'ज्यूंचे विचारधन' या पाचव्या प्रकरणात हिब्रू भाषेचा उगम, तिची लिपी आणि त्यातील धार्मिक ग्रंथसंपदा यांची माहिती आहे. या प्रकरणात ज्यू विचारसरणी, त्यांच्या धार्मिक प्रथा, सण यांची बऱ्यांपैकी माहिती दिलेली आहे.

 

'छळ छळ नि छळ' या सहाव्या प्रकरणात ख्रिस्ताब्द 135मध्ये रोमन साम्राज्यांकडून पॅलेस्टाइनमधून ज्यूंची हाकालपट्टी झाल्यावर ते आपली ज्यू संस्कृती सांभाळत जगभरात पसरले, याचे वर्णन आहे. या विविध देशांतील ज्यूंच्या अस्तित्वामधून ज्यूंमध्ये विविधता पसरली. त्यात काळे ज्यू, गोरे ज्यू, ब्राउन (भारतीय उपखंडातील) ज्यू असे विविध प्रकारचे ज्यू निर्माण झाले. म्हणूनच आता ज्यू हा एक वंश न राहता तो एक गोतावळा बनलेला आहे. अशातच विविध देशांमध्ये - विशेषत: युरोपात आणि रशियामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्याने आणि येशूख्रिस्ताच्या मृत्यूस ज्यू धर्मगुरू कारणीभूत असल्याने सर्व ज्यू समाजाला वेठीस धरले जाऊ लागले. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही, किंबहुना त्यांचा अनन्वित छळ झाला. त्याची माहिती 'गेटोंच्या कोंडवाडयात' या सातव्या प्रकरणातून मिळते. विविध मार्गांनी साम, दाम, दंड आणि भेद वापरून ज्यूंना ख्रिस्ती धर्मप्रवेशासाठी भरीस घातले गेले. या ज्यू द्वेषातूनच युरोपातील देशांत ज्यूंसाठी कुंपणातील वसाहती, म्हणजेच गेटो तयार केले गेले. यातच सगळया ज्यूंना कोंडले जाऊ लागले. ख्रिस्ती प्रवचनांना उपस्थित राहणे त्यांना बंधनकारक असे. ज्यू लोकांनी ख्रिस्ती लोकांना दर वर्षी ठरावीक रक्कम दंड स्वरूपात द्यावी लागे. गेटोतील निर्वासितांना फक्त जुन्याच वस्तू वापरण्यास आणि विकत घेण्यास परवानगी असे. यामुळेच असेल, ज्यूंमध्ये अजूनही सेकंड हँड गोष्टी वापरण्याची पध्दत असावी. यात नानांनी ज्यू लोकांच्या स्वभाववैशिष्टयांचे आणि व्यक्तिविशेषाचे जे वर्णन केले आहे, त्याचा अनुभव मला स्वत:ला इस्रायलमध्ये असताना आलेला आहे. सेमवंशीय लोकांबध्दलचा टोकाचा द्वेषदेखील याच कालावधीत युरोपात पसरला. तशाही स्थितीत ज्यूंनी आपला धर्म, संस्कृती, परंपरा आणि भाषा यांचे जतन केले आणि झायनिस्ट चळवळीस सुरुवात झाली. युरोपातील ज्यू काही संख्येत पॅलेस्टाइन या मातृभूमीकडे वळले. एलिझर पर्लमन या वीस वर्षीय तरुणाने मार्सेलीसहून जाफाला जातानाच हिब्रू भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा विडा उचलला आणि मातृभूमीत पाऊल ठेवल्यावर आपले युरोपीय नाव बदलून 'बेन येहुदा' हे हिब्रू नाव धारण केले. डॉ. हाइम वाईजमन, बेन गुरिअन, आर्थर रुप्पीन अशा झायनिस्ट चळवळीतील धुरीणांनी इस्रायलच्या पुनःस्थापनेसाठी काय काय प्रयत्न केले, याचे यथासांग वर्णन नानांनी 'पीळ उलगडु लागतो', 'जागृतीची चाहूल', 'आई की दाई' या तीन प्रकरणांतून केले आहे. राष्ट्रभक्तीने भारलेले लोक जिथे काहीही आशा नाही अशा ठिकाणी कशा प्रकारे सर्व गोष्टींची बांधणी करून दूरदृष्टी बाळगून धोरणांची काटेकोर अंमलबजावणी कशी करतात, याचे जिवंत उदाहरणच या प्रकरणांतून पाहावयास मिळते. सध्याच्या इस्रायलमध्ये असलेल्या रस्त्यांची नावे, ठिकाणांची तसेच इमारतींची, शैक्षणिक संस्थांची नावे मला माहीत होती, पण त्यांचे सगळे संदर्भ मला नानांच्या या पुस्तकात मिळाले. ब्रिटिशांनी नेहमीप्रमाणे आपला स्वार्थ साधण्यासाठी ज्यू लोकांच्या स्वातंत्र्यप्रेमाचा आणि अरबांच्या आक्रमकतेचा फायदा घेऊन फोडा आणि राज्य करा या तत्त्वाचा वापर करून घेतला आणि अरब-ज्यू संघर्ष कायमच पेटता राहील अशी बेगमी करून ठेवली. याबाबत 'आई की दाई', 'बाल्फोर घोषणा', 'नगरांतून खेडयाकडे', 'कुटिलते तुझे नांव इंग्रज', 'हा तर प्रलय काळ' आणि 'फाळणीचा निर्णय' या प्रकरणांतून वाचावयास मिळते.

 बाल्फोर घोषणा झाली, त्या वेळी इंग्रजांचे ज्यूंशी संबंध चांगले होते. पण इंग्रजांच्या कुटिल प्रवृत्तीमुळे दुसरे महायुध्द संपायच्या काळापर्यंत हे संबंध इतके बिघडले की इंग्रजांनी अरबांना ज्यूंविरुध्द लढण्यासाठी मदत करावयास सुरुवात केली. 'स्वातंत्र्य संग्राम' या प्रकरणांत इंग्रज पॅलेस्टाइन सोडून जाताना अरबांनी पॅलेस्टाइन स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याआधीच अमेरिकन झायनिस्ट बांधवांच्या पाठिंब्याने त्या वेळच्या पॅलेस्टाइनमधील ज्यू क्रांतिकारकांनी कशा प्रकारे अरब आणि इंग्रज यांच्या हल्ल्यांना तोंड देत आपले स्वतंत्र राष्ट्र असल्याची घोषणा करून ताबडतोब त्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळविला. या सर्व रंजक कथा नानांनी अतिशय प्रभावीपणे मांडल्या आहेत. ते वाचताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. 'कर्तृत्वाची गरुडभरारी' या सतराव्या प्रकरणात नानांनी इस्रायलच्या स्थापनेनंतर ज्यू लोकांनी राष्ट्र उभारणीसाठी, शेतजमीन तयार करून ती सुपीक बनवण्यासाठी, आपल्या सीमांचे, ज्यू वसाहतींचे अरबांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या ज्यू बांधवांना कसे तयार केले, त्याचप्रमाणे इतर देशांतून येणाऱ्या ज्यू लोकांना सामावून घेण्यासाठी कशी उत्तम यंत्रणा तयार केली, याचे वर्णन वाचल्यावर राष्ट्र उभारणी करण्याची शास्त्रशुध्द पध्दतीच लक्षात येते. नानांची मराठी भाषा जरी हल्लीच्या पिढीला वाचायला जरा अवघड वाटली, तरी पहिल्या दोन प्रकरणांनंतर आपल्याला त्या भाषेची सवय होत जाते. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रभक्ताने पुन:पुन्हा वाचून या पुस्तकाची पारायणे करावीत, म्हणजे राष्ट्र उभारणीसाठीचे शास्त्र आत्मसात करता येईल, यात शंकाच नाही.

Powered By Sangraha 9.0