शं नो वरुण:

18 Aug 2018 13:29:00

सदराचे नाव : भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे

बृहत्तर भारतात आता वेगवेगळे देश, विविध वेश आणि वेगळे धर्म असले, तरी भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा दिसतात. आजही जेव्हा दूरच्या एखाद्या देशात कुठेतरी खोल दडलेले भारतीयत्व सापडते, तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. 'भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे' ही लेखमाला भारतीय संस्कृतीच्या पाउलखुणा जिथे सापडल्या आहेत, त्या ठिकाणी घेऊन जाणारी यात्रा आहे.

 इसवीसनाच्या बाराव्या शतकापर्यंत, भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, न्याय, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादी युरोपपासून व्हिएतनामपर्यंत पोहोचल्या होत्या. भारतात परकीय सत्ता आल्यावर, साधारण बाराव्या शतकापासून मात्र हे संबंध संपुष्टात आले आणि लवकरच हे संपूर्ण पर्व विस्मृतीत गेले. एकोणिसाव्या शतकात जेव्हा युरोपीय लोक जगभर पोहोचले, तेव्हा विविध देशातील भारतीय संस्कृती त्यांच्या लक्षात आली. या मोठया भूभागाला त्यांनी 'Greater India' किंवा 'बृहत्तर भारत' असे संबोधले. बृहत्तर भारतात आता वेगवेगळे देश, विविध वेश आणि वेगळे धर्म असले, तरी भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा दिसतात. आजही जेव्हा दूरच्या एखाद्या देशात कुठेतरी खोल दडलेले भारतीयत्व सापडते, तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. ही लेखमाला भारतीय संस्कृतीच्या पाउलखुणा जिथे सापडल्या आहेत, त्या ठिकाणी घेऊन जाणारी  यात्रा आहे.

या यात्रेची सुरुवात पाकिस्तानातील स्थळांपासून. पहिले तीर्थस्थळ आहे - सिंधू नदी आणि वरुण मंदिर.

सिंधू नदीची नव्याने काय ओळख करून द्यायची? विवाहातील मंगलाष्टकात 'गंगा सिंधू सरस्वती च यमुना...' यामध्ये सिंधूचा उल्ल्ेख केला जातो. किंवा नित्य पठण करावयाच्या श्लोकात - '... नर्मदे सिंधू कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु' यामधूनसुध्दा सिंधूचे स्मरण आपल्या हृदयात आहे. मानस सरोवराजवळ उगम पावणारी सिंधू नदी हिमालयातून काश्मीर, पंजाब आणि सिंधमार्गे समुद्रात विलीन होते.

ज्या नदीचा पलीकडचा काठ दिसत नाही, अशी प्रचंड नदी पूर्वीच्या मानवाला समुद्र वाटली की काय, कोण जाणे. त्याने तिला समुद्र किंवा सिंधू असे म्हटले! गांधारच्या पलीकडे असलेल्या पर्शियन लोकांनी सिंधूला 'हिंदू' म्हटले आणि भारताला 'हिंद' असे  संबोधले. पर्शियाच्या पलीकडे असलेल्या ग्रीकांनी 'हिंदू' नदीला 'Indus' आणि 'हिंद'ला 'India' म्हटले. सिंधू नदीचा महिमा असा की तिच्यावरून या देशाचे, या देशातील लोकांचे आणि एका महासागराचे नामकरण झाले आहे. इतकेच नाही, तर दूरच्या इंडोनेशिया या देशाच्या नावाचे मूळसुध्दा सिंधू नदीत आहे.

अनेक नद्यांनी समृध्द असलेल्या या प्रांताला वेदांनी 'सप्तसिंधू परिसर' असे म्हटले. सप्तसिंधू प्रांतातील एक लोकप्रिय देव होता - वरुण. वरुण हा समुद्राचा, पाण्याचा देव. आजही पूजा करताना आपण पाण्याने भरलेल्या कलशात वरुणाची स्थापना करतो. मकरावर आरूढ असलेला, हातात पाश धारण करणारा देव आहे. तैत्तरीय उपनिषदात वरुणाला नमन करताना म्हटले आहे - शं नो वरुण:। समुद्राचा देव असेलला वरुण, आमचे मंगल करो! आमचे कल्याण करो! आमचे रक्षण करो!

वरुणाचे एकमेव मंदिर, सिंध प्रांतात, समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. समुद्रातून प्रवास करणाऱ्यांचे रक्षण करणारा हा देव, सहजच व्यापारासाठी समुद्र सफरी करणाऱ्या सिंधी जनांचा अतिशय लाडका आहे.

अशी कथा सांगितली जाते, की दहाव्या शतकाच्या आसपास सिंधमधील इस्लामी शासकाने प्रजेवर अनंत अत्याचार केले. त्या त्रासापासून सुटका व्हावी, म्हणून तेथील प्रजेने सिंधू नदीच्या काठी अन्नपाण्याचा त्याग करून वरुणाची प्रार्थना आरंभली. त्या वेळी सिंधू नदीतून साक्षात वरुण प्रकट झाला. 'मी लवकरच जन्म घेऊन तुमचे रक्षण करीन!' असे वरुणाने त्यांना अभय दिले. झुलेलालच्या रूपात अवतीर्ण झालेल्या वरुणाने पुढे या भक्तांचे रक्षण केले. झुलेलाल हा सिंधी लोकांचा इष्टदेव. कराचीमधील या वरुण मंदिरात झुलेलालची सुध्दा एक मूर्ती आहे.

फाळणीनंतर वरुण मंदिराच्या दुरावस्थेस सुरुवात झाली. 1992मध्ये अयोध्येतील बाबरी ढाचा पाडल्यानंतर, या मंदिराची इतकी हानी केली गेली की ते मंदिर मोडकळीस आले. सिंधमधील हिंदूंनी हे मंदिर कसेबसे राखले. 2016पासून कराचीतील अमेरिकन दूतावासाने या मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे, ही एक सकारात्मक बाब आहे.

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com 

Powered By Sangraha 9.0