***डॉ. आर्या जोशी *****
श्रावण महिना व्रतांचा राजा म्हणून ओळखला जातो. व्रतराज, धर्मसिंधू अशा विविध ग्रंथांत श्रावण महिन्यात करायची व्रते दिलेली आहेत. नागपंचमी हे त्यापैकीच एक व्रत. नागपंचमीच्या परंपरा आणि त्यामागील इतिहास तसेच त्याची प्रतीकात्मकता याविषयी संकलित माहिती या लेखात नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या निवडक प्रांतांत साजरी केली जाणारी नागपंचमी याविषयीही माहिती नोंदविलेली आहे.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सण पूजनीय मानला आहे. त्याला एकेका देवतेच्या उपासनेची जोड दिलेली आहे. या सर्वाला व्रत संकल्पनेत गुंफले गेल्यामुळे परमेश्वरी सान्निध्य आपोआपच लाभते.
कृषिवलांचा सण
भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. नागपंचमी हा कृषिवलांचा सण मानला जातो. शेतीची कामे चालू असल्याने नांगराच्या फाळाने शेतात वावरणारे साप किंवा नाग यांना इजा पोहोचू शकते आणि त्यामुळे माणसाला सापाचा दंशही होण्याचा संभव असतो. या कारणास्तव पावसाळयात नाग किंवा साप यांच्यापासून आपले संरक्षण व्हावे, यासाठी नागांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असावी. उंदरांचा शेतातील उपद्रव कमी करणारा साप हा पर्यावरणदृष्टया शेतकरी गटाचा मित्रच असतो. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस.
नागरपंचमी - एक संकल्पना
गं.बा. मुजुमदार यांनी नोंदविले आहे की ही नागपंचमी नसून नागरपंचमी आहे. आदिमायेच्या उपासनेसाठी नाथपंथी संप्रदायांनी नागकुलदर्शक नावे दिलेली होती. नावे योग परिभाषेतील आहेत. नाथ पंथात वारुळाची पूजा करण्याची प्रथा होती, हीच प्रथा पुढे नागपंचमीच्या निमित्ताने सुरू राहिलेली असावी.
नागपंचमीच्या सणामागील प्रतीकात्मकता
नागाला क्षेत्रपाल म्हणून मान दिला जातो. तो भूमीचा रक्षणकरता आहे अशी भावना यामागे आहे. शेतात वारूळ असणे हे शुभ लक्षण मानले जाते. तसेच वारुळाची माती ही सर्वात सुपीक असाही समज दिसून येतो. वारुळाच्या मातीला मूळमृत्तिका असे संबोधिले जाते.
या संदर्भात डॉ. शैला लोहिया यांनी 'भूमी आणि स्त्री' या आपल्या पुस्तकात नोंदविले आहे की वारूळ हे भूमीच्या सर्जन इंद्रियांचे प्रतीक मानले जाते आणि नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला जातो. त्याच्या अस्तित्वामुळे भूमी सुफळित होते, अशी श्रध्दा आहे.
धार्मिक महत्त्व
अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची या दिवशी पूजा केली जाते.
'वासुकि: तक्षकश्चैव कालियो मणिभद्रक:। ऐरावतो धृतराष्ट्र: कार्कोटकधनञ्जयौ॥' (भविष्योत्तरपुराण - 32-2-7) हा श्लोक म्हणून पूजा केली जाते.
हिंदू धर्माप्रमाणेच जैन आणि बौध्द धर्मांतही नागपूजा प्रचलित आहे. गौतम बुध्दाच्या जन्मानंतर नंद आणि उपनंद या नागांनी त्याला स्नान घातले, अशी कथा प्रचलित आहे.
आध्यात्मिक महत्त्व
श्री ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कुंडलिनी शक्ती ही नागीण स्वरूपात असल्याचे म्हटले आहे. नाथ संप्रदायाची ही धारणा आहे. नुकत्याच कात टाकलेल्या, साडेतीन वेटोळे असलेल्या, कुंकवाने जणू काही न्हालेल्या अशा नागिणीप्रमाणे कुंडलिनी असून ती तेजाचे प्रतीक मानली आहे.
लोकसंस्कृतीतील महत्त्व
महाराष्ट्रात शेतातील वारुळात जाऊन महिला आणि मुले पूजा करतात. झाडाला झोके बांधून खेळतात, मेंदीने आपले हात सजवितात. नाग हा सर्जनाचे प्रतीक मानला जातो अशी लोकसंस्कृतीत धारणा आहे. त्यामुळे स्त्रिया आणि महिला यांचा या सणाशी संबंध जोडला गेला असावा. ग्रामीण भागात नागाला भाऊ मानून त्याची आळवणी करणारी लोकगीतेही गायली जातात.
नागभाऊरायाला नैवेद्य -
नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा
नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा।
पंचमीला माहेरवाशिणीला बांगडया भरण्याची पध्दती आजही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. नागचौथीला आपल्या भावाच्या आणि शेताच्या कल्याणासाठी स्त्रिया उपवास करतात.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी भुलाबाई स्थापन करून त्याची पूजा करतात. हे शिवाचे रूप मानले जाते. काही ठिकाणी शिराळशेठ मांडून त्याच्या दातृत्वाची पूजा केली जाते, आदर केला जातो.
भारताच्या विविध प्रांतांतील नागपंचमी
याबरोबरच भारतीय संस्कृतीच्या उगमस्थानी असलेल्या कृषी संस्कृतीशीसुध्दा या संकल्पनेची नाळ जोडलेली दिसते. कुस्तीगीर वर्षभर केलेली आपली मेहनत नागपंचमीला आखाडयात प्रदर्शित करतो. त्याने घेतलेली स्वत:च्या आहाराची, व्यायामाची, दिनचर्येची काळजी, त्याचा नियमित सराव आणि त्यातून तयार झालेले आणि पोसले गेलेले त्याचे बलदंड शरीरसामर्थ्य दाखविते. शेतकरी आपल्या लावलेल्या पिकाची उत्तम काळजी घेतो, रोगराईपासून किंवा अन्य आपत्तीपासून त्याचे रक्षण करतो, त्याला पुरेसे पाणी देतो आणि शेतीची मशागत करतो, त्यातूनच उत्तम पीक आणि समृध्दी हाती येते. शरीर पोसलेला कुस्तीगीर आणि सुपीक जमिनीतील शेती यांचे रूपक या ठिकाणी स्वीकारलेले दिसते. सर्जनाची प्रक्रिया आणि ब्रह्मचर्य यांचा संगम नागपंचमीच्या निमित्ताने साधलेला दिसतो.
मध्य प्रदेश, काश्मीर, गुजरात, बंगाल, उत्तर प्रदेश या प्रांतांत या दिवशी नागांची पूजा केली जाते. काश्मीर परिसरात शेषनाग, इंद्रनाग, संतनाग अशी देवळे असून चिनाब नदीच्या काठी वासुकीचे मंदिर आहे.
प्राचीन साहित्यात व इतिहासात नागवंश
भारतीय संस्कृतीत महाभारतापासून नाग जमातीचा आदर करण्यात येतो. नागकन्या उलूपी आणि अर्जुन यांचा विवाह ही महाभारतातील घटना आहे. वायुपुराणात आणि ब्रह्मांड पुराणात नागवंशाचा उल्लेख सापडतो.
महाराष्ट्रातही पैठण, नागपूर, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी नाग जमातीच्या वस्तीचे पुरावे मिळाले आहेत, असे अभ्यासक नोंदवितात.
नव नाग या राजाने नव नाग वंशाची स्थापना केली, असे डॉ. के.पी. जयस्वाल यांनी नोंदविले आहे. या वंशाचे मूळ नाव भारशिव असे असून या राजाने कुशाण राजा वासुदेव यांच्या समकालीन राज्य केले. इ.स. 140 ते 170 या काळात त्याचे राज्य अस्तित्वात होते. त्याची नाणी कौशम्बी येथून पाडली जात असत. छत्तीसगडच्या इतिहासात या वंशाचे महत्त्वाचे स्थान मानले जाते. नाग किंवा सर्प ही या वंशाची पूजनीय देवता मानली जात असे. या वंशातील लोक नाग पाळून युध्दात त्यांचा वापर करत असावेत, असेही एक मत दिसून येते.
प्राचीन साहित्यात - तैत्तिरीय संहितेत नागपूजेचा उल्लेख सापडतो. महाभारतात बलराम हा शेषाचा अवतार मानला गेला आहे. पुराण साहित्यात शिवासह नागाचे नाते जोडलेले दिसून येते. गणेशानेही सापाचा कंबरपट्टा बांधलेला आहे असे पुराणात उल्लेख सापडतात. शेषनागाने पृथ्वी आपल्या मस्तकावर तोलली आहे ही आख्यायिका प्रसिध्द आहेच.
लोकसंस्कृती, प्राचीन इतिहास, अध्यात्म अशा विविध विषयांमध्ये नागाचे असलेले स्थान याचा हा अतिशय छोटा आढावा.
श्रावणातील नागपंचमीच्या व्रताचा केवळ लोकसंस्कृतीतील संदर्भ अनेकदा माहीत असतो. या लेखाच्या निमित्ताने पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या सरीसृप वर्गातील नागाचे महत्त्व वेगवेगळया दृष्टीकोनांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडील काळात पर्यावरणविषयक जागृतीमुळे शहरी भागात या सणाचा विशेष प्रसार दिसून येत नाही. सापाला सांभाळणे, त्यांची काळजी घेणे याविषयी जाणीवजागृती केली जाते आहे. त्यामुळे विज्ञानाच्या डोळस नजरेतून नागाकडे पाहण्याची कालसुसंगत नवी प्रथा सुरू होत असताना त्याचे प्राचीनत्व अभ्यासणे आणि त्यामागील कारणे जाणून घेणेही रंजक ठरू शकेल. या श्रावण महिन्यात श्रावणातील अन्य व्रतांची अशी माहिती मिळविण्याचा संकल्प वाचकांनी अवश्य करावा.
-9422059795