आषाढी एकादशीच्या आदल्या रात्री

23 Jul 2018 12:15:00


सांज झाली आणि पांडुरंग शेला सावरत राउळाच्या बाहेर आले. मागून रुखमाईने आवाज दिला, पण पांडुरंगांनी तो ऐकला नाही. झरझर पावले टाकत पांडुरंग वाळवंटाच्या दिशेने चालू लागले. बाहेर पावसाची रिमझिम चालू होती. पावसाचे थेंब पांडुरंगाच्या केशसंभारातून मोती होऊन ओघळू लागले. पांडुरंग चिखल तुडवत चालू लागले. पितांबराचा सोगा कमरेला खोचण्याचे भानही त्यांना राहिले नाही. वाळवंटात जाऊन संत मंडळींशी गळाभेट घेण्यासाठी ते उतावीळ होते. खरे तर हा शतकानुशतकाचा प्रघात. विठ्ठलनामाचा गजर करत येणारे वारकरी मंदिरात येण्याआधीच वाळवंटात जाऊन त्यांना भेटावे, त्यांच्या मनाचे गूज समजून घ्यावे आणि त्यांचा शीण दूर करावा, वारकऱ्यांची आस पुरी करावी या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पांडुरंग महाद्वार घाट उतरून नदीपात्रात आले. पांडुरंगांनी शेवटी पायरी उतरली आणि मनाशीच हसले. त्यांच्या सावळ्या गालावर त्या हास्याचे प्रकटीकरण उमटलेच. याच वाळवंटात हरिनामाचा गजर करत समतेची द्वाही फिरवली गेली होती. महाराष्ट्रीय संत मंडळींनी जात, पंथ, धर्म यांना सोडचिठ्ठी देऊन उच्चरवात सांगितले होते, "भेदाभेद अमंगळ". संत मंडळींची ही द्वाही अगदी कालपरवापर्यंत चंद्रभागेच्या तीरावर गुंजत होती. पांडुरंगाचा भक्त हा जातिभेदाच्या पलिकडे गेलेला, म्हणूनच पांडुरंगाच्या अंतःकरणात वास करणारा असतो. पांडुरंग एक एक पाऊल टाकू लागले, तसतसे त्यांना ज्ञानोबा, नामदेव, गोरोबा, चोखोबा, नरहरी सोनार, सावतोबा माळी, तुकोबा, जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा अशी संत मंडळी आठवू लागली. ज्यांनी आपल्या जगण्यातील दुःखे घरी ठेवली होती, ते पंढरीत आले होते केवळ पांडुरंगाला पाहण्यासाठी, भावभक्तीचे रिंगण घालण्यासाठी. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ही मंडळी पांडुरंगाला विश्वमांगल्याचे साकडे घालत. जातभाव चंद्रभागेच्या पाण्यात विसर्जित करून विठूचे डिंगर होत असत. पांडुरंगांच्या पावलाची गती वाढू लागली, तशी त्यांची स्मरणसाखळीही विरळ होत गेली. पांडुरंग भानावर आले. आसपासचा कल्लोळ पाहून पांडुरंग भांबावून गेले. पंढरीच्या वारीत त्यांना जातीचे झेंडे डोलताना दिसत होते. संतांचे जात प्रमाणपत्र लावलेल्या राहुट्या वाळवंटात दाटीने एकमेकांकडे संशयाने पाहत उभ्या होत्या. तुकोबाने केलेला 'पाहिजे जातीचे' या उपदेशाचा आज असा अर्थ लागतो, हे पांडुरंगांलना प्रथमच कळले. जातीजातीच्या राहुट्या आणि त्यातून निर्माण झालेला चिखल तुडवत पांडुरंग साऱ्या वाळंवटभर फिरले. त्यांची इच्छा होती भगवद्भक्ताला गळाभेट देण्याची, जो जातीच्या पलीकडे गेलेला असेल. पण इथे तर सर्व जण समतेचा गजर करत आपआपल्या स्वतंत्र राहुट्या जपणारे आणि समतेच्या नावाखाली नवी अस्पृश्यता पाळू पाहणारे. पांडुरंग उदास झाले. काही वेळापूर्वीचे ते मुखकमलावर विराजमान झालेले हास्य परागंदा झाले आणि जड पावलाने राउळाकडे परतले. महाद्वारात रुक्मिणीमाता पाण्याची घागर घेऊन उभी. हाही शतकानुशतकाचा प्रघात. पांडुरंगांचा पडलेला चेहरा रुक्मिणीमातेच्या नजरेतून सुटला नाही. तिने पांडुरंगाला प्रश्न केला, "काय झाले?"
 "वाळवंटात खूपच चिखल झाला आहे."
"वाळवंटात नाही, साऱ्या महाराष्ट्रातच चिखल झालाय. तुम्ही जरा या युगात या."
"म्हणजे?"
"तुमच्या संतांनी महाराष्ट्राला समतेची, ममतेची शिकवण दिली, पण आता ती कीर्तन-प्रवचनापुरती मर्यादित झाली आहे. शिकवण आणि व्यवहार यांच्यात खूप अंतर पडले देवा."
"मग?"
"मग काय?आपण कमरेवर हात ठेवून उभे राहून वाट पाहू."
"कशाची?"
"या जगाला समतेचा संदेश देणारे संत येण्याची. देवा, पुन्हा ज्ञानोबा येतील, तुकोबा येतील, नामदेव येतील, चोखोबा येतील. त्यांना यावेच लागेल. ही जातीपातीची जंजाळे दूर करून मानवतेचा संदेश देण्यासाठी त्यांना यावेच लागेल. ते तेथील नव्या रूपात, नव्या संदर्भात आणि सांगतील नव्या भाषेत तेच चिरंतन तत्त्व, जे महाराष्ट्रीय संत मंडळींनी पोटतिडकीने मांडले. करतील नवा समाज उभा." 
"इतका विश्वास?"
"हो, माझा माझ्या देवावर आणि त्याच्या खऱ्या भक्तावर ठाम विश्वास आहे."
पांडुरंगांनी स्मितहास्य केले आणि रुक्मिणीमातेला म्हणाले, "अग, इथे काय उभी? चल, चल, राऊळात चल. उद्या आषाढी, ती बघ केवढी रांग लागली आहे, चल."
पांडुरंग राउळात पोहोचले आणि काकड आरतीची घंटा वाजू लागली.
 
रवींद्र गोळे
09594961860
Powered By Sangraha 9.0