अनुबंध

02 Jul 2018 16:32:00

भाग्यवशाने एखाद्या कवीला खरीच सर्जक साथ लाभते किंवा आयुष्याच्या वेगवेगळया वळणांवर त्याच्या प्रतिभेच्या फुलोऱ्यात सुगंध पेरते कुणी अनामिक स्फूर्तिदेवता! कधी सदेह, समूर्त, तर कधी अमूर्त प्रतिभा! कविवर्य शंकर वैद्य यांची ही कविता वाचताना उगाच आठवली एका  प्रतिभावंत आद्यकवीची कल्पित प्रेमकहाणी.

कविवर्य शंकर वेैद्य यांची ही कविता वाचताना दर कडव्यात तर्क 'ती'विषयीच्या निरनिराळया कल्पना करू लागला. सारख्याच कवींच्या प्रेमकवितांच्या केंद्रस्थानी असते एक 'ती'! आपल्या मगदुराप्रमाणे आपणही या 'ती'ची कल्पना करतो. आपल्या कल्पनाविश्वातून त्या कवितेला एखादी नायिका बहाल करतो. भाग्यवशाने एखाद्या कवीला खरीच सर्जक साथ लाभते किंवा आयुष्याच्या वेगवेगळया वळणांवर त्याच्या प्रतिभेच्या फुलोऱ्यात सुगंध पेरते कुणी अनामिक स्फूर्तिदेवता! कधी सदेह, समूर्त तर कधी अमूर्त प्रतिभा!

ही कविता वाचताना उगाच आठवली एका  प्रतिभावंत आद्यकवीची कल्पित प्रेमकहाणी.

..महाकवी कालिदास! विलक्षण प्रतिभेचं आणि तरल कल्पनाशक्तीचं दर्शन घडवणाऱ्या 'मेघदूत'सारख्या महाकाव्याचा जनक. त्याची स्फूर्तिदेवता, त्याची प्रेमिका मल्लिका असं कल्पून लिहिलेली त्याची प्रेमकहाणी. कुणाही प्रतिभावंताच्या निर्मिकाच्या आयुष्याला सहज लागू होईल असं कथानक. तोच सूर या कवितेत नकळत जाणवलेला.

शंकर वैद्यांच्या मनात या कथानकाचा पुसटसा तरी संदर्भ असेल का? माहीत नाही. पण नाहीतरी कविता वाचताना प्रत्येक जण ती आपल्या जीवनानुभवाच्या चश्म्यातूनच वाचत असतो!  प्रेम, विरह यासारख्या सनातन भावना काळाच्या प्रवाहात वाहत वाहत प्रत्येक कवीच्या ओंजळीत येतात आणि वेगळया रूपात भेटत राहतात.

काश्मीरसारख्या नंदनवनात राहणारा कविहृदयी कालिदास व सुंदर, भावुक मल्लिका.. आषाढातल्या एका पावसाळी संध्याकाळी झालेली भेट.. एकमेकांच्या संगतीत फुलत गेलेली प्रेमकहाणी अन बहरत गेलेली कालिदासाची काव्यप्रतिभा.. उज्जैनसारख्या प्रगत प्रतिष्ठित नगरीत तिचं चीज होईल, ही तिची तळमळ. राजकवी बनण्याची संधी त्याकडे चालून आलेली.

हिमालयातला निसर्ग, गाव अन ती, हे सोडून जायची त्याची इच्छा नाही, पण तिचा आग्रह.. त्याला लौकिक मिळावा म्हणून तिने त्याचं दुरावणंही स्वीकारलंय.

कालिदास भरपूर नावाचा, पैशाचा, प्रतिष्ठेचा, कीर्तीचा धनी.

मल्लिकेपासून दूर आल्यानंतर विद्वान व सुंदर राजकन्येशी विवाह, पण कवितेत मात्र 'ती'च्या विरहाची धारा.

तिच्यावरच्या उत्कट कवितांनी तो शिखरावर.. पण तिच्याकडे मात्र पाठ.

मल्लिका केवळ भावुक, भाबडी प्रेयसी नाही. तिचं प्रेम केवळ शरीरावर वा त्याच्या प्रतिभेवर नाही, तर आपल्या प्रेमभावनेवरच तिचं प्रेम आहे! नाइलाजाने वाटयाला आलेलं वारांगनेचं आयुष्य जगतानाही ती कालिदासाचं सगळं साहित्य वाचते आहे. तो मात्र नगरात येऊनही तिला भेटत नाही. शेवटी सगळीकडून परास्त होऊन तिच्याकडे येतो, तेव्हा ती कालिदासाला विचारते, ''उज्जैनसारख्या नगरीत खूप वेश्या पाहिल्याही असशील. पण माझ्यासारखी कुणी पाहिली आहेस? मी जे गमावलंय, त्याची वेदना जाणवतेय का तुला?''

कालिदास-मल्लिका ही नावं बाजूला केली, तरी कवी व त्याची प्रतिभा यांच्यातलं नातं याही कवितेत तसंच दिसतं. मग कधी ती कुणाच्या रूपाने सदेह सोबत करणारी असेल किंवा कधी अमूर्त काल्पनिक स्फूर्तिदेवता!

ती जेव्हा सोबत होती, तेव्हा कशाचंच भान नसायचं! ती जवळ असली तरी, नसली तरी तिच्या अस्तित्वाची जाणीव इतकी व्यापून उरायची की वेळकाळाशी बांधलेला असा मी वेगळा उरलोच नव्हतो. तिच्या असण्यात मीही फक्त असायचो! पण आता ती नाही. ती जाताना मला वर्तमानाला अन काटयाला बांधून गेली आहे. आता फिरणाऱ्या काटयांमुळे तिच्याविणा न सरणाऱ्या काळाची जाणीव तीव्र होते आहे.

काय होते ते दिवस ! ते माझं सुंदर गाव. तांबडया मातीच्या डोंगरातलं. लालभडक दरडीच्या दो बाजूला भिंती अन त्यातून उतरत जाणारा रस्ता. गावापासून दूर दूर नेणारा. तिच्यापासून दूर नेणारा. गाव सोडून जातेवेळी पावसाळी ढगासारखे भरून आलेले तिचे डोळे!

किती निर्व्याज निरागस तिचं प्रेम! तिच्यासारखंच साधंसुधं.

ना शृृंंगार, ना कशाचा हव्यास. सदाफुलीसारखी मोहक पण मूकपणे आपल्या जागी फुलत राहायची ती. तिच्याजवळ असलं की शांत वाटे. पण स्वत:कडे ओढून आणणारा मादक, तीव्र गंध मात्र नसतो सदाफुलीला. तिला हे कधीतरी सांगावंसं वाटे...

तिच्या या अशा अबोल, अव्यक्त भावनांना जरा तीव्र आसक्तीचा गंध दे देवा! ती मला बांधून घालू दे, असं मीच विनवायचो परमेश्वराला.

पण तसं घडलं नाहीच. सदाफुली तशीच राहिली लाल मातीच्या वाटेवर मागे. मी किती दूर चालत आलोय. कितीतरी काळ लोटला आहे मध्ये. पुन्हा एकदा भेट झाली तिची. तीच ती. आता ते पूर्वीचं लोभस रूप नाही उरलेलं. पाकळया झडून गेल्यासारखी ती..ती हसली.

सारं जुनं आठवून तशीच सुंदर हसली. ते हळवे कोवळे अनुबंध आठवत. ते हरवलेले दिवस आठवत. आज मात्र मला वाटलं की ती सारं उधळतेय तिच्या हसण्यातून. मी शोधत आलो होतो ते जुने अनुबंध. तो रसभरला सहवास, ते प्रसन्न हसू, ज्यातून माझी कविता फुलत होती. तिच्या हसण्याने माझ्या मनात निर्मितीच्या बागा फुलत होत्या. आज तिच्या हसण्यातून गंध दरवळतो आहे, पण सुकलेल्या निर्माल्याचा!

मी पुन्हा माझ्या जगात आहे. पुन्हा वर्तमानाशी बांधला गेलो आहे. ती तिची ओझरती भेट मला आठवत राहतेय. तिच्यासारख्या आठवणी फेर धरतात. मी जणू झोपेतून जागा झालो आहे आता. कुणी जागं केलं मला? कुणीही तर नाही आता माझ्या सोबतीला. आजूबाजूला.

मग हे कोण मला सोबत करतंय? तिच्या आठवणींचं चांदणंच स्पर्शून गेलंय मला!

सगळा पट डोळयासमोरून सरकतो आहे. तिच्या असण्याच्या वेळा, तिच्या नसण्याच्या वेळा. ती नव्हती असं झालंच कुठे पण?  ती नव्हती म्हणून तर ती सतत असत होती. आठवणीत.

माझ्या श्वासात, माझ्या स्पंदनांत ती होतीच. दर वेळी तिच्या नसण्याची कळ एका एका कवितेला जन्म देत होती.

जगाला माझ्या कवितांचं वैभव दिसलं. पण त्या लखलखत्या मशालीत जळत असतं ते कवीचं मन! त्याच्या मनावर झालेल्या एकेका आघाताच्या पायावर जगाला दिपून टाकणाऱ्या कवितेचा डोलारा उभा असतो. जीव जाळून तो जगाला आनंद देत असतो. एकेक कविता म्हणजे जळती वेदनाच तर असते त्याची वा तिची!

 

ती होती तेव्हा घडयाळ होते-नव्हते

अस्तित्व-सुखाचे भान तेवढे होते

ती अंतरली अन् उरलो मी एकाकी

--हे तेव्हापासून फिरू लागले काटे!

 

तांबडया मातिच्या दरडी दो बाजूंला

पथ उतरत पुढती जाई खोल नदीला

मी गाव सोडुनी निघे अशा या वेळी

ढग तिच्या घरावर ओथंबुन आलेला!

तो जीव भाबडा, काय तिचा हव्यास

घेऊन यायची सदा फुलांचे घोस!

मी व्यथित होऊनी म्हटले होते ''-- देवा,

एकदा तरी दे तिच्या फुलांना वास!''

 

भेटली अचानक कितीतरी वर्षांनी

सौंदर्य तियेचे गेले होते झडुनी

तरि हसली सुंदर स्मरुन जुने अनुबंध

वाऱ्यावर पसरे निर्माल्याचा गंध!

 

ये जाग अचानक, कुणी स्पर्शुनी गेले

मी उठुन बघे तर जग सारे निजलेले

कुणि नव्हते भवती, अगदी कुणिही नव्हते

---चांदणे बिछान्यावरून सरकले होते !

 

मिरवणूक येता बत्त्या झगमग दिसती

त्या कोण वाहती, तव नच दिसुनी येती

दिसतील व्यथा का अंतरातल्या तुजला

ज्या माथ्यावरती कविता मिरवत नेती?

 

Powered By Sangraha 9.0