कलाटणीचे दिवस... बागपत!

02 Jul 2018 15:00:00

दिल्लीच्या पश्चिमेला 75 किलोमीटर्सवर असलेल्या सनौली इथे ताम्रयुगातील अवशेष सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे अवशेष सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचे आहेत. मुख्यत्वेकरून ही एक दफनभूमी आहे. 2005 साली जेव्हा इथे काम सुरू झाले, तेव्हा या ठिकाणी जवळजवळ 116 दफने सापडली होती. ही दफने बऱ्याच अंशी सिंधू संस्कृतीतील दफनांसारखीच होती. गेल्या मार्च महिन्यात केलेल्या उत्खननात इथे पुन्हा आठ दफने सापडली. दफनांबरोबर तांबे या धातूने मढवलेले रथ सापडले आहेत. या उत्खननाविषयीचा हा सविस्तर लेख.

दहा-पंधरा दिवसांपूर्वी फेसबुकवर एक बातमी दिसली. फेसबुकवर तशा अनेक बातम्या फिरत असतात. काही नवीन असतात, तर काही एकाच्या वॉलवरून दुसऱ्याने कॉपी-पेस्ट केलेल्या असतात. पाहताना प्रत्येक वेळी ते ध्यानी येत असते. त्यामुळे सराईत नजरेला काय पाहावे अन् काय नाही याचा नेमका अंदाज येत असतो. ही बातमी तशी लहानशीच होती. लक्षात येईल न येईल अशी. पहिल्यांदा नुसतीच नजर फिरून गेली. काही काळानंतर जाणवले की, नजरेतून काहीतरी महत्त्वाचे निसटलेय. मग पुन्हा मागे गेलो आणि ती बातमी वाचली. त्यानंतर निखळ आनंद म्हणजे काय याची अनुभूती पुन्हा एकदा घेतली.

उत्तर प्रदेशातील बागपतजवळ सनौली नावाचे एक लहानसे खेडे. तेथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून 2005 सालापासून उत्खनन सुरू होते. त्या तेरा वर्षांच्या तपश्चर्येत काय काय मिळाले याची एक छोटीशी झलक त्या बातमीत होती. काही चार दोन फोटो होते. मला वाटते एक लहानशी दृकश्राव्य फीतही होती. बातमीचा सारांश असा होता की, 2005पासून सुरू असलेल्या या उत्खननात गेल्या तीन-चार महिन्यात जे काही सापडलेय, त्याची फलश्रुती म्हणून आता भारतीय इतिहासाच्या विशाल अशा पटावरील काही जुनी चित्रे पुसून बहुधा नवी चित्रे रेखाटावी लागणार आहेत. ही अशी चित्रे रेखाटण्यासाठी काही साधने - किंबहुना शास्त्रे वापरली जातात. पुरातत्त्व, शिलालेख-ताम्रपट, लिखित साधने, नाणकशास्त्र आणि लोककथा-दंतकथा अशा पाच साधनांनी अन् पाच अंगांनी इतिहासाचा पट रंगवला जातो. यांपैकी एकाही साधनात कुठे काही कमतरता राहिली, तर ते चित्र पाहताना सतत जाणवत राहते की जे नेमके सांगता येत नाही असे काहीतरी कुठेतरी हुकलेय. म्हणूनच या पाचही साधनांची एकवाक्यता झाली की मगच ऐतिहासिक पुरावा म्हणून त्या एकवाक्यतेची नोंदणी केली जाते.

इतिहास म्हटला की त्यात शंकास्थळे असतात. त्यात वादाचे मुद्दे असतात. वेगवेगळया विचारसरणींच्या टकरा असतात. हे सारे अगदी जागतिक स्तरावर, प्रत्येक देशामध्ये होत असते. मग आपलाच देश अपवाद कसा असू शकेल? आपल्या भारतीय इतिहासातही आजवर अशी अनेक शंकास्थळे सापडलेली आहेत. त्यातील काहींचा उलगडा झालेला आहे, काहींचा येत्या काळात होईल याचीही खात्री आहे. आर्यांची कुळकथा आणि आपणा भारतीयांना अभिमानाचा विषय असलेली रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये व त्यातील घटनांची कालनिश्चिती या दोन विषयांचा ऊहापोह 1925 साली सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडल्यानंतर अधिक आवेशाने आणि हिरिरीने सुरू झाला. याच्याही अगोदर आर्यांच्या प्रश्नाबाबत अनेक विद्वानांनी मते मांडली होती. चर्चा रंगवल्या होत्या. वाद उकरून काढले होते. लोकमान्य टिळकांसारखे विद्वान गणितीही यामध्ये ठामपणे आपापली मते मांडीत होते. आर्य आक्टर्िक प्रदेशातून - उत्तर ध्रुवावरून - उतरले इथपासून ते ही आर्यमंडळी मध्य आशियातून आली इथवर दोन्ही बाजू आपापल्या मतावर ठाम होत्या. रामायण आणि महाभारत हे दहा-पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले यापासून ते हा इतिहास अगदी अलीकडे, म्हणजे ख्रिस्तपूर्व दीड हजार ते हजार वर्षांपूर्वीचा - लोहयुगातला - आहे अशा चर्चांचे फडही रंगत होते. यामागे पुरातत्त्वज्ञांची काही गृहीतके होती ती अशी की, त्या काळातील माणूस आता केवळ पशुपालन न करता शेती करू लागला होता. म्हणजेच लोखंडी नांगराचा वापर सुरू झाला होता. या महाकाव्यात वर्णन केलेली लढाईची हत्यारे आदी लोखंडाने तयार केलेली होती. यावर वादचर्चा अगदी अहमहमिकेने झडत होत्या. सिंधू संस्कृती कशी लोप पावली व ती लोपल्यानंतर नेमके काय झाले असावे, आर्य बाहेरून आले असतील तर मग पंचनदांच्या भागात नेमके कधी उतरले, अशांसारखे वादाचे मुद्दे होते. अर्थात हे वाद मुख्यत्वे दोन गटांमध्ये सुरू होते. पहिला गट उपलब्ध झालेल्या पुरातत्त्वीय पुराव्यांखेरीज इतर कशावरही विश्वास नसणारा असा आणि दुसरा गट प्राचीन लिखित साधनांवर बेतलेल्या काहीशा साधार तर्कांवर विश्वास असणारा. त्यातून सगळेच आपापल्या मतांवर ठाम. समन्वय होईल अशीही शक्यता नाही. मग त्यामुळे एकमेकांचे गर्वहरण हा एकच पर्याय या दोघांसाठी शिल्लक राहत होता. मात्र परवाच्या त्या बातमीने बहुधा या साऱ्याच चर्चांना, वादविवादांना मुळापासून हलवले आहे.

दिल्लीच्या पश्चिमेला 75 किलोमीटर्सवर असलेल्या सनौली इथे ताम्रयुगातील अवशेष सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे अवशेष सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचे आहेत. मुख्यत्वेकरून ही एक दफनभूमी आहे. 2005 साली जेव्हा इथे काम सुरू झाले, तेव्हा या ठिकाणी जवळजवळ 116 दफने सापडली होती. ही दफने बऱ्याच अंशी सिंधू संस्कृतीतील दफनांसारखीच होती. गेल्या मार्च महिन्यात केलेल्या उत्खननात इथे पुन्हा आठ दफने सापडली. या आठपैकी तीन ठिकाणी मृतदेहांसाठी असलेल्या पेटया आहेत. वैशिष्टय म्हणजे नैर्ऋत्येच्या दिशेने पाय असलेल्या या साऱ्यांच मृतदेहांभोवती मातीची मडकी रचून ठेवलेली होती. पायांपाशी मोठी, तर डोक्यांपाशी लहान मडकी अशा पध्दतीने ही रचना केलेली होती. अशा प्रकारची मातीच्या मडक्यांसहित केलेली दफने हडप्पा संस्कृतीच्या शेवटच्या कालखंडात केलेली आढळतात. मात्र या प्रकारच्या तांब्याने मढवलेल्या मृतपेटया केवळ भारतातच नव्हे, तर आपल्या भारतीय उपखंडात पहिल्यांदाच आढळल्या आहेत.

मात्र या वेळी सनौलीच्या उत्खननात काही वेगळे सापडलेय. येथे दफनांबरोबर तांबे या धातूने मढवलेले रथ सापडलेत. या रथांची चाके लाकडी, भरीव व आरे नसलेली आहेत. त्यांचे लाकूड अर्थातच कुजून गेलेय. मात्र ती तांब्याने मढवलेली होती, त्यामुळे त्या चाकांचा आकार नेमका कळतोय. रथाचा आस व त्यातून निघालेला वाहन जोडणीचा दांडा लाकडी आहे. जिथे योध्दयाची जागा असते, तिथे दोन्ही बाजूंना तांब्याने मढवलेले लाकडी पडदे व समोरही त्याच पध्दतीचे संरक्षणात्मक आवरण.  या रथांच्या तांब्याच्या पत्र्यावर जे नक्षीकाम आहे, त्यात शिंगांची व पिंपळपानी आकाराची शिरस्त्राणे वा मुकुट असलेले मुखवटे आहेत. फुलांच्या आकृती असलेली काही अलंकरणे आहेत. जी हत्यारे सापडली आहेत, ती सारीच हत्यारे भरीव तांब्याची आहेत. त्यात तलवारी आहेत. खंजीर आहेत. छातीवर चिलखताप्रमाणे लावता येऊ शकणाऱ्या तांब्याच्या चेस्ट प्लेट्स आहेत. पुरातत्त्वज्ञांच्या मते हे सारे लढाऊ असलेल्या संस्कृतीकडे अथवा युध्दसज्ज समाजाकडे अंगुलिनिर्देश करते. याशिवाय तेथे सापडलेली निरनिराळया आकारांची मातीची व तांब्याची सुबक भांडी, निरनिराळया रंगांची व आकारांची उपरत्ने व त्यांपासून तयार केलेले मणी, कंगवे, तांब्याचा आरसा हे सारेच तत्कालीन समाजाच्या सुबत्तेचा, आधुनिकतेचा, उच्च प्रतीच्या कारागिरीचा चढता-वाढता आलेख आपल्याला दाखवते. अशा प्रकारचे रथ मेसोपोटेमिया अन् ग्रीस येथील संस्कृतींच्या दफनस्थळी मिळालेले आहेत. या दोन्ही ठिकाणी सापडलेले अवशेष हे पुरातत्त्वज्ञांच्या मते साधारण ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांपूर्वीचे आहेत. हा कालखंड साधारणपणे सनौली इथे सापडलेल्या रथांच्या अवशेषांशी मिळताजुळता आहे. याचा अर्थ असाही लावता येतो की, जेव्हा मेसोपोटेमियामधील वा ग्रीसमधील लढवय्ये रथात बसून, चिलखते व शिरस्त्राणे घालून लढाया लढत होते, त्या वेळी आपल्या देशातील परिस्थितीही काही फारशी वेगळी नव्हती.

1922 ते 1925 या काळात सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडायला सुरुवात झाली. त्याअगोदर पश्चिमी विद्वानांच्या दृष्टीने भारतीय संस्कृती ही बुध्दजन्माच्या अगोदर फार फार तर हजारभर वर्षे जुनी असेल असा एक दृढ मतप्रवाह होता. आपल्याकडील बहुतांश विद्वानांनीही या मताला प्रतिजाप करायचे धाडस अजून तरी दाखवले नव्हते. त्या काळी वेद अन् आर्य यावर घनघोर चर्चा सुरू होत्या. असे असताना एके दिवशी सगळया जगाचे डोळे खाडकन उघडले. सर जॉन मार्शल आणि त्यांच्या चमूला सिंधू संस्कृतीच्या अवशेषांचा अपघातानेच शोध लागला होता. यानंतर दोनेक वर्षांतच प्राचीन भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन व्हायला सुरुवात झाली होती. आता सगळेच संदर्भ बदलले होते. व्याख्या बदलल्या होत्या. परिमाणे बदलली होती. इतकी वर्षे नवखी म्हणून देशी-विदेशी पुरातत्त्वज्ञांकडून काहीशी हिणवली गेलेली भारतीय संस्कृती बोलबोल म्हणता जगातील प्राचीनतम संस्कृतींच्या पंक्तीला जाऊन बसली होती. बोलकी तोंडे गप्पगार झाली होती.

या वेळीही नेमके असेच घडलेय. आपल्याच प्राचीन लिखित साहित्याची भाकडकथा, पुराणातली वानगी वगैरे शेलक्या शब्दात संभावना करणाऱ्या विचारधारेची काहीशी कोंडी व्हायची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. रथ सापडले, मात्र घोडयांची हाडे काही सापडली नाही असे युक्तिवादही आता सुरू होतील. दायमाबादला सापडलेल्या खेळण्यातल्या बैल जोडलेल्या रथाचे उदाहरण देऊन हे रथही त्याच प्रकारचे आहेत असेही म्हटले जाईल. बाप दाखव नाहीतर श्राध्द कर या एकाच तत्त्वावर सगळीच शास्त्रे चालत असतात. मात्र या मार्गावर चालताना नाण्याला तितकीच महत्त्वाची अशी दुसरीही बाजू असू शकते, हा समन्वयाचा मध्यममार्ग सोईस्करपणे विसरला जातो वा अव्हेरला तरी जातो.

हे लिहीत असतानाच आणखी एक सुखद बातमी कानी पडली आहे. हरयाणातील राखीगढी या सुमारे साडेआठ हजार वर्षे प्राचीन अशा स्थळी सापडलेल्या वेगवेगळया कालखंडातील मानवी सांगाडयांचे डी.एन.ए. विश्लेषण केल्यानंतर जे निष्कर्ष आले आहेत, त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आर्य हे एतद्देशीयच होते. ते आक्टर्िक प्रदेशातून व मध्य आशियातून इथे आले व आक्रमणे करून त्यांनी सिंधू संस्कृतीचा पाडाव केला हा आजवर मनात घट्ट रुजलेला समज या वैज्ञानिक चाचण्यांनी खोटा ठरवला आहे. आर्यांचा प्रश्न हा मानवी इतिहासातील आजवरचा सर्वात जटिल व वादग्रस्त प्रश्न होता. त्याचे निराकरण आता झाले आहे. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू
डॉ. वसंतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ही शोधयात्रा सुफळ संपूर्ण झाली आहे असे म्हणावे लागेल. ही सारीच मंडळी त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत!

येत्या काही काळात या शोधांविषयीचे सविस्तर अहवाल सरकारकडून प्रसिध्द होतील. त्यावर या विषयातील तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया उमटतील. त्यावरून चित्र अधिकाधिक स्पष्ट होईल. आताच त्यावर काही म्हणणे व प्रसिध्द झालेल्या बातमीतून थेट अर्थ लावायला व अनुमाने काढायला धावणे हे निश्चितच मूर्खपणाचे ठरेल.

मात्र तोपर्यंत असे म्हणता येईल की, या संदर्भात गेल्या काही दिवसांत आपल्या देशात सापडलेले हे पुरावे 'न भूतो' म्हणता येतील असेच आहेत. 'न भविष्यति' असे मी मुद्दाम म्हणत नाही, कारण काळाच्या पोटात काय दडलेले आहे हे कुणीच सांगू शकत नाही. कदाचित याहीपेक्षा काही अद्भुत या धरित्रीच्या पोटात दडलेले असण्याची शक्यता आहेच..!

9619006347

Powered By Sangraha 9.0