केदारनाथ, पंचकेदारांमधला सर्वोच्च केदार. आस्थेच्या या सर्वोच्च स्थानाचं आणि त्याच्या महिम्याचं वर्णन करून या मालिकेचीसमाप्ती करत आहोत.
केदार तीर्थाचा महिमा वर्णन करताना महादेव पार्वतीला सांगताहेत,
मानवाला केदार तीर्थाचं दर्शन करून जशी गती प्राप्त होईल, तशी अन्य कोणत्याही तीर्थाचं दर्शन करून होणार नाही. सहस्र जन्मांमध्ये यज्ञ करणाऱ्याला जसं व जे फल प्राप्त होतं, ते केदार तीर्थात जलपान करून मिळतं.
न लभ्यते गतिर्मत्यै: केदारेण तु या भवेत्।
जन्मांतरं सहास्रेषु यत्फलं यज्ञयाजिनाम्॥
केदारोदकपानेन तत्फलं परिकीर्तितम्।
त्रिकालं परिभुंजान: क्रीडते त्रिदशैरपि॥
(केदारकल्प, नवम पटल, श्लोक 8-9)
केदार तीर्थाचा हा महिमा बघून, ऐकून किती कालापासून या क्षेत्राच्या ओढीने लोक दर्शनासाठी येत आहेत, अगदी युग-युगांतरापासून. हे आस्थेचं सर्वोच्च स्थान.
वैशाख महिन्याच्या, अक्षय्यतृतीयेच्या/ त्याच्या आसपासच्या मुहूर्तावर केदारनाथचं कपाट उघडलं जातं, विधिवत् पूजाअर्चा करून. यासाठी नरेंद्रनगर संस्थानचे राजे, बद्रिकेदार समिती व पुजारी यांच्या सहमतीने योग्य मुहूर्त काढला जातो अन् हे कपाट भाऊबीजेच्या दिवशी बंद होतं. या दिवशी चारधाम यात्रा समाप्त होते.
आपण केदारपुरीत पोहोचलोय. जेव्हा रामबाडयापासून सात कि.मी. चालून गेल्यावर सर्वप्रथम केदारपुरीचं दर्शन लांबून होतं, तेव्हा त्याच्या दर्शनानेच मन उल्हासित होतं अन डोळयात पाणी.
केदारनाथ समुद्रसपाटीपासून 11,750 फूट उंचीवर आहे. अत्यधिक थंड प्रदेशात. हे धाम तीन दिशांना गगनचुंबी हिमशिखरांनी आवृत असं. असं वाटतं की पृथ्वीच्या शेवटच्या टोकावर आपण उभे आहोत. फक्त परमतत्त्व व आपण.
केदारनाथ मंदिराच्या मागे असणारं केदार शिखर 22,770 फूट उंच व त्याच्या शेजारचं केदारडोम 22,441 फूट. या शिखरांच्या मधूनच मंदाकिनी नदीचा उगम होतो, चोरबारी ग्लेशिअरमधून.
केदारनाथ मंदिर
केदारनाथ मंदिर उत्तराखंड शैलीतल्या मंदिरांत सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ असं. मंदिराची निर्मिती विशाल पाषाण शिलांपासून करण्यात आली आहे. याचं निर्माण कार्य बघून आश्चर्य वाटतं - इतक्या प्राचीन काळात कसल्याही सुविधा वगैरे नसतानाही इतक्या मोठमोठया पाषाण शिला एवढया वर कशा नेण्यात आल्या? या नेपाळमधल्या गंडकी नदीपात्रातल्या गंडकी शिला आहेत, ज्या नेपाळमधून इथवर आणण्यात आल्या. याचाच अर्थ असा की असं काही तंत्रज्ञान अवश्य उपलब्ध असणार आहे, ज्याच्या अंतर्गत या एवढया मोठया शिला इथपर्यंत आणल्या गेल्या.
केदारनाथ मंदिराची उंची 71 फूट आहे व भिंतींची जाडी 12 फूट एवढी. मंदिराच्या मागच्या बाजूला ईशानेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या निर्मितीबद्दल अनेक वदंता आहेत. त्यापैकी एक - या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेचा इतिहास संक्षेपात असा सांगितला जातो की हिमालयातल्या केदार शिखरावर भगवान विष्णूंचे अवतार महातपस्वी नर व नारायण ऋषी तपस्या करत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले व त्यांच्या प्रार्थनेनुसार ज्योतिर्लिंग स्वरूपात सदैव वास करण्याचं वरदान प्रदान केलं. हे स्थान केदारनाथ.
पण शिवपुराणातल्या कोटिरुद्र संहितेतल्या अध्याय 19-13मध्ये उल्लेख आहे, की पांडवांना महिषरूपी महादेवांनी याच स्थानी दर्शन दिलं होतं. भगवान शिव सनातन, अज, सर्वव्यापी आहेत. परंतु महादेवांनी लोककल्याणासाठी ही लीला करून पांडवांना महिषरूपात दर्शन दिलं, त्याप्रती कृतज्ञतेची भावना मनात ठेवून पांडवांनी या मंदिराच्या निर्मितीचा श्रीगणेशा केला असावा. कारण या मंदिराची भव्यता व त्यासाठी लागलेल्या शिला बघता या मंदिराचं निर्माण करायला किमान शंभर ते दीडशे वर्षं लागली असावी. महाराज युधिष्ठीर केवळ 36 वर्षं राज्य करून सर्व पांडव व द्रौपदी यांच्यासह स्वर्गाला गेले. त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या वंशजांनी हे कार्य पूर्ण केलं असावं.
पांडवांना वेदव्यासांनी उपदेश केल्यामुळे पांडव महादेवांच्या दर्शनासाठी या जागी आले. महादेवांनी एका मोठया महिषाचं रूप घेतलं व तिथून निघून जात असताना त्यांना ओळखून भीमाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी महादेवांनी पाताळात मुसंडी मारली अन त्यांचं वशिंड हे लिंग स्वरूपात या ठिकाणी राहिलं.
आगतान्निकटं दृष्ट्वा प्राविशं धरणी तदा।
तथाविधं मां दृष्ट्वा तु पृष्ठ देशे समागता॥
केदार संज्ञके देवि पस्पर्शु: पृष्ठकं शुभम्।
स्पर्शमात्रेण ते सर्वे विमुक्ता गोत्रहत्यया॥
(केदार खंड, अध्याय 52/5-7)
पांडवांना केदार क्षेत्री येताना बघताच भगवान शिवांनी पाताळात प्रवेश केला. महिषरूपी शिवांचा फक्त पृष्ठभागच पांडवांना बघायला मिळाला, पण त्याला स्पर्श करताच पांडव गोत्रहत्येच्या पापातून मुक्त झाले. आतापर्यंत आपण पाहिलेल्या चार केदारांच्या जागी महिषरूपी शिवांची विविध अंगं पूजली जातात. रुद्रनाथ मुख, कल्पेश्वर जटा, तुंगनाथ बाहू, मध्यमाहेश्वर नाभीप्रदेश अन पाताळात मुसंडी मारलेल्या शिवांचं मुख पशुपतिनाथला प्रकट झालं.
आदिशंकराचार्य हे महादेवांचा अवतार मानले जातात. महादेव आपला पुत्र स्कंद याला सांगतात की पृथ्वीवर कलियुगाचा प्रवेश झाल्यावर ते शंकर यतीचं (संन्याशाचं) रूप धारण करून लोककल्याणार्थ, नारद कुंडातून भगवान बद्रिनाथ मूर्ती बाहेर काढून तिची स्थापना करतील.
पुराणांत हेही म्हटलंय की महादेवांचा अवतार, शंकर यतींनी आठव्या वर्षी चार वेदांचं संपूर्ण ज्ञान प्राप्त केलं, बाराव्या वर्षी सर्व शास्त्र विशारद, सोळाव्या वर्षी अनेक भाष्यं लिहिली व केवळ बत्तिसाव्या वर्षी समाधी घेतली.
पांडवांनी निर्माण केलेल्या केदारनाथ मंदिराचं पुनरुज्जीवन आदिशंकराचार्यांनी केलं. उत्तराखंड, अर्थात केदारखंडातल्या जवळजवळ सर्वच मंदिरांचं पुनरुज्जीवन आदिशंकराचार्यांनी केलं. महाकवी कालिदास म्हणतात, आदिशंकराचार्य अकराव्या वर्षी बदरिकाश्रमात आले. ज्योतिर्मठी घोर तपश्चर्या केली, भगवतीचं दर्शन झालं, मग बदरिकाश्रमात येऊ न नारद कुंडातून बद्रिनारायणांची मूर्ती बाहेर काढून तिची स्थापना केली. नंतर वेद, उपनिषदं यावर भाष्य लिहिली व केदारनाथला प्रस्थान केलं. त्यानंतर केदारनाथ मंदिराचं पुनरुज्जीवन केलं अन बत्तीसाव्या वर्षी केदारनाथलाच समाधी घेतली.
आदिशंकराचार्यांचं समाधीस्थान केदारनाथ इथे होतं. 2013मध्ये झालेल्या महाप्रलयात ही समाधी वाहून गेली. मंदिराच्या भिंतींनाही त्याची झळ पोहोचली.
मंदिराच्या द्वारावर द्वारपाल शृंगी व भृंगी यांच्या मूर्ती विराजमान आहेत. गर्भगृहाच्या द्वारावर शैव मूर्ती आहेत, पंचमुखी. केदारनाथ बारा ज्योतिर्लिंगांमधलं अकरावं ज्योतिर्लिंग. मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडपात सर्वप्रथम दिसतात ते श्रीकृष्ण, पांडव, द्रौपदी यांच्या मूर्ती. मंदिराच्या अंतगृहात त्रिकोणाकृती शिवलिंग.
भैरवनाथ मंदिर
केदारनाथ मंदिराच्या काहीसं उंचावर,(साधारण 200 फूट) जिथून सरस्वती नदी उतरते, तिथे केदारनाथांचे क्षेत्रपाल भैरवाचं मंदिर आहे. याचं दर्शन घेतल्याशिवाय केदारनाथ यात्रा सफल होत नाही. इथल्या गुराखी, बकरवालांचं हे श्रध्दास्थान. आषाढ महिन्यात हे लोक भैरवनाथांना नेवैद्य, भोग अर्पण करतात.
केदारभूमीत मंदाकिनी, सरस्वती, क्षीरगंगा, मधुगंगा व स्वर्गगंगा या पाच नद्यांचा संगम होतो, असं हे परम पावन धाम.
क्षीरगंगा - मंदाकिनी नदी संगम होतो. या संगमापासून काही अंतरावर आहे हंस कुंड, ज्याच्या जलप्राशनाने ब्रह्मदेवांना हंसरूप प्राप्त झालं होतं, अशी कथा आहे.
मधुगंगा - क्षीरगंगेजवळच असणारी दुसरी नदी. हिचाही मंदाकिनीशी संगम होतो. या तीर्थाला क्राैंचहर तीर्थही म्हटलं जातं. या संगमावर स्नान करण्यामुळे कैलासप्राप्ती होते, असा विश्वास आहे.
स्वर्णगंगा - मधुगंगा व क्षीरगंगा यांच्या उगमस्थानाच्या मधून येणारी ही तिसरी नदी. स्वर्णगंगा वा स्वर्गद्वारी यात स्नान केल्यामुळे शिवसायुज्य प्राप्त होतं.
सरस्वती गंगा - स्कंद पुराणांतर्गत केदार खंडानुसार केदार क्षेत्रात वाहणारी ही परमपवित्र नदी. विष्णूच्या नाभीपासून उत्पन्न झालेली. सरस्वतीला सरस गंगाही म्हणलं जातं. केदार क्षेत्रातल्या ब्रह्मकुंडाजवळ विलीन होते. जो 'ओम् नमोनारायण' या मंत्राचा उच्चार करून सरस्वतीचं जल प्राशन करेल, त्याचा शतकोटी कल्पांपर्यंत पुनर्जन्म होत नाही, असं सांगितलं जातं.
सरस्वतीति विख्याता धारा परमपावना।
श्रविष्णोर्नाभितस्तत्र आयाति दुरितापहा॥
नमोनारायणेत्युक्ता मंत्रपूतं जलं पिबेत्।
न तस्य पुनरावृत्ति कल्पकोटि शतैरपि॥
(स्कंद पुराण, केदार खंड, अ. 43/ 8-9)
मंदाकिनी - केदारनाथ मंदिरामागच्या केदारनाथ पर्वतशिखराच्या पायथ्याशी असलेल्या चोराबारी ग्लेशिअरमधून मंदाकिनी नदीचा उगम झालाय. मंदाकिनीच्या जलस्नानामुळे शिवांशी एकरूप होण्याचं भाग्य लाभतं. मंदाकिनी - मंद मंद वाहणारी असा अर्थ. पण तिच्याच उत्पातामुळे 2013चा महाप्रलय घडला. सर्व काही नष्ट झालं, एक मंदिर सोडून..
मध्यमा या श्वेतवर्णा स्वर्गद्वारा प्रकीर्तिता।
महाजलौघा सुश्रोणी धारा मंदाकिनी मता॥
वात्सु स्नात्वा वरारोहे शिवसायुज्यमाप्नुयात।
कामतोऽकामतो वापि भक्तयाऽभक्त्यापि पार्वति॥
(केदार खंड, अ. 40/36-38)
चोराबारी ग्लेशिअरची दोन मुखं. त्यापैकी एका मुखातून (3,865 मी./12,680 फूट) मंदाकिनीचा उगम झालाय व दुसऱ्या मुखाशी (8,835 मी./12,582 फूट) तयार झालंय चोराबारी सरोवर. केदारनाथ गावापासून चार कि.मी. अंतरावर या तळयाच्या काठी महादेवांनी सप्तर्षींना योगविद्येचं ज्ञान सर्वप्रथम दिलं. याचं पूर्वीचं नाव कांती सरोवर. तसंच या ठिकाणी भैरव मंदिर आहे. त्याला लागूनच एक अरुंद घळ, जी भैरव उडी या नावाने प्रसिध्द. या ठिकाणाहून उडी मारल्यास मुक्ती मिळते, अशी भक्तांची श्रध्दा. पण ही प्रथा बंद करण्यात आली.
केदार क्षेत्री असणारी कुंडं
अमृत कुंड -मंदिराच्या पाठीमागे या कुंडात केदारेश्वराच्या स्नानानंतरचं जल पडतं, ते अमृत कुंड.
रेतस कुंड - सरस्वती नदी जिथून वाहते, ते स्थान.
हंस कुंड - जिथे ब्रह्मदेवांनी हंसरूप धारण केलं होतं. या ठिकाणी श्राध्दकर्म करण्याने जन्मजन्मांतरीच्या नरकात पडलेल्या पितरांना परमपदाची प्राप्ती होते. असं म्हणतात की भगवान शिव हातात त्रिशूल घेऊन, मस्तकावर अर्धचंद्र धारण करून, गळयात सर्पमाळा व बैलावर स्वारी करून सदैव या तीर्थक्षेत्री निवास करतात.
शिव कुंड, ब्रह्म कुंड, सरस्वती कुंड ही आणखी काही कुंडं केदार क्षेत्री असणारी.
शिव कुंड तीर्थाच्या उत्तर दिशेला आठ कि.मी. अंतरावर एका जलप्रपातामुळे तयार झालेलं वासुकी ताल/ सरोवर. या ठिकाणी वासुकी सर्पाचं अस्तित्व आहे असं मानलं जातं. या क्षेत्राला महापथ मानतात. जो कोणी इथे पोहोचतं, त्याचं मग मानवलोकात परत जाणं होत नाही. वासुकी तालजवळच शेषेश्वर महादेव आहे. (केदार खंड, अ. 42/66) जो श्रध्दाळू इथपर्यंत पोहोचतो, त्याला वासुकीचं दर्शन होतं असा विश्वास आहे. वासुकी सरोवरातून वासुकी गंगा (सोनगंगा) उगम पावून सोमद्वार (सोनप्रयाग)जवळ मंदाकिनीशी संगम पावते. वासुकी सरोवराच्या चार कि.मी. पुढे मनणी देवीचं मंदिर, जे आता भग्नावस्थेत आहे. याच्याच पुढे पैंया सरोवर. अत्यंत खोल. म्हटलं जातं की, या सरोवरात पैंया, पद्मवृक्षाची छाया दिसते, जवळपास कुठेही हा वृक्ष नसतानाही.
असा या केदार तीर्थाचा महिमा. अलौकिक व अद्भुत गोष्टींनी पुरेपूर असा हा आस्थेचा सर्वोच्च प्राण!
2013च्या महाप्रलयानंतर आताचं केदारनाथ
16-17 जून 2013ला महाप्रलयात साधारण घडलंय ते असं - सहा महिने झालेली प्रचंड बर्फवृष्टी, त्यानंतर आलेला पाऊस, केदारनाथच्या मागे, वर असणारा चोरबारी ग्लेशिअर हा अक्षरश: फुटला. हा ग्लेशिअर फुटल्यावर त्याच्यातील बर्फाने चोरबारी सरोवरातील पाण्याची पातळी वाढली व चोरबारी सरोवराच्या तटबंदीला भेगा पडल्या. याच ग्लेशिअरमधून मंदाकिनी नदीचा उगम होतो, जी उगमापासूनच भयंकर प्रपाती आहे. हा ग्लेशिअर फुटल्यावर मंदाकिनीही खूप भयंकररीत्या वाहू लागली. केदारडोम या शिखराचा एक कडा निखळून येऊन हिमप्रपात झाला. मंदाकिनी व हा हिमप्रपात व ग्लेशिअरमधील बर्फ आपल्याबरोबर सगळे मोठमोठे दगड घेऊन खाली आले.
2013च्या महाप्रलयानंतर केदारनाथ मंदिर व गाव याचं झालेलं आत्यंतिक नुकसान भरून काढायची तर गरज होतीच. NIM- Neharu Institute of Mountaineering, उत्तरकाशी या संस्थेचे प्रिन्सिपॉल कर्नल अजय कोठियाल - एक जिगरबाज आर्मी ऑॅफिसर. यांच्यावर केदारनाथला त्याचं मूळ स्वरूप पुन्हा प्राप्त करून देण्याची जबाबदारी टाकली अन त्यांनी ती स्वीकारली.
2004पासून तत्कालीन केंद्र सरकारने टाकलेल्या जबाबदारी अंतर्गत त्यांच्या देखरेखीखाली केदारनाथला अत्याधुनिक मशीनरी उतरवण्यात आली अन दुरुस्तीकाम सुरू झालं. गेल्या तीन वर्षांत सध्याचं केंद्र सरकार व उत्तराखंडाचं राज्य सरकार यांच्या सहयोगामुळे केदारनाथला जाण्याचा रस्ता पुन्हा बांधून काढण्यात आलाय. या मार्गावर रेनशेड, दुकानं बांधण्यात आली आहेत. तसंच जागोजागी टॉयलेट्सची सोय.
उद्ध्वस्त झालेल्या 48 घरांपैकी 35 घरांचं demolition करून ती नव्याने बांधण्यात आली आहेत. तसंच केदारनाथपर्यंतचा रस्ताही अतिशय मजबूत असा बांधला गेलाय. मंदाकिनी नदीचा प्रवाह केदारनाथ मंदिराला व गावाला पुन्हा हानी पोहोचवणार नाही, अशा पध्दतीने वळवण्यात आलाय. हे सगळं NIM, अजय कोठियाल, सध्याचं केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या अथक परिश्रमांचं फळ आहे, ज्यांना या कामगिरीवर नियुक्त करण्यात आलं.
आज रुद्रप्रयागपासून ते केदारनाथपर्यंत मंदाकिनीच्या प्रवाहात जागोजागी सुरक्षा भिंती बांधण्याचं काम चालू आहे, जेणेकरून पुन्हा काही झालं तर कमीत कमी नुकसान व्हावं.
गढवाल निगमन मंडळाने या डोंगरावर येणाऱ्या लोकांसाठी नवीन पध्दतीची, अनेक सोयीयुक्त बांधकामं, prefab huts, bunk beds, tents इ. उपलब्ध करून दिलंय. वयस्कर, आजारी लोकांसाठी मंदिर ते हेलिपॅड या मार्गावर बीच कार्ट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. हरिद्वार ते कर्णप्रयाग या मार्गावर, रेल्वेचा महत्त्वाकांक्षी व धाडसी प्रकल्प चालू झालाय. दुर्गम भागात रस्ते बांधण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जागोजागी सुरू केले गेलेत. हे सगळं गेल्या तीन वर्षांतलं काम आहे. अनेक हेलिपॅड तयार केली गेली आहेत.
2013च्या महाप्रलयात आदिशंकराचार्यांची समाधी वाहून गेली. त्यांची मूर्ती वाचवण्यात यश आलं अन त्या समाधी स्थानाचा शिलान्यास 20 ऑॅक्टोबर 2017 रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुन्हा करण्यात आला. मंदिराच्या मागे एक मोठी संरक्षक भिंत बांधण्यात येतेय, जेणेकरून पुन्हा केदारनाथला काही अघटित घडलं, तर मंदिराला काही होऊ नये. हजारो, लाखो भारतीयांचं श्रध्दास्थान असलेल्या या श्रेष्ठ ज्योतिर्लिंगाला काही होऊ नये, यासाठी हे प्रयत्न चालू आहेत.
या महाप्रलयात घडलेली एक अद्भुत गोष्ट - सगळं काही पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे कोसळत असताना, फक्त केदारनाथ मंदिर सुरक्षित राहिलं. त्यातही आतमध्ये खूप वरपर्यंत पाणी होतं. थोडयाशा नुकसानावर निभावलं. केदार शिखरांमधून एक अजस्र शिला वाहत येऊन मंदिराच्या पाठीमागे येऊन थांबली अन त्यामुळे मंदाकिनीचा प्रवाह विभागला गेला व ती मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वाहत गेली, मंदिराला धक्का पोहोचला नाही.
असा हा पंचकेदारांमधला सर्वोच्च केदार, त्याच्या स्थानावर अढळ असा. लाखो, करोडो भाविकांच्या आस्थेचं सर्वोच्च स्थान.
ये वदंत्यापि केदारं गमिष्यामि इति क्वचित्।
पितरस्तस्यादेवेशि त्रिशतं कुलसंयुक्ता॥
गच्छति शिवलोके तु सत्यं सत्यं न संशय:॥
(केदार खंड, अ.41/ 9-10)
॥शुभं भवतु॥