केदारनाथ

10 Jul 2018 15:26:00


 

केदार तीर्थासंबंधी असं म्हटलं गेलंय की, केदार क्षेत्रासारखं कोणतंही क्षेत्र नाही अन केदार तीर्थासारखं कोणतंही तीर्थ नाही. केदार तीर्थाच्या महत्त्वासंबंधी समजावून सांगताना महर्षी वेदव्यासांनी पांडवांना केदार तीर्थाची यात्रा करण्याचा उपदेश केला होता.

Z केदारात्परं स्थानं न केदारात्परम तप।

न केदारोत्परो मोक्ष: स्वयं देवेन भाषितम्॥

(केदार कल्प श्लोक 3, दशम पटल)

जवळजवळ सर्वच पुराणांत हिमालयातल्या तीर्थक्षेत्रांचं वर्णन मिळतं. ब्रह्म पुराणात तर उत्तराखंड तीर्थांचं चारही युगांच्या क्रमाने वर्णन मिळतं. पद्म पुराणाच्या सृष्टी खंडात व उत्तर खंडातही इथल्या तीर्थांचं वर्णन आढळतं. स्कंद पुराणांतर्गत केदार खंडात केदार हिमालयातल्या सर्व तीर्थांचा उल्लेख केलाय.

केदार तीर्थासंबंधी असं म्हटलं गेलंय की, केदार क्षेत्रासारखं कोणतंही क्षेत्र नाही अन केदार तीर्थासारखं कोणतंही तीर्थ नाही.

क्षेत्राणाम्च तथा प्रोक्तं क्षेत्रं केदारसंज्ञितम्।

केदार क्षेत्रमाख्यातं तीर्थानां तीर्थमत्तुमम्॥ (स्कंद पुराण, केदार खंड, अध्याय 41/14,42/42)

केदार तीर्थाच्या महत्त्वासंबंधी समजावून सांगताना महर्षी वेदव्यासांनी पांडवांना केदार तीर्थाची यात्रा करण्याचा उपदेश केला होता. महाभारत युध्दात झालेल्या गोत्रहत्यांच्या, ब्रह्महत्यांच्या पापातून मुक्त होण्यासाठी काय उपाय आहे? काय कर्मं केली असता या पापांतून मुक्ती मिळेल? याबद्दल पांडवांनी महर्षी वेदव्यासांना विचारलं.

महर्षी वेदव्यासांनी पांडवांना उपदेश केला की, केदार तीर्थाचं दर्शन घेतल्याशिवाय गोत्रहत्येच्या पापातून मुक्ती मिळणार नाही. ब्रह्मादी देवताही शिवदर्शनाच्या लालसेने केदार तीर्थ धाम यात्रा करतात. या तीर्थात गंगा, मधुवर्णा, क्षीरवर्णा, श्वेतवर्णा, सुचिवर्णा या धारा वाहतात. भगवान शिव इथे गणेशादी देवांकडून सेवित होतात. या क्षेत्रात जो आपला जीव त्यागतो, त्याला निश्चितच शिवलोकाची प्राप्ती होते. अनेक तीर्थांनी युक्त केदार तीर्थ हे मोक्षदायी असं आहे. अन हे माहात्म्य ऐकवून वेदव्यासांनी पांडवांना उपदेश केला की ब्रह्महत्या निवारणार्थ केदार तीर्थयात्रा करा.

गच्छध्वं त्रिदशस्थानं महापथसमीरितम्।

एतदेव परं स्थानं ब्रह्महत्या निवारणम्॥

(स्कंद पुराण,केदार खंड अ 40 / 24)

केदार तीर्थाचा हा महिमा. हा आस्थेचा सर्वोच्च प्राण -केदारनाथ!

एकदा पार्वतीने प्रश्न विचारला, ''हिमालयातलं सर्वात उत्तम तीर्थ कोणतं?''

महादेव स्वत: सांगतात, ''समस्त तीर्थांमध्ये केदार तीर्थ अपूर्व आहे, जे मनोकामना पूर्ण करणारं व क्षेत्रांमध्ये परम क्षेत्ररूप, केदार तीर्थ उत्तम तीर्थ!''

अपूर्वं सर्वतीर्थानां मनसोऽभीष्ट्दायकम्।

क्षेत्रं तु परमं देवि केदारं तीर्थमुत्तमम्॥

(केदार कल्प सप्तम: पटल, श्लोक 12)

अत्यंत प्राचीन असं केदार क्षेत्र.. कालातीत असं..

आपण मध्यमाहेश्वरहून उतरून येऊन पुन्हा उखीमठला येतो. उखीमठला मुक्काम करून केदारनाथच्या दिशेने प्रवास करतो.

उखीमठ ते कुंड हा रस्ता अतिशय सुरेख असा. जंगलांतून जाणारा. कुंड हे छोटंसं गाव उखीमठपासून 16 कि.मी. अंतरावर. आता 2013च्या महाप्रलयानंतर, केदारनाथच्या मार्गावरील काही छोटया गावांमध्ये केदारनाथला जाण्यासाठी हेलिपॅड उभी केली आहेत. अगस्त्यमुनी, फाटा, कुंड, नाला, रामपूर, सीतापूर या गावांतूनही हेलिकॉप्टर्सनी जायची सोय आहे.

आपण जेव्हा रुद्रप्रयागहून केदारनाथकडे जातो, तेव्हा वाटेत लागतं ते अगस्त्यमुनी हे गाव.

या ठिकाणी ऋ षी अगस्त्य यांनी तपश्चर्या केली होती, असं मानलं जातं. जेव्हा देवतांच्या भयाने समस्त दानव सागरतळाशी जाऊन लपले होते, तेव्हा देवतांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन अगस्त्य मुनींनी समुद्र एका आचमनात पिऊन टाकला होता अन सागर शोषणाच्या पापापासून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. तेव्हापासून याचं नाव अगस्त्यमुनी असं पडलं.

अगस्त्यमुनी आपली पत्नी लोपामुद्रा हिच्यासमवेत इथे राहू लागले. इथे अगस्त्यमुनींचं प्राचीन मंदिर आहे, जिथे त्यांची ताम्रमूर्ती विराजमान आहे. शेजारी नवग्रह आहेत. तसंच त्यांच्या दोन शिष्यांच्या मूर्तीही आहेत. अगस्त्यमुनीपासून 19 कि.मी. अंतरावर कुंड हे गाव आहे. कुंड येथूनच केदारनाथ, बद्रिनाथ, रुद्रप्रयागहून येणारे-जाणारे यात्रेकरू येऊन पुढे जातात.

कुंडहून आपण येतो गुप्तकाशी येथे. गुह्य वाराणसी.

कुंडहून चक्राकार मार्गाने 5 कि.मी. अंतर पार केल्यावर येतं गुप्तकाशी.

पुराणांत याचं वर्णन गुह्य वाराणसी असं केलंय.

केदारे दक्षिणे भागे योजनष्टके।

गुह्यं वाराणसीक्षेत्रं योजनद्वयविस्तृतम्॥

इदं स्थानं गुह्यतमं यतो गुप्तेति काशिका।

यस्या: संस्मरणादेव नश्यन्ति परमापद॥

(स्कंद पुराण 244, केदार खंड 200/15.17)

पाच हजार फूट उंचीवर. गुप्तकाशीत भगवान विश्वनाथांची व भगवान अर्धनारीनटेश्वराची प्राचीन मंदिरं आहेत, जी प्राचीनकालीन पाषाणकलेचं दर्शन घडवतात. विश्वनाथ मंदिरात भगवान विश्वनाथांचं स्वयंभू लिंग आहे. इथे मणिकर्णिका नावाचं कुंड आहे, ज्यात गणेशमुखातून गंगा व यमुना नावाच्या दोन जलधारा वाहतात. पुराणांच्या मान्यतेनुसार गंगा-यमुना या इथे गुप्त रूपाने राहतात. यांत स्नान केल्यामुळे मनुष्यास दुर्लभ अशी मुक्ती प्राप्त होते..

तत्र गंगा च यमुना गुप्ते तिष्ठत ईश्वर।

तत्र य: स्नाति मनुजो मुक्तिं प्राप्नोति दुर्लभाम्॥

माघ मासि महाभाग मकरस्थे दिवाकर।

योत्र कुंभवम स्नाति फलं किं वै वदाम्यहम्॥

सुस्नात: सर्वतीर्थेषु सगंगासागरादिषु।

सप्तदीपवती चैव वसुधा रत्नपूरिता॥

(स्कंद पुराण 244, केदार खंड अध्याय 200/18-119,21-22)

असं म्हणतात की प्राचीन काळी इथे भगवान शिवांच्या दर्शनार्थ ऋषींनी तपश्चर्या केली होती.

महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यानुसार पांडव जेव्हा महादेवांच्या दर्शनासाठी सर्वप्रथम काशी-वाराणसी क्षेत्री गेले, तेव्हा त्यांना महादेवांचं दर्शन झालं नाही, कारण महादेव काशी क्षेत्रातून गुप्तकाशीला गुप्त रूपाने वास्तव्य करत होते. त्यामुळे या स्थानाचं नाव 'गुप्तकाशी' असं पडलं. त्यानंतर पांडव जेव्हा केदार क्षेत्री आले, तेव्हाही महादेवांनी त्यांना दर्शन दिलं नाही. ते गुप्तच राहिले.

या तीर्थाची फलश्रुती वाचल्यामुळे वा ऐकण्यामुळे सर्व पापांचा नाश होऊन काशीदर्शनाचं फळ मिळतं, असं मानलं जातं.

इदं वाराणसी तुल्यं क्षेत्रं चैव द्वियोजनम्।

यस्य श्रावणमात्रेण दहयन्ते पापराशय॥

श्रुणुयाच्च पठेद्यस्तु गुप्तवाराणसीभवम्।

माहात्म्यं सर्वपापघ्नं काशीदर्शफलं व्रजेत॥

(स्कंद पुराण 246, केदार खंड 200/ 37-38)

गुप्तकाशीजवळ बामसू व शोणितपूर ही गावं आहेत. असं मानलं जातं की, राजा बलीपुत्र भौमासूर याची राजधानी बामसू व बाणासूर याची राजधानी शोणितपूर ही होती.

गुप्तकाशीहून साधारण आठ कि.मी. अंतरावर आहे ते फाटा गाव. समुद्रसपाटीपासून 5250 मीटर उंचीवर वसलेलं. याच्या जवळ जामू नावाचं गाव, महर्षी जमदग्नी व रेणुका यांनी पुत्रप्राप्तीसाठी येथे तपश्चर्या केली होती. तेव्हा स्वतः भगवान विष्णू रेणुकेच्या गर्भात प्रकट झाले, अन परशुराम अवतार प्रकट झाला.

हे संपूर्ण क्षेत्र पूर्वकाली महिषासुराच्या आधिपत्याखाली होतं. त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश व समस्त देवतांच्या तेजातून देवी महिषासुरमर्दिनी इथेच प्रकट झाली. त्यामुळे तिचं एक नाव शैलपुत्री हेही आहे.

पांडवांना गोत्रहत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी केदारनाथचं दर्शन घ्यावं, हा उपदेश महर्षी वेदव्यासांनी पांडवांना केला, त्याचप्रमाणे रावणवधानंतर श्रीराम, गुरू वसिष्ठ यांच्या उपदेशामुळे उत्तराखंडातल्या तीर्थांच्या यात्रेला निघाले. सर्वप्रथम हृषीकेशला दोन वर्षं वास्तव्य केल्यावर ते देवप्रयागला वर्षभर तपस्यारत राहिले. त्यानंतर वसिष्ठ, सीता व लक्ष्मण यांच्यासमवेत ते केदार तीर्थाला आले. या ठिकाणी वसिष्ठ मुनींनी श्रीरामांकडून केदारनाथला विधिवत अभिषेक करवला.

वसिष्ठश्च ययै यत्र रामो महामुनि।

कारयामास विधिवदभिषेक महामुनि॥

सकृत्केदार भवनं गत्वा मुच्येत बंधनात।

धन्या: सुकृतिनो लोके येत्र वासं प्रकृर्वत॥

न ते स्तनंघया विप्रा जायंते हि पुनर्द्विजा॥

(स्कंद पुराण 251,केदार खंड 206/28-30)

फाटा गावापासून साधारण पाच कि.मी. अंतरावर रामपूर नावाचं गाव आहे वा त्यापासून दोन कि.मी. अंतरावर सीतापूर हे गाव. या नावांवरून असा तर्क करता येतो की केदार तीर्थाला जाताना या दोन्हीही ठिकाणी अनुक़्रमे श्रीराम व सीता यांचं वास्तव्य काही काळ झालं असावं, म्हणूनच रामपूर व सीतापूर अशी नावं पडली..

सीतापूरहून पुढे उजव्या हाताला प्रशस्त होत जाणाऱ्या मार्गाने गेल्यावर सोनप्रयाग/सोमप्रयाग हे स्थान येतं. इथे वासुकी सरोवरातून उगम पावणारी वासुकी/सोन गंगा व मंदाकिनी या नद्यांचा संगम होतो, अन या जागेला सोमद्वार म्हणतात. या जागी सोमदेवांनी तपश्चर्या केली होती, असं सांगितलं जातं.

सोनप्रयागपासून पाच कि.मी. अंतरावर आहे गौरीकुंड.

2013मध्ये झालेल्या महाप्रलयात गौरीकुंड संपूर्ण नष्ट झालं. गौरीकुंड हे केदारनाथ यात्रेचं सुरुवातीचं स्थान. इथूनच केदारनाथच्या चढाईला सुरुवात होते (होत होती).

गौरीकुंड - समुद्रसपाटीपासून 6500 फूट उंचीवर असलेलं. या ठिकाणाहून केदारनाथचा पायी चालण्याचा मार्ग चालू व्हायचा. आता लायनचुली या ठिकाणावरून हा मार्ग नेण्यात आला आहे.

गौरीकुंड हे सतत गजबजलेलं - यात्रेकरू, पोर्टर्स, गाईड, घोडे, खेचरं व त्यांचे मालक या सर्वांनी गजबजलेलं असं ठिकाण. म्हटलं तर केदारनाथचा बेस कँपच.

हा संपूर्णपणे जुना रस्ता. तो कसा होता हे माहीत असावं, यासाठी ही माहिती.

या रस्त्याचं नैसर्गिक सौंदर्य अफाट असं होतं. बांधीव, पायऱ्या पायऱ्यांच्या रस्त्यानं चालताना खळाळती मंदाकिनी उजव्या बाजूने आपल्याला सोबत करणारी. तसंच घनदाट जंगल, विविध वनस्पती व वाटेतले झरे, धबधबे यामुळे हा मार्ग अत्यंत सुखद असा.

जसं जसं आपण चढाईला सुरुवात करून चालायला लागतो, तसं तसं आपल्या उजव्या बाजूने वाहणारी मंदाकिनी नदी, घनदाट जंगल व उंच उंच वृक्ष, जणू तपश्चर्या करत असणारे.. हे निसर्गचित्र चालायला प्रोत्साहित करणारं.

गौरीकुंड हे सर्वसिध्दिदायक असं तीर्थ. या स्थानी भगवती गौरीने ऋतुस्नान केलं होतं, तेव्हापासून याचं नाव 'गौरीकुंड' असं पडलं.

त्रिगव्यूतौ माम्स्थानाद्दि्क्षणे श्रुणु तीर्थकरम्।

गौरीतीर्थमिदं 'यातं सर्वसिध्दि प्रदायकम्॥

यत्र त्वया महेशानि मन्दाकिन्यास्तटे पुरा।

ऋतुस्नान कृतं तद्वै गौरीतीर्थमिति स्मृतम्॥

(स्कंद पुराण 45केदार खंड 42/46-48)

गौरीकुंड या ठिकाणी दोन कुंडं - एक थंड पाण्याचं व एक तप्त पाण्याचं कुंड आहे. इथेच पार्वतीचं मंदिर आहे. शीतल जलकुंडाला अमृत कुंडही म्हणतात, ज्यातून गोमुखावाटे पाण्याची धार प्रवाहते. कुंडाच्या दक्षिणेला उमा महेश्वर शिला आहे. याच्याजवळ गौरी, राधा-कृष्ण व ज्वाला भवानी यांच्या मूर्ती आहेत. तप्त कुंडाजवळच खाऱ्या पाण्याचं कुंड. असं म्हणतात की या कुंडातच गौरीने स्नान केलं होतं.

गौरीकुंडहून 14 कि.मी. चढून गेल्यावर आपण केदारनाथला पोहोचतो.

2013मध्ये जून महिन्यात झालेल्या महाप्रलयात गौरीकुंड संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ऐन यात्रेच्या हंगामात झालेला हा महाप्रलय अनेक यात्रेकरू, स्थानिक लोक, गाढवं, खेचरं, घोडे यांना गिळून गेला. आता गौरीकुंड या जागेचं नावनिशाणही नाही.

गौरीकुंडहून चालायला सुरुवात केल्यावर तीन कि.मी.वर आहे भैरव मंदिर, ज्याला चीरबासा भैरव हे नाव आहे. भैरव हा केदारनाथांचा क्षेत्रपाल. (आता हेही नष्ट झालंय.)

पुढे येते ती जंगल चट्टी. थोडी विश्रांती घेऊन चालायला सुरुवात केल्यावर येतं ते रामबाडा.

रामबाडा

चीरबासापासून चार कि.मी. अंतरावर रामबाडा नावाचं गाव - वस्ती म्हणू या. गौरीकुंड ते केदारनाथ या मार्गावरील निम्म्या अंतरावर वसलेलं हे गाव. केदारनाथचं दर्शन घेऊन लोक परत येऊन रामबाडा येथे मुक्काम करत असत, कारण केदारनाथला अतिथंडी असते, त्यामुळे रामबाडयाला येऊन थांबणं हे सोयीचं होतं.

रामबाडयाला राहाण्याच्या अनेक सोयी होत्या. धर्मशाळा, गेस्ट हाउसेस, स्थानिक लोकांनी त्यांच्या घरांत केलेल्या सोयी.

2013च्या महाप्रलयात रामबाडा हे गावही नष्ट झालं, त्याचंही नावनिशाण राहिलं नाही. ज्या दोन दिवसांत हे भयंकर तांडव झालं, त्या दोन दिवसांत रामबाडा येथे हजारोंच्या संख्येनं यात्रेकरू उपस्थित होते. मोजक्या लोकांचे जीव वाचले.

रामबाडाहून पुढे काही अंतर गेल्यावर लागते ती गरुड चट्टी. चट्टी म्हणजे विश्रांतीचं ठिकाण. ही देवदर्शनी आहे. या जागेवरून केदारनाथचं पहिलं दर्शन होतं अन उलटया दिशेला, समोरच्या पर्वतामध्ये दिसतं ते त्रियुगी नारायण. ज्या ठिकाणी महादेव व पार्वती यांचा विवाह झाला, ते ठिकाण. या ठिकाणी तीन युगांपासून पेटलेलं होमकुंड - जे स्थानिक लोकांनी तेवतं ठेवलंय, हे या जागेवरून अस्पष्टसं दिसतं.

रामबाडयाहून 7 कि.मी.वर आहे केदारनाथ.

सोनप्रयाग, गौरीकुंड, रामबाडा व केदारनाथ असा एकंदर 20 कि.मी. प्रवास. त्यापैकी केदारनाथच्या पायथ्याशी गौरीकुंडहून हा 14 कि.मी. पायी चालण्याचा रस्ता, जो वर चढत जाऊन छोटयाशा केदारनाथ गावात संपणारा. धर्मशाळा, सध्या झालेली हॉटेल्स यांची गर्दी. ज्या वेळी सहा महिने ही सगळी मंदिरे बंद असतात, त्या वेळी रहिवासी स्थानिक लोक खाली असलेल्या रामपूर, सीतापूर, सोनप्रयाग, उखीमठ, गुप्तकाशी या गावांत राहातात. यात्रेच्या वेळी सहा महिने गौरीकुंडला राहातात. केदारनाथ मंदिराच्या मागे उभा हिमालय, मागे असलेली संपूर्ण केदार रेंज, केदारडोम, केदार व सुमेरू ही शिखरे दिसतात अन जवळ आहे ते चोरबारी सरोवर. आता नामकरण केलेलं गांधी सरोवर.

हे चोरबारी सरोवर चोरबारी ग्लेशिअरमुळे तयार झालंय. अन गांधीजींची रक्षा विसर्जन केल्यामुळे त्याला आता गांधी सरोवर हे नाव दिलंय. सहा महिने ही मंदिरे अमाप बर्फवृष्टीमुळे बंद असतात अन अक्षय्यतृतीयेला उघडतात व भाऊबीजेच्या दिवशी बंद होतात. गंगोत्री व यमुनोत्री यानंतर दोन दिवसांनी केदारनाथची कवाडं उघडतात व नंतर दोन दिवसांनी बद्रिनाथची कवाडं.

महाप्रलयात साधारण घडलंय ते असं - सहा महिने झालेली प्रचंड बर्फवृष्टी, त्यानंतर आलेला पाऊस, केदारनाथच्या मागे, वरती असणारा 'चोरबारी ग्लेशिअर' हा अक्षरश: फुटला. हा ग्लेशिअर फुटल्यावर त्याच्यातील बरर््फाने चोरबारी सरोवरातील पाण्याची पातळी वाढली व चोरबारी सरोवराच्या तटबंदीला भेगा पडल्या. याच ग्लेशिअरमधून मंदाकिनी नदीचा उगम होतो, जी उगमापासूनच भयंकर प्रपाती आहे. हा ग्लेशिअर फुटल्यावर मंदाकिनीही खूप भयंकररीत्या वाहू लागली. केदारडोम या शिखराचा एक कडा निखळून येऊनहिमप्रपात झाला. मंदाकिनी व हा हिमप्रपात व ग्लेशिअरमधील बर्फ आपल्याबरोबर सगळे मोठमोठे दगड घेऊन खाली आले.

एखादा हिमकडा जेव्हा तुटतो, त्याचे तुकडे तुकडे जेव्हा होतात, तेव्हा हत्तीएवढया मोठया दगडांचा खच होतो. हे दगड वेगाने खाली येतात अन आपल्याबरोबर इतर अनेक कडे ढासळायला मदत करतात. हिमालयाचं स्वरूप पाहिलं तर अतिशय फ्रॅजाईल असा, ठिसूळ अशा ग्रॅनाईटने तयार झालेला.. अन लाखो वर्षांपासून बर्फ साचत गेलेला. त्यावर हा बर्फ भुसभुशीत होऊन तोही खाली घसरतो. या तिन्ही कारणांमुळे चोरबारी ग्लेशिअर, मंदाकिनी व प्रचंड पावसामुळे झालेला हिमप्रपात हे सगळं या विध्वंसाचं कारण आहे. 16 व 17 जून 2013 या दोन दिवसांत हाहाकार माजवला..

सध्याचा नवीन मार्ग आहे तो सीतापूरपासून केदारनाथपर्यंत असा आहे. साधारण 21 कि.मी.चा हा मार्ग.

Nehru Institute Of Mountaineering (NIM)च्या अथक परिश्रमांनंतर हा मार्ग जेवढया लवकर सुस्थापित करता येईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न केला गेला. एकंदर नवीन अकरा मार्ग शोधले गेलेत. पण त्यापैकी सध्या वापरला जाणारा हा सोपा असा.

सध्याचा मार्ग

गौरीकुंड - 6 कि.मी. रामबाडा पूल - 4 कि.मी.- जंगलचट्टी -3 कि.मी. - भीमबाली - 4 कि.मी. - लायनचुली - 4 कि.मी. -केदारनाथ बेस -1 कि.मी. - केदारनाथ मंदिर.

आणखी दोन मार्ग उपलब्ध आहेत, पण फारसे वापरले न जाणारे...

1) - चौमासी - खाम - रामबाडा - केदारनाथ 18 कि.मी.

2) - त्रियुगीनारायण - केदारनाथ 15 कि.मी.

आता आपण येऊन पोहोचलोय आस्थेच्या अत्युच्च प्राणाच्या दर्शनासाठी. केदारनाथच्या दर्शनाची अभिलाषा तर आहेच, त्याचबरोबर मंदिर  निर्माण, त्याचा इतिहास व त्याबद्दलची आत्यंतिक आस्था, तसंच 2013नंतर केदारनाथकडे जाणाऱ्या मार्गाचं  पुनर्निर्माण कसं केलं गेलं, त्यामागचे अफाट कष्ट, अचूक निर्णय हे सर्व बघू या,

शेवटच्या भागात...

Pourohitamita62@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0