अमेरिकन विद्यालये आणि हिंसाचार

09 Jun 2018 13:10:00

देशाच्या जन्मापासून - म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीपासून बंदुका सहज उपलब्ध करणाऱ्या अमेरिकेत गेल्या शतकाच्या शेवटापासून, विशेषतः शाळांमधील हिंसाचार धोकादायक पध्दतीने वाढलेला आहे. उपलब्धता हे जसे त्याचे एक आणि प्रमुख कारण, शस्त्रास्त्र उद्योगांनी त्याचे केलेले बाजारीकरण आणि पर्यायाने स्वार्थी राजकारण ही इतर कारणे आहेत, तसेच शेवटी व्यक्तीच्या आणि पर्यायाने समाजाच्या जडणघडणीत त्याचे मूळ आहे.

 संसारीं दु:खसंमंध। प्राप्त होतां उठे खेद।

कां अद्भुत आला क्रोध। तो तमोगुण॥

शेरीरीं क्रोध भरतां। नोळखे माता पिता।

बंधु बहीण कांता। ताडी, तो तमोगुण॥

दुसऱ्याचा प्राण घ्यावा। आपला आपण स्वयें द्यावा।

विसरवी जीवभावा। तो तमोगुण॥

भरलें क्रोधाचें काविरें। पिश्याच्चापरी वावरे।

नाना उपायें नावरें। तो तमोगुण॥

आपला आपण शस्त्रपात। पराचा करी घात।

ऐसा समय वर्तत। तो तमोगुण॥

- दासबोध, दशक दुसरा, समास सहावा, श्लोक 2 ते 6

 मानवी मन आणि त्याला अनुसरून असलेले मानवी/वैयक्तिक आचार-विचार ह्यांचा मूलभूत ऊहापोह करताना भारतीय संस्कृतीत हजारो वर्षे फक्त तीनच मूलभूत तत्त्वे सांगितली गेली आहेत - सत्त्व, रज आणि तम. आज आत्यंतिक राजसिक असलेल्या आणि म्हणून ज्याचे कळत-नकळत जगाला आकर्षण असलेल्या अमेरिकन समाजातील वैयक्तिक हिंसा बघताना वर दासाबोधात सहजपणे सांगितलेली तामसिकता प्रकर्षाने दिसते. पण या तामसिकतेच्या मुळाशी काय आहे, याचा विचार केवळ अमेरिकन जीवनापुरताच अथवा समाजापुरता मर्यादित राहू शकत नाही.

18 मे 2018, सँता फे हायस्कूल, सँता फे, टेक्सास - 17 वर्षांचा एक विद्यार्थी दिमित्री पेगोर्त्झीस नेहमीप्रमाणे शाळेत आला, पण येताना वडिलांच्या मालकीच्या दोन बंदुका आणि काही पाईप बाँब्ज घेऊन आला. एकीकडे पाइप बाँब उडवत दुसरीकडे बेछूट गोळीबार करत 10 निष्पापांचा जीव घेतला. त्यात एक विद्यार्थी देवाणघेवाण/प्रवास कार्यक्रमाखाली (student exchange programखाली) तात्पुरती आलेली एक पाकिस्तानी 17 वर्षीय साबिका शेख होती, आणखी 7 समवयीन मुले, त्याच दिवशी गरज आहे म्हणून तात्पुरती आलेली substitute teacher आणि आणखी एक शिक्षिका होती. त्या व्यतिरिक्त 13 जण जखमी झाले.

त्या आधी याच वर्षात 13 फेब्रुवारीस पार्कलँड, फ्लोरिडा येथे 19 वर्षांचा एक मुलगा (निकोलस क्रूझ) बंदूक घेऊन शाळेत आला - 17 जणांचा हकनाक बळी गेला, तर 14 जण जखमी झाले.

या दोन घटनांच्या मध्येदेखील 8 'लहान' घटना या शाळेत अथवा विद्यापीठात घडल्या, ज्यामध्ये 7 जीव गेले, तर 14 जण जखमी झाले. आंतरजालीय ज्ञानकोश - विकिपीडियापासून ते न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी आदी आणि बहुतांशी सर्वच अमेरिकन प्रसारमाध्यमांनी यावर रकानेच्या रकाने भरून लिहिलेले दिसते. सीएनएन वृत्तवाहिनीच्या व्याख्येनुसार या वर्षात 22 वेळा, तर न्यूयॉर्कचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग यांनी स्थापन केलेल्या Every Town for Gun Safety या संघटनेच्या व्याख्येनुसार केवळ या वर्षात 40हून अधिक गोळीबार झालेले आहेत.

कुठलेही सुजाण मन विषण्ण होईल अशा या दुर्घटना आहेत आणि सामान्य अमेरिकन मन त्याला अपवाद आहे असे म्हणता येणार नाही. तरीदेखील अमेरिकन समाज हा शाळेतील गोळीबार आणि एकंदरीतच बंदुकांमुळे होणारा सामाजिक हिंसाचार या संदर्भात दुभंगलेला राहिलेला आहे.

त्याच्या मुळाशी जायचे असेल, तर अमेरिकन स्वातंत्र्ययुध्द आणि त्यानंतर तयार झालेली लोकशाही आणि अमेरिकन राज्यघटना (US Constitution) इथपासून ते अर्थकारण, समाजकारण, राजकारण आणि आधुनिक समाज या सर्वांचाच विचार करायला लागेल. हा विचार करत असताना आपले - म्हणजे भारतीय मनाचे आणि सामान्य भारतीय व्यक्तीवरील संस्कार डोक्यात न ठेवता अलिप्तपणे बघणे जरुरीचे आहेत. उद्देश हा की त्यातून हे अमेरिकन वास्तव समजू शकेल.

अमेरिकन राज्यघटना - घटना दुरुस्ती 2

अमेरिकन स्वातंत्र्य 4 जुलै 1776 रोजी घोषित झाले. पण अमेरिकन राज्यघटनेचा उदय 1789 साली झाला. या देशाने स्वातंत्र्याच्या पहाटेपासून जनतेला सर्वार्थाने स्वातंत्र्य दिले. या राज्यघटनेमधील प्रमुख 'घटना दुरुस्ती' 1791पर्यंत झाल्या. या प्रमुख 10 घटना दुरुस्त्या या अमेरिकन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. यातील दुसरी घटना दुरुस्ती जी केली गेली, ती म्हणजे Right to bear arm अर्थात सामान्यांचा शस्त्रे बाळगण्याचा हक्क. ही दुरुस्ती म्हणते, 'A well-regulated Militia, being necessary to the security of a free state, the right of the people to keep and bear Arms, shall not be infringed.' म्हणजे, जर राज्य आणि जनता स्वतंत्र राहायला हवी असेल, तर जनतेला शस्त्र बाळगण्याचा आणि वापरायचा हक्क असायला हवा. थोडक्यात - जर घटनेच्या विरोधात जाणारे राज्य आले, तर जनता अशा सरकारशी दोन हात करायला सज्ज असली पाहिजे.

अमेरिकन राहणीमान

अमेरिका ही जशी बोस्टन, न्यूयॉर्क, शिकागो, लॉस एन्जेल्स आणि अशा अनेक शहरांमुळे अथवा शहरी राज्यांमुळे, घनदाट वस्तींमुळे तयार झालेली आहे, त्याहूनही अधिक इथल्या ग्रामीण आणि विरळ वस्तींच्या भूभागानेसुध्दा तयार झाली आहे. असे प्रदेश हे कुठल्याही आधुनिक सोयीपासून दूर असतात. जवळ असणारे वन्य प्राणी, तसेच चोर-लुटारू आदींपासून संरक्षण करण्यासाठी अशा प्रदेशातील नागरिकांना हत्यारांची गरज असते. त्यामुळे अशा भागात बंदुका असणे पूर्वापार नैसर्गिकच झाले आहे.

शस्त्रास्त्रांचे अर्थकारण

अमेरिकन व्यापारी वृत्तीत ग्राहकता वाढवण्यासाठी सातत्याने नवीन उत्पादने आणणे हे सतत चालते. त्याचा परिणाम सर्व जगावर झालेला आहे. विशेषतः अत्याधुनिक फोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यामुळे तो खूपच होत चाललेला दिसतो. मात्र नानाविध प्रकारच्या बंदुका तयार करणारे उद्योग यांना सतत ग्राहकपेठ तयार करणे हे गरजेचे ठरले आहे. आज शस्त्रास्त्रांचा अमेरिकन अर्थकारणावरील प्रभाव हा सुमारे 52 अब्ज डॉलर्स इतका आहे आणि त्यातून काही लाखांच्या घरात रोजगार तयार होतात. त्यातून सरकारसाठी सुमारे 71 कोटी डॉलर्सच्या घरात करवसुली होते! थोडक्यात शस्त्रास्त्र ही नुसतीच वापरायची साधने नसून ते अर्थकारणातील एक महत्त्वाचा भाग आहे.

National Rifle Association (एन आर ए)

अर्थकारण तसेच अमेरिकन तत्त्व - अर्थात वर उल्लेखलेली दुसरी घटना दुरुस्ती राखण्यासाठी National Rifle Association (एन आर ए) या संघटनेने अमेरिकाभर स्वत:चे जाळे पसरवले आहे. सामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत आणि दोन्ही बाजूंच्या राजकीय विचारांच्या अनेक व्यक्ती त्याचे सदस्य आहेत.

कायदे आणि राजकारण

धूम्रपान आणि मद्यवापरासाठी 21 वर्षे वय असणे सक्तीचे ठेवणारे अमेरिकन कायदे हे बंदुका मात्र 18व्या वर्षी घेऊन देतात. अनेक ठिकाणी बंदुका घेण्यास गेल्यावर 3 दिवस वाट पाहावी लागते. त्या काळात त्या व्यक्तीबद्दलची माहिती शोधली जाते आणि योग्य वाटले तरच बंदूक विकत दिली जाऊ शकते. पण असल्या कायद्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस बंदूक विकणे अथवा एखाद्या ट्रेड शोमध्ये बंदूक विकत घेणे मुक्त ठेवले गेले आहे. परिणामी ज्यांना बंदुका हव्या आहेत त्यांना त्या मिळवण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत.

बंदुका या विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण अमेरिकन जीवनाचा अघोषित पण अविभाज्य घटक आहेत. पण तसेच त्या शहरी वातावरणातदेखील सहज उपलब्ध असतात. अमेरिका हे संघराज्य असल्याने प्रत्येक राज्यात बंदुकांच्या संदर्भातील कायदे आणि नियम वेगवेगळे आहेत. त्याव्यतिरिक्त काही कायदे केंद्र स्तरावरदेखील आहेत. पण संघराज्य संकल्पनेमुळे केंद्रीय नियंत्रणावर मर्यादा आहेत.

अमेरिकन उजव्या - म्हणजे रिपब्लिकन विचारसरणी आणि डाव्या - म्हणजे डेमोक्रॅटिक विचारसरणी यांचे बंदुकांच्या सहज असलेल्या उपलब्धतेसंदर्भात टोकाचे भिन्न विचार आहेत. जे काही सामाजिक 'नाजूक' विषय आहेत, त्यातील एक विषय हा बंदुकांवरील नियंत्रण आणि दुसरी घटना दुरुस्ती हा आहे. तो विशेषतः गेल्या दोन-तीन दशकात अधिकच वाढलेला आहे. त्यातच लोकशाही राजकारणाचा एक अविभाज्य घटक म्हणजे राजकीय पक्षांना लागणारा पैसा... अमेरिकन लॉबी प्रकारात बंदुकांच्या संदर्भातले विविध गट हे राजकीय पक्षांवर पैसे देऊन अथवा न देऊन दबाव आणत असतात.

एन आर ए संघटना आणि तिच्याशी संलग्न गट आणि त्यांच्याकडून जाहिराती मिळवणारी माध्यमे ह्यांच्या दृष्टीने, बंदुका हे ह्या विकृत हिंसेचे कारण नसून त्यांच्या चापावरील हात आहे, मानसिकता आहे. त्यामुळे बंदुकांच्या विरोधात काही बोलायचे तरी घटनेच्या विरोधात बोलण्यासारखे आहे असे दाखवून एका बाजूच्या (बंदुकाप्रेमी अथवा बंदुका असलेल्या) समाजाला भडकावण्याचे काम कळत-नकळत केले जाते.

दुसरीकडे उदारमतवादी (लिबरल्स) डावे अथवा डेमोक्रॅटस यांचे म्हणणे हे बंदुका प्रामुख्याने कारण आहे आणि माणसे अथवा मानसिकता हे नंतर येते. प्रस्थापित राज्यघटना न बदलता अधिक नियम हवे, असे त्यांचे म्हणणे असते. पण त्यात हळूहळू सरकारी नियंत्रण वाढायला लागते. परिणामी ज्या कारणासाठी दुसरी घटना दुरुस्ती केली गेली होती, त्याच्या विरोधातच असे नियम जाऊ शकतात, असे विरोधकांचे म्हणणे असते.

जेव्हा दोन टोकांची राजकीय मतप्रणाली असते, तेव्हा त्यात समाज नुसता दुभंगला जात नाही, तर भरडला जातो. शाळेतील हिंसाचार हे त्याचे अत्यंत टोकाचे आणि दुर्दैवी उदाहरण आहे.

आधुनिक राहणीमान

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे, विकृतीच्या मागे तामसिकता असते हे जरी वास्तव असले, तरी त्या तामसिकतेची वाढ कशामुळे होते हे बघणे गरजेचे आहे. बऱ्याचदा शाळेतील हिंसाचाराच्या मागे असलेल्या मुलांची कुटुंबे दुभंगलेली असतात. अनेक प्रकरणांत घरात आई-वडील वेगळे झालेले असतात. मुलांना वडील मिळत नाहीत. फ्लोरिडामध्ये केलेल्या गोळीबाराच्या मागे असलेला मुलगा हा आश्रितासारखा राहत होता.

दुसरा भाग म्हणजे आधुनिक व्हिडिओ खेळ - मुलांना अत्यंत हिंस्र खेळ सहज मिळू शकतात. जालीय माध्यमात हे खेळत असताना वास्तव आणि काल्पनिक यातील रेषा नुसती पुसट होत नाही, तर मनेदेखील बधिर होतात. आपली मुले नक्की काय खेळत आहेत याकडे केवळ दुभंगलेल्या कुटुंबातूनच दुर्लक्ष होते असे नसते.

तिसरा भाग आणि तोदेखील विशेषतः शाळेतील हिंसाचारासंदर्भात असतो, तो म्हणजे बुलिंग - थोडक्यात साध्या अथवा प्रतिकार करण्यात कमी पडू शकणाऱ्या मुलाची नुसतीच टिंगलटवाळी नाही, तर त्याच्याशी आत्यंतिक मस्ती करणे आणि त्याला एकटे पाडणे. त्यात गुंड मुले दुर्बल मनाच्या मुलांवर काही काळापुरती का होईना, नियंत्रण घेतात. याकडे बऱ्याचदा शिक्षकांचे आणि शाळेचे दुर्लक्ष होते. घरी संवाद नसला तर त्या मुलांना आपले मन मोकळे करण्यास जागा नसते. तर त्यातून दोन प्रकारची गुन्हेगारी असलेली मुले तयार होऊ शकतात - एक म्हणजे बुली करणारी, तर दुसरी म्हणजे ते तेव्हा योग्य तो प्रतिकार/विरोध न करता सहन करणारी. मग हतबल होऊन आत्महत्या करणे अथवा आत्यंतिक चिडचिड होऊन, सूड म्हणून जे समोर येईल त्याची हत्या करत स्वत:ला संपवणे ह्या चुकीच्या मार्गी लागणे, हे परिणाम दिसतात. पण संवाद नसणे हे असे होण्याचे कारण ठरते.

सारांश

देशाच्या जन्मापासून - म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीपासून बंदुका सहज उपलब्ध करणाऱ्या अमेरिकेत गेल्या शतकाच्या शेवटापासून, विशेषतः शाळांमधील हिंसाचार धोकादायक पध्दतीने वाढलेला आहे. उपलब्धता हे जसे त्याचे एक आणि प्रमुख कारण, शस्त्रास्त्र उद्योगांनी त्याचे केलेले बाजारीकरण आणि पर्यायाने स्वार्थी राजकारण ही इतर कारणे आहेत, तसेच शेवटी व्यक्तीच्या आणि पर्यायाने समाजाच्या जडणघडणीत त्याचे मूळ आहे. फोन्स, समाजमाध्यमे, जालीय खेळ आदी सर्व काल्पनिक विश्वातून एका प्रकारच्या नशेत राहायची सवय होणे आणि त्याच वेळेस वैयक्तिक नातेसंबंध, आत्मीयता, माया-ममता आदी शब्द केवळ शब्दकोशीय करण्यातून केवळ व्यक्तीच नाही, तर समाज ढवळला जात आहे. शाळेतील हिंसाचार हे त्याचे केवळ एक रूप आहे.

Powered By Sangraha 9.0