राष्ट्रीय नाटय विद्यालयाचा हिंदी नाटय समारोह

28 Jun 2018 15:44:00

 

राष्ट्रीय नाटय विद्यालय (एन.एस.डी.), दिल्ली ही संस्था भारतातीलच नव्हे, तर आशियातील एक आगळीवेगळी अशी संस्था आहे. बीडचे रंगकर्मी  प्रा. वामन केंद्रे हे सध्या त्याचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. औरंगाबादेत बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटयशास्त्र विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय नाटय विद्यालयाने 16 ते 20 जून या काळात ग्रीष्मकालीन नाटय समारोह आयोजित केला होता. या रंगमंडलीच्या 50 कलाकारांनी मिळून एकूण पाच हिंदी नाटके सादर केली.

 

"एन.एस.डी.' या लघुनावाने ओळखली जाणारी राष्ट्रीय नाटय विद्यालय, दिल्ली ही संस्था भारतातीलच नव्हे, तर आशियातील एक आगळीवेगळी अशी संस्था आहे. इब्राहिम अल्काझी यांनी नावारूपाला आणलेली ही संस्था सध्या एका मराठी माणसाच्या नेतृत्वाखाली काम करते आहे, याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. बीडचे रंगकर्मी प्रा. वामन केंद्रे हे सध्या राष्ट्रीय नाटय विद्यालयाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत.

अभिनयाचे प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून 'एन.एस.डी.' जास्त परिचित आहे. पण या संस्थेच्या वतीने दुसरे एक महत्त्वाचे काम केले जाते, त्याचा सामान्य रसिकांना फारसा परिचय नाही. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नाटयक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चांगल्या संस्थांची नाटके देशातील विविध ठिकाणी एनएसडीच्या वतीने सादर केली जातात. हे प्रयोग म्हणजे सामान्य रसिकांसाठीचे खुले नाटय विद्यापीठच आहेत. यातून रंगमंचावरील जे विविध नाटयाविष्कार पाहायला मिळतात, त्याने सामान्य रसिकांच्या अभिरुचीचे उन्नयन होण्यास फार मदत होते.

शिवाय आणखी महत्त्वाचे एक काम या संस्थेच्या वतीने केले जाते. 'रंगमंडली' या नावाने या संस्थेची स्वत:ची एक नाटक कंपनी आहे. यात नाटय विद्यालयातून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी भरती केले जातात. या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी नोकरीवर घेतले जाते. त्यांनी विविध नाटयप्रयोग बसवून भारतभर सादर करावेत अशी ही योजना आहे.

औरंगाबादेत बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटयशास्त्र विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय नाटय विद्यालयाने 16 ते 20 जून या काळात ग्रीष्मकालीन नाटय समारोह आयोजित केला होता. या रंगमंडलीच्या 50 कलाकारांनी मिळून एकूण पाच हिंदी नाटके सादर केली. (वामन केंद्रे लिखित 'गजब तेरी अदा', अजय शुक्ला लिखित 'ताज महाल का टेंडर', महाश्वेता देवी यांच्या कथेवरचे उषा गांगुली दिग्दर्शित 'बांयेन', असीफ अली हैदर यांचे काश्मीरवरचे 'खामोशी सिली सिली' आणि विजय तेंडुलकरांचे गाजलेले नाटक 'घाशीराम कोतवाल'. याचे हिंदी रूपांतर वसंत देव यांनी केले आहे.)

या सर्व नाटकांचे वैशिष्टय म्हणजे नाटय विद्यालयाच्या शिस्तीत बसवलेले सफाईदार सादरीकरण. एखादा नट मंचावर येऊन विनाकारण फिरतो आहे, किंवा नेपथ्याच्या नावाखाली टेबल-खुर्ची-सोफा असे काहीतरी कालबाह्य वाटणारा बॉक्स टाईप सेट लावला आहे किंवा संगीताच्या नावाखाली काहीतरी तयार संगीताचे तुकडे उचलून योजना केली आहे असे काही काही आढळले नाही.

याच्या उलट अतिशय वेगळी अशी नेपथ्य रचना (उदा., 'गजब तेरी अदा'मध्ये राजासाठी एक नुसता उंचवटा व त्याला दोन्ही बाजूंनी उतार, 'घाशीराम'मध्ये मध्यभागी एक चौरस व त्याला चारी बाजूंनी छोटे उतार, 'खामोशी सिली सिली'मध्ये काश्मीरची आठवण जागविणारे लाकडी फळयांपासून बनविलेले अप्रतिम हलते नेपथ्य, 'बांयेन'मध्ये उंचावरून सोडलेले दोरखंड) पाहायला मिळाली.

'बांयेन' या नाटकात मोठया जाड अंबाडीच्या दोऱ्याची जाळी वापरून त्याच्या पाठीमागून प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्याचा परिणाम इतका विलक्षण होता की रसिक त्या नेपथ्यालाही दाद देऊन गेला. प्रकाशयोजना हासुध्दा या नाटकांचा एक लक्षणीय भाग होता. बांयेन नाटकात तळयाकाठचे दृश्य दाखविताना प्रकाशयोजनेतून पाण्याच्या लाटा अप्रतिम दाखविल्या होत्या. काश्मीरचे वातावरण दाखविताना घोडागाडी प्रत्यक्ष मंचावर दाखवीत घोडयाशिवाय ती ओढणाऱ्याचे कष्ट एक वेगळाच आशय समोर प्रकट करत होते.

संगीत आणि नृत्य याबाबत तर सर्व नाटकांत इतके विविध प्रयोग सादर झाले की हे सगळे आपण नियमित सादर होणाऱ्या इतर नाटकांत न वापरता किती मोठी हानी करून घेत आहोत असेच वाटत राहिले.

'गजब तेरी अदा'मध्ये सर्व दहा स्त्री पात्रांच्या हातात देवघरात असतात तशा थोडया मोठया घंटा दिल्या होत्या. त्यांचा एक सुरेख मंजूळ आवाज, शिवाय हलगीचा ठेका यातून एक वेगळेच सळसळते संगीत कानावर पडत होते आणि परिणाम साधत होते.

'बांयेन' या नाटकात एक शेवटचा प्रसंग आहे. बंडखोर लोक रेल्वे पटरीवर मोठमोठी लाकडे आणून टाकतात आणि रेल्वेला अपघात व्हावा अशी व्यवस्था करतात. या प्रसंगात सर्व पुरुष पात्र हातात दोन मोठे बांबू घेऊन येतात. बांबू जमिनीवर आपटताना सगळया कलाकारांनी एक अतिशय भयसूचक ठेका पकडला होता.

'खामोशी सिली सिली' नाटकांत काश्मिरी संगीतात वापरल्या जाणाऱ्या रबाब, सारंगी, संतूर यांचा अतिशय नेमका वापर केला गेला होता.

कोरिओग्राफी (नृत्यरचना) हीसुध्दा एक वेगळी दखल घ्यावी अशी बाब या नाटकांमधून दिसून आली. घाशीरामसारख्या नाटकांत बावनखणीतील लावणी, कीर्तन अशा कितीतरी वेळी वेगवेगळया नृत्यअदा कलाकारांनी अप्रतिमरीत्या सादर केल्या. अगदी गुन्हेगाराला शिक्षा देताना एक कलाकार शरीराच्या वेगवेगळया हालचाली करत त्या गुन्हेगारापाशी येतो आणि त्याच्या डोक्यावर आपल्या दोन हातांनी हातात शस्त्र आहे असे समजून अशा काही हालचाली करतो की खरोखरच्या शस्त्रानेच शिक्षा केली आहे असे पाहणाऱ्याला वाटावे.

'बायेंन'सारख्या नाटकांत स्त्री पात्रांसाठी बंगाली पध्दतीच्या साडीचा फार नेमका वापर केला गेला आहे. लग्नप्रसंगीचे कपडे, मृत्यूचा करुण प्रसंग असतानाचे कपडे, पांढरी लाल काठाची साडी वापरत सूचकपणे ती नेमकी संस्कृती समोर उलगडणे हे सगळे ठसठशीतपणे लक्षात राहावे असे होते.

नाटक ही सादरीकरणाची कला आहे. ते सादरच झाले पाहिजे आणि बघितले गेले पाहिजे. यासाठी राष्ट्रीय नाटय विद्यालय जे प्रयत्न करत आहे, त्याला दाद दिलीच पाहिजे.

राष्ट्रीय नाटय विद्यालयात ज्या पध्दतीने ही नाटके सादर करण्यासाठी एक रंगमंडल कंपनी (रेपटरी कंपनी) तयार करून मेहनत घेतली जाते, त्याप्रमाणे विविध ठिकाणी जे नाटयशास्त्र विभाग आहेत, त्यांना असे करणे अनिवार्य केले जावे. नाटक ही केवळ वर्गखोलीत बसून शिकण्याची गोष्ट नाही. ते सादर झाले पाहिजे. खरे तर ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची नाटयगृहे आहेत, त्या ठिकाणीच नाटयशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय केली पाहिजे - उदा., वैद्यकीय महाविद्यालय हे रुग्णालयाला जोडूनच असते, त्याप्रमाणे नाटयशास्त्राचे प्रशिक्षण हे नाटयगृहाला जोडूनच दिले जावे.

रा.ना.वि.च्या या सादरीकरणातून काही एक प्रश्न निर्माण होतात. महाराष्ट्र पातळीवर गेली 50 वर्षे राज्य नाटय स्पर्धा होत आहेत. नाटक हे जर सादर करण्यासाठीच आहे, तर महाराष्ट्रात ज्या नाटकाला पहिले-दुसरे-तिसरे बक्षीस मिळाले आहे, अशा नाटकाचा प्रयोग महाराष्ट्राच्या विविध भागांत सादर झाला पाहिजे. जर शासन या स्पर्धेवर आधीच इतका खर्च करत आहे, तर या कलाकारांना महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी किमान 20 प्रयोग करायला मिळावेत. हे सहज शक्य आहे.

भारतभर अतिशय प्रतिभावंत कलाकार विखुरलेले आहेत, हे रा.ना.वि.च्या प्रयोगांमधून लक्षात येते. मग यांना मंच मिळाला तर यांची कला रसिकांसमारे येईल. टीव्हीने रंगमंच खाऊन टाकला म्हणून तक्रार करत न बसता अशी प्रत्यक्ष कृती केली पाहिजे.

पाच दिवस चाललेल्या या नाटय समारोहाला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. खर्ुच्यांवर जागा नाही मिळाली, तर जमिनीवर बसून तरुणांनी नाटके बघितली. त्यांना दाद दिली. टाळयांचा कडकडाट केला. संवादाला, संगीताला, नेपथ्याला नेमक्या जागी दाद दिली. याची दखल घेतली गेली पाहिजे.

गाणे किंवा नाटक हे सादरच झाले पाहिजे. त्याची नुसती चर्चा करून काही फायदा नाही. राष्ट्रीय नाटय विद्यालयाच्या माध्यमातून जगभरच्या, भारतभरच्या प्रतिभावंत कलाकारांना पाहायला मिळते, त्यांची सादरीकरणे समोर येतात ही मोठीच फलश्रुती आहे.

लोकगीते, लोकसंगीत याचा रंगभूमीवर फार चांगल्या पध्दतीने उपयोग केला गेलेला या समारोहात दिसून आला. रा.ना.वि. लोककलांनाही एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, याचीही नोंद करायला हवी.

                      जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

 

Powered By Sangraha 9.0