वाकडीची वाकडी वाट

22 Jun 2018 17:52:00

वाकडी येथील घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. अल्पवयीन मुलावर झालेला अत्याचार हा जातीय भावनेतून झालेला नाही. त्याची कारणें वेगळी आहेत. म्हणून त्या अत्याचाराची तीव्रता कमी होत नाही. पण अशा अन्याय अत्याचाराच्या घटना घडताच काही मंडळींच्या पुरोगामित्वाला भरते येते. मूळ विषय बाजूला राहतो आणि त्याच्या आधाराने समाजविघातक कारवाया सुरू होतात. वाकडी आणि रुद्रवाडी येथील घटनांनंतर माध्यमांचा हा वाकडेपणा आणि काही विघ्नसंतोषी मंडळींचे मनसुबे पाहिले की हा वाकडेपणा कधी जाणार, आपण जातिविरहित चश्म्यातून समाजाचा कधी विचार करणार हा प्रश्न पडतो.

 वाकडी, ता. जामनेर, जि.जळगाव येथे दोन अल्पवयीन मुलांवर नुकताच अत्याचार झाला. खाजगी विहिरीत आंघोळ केल्यामुळे ही घटना घडली असली, तरी ती मानवतेला काळिमा फासणारी आहे. त्या मुलांना मारहाण करत असतानाचे चित्रीकरण करून ते प्रसारित करणे हाही दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे वाकडी घटनेकडे बालहक्काच्या दृष्टीने बघायला हवे. घटना घडल्यानंतर अत्याचारपीडित मुलांच्या आईने तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली. त्यानंतर ती वादग्रस्त चित्रफीत चित्रवाहिन्यांच्या हाती लागली आणि सुरू झाला जातीय खेळ. दलित विरुध्द सवर्ण अशा प्रकारची मांडणी करत पुरोगामी महाराष्ट्र, मनूवाद, दलित जातीचे शोषण अशा अनेक चटपटीत विषयांची फोडणी देत वाकडी येथे घडलेली घटना फुलवण्यास सुरुवात झाली. ज्या मुलावर अत्याचार झाला, ती मुले मातंग समाजातील आहेत आणि ज्याने अत्याचार केला तो जोशी आहे - म्हणजे ब्राह्मण आहे या गृहीतकावर आधारित मांडणी सुरू झाली. बहुसंख्य चित्रवाहिन्या आणि त्यात सहभागी होणारे नेहमीचे बोलके पोपट यांनी हिंदुत्वाविषयीची आपली मळमळ ओकून घेतली. राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे अशा प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यात भर म्हणून की काय, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेवर भाष्य करून सवर्ण समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, सवर्णांनी मातंग समाजावर अत्याचार केला असून यामागे भाजपा, रा.स्व. संघ आहे. त्याचबरोबर माध्यमाचे संकेत न पाळता त्यांनी अन्यायग्रस्त मुलांची चित्रफीत जशीच्या तशी प्रसारित केली. एकूणच वाकडी येथील घटनेच्या आधाराने हिंदुत्वाला झोडपून काढण्याची संधी मिळाली आहे, याचा आनंदोत्सव करणाऱ्यांना काही तासांत आपला मोर्चा बदलावा लागला. कारण अत्याचार करणारा जोशी हा ब्राह्मण नव्हे, तर कुडमुडे जोशी (भटके विमुक्त) निघाला. तथाकथित पुरोगाम्यांसाठी हा विषय मग शीतपेढीत ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.

माध्यमांतून प्रसारित झालेला विषय आणि वास्तव यामध्ये जमीन-अस्मानाइतके अंतर आहे. अल्पवयीन मुलावर झालेल्या अत्याचाराचे समर्थन होऊ  शकत नाही. पण हे प्रकरण तथाकथित जातभावनेतून घडले आहे, असे म्हणण्यास अजिबात वाव नाही. ज्या मुलांना मारहाण झाली, त्यांना आधी अनेक वेळा समज दिली होती, तरीही त्यांच्यात सुधारणा होत नाही हे पाहिल्यावर ''त्यांना शिक्षा करा, आमचा आक्षेप नसेल'' असे मुलांच्या पालकांनीच सांगितले होते. या गोष्टी लक्षात घेऊन या घटनेकडे पाहिले, तर माध्यमांचा खोटेपणा आपल्या लक्षात येऊ  शकतो. वाकडी या गावातील घटनेच्या आडून समाजात किती मोठया प्रमाणात जातीयवाद फोफावला आहे, विद्यमान सरकार जातीयवादाला कशी मोकळीक देते आहे असे मांडण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी वाकडी गावात कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव नाही. संपूर्ण गावाने या घटनेचा निषेध करून आम्ही आमच्या गावाचे सामाजिक वातावरण बिघडू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या भूमिकेला कोणत्याही माध्यमांनी प्रसिध्दी दिली नाही.

मुळात वाकडी येथील घटनेला जातीय रंग देऊन वातावरण तापवले गेले आणि त्याचा फायदा घेण्यासाठी राजकीय पक्षांनी रांग लावली. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्र्यांनी पीडितांचे जळगाव शहरात पुनर्वसन करण्याची मागणी केली. जेव्हा खरोखरच परिस्थिती बिघडलेली असते, जातीय तणाव पराकोटीला पोहोचलेला असतो, पीडित कुटुंब दहशतीच्या छायेत वावरत असते, तेव्हा अशा परिस्थितीत पुनर्वसनाची मागणी करणे योग्य असते. पण वाकडीत अशी परिस्थिती खरेच आहे का? की केवळ लोकानुनयासाठी रामदास आठवले यांनी ही मागणी केली आहे? रामदास आठवल्यांसारखेच अन्य पक्षांच्या नेत्यांनीही वाकडीला भेट देऊन या घटनेवरचे आपले भाष्य केले. एका संघटनेने तर पंचनाम्यात विहीर बदलली असल्याचा आरोप केला. एकूणच काय, तर वाकडीच्या तापलेल्या तव्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. काहीही करून या घटनेला दलित-सवर्ण अन्याय-अत्याचाराचे स्वरूप द्यायचे आणि विद्यमान सरकारविषयी मतदारांच्या मनात असंतोष निर्माण करायचा, असा या मंडळींचा डाव होता. पण जोशीची ओळख पटली आणि ही खेळी चुकली. असे जरी झाले असले, तरी काही लोक आपला स्वार्थ साधण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत हेही वाकडीतील घटनेतून समोर आले होते. हिंदू समाज खंडित करण्यासाठी जे लोक गिधाडासारखे टपून बसलेले असतात, त्यांच्यासाठी तर अशा घटना म्हणजे पर्वणीच. वाकडीची घटना घडली, स्वाभाविकपणे मातंग समाजाकडून त्याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटणे नैसर्गिक होते. पण त्याचा फायदा घेत कुठे जाहीरपणे, तर कुठे आडपडदा ठेवून मातंग समाजाला धर्मांतर करण्याचे आवाहन केले गेले. मातंग समाज हा नेहमीच धर्मनिष्ठ राहिला आहे. त्याच्या भावनांना हात घालून काही नतद्रष्ट मंडळी हिंदू समाज फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजातील वंचित उपेक्षित घटकांत वेगवेगळी आमिषे दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी वाकडीची घटना मोठी संधी होती. पण मातंग समाजातील काही सजग व्यक्तींनी हा डाव उधळून लावला असला, तरी धोका अजून टळला नाही.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मातंग समाजाबाबत अशा घटना वारंवार  घडत आहेत. मातंग समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते का? याचा मुळातून तपास केला पाहिजे. गेल्या महिन्यात लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी या गावात मातंग समाजातील नवरदेव मंदिरात दर्शनाला गेला, म्हणून त्याच्या कुटुंबीयांना मारहाण झाली होती. विशेष म्हणजे त्या नवरदेवाची आई त्या गावची सरपंच आहे. अशा प्रकारच्या घटनांचा निषेध करताना समाजमाध्यमांतून त्याचे प्रकटीकरण कशा प्रकारे होते, हे पाहिले तर लक्षात येईल की मातंग समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर करण्याचा डाव जाणीवपूर्वक खेळला जात आहे. रुद्रवाडीला झालेली घटना खरी असली, तरी समाजाला भडकवण्यासाठी प्रसारित केलेली चित्रफीत त्या घटनेची नव्हती, तर ती छत्तीसगडमधील होती, हे सत्य लक्षात येईपर्यंत खूप मोठया प्रमाणात समाजमाध्यमांतून फिरवली गेली. आज रुद्रवाडीतील चोवीस कुटुंबे गाव सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत. म्हणजे या घटने मागे केवळ मंदिर प्रवेश आणि त्यावरून झालेला अत्याचारच कारणीभूत नसून अन्यही गोष्टीमुळे अशी घटना घडत आहे. आणि त्यावर फारसे कोणी भाष्य करत नाही. केवळ मंदिर प्रवेश नाकारला, मारहाण केली म्हणून अशा प्रकारच्या विस्थापनाचा निर्णय कोणी घेणार नाही, हे लक्षात घेऊन सत्याचा शोध घ्यायला हवा. सांगायचा मुध्दा एवढाच की काहीही करून मातंग समाजात असंतोष निर्माण करायचा आणि त्याला वेगळा मार्ग निवडण्यास भाग पाडायचे, अशी रणनीती तयार करून काही मंडळी समाज तोडण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये संख़्याबळाच्या दृष्टीने विचार केला, तर मातंग समाजाचा दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर असणारा नवबौध्द समाज आणि मातंग समाज यांच्यात अनेक पातळयांवर तफावत आहे. आरक्षणाचा योग्य वाटा आम्हाला मिळत नाही असे मातंग समाजाचे म्हणणे असून आरक्षणाचे जातीनिहाय वर्गीकरण करा अशी या समाजाची मागणी आहे. राजकीय क्षेत्रात एकमुखी नेतृत्व नसल्यामुळे हा समाज गटातटात विभागला असल्याने त्याचा राजकीय वापर करून घेण्यात सर्वच राजकीय पक्षांना अधिक रस आहे. मातंग समाजाच्या जिल्हानिहाय सामाजिक, राजकीय संघटना असल्या, तरी त्या अन्याय-अत्याचाराविरुध्द एकत्रितपणे मैदानात उतरताना दिसत नाहीत. अशा वास्तवाच्या फेऱ्यात हा समाज अडकला आहे आणि समाजाचे विभाजन करू पाहणारे याचाच फायदा घेत असतात. एकूणच काय, तर मातंग समाजात असंतोष निर्माण होईल अशा घटना घडवून आणायच्या किंवा वैयक्तिक स्वरूपातील घटनांना जातीय रंग देऊन प्रदर्शित करायच्या व त्यातून सामाजिक विद्वेष अधिक वाढवत समाजाला अराजकाच्या तोंडावर उभे करायचे, अशी काही मंडळींची चाल आहे आणि त्यात प्रसारमाध्यमेही सहभागी होत आहेत, हे वाकडीतील घटनेवरून सिध्द होत आहे.

वाकडी काय किंवा रुद्रवाडी काय, दोन्हीही घटनांचा निषेध केला पाहिजे. मानवी सन्मान आणि घटनादत्त अधिकार यांची पायमल्ली या दोन्ही ठिकाणी झाली आहेच, पण रुद्रवाडीच्या घटनेला जसे जातभावनेचे आणि अस्पृश्येचे संदर्भ आहेत, तसे वाकडीच्या घटनेला नाहीत, हे आपण समजून घेतले पाहिजे आणि सरसकट सर्वच अन्याय-अत्याचाराच्या घटना म्हणजे जातीय अत्याचार हे समीकरण मांडणे थांबवले पाहिजे.

वाकडीच्या घटनेने सर्वच समाजबांधवांसाठी हाच संदेश दिला आहे. आपण सर्व जण एका समाजाचे अविभाज्य घटक आहोत ही भावना अधिक प्रबळ करणे आणि समाजजीवनातील विषमता दूर करत जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन अशा घटनांपासून दूर राहणे ही आजची सामाजिक गरज आहे. ती गरज आपण पूर्ण कशी  करणार? हा आजचा प्रश्न आहे.

 

जामनेर तालुक्यातील वाकडी येथे शेतात खाजगी विहिरीत पोहण्याच्या कारणावरून मागासवर्गीय समाजातील दोन मुलांना जी अमानुष मारहाण झाली, त्याचा भटके विमुक्त विकास परिषद तीव्र धिक्कार करीत आहे. आरोपींना अटक होऊन न्यायालयीन कोठडीदेखील मिळालेली आहे.


भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पीडितांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून दिलासा दिलेला आहे. या घटनेमागे कोणतीही जातीय भावना नसून वैयक्तिक वाद असल्याचे प्रत्यक्ष भेटीअंती लक्षात आलेले आहे. ज्यांच्यावर फिर्याद दाखल केलेली आहे, ते भटके विमुक्त समाजातील ईश्वर बळवंत जोशी हे कुडमुडे जोशी (भविष्यकथन करणारे), दुसरा आरोपी हा लोहार या भटक्या जमाती-ब  या प्रवर्गातील आहे. मुलांना समजावणे हा त्यांचा उद्देश असला, तरी पध्दत मात्र अमानवी होती. त्यांना कायद्याप्रमाणे त्याची शिक्षा होईलच; परंतु त्यांनी मुलांना जातिवाचक काहीही बोलले नाही, हे त्या भटके विमुक्त आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांच्या भेटीवरून कळले. महत्त्वाची आणखी एक बाब म्हणजे एका पीडित मुलाचे आजोबा अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचारी असून ते पाणीपुरवठयाचे व टाकी साफसफाईचे कार्य करतात. त्यामुळे गावात जातीयता पाळली जात नाही. तसेच मुले विहिरीत पोहल्याने पाणी अपवित्र झाले किंवा पाण्याला विटाळ झाला असे कोणीही म्हटलेले नाही. विहिरीत पोहणारी मुले खेडयापाडयात नग्नावस्थेतच पोहतात. त्यामुळे त्यांना नग्न करून त्यांची धिंड काढली हे म्हणणेही धादांत खोटे आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात काही माध्यमे व काही संघटनांचे कार्यकर्ते ह्यांची भूमिका संशयास्पद होती, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. 

भटके विमुक्त विकास परिषद आरोपींना कायद्यानुसार शिक्षेची मागणी करीत आहे. या घटनेमुळे सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भटके विमुक्त विकास परिषद करीत आहे.

- उध्दवराव काळे

उपाध्यक्ष, भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र प्रांत

 

वाकडी, ता. जामनेर, जिल्हा जळगाव येथे मातंग समाजातील अल्पवयीन मुलांना नग्न करून अमानुषपणे मारहाण झाल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले. ही मारहाण जातीय द्वेषातून झाली की मानसिक विकृतीतून, हा संशोधनाचा विषय असला तरी वाकडी प्रकरणाचा आधार घेऊन राज्यात जातमूलक प्रसार-प्रचार करून या प्रकरणाला राजकीय वळण देऊन स्वतःचे उखळ पांढरे करण्याचे पाप काही राजकीय मंडळी जाणूनबुजून करत आहेत. कोणताही सामाजिक पाठिंबा नसलेले एकलखोरे पुढारी या प्रकरणाच्या माध्यमातून मातंग समाजबांधवांना धर्मांतर करण्याबाबत उपदेशाचे डोस पाजत सुटले आहेत. समाजबांधवांनी अशा लोकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये.


वाकडी येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून सतत विकासाभिमुख राहिलेल्या महाराष्ट्राची पिछेहाट आणि पुरोगामी महाराष्ट्राची मोठी हार करणारी आहे. अशा घटनांमुळे मातंग समाजातील युवकांमध्ये संताप, चीड आणि उद्वेग निर्माण झाला आहे. शासनाने याची वेळीच दखल घ्यावी. घटनेतील आरोपींचा खटला अंडर ट्रायल व जलदगती न्यायालयात चालवावा.

- संतोष पवार

अध्यक्ष, लहुप्रहार ,महराष्ट्र राज्य

 

Powered By Sangraha 9.0