भारतीय जेवणात 'कढीपत्ता' हा महत्वाचा घटक. कढीपत्ता माहीत नाही असं घर शोधून सापडणार नाही. मराठी, गुजराती, तामिळ, कानडी, बंगाली, पंजाबी - भारतभर सगळीकडेच अनेक पदार्थांत आवर्जून कढीपत्ता वापरला जातो. फोडणीत कढीपत्ता नसेल तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. कढीपत्ता टाकताच दरवळणारा तो खमंग वास. अशा या सुगंधी पानाविषयी या लेखात जाणून घेऊ या.
तमालपत्र आणि दालचिनीच्या पानांचा आणि सालीचा घोळ संपत नाही, तर अनेकांनी मसाल्यात वापरलं जाणारं हिरवं पान, अर्थात कढीपत्ता यावर लिहावं असं सुचवलं. मसाल्यात घालायच्या या हिरव्या पानाबद्दल, अर्थात कढीलिंबाबद्दल लिहायला सुचवल्याने दररोज वापरला जाणारा हा हिरवा मसालेदार घटक पदार्थ आजच्या मसाला यात्रेतला सुगंधी पडाव बनलाय.
अनेक घरांमध्ये बाजारातून आणलेल्या ओल्या मसाल्यातल्या एखाद्या फांदीला 'डोळे आहेत, लावून बघू या' असं म्हणत घरात कुंडीत किंवा बागेत, जिथे जागा मिळेल तिथे ही फांदी टोचली जाते. जर ही डोळेधारी फांदी जगली, तगली, तर मस्त झुडूपवजा झाड बनून जातं. या सुगंधी फांदीला कढीलिंब किंवा कढीपत्ता अशा लोकप्रिय नावांनी ओळखलं जातं.
कडुलिंबाशी नामसाधर्म्य असलेला हा मसाला घटक इतर मसालेदर घटकांच्या मानाने अप्राप्य वाटत नाही, कारण याची सहज उपलब्धता त्याला अतिशय सामान्य बनवून टाकते. बेलाचं झाड ज्या 'रुटेसी' कुटुंबातलं आहे, त्याच Rutaceae कुटुंबातलं हे झाड आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग आहे. कढीपत्त्याबद्दल तसं पाहिलं तर आपण आवर्जून माहिती करूनच घेत नाही. ते झाड आहे म्हणून आहे असाच काहीसा दृष्टीकोन आपण याच्याबद्दल बाळगतो. व्यवस्थित वाढलं, तर आठ ते दहा मीटर्सची उंची गाठणारं हे उष्णकटिबंधीय झाड बहुतेकांच्या घरात कुंडीत वाढत असतंच. कढीलिंबाच्या 'मुराया कोनिगी' (Murraya koenigii) या वनस्पतिशास्त्रीय नावात दोन लोकांच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे, हे वाचून अनेकांना गंमत वाटते. वर्गीकरण शास्त्राचा पितामह कार्ल लिनियस याने आपला अभ्यासू विद्यार्थी जोहान मुरे याच्या स्मरणार्थ ह्या झाडाचं प्रजाती नाम 'मुराया' केलं. ह्याच्या नावातलं 'कोनिगी' हे जातीविशेषण स्विस गणितज्ञ 'कोनिग' याच्या स्मरणार्थ केलं गेलंय. कढीलिंब उर्फ कढीपत्ता हा त्याच्या पानांना येणाऱ्या विशिष्ट वासामुळे ओळखला जातो. वर्षभर हिरवंगार असणारं म्हणजेच सदाहरित प्रकारातलं हे झाड पश्चिम घाटाच्या, सह्याद्रीच्या जंगलात विपुल प्रमाणात आढळतं असं कुणी सांगितल्यास अजिबात आश्चर्य वाटायची गरज नाही. सह्याद्रीमधली अनेक जंगलं ह्या झाडांनी व्यापलेली आहेत. भारत, श्रीलंका आणि भारतीय उपखंडातील देश असं मूळ स्थान असलेलं हे झुडूप आज बहुतेक सर्व खंडांमध्ये नेलेलं असून बहुतांश 'तडका मारके' पदार्थांमध्ये याचा मुक्तहस्ताने वापर केला जातो.
साधारण मार्चअखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या सुमारास, वसंत ॠतूमध्ये कढीलिंबाच्या झाडाला सडसडीत फांद्यांच्या टोकावर पांढरी सुवासिक फुलं येतात. हिरव्या शेल्यावर जणू पांढरी सुवासिक नक्षीच काढलेली वाटावी अशी ही फुलं कीटकांना आकर्षित करतात. कढीलिंबाच्या फुलांचा वास भन्नाट गोड असतो. पुढे मे महिन्यात, कडकडीत उन्हाळयात या झाडाला हिरवी फळं येतात. अगदी करवंदासारखी पिकत जाऊन ही फळं काळीभोर होतात. या पिकलेल्या फळात दोनच बिया असतात. निसर्गाने केलेली करणी म्हणजे, कढीपत्त्याच्या फळांचा गर खाण्यास योग्य असतो, पण यातल्या त्या दोनच बिया मात्र विषारी असतात. म्हणजे ही पिकलेली फळं खायला झाडावर वेगवेगळे पक्षी आणि खारी गर्दी करतात, त्यातला गर खातात नि बिया फेकून देतात. निसर्गात हे सगळं स्वत:च्या लयीत सुरू असतं. पण ते पाहायला आपल्याला वेळच नसतो. त्याची पानं फोडणीसाठी आणि चटणी करण्यासाठी वापरली जातात, हाच काय तो त्याचा नि आपला घनिष्ट संबंध. बाकी याचा अनेक प्रकारे आयुर्वेदिक वापर होतो हे आपल्या खिजगणतीतही नसतं किंवा याचं लाकूड टिकाऊ असल्याने शेती उपयोगी अवजारं बनवण्यासाठी वापरलं जातं, हे आपल्या गावीही नसतं. रुटेसी कुटुंबातल्या बहुतांश सदस्यांच्या पानांना एक तीव्र गंध असतो. हा गंध हुंगल्यावर तरतरीत वाटतं. कढिलिंबाच्या पानांमध्ये कोनिगीन नावाचा ग्लाइकोसिड घटक आढळतो. दालचिनी आणि तमालपत्राप्रमाणेच कढीपत्त्यातही व्हायोटाइल तेल आढळतं. व्हायोटाइल म्हणजे हवेच्या संपर्कात आल्यावर लगेच उडून जाणारं सुगंधी तेल. हेच कारण आहे, ज्यामुळे कढीपत्त्याची पानं चुरगाळून हुंगली की तरतरी आणणारा सुवास येतो. फोडणीत वापरणं आणि चटणी करून खाणं हे कढीपत्त्याचे दोनच उपयोग आपल्याला माहीत असतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की आयुर्वेदाला आणि हल्लीच्या मॉडर्न सायन्सला कढीपत्त्याचे अनेक उपयोग माहीत आहेत. पचनसंस्था सुधारण्यात महत्त्वाचं काम कढीपत्त्याची पानं करत असतात. आजारपणाने तोंडाची गेलेली चव परत आणण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. पचनसंस्थेशी संबंधित अनेक आजारांवर आयुर्वेदात या झुडपाच्या पानाचे उपयोग उल्लेखले जातात. अलीकडेच संशोधन सुरू असलेली गोष्ट म्हणजे, मधुमेहावर कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग केला जातो. हे असं काही समजलं की आपलं जंगलीपण जागृत होतं आणि त्या गोष्टीला, झाडाला अगदी ओरबाडून काढलं जातं. मी डेहरादूनला शिकायला असताना नियमित पाहिलेली गोष्ट म्हणजे, उत्तरेकडे कढीपत्त्याच्या पानांना पाण्यात उकळवून निघालेलं पाणी नियमित केसगळती थांबवायला महिनोंमहिने घेतलं जात असे. या पानांमध्ये कीडनाशक पदार्थ असल्याने अनेक ठिकाणी कडुलिंबाबरोबरच कढीपत्त्याची पानंही धान्य साठवणीत ठेवली जातात. आयुर्वेदाला परिचित असलेल्या आणि भारतीय पाकशास्त्राला सुपरिचित असलेल्या या कढीपत्त्यावर अनेक ठिकाणी संशोधनं सुरू असून कर्करोगासाठी पेशींना लढायची ताकद कढीपत्ता देऊ शकतो काय, असं संशोधन सुरू असून कंपवातासारख्या आजारांवरही हे झुडूप उपयोगी ठरू शकतं, असा अभ्यासकांना विश्वास वाटतोय. पोटाची दुखणी, नैराश्य, सूज, शरीरदाह दूर होण्यासाठी अजूनही दक्षिणेकडे घराघरामध्ये याचा वापर केला जातो.
कढीपत्त्याच्या पानात अत्यल्प का होईना, पण मानवी शरीराला आवश्यक असं लोह आणि ब जीवनसत्त्व आढळतात. म्हणूनच यांच्या नियमित सेवनाने दीर्घकाळाने उपयोग झालेला दिसून येतो. खाद्यपदार्थांमध्ये फोडणीसाठी, छाटणीसाठी याची पानं वापरली जातातच, तसंच हल्ली विविध सूप्स, सॅलड, लोणची यामध्ये आणि चक्क वाइन्समध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. दक्षिणेकडे अनेक ठिकाणी तुळस उपलब्ध नसेल तर चक्क देवाला वाहायला आणि हारांमध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो हे विशेष. कढीपत्त्याच्या पानांमधून काढलेला तैलार्क विविध साबणांमध्ये वापरला जातो. याच्या पिकलेल्या बियांमधून निघणारं तेल वंगणाला पर्यायी तेल म्हणून वापरलं जातं.
कढीपत्त्याचं लाकूडही मध्यम प्रतीचं समजलं जात असल्याने पूर्ण वाढीच्या झाडापासून मिळणाऱ्या लाकडाचा उपयोग चक्क शेतीची अवजारं बनवायला केला जातो. उत्तम जळण म्हणूनही याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. कढीलिंब, मिठा नीम, करी बेऊ, करी पत्ता, बसंगो, किंवा संस्कृतमध्ये गिरिनिम्ब किंवा सुरभी निंब अशी नाव धारण करणारं हे लहानसं झुडूप जगभर शंभरहून जास्त नावांनी ओळखलं जातं, हे आश्चर्यच म्हणावं लागेल. याच्या चवीव्यतिरिक्त, औषधी उपयोगाव्यतिरिक्त आणि अजूनही स्वस्त किमतीत उपलब्ध असणं या व्यतिरिक्त ह्या हिरव्या मसाल्याची मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे, कढीलिंबाची पानं खाऊन फूलपाखरांची फौजच्या फौज तयार होते आणि परिसराला रंगीत करून टाकते.
roopaliparkhe@gmail.com
सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.https://www.facebook.com/VivekSaptahik/