ऐश्वर्ये भारी....

26 May 2018 15:28:00

***चांदण्यात फिरताना****

सावरकरांची विलक्षण प्रतिभा, तरल कल्पनाशक्ती, ओजस्वी शब्दकळा, चिंतनाची खोली या साऱ्याचा अर्क ज्या कवितेत आहे, ती मनोरम काव्यचंद्रिका म्हणजे 'जगन्नाथाचा रथ'! जगन्नाथाचा रथोत्सव म्हणजे केवळ रथाची यात्रा नव्हे, तर रथ, चाके, त्याला ओढणारे हात व संपूर्ण भवताल मिळून हा रथोत्सव होतो असे मानले जाते. जीवनाचे चक्र व त्यात सहभागी असणारी सारी जीवसृष्टी याचेही हे प्रतीक मानले जाते. सावरकर या प्रतीकाचाच आणखी विस्तार करत विश्वनियंत्याला, जगाच्या नाथाला प्रश्न करत आहेत. हे प्रश्न त्या रथयात्रेच्या संदर्भात नाहीत, तर कोलूच्या मरणयातना सोसत त्या लाकडी खांबाभोवती फिरणाऱ्या सावरकरांच्या मनात या विश्वाच्या अविरत फिरत असलेल्या चक्राबद्दल, अद्यापही गूढ असलेल्या विश्वउत्पत्तीच्या रहस्याबद्दल, त्याच्याशी असलेल्या मानवाच्या नात्याबद्दल कुतूहल आहे. या अथांग पोकळीत आपल्या दिव्य रथातून फिरत असलेल्या जगन्नियंत्याला ते त्यांची जिज्ञासा पुरवण्याची विनंती करत आहेत. परंपरा, पुराणकथा, विज्ञान, काव्यप्रतिभा यांचे अद्भुत मिश्रण असलेली ही कविता, 28 मे या सावरकरांच्या जन्मदिवसानिमित्त!

भारतमातेचे लचके तोडणाऱ्या पारतंत्र्याच्या क्रूर श्वापदावर हल्ला करणारा नरसिंह म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांचे धगधगते लेखन, ओजस्वी भाषणे म्हणजे नरसिंहाच्या, शत्रुहृदयात धडकी भरवणाऱ्या डरकाळया.

त्याची एक एक कृती म्हणजे शत्रूवर पुन्हा पुन्हा घेतलेली झेप. या नरसिंहाच्या रुद्रपौरुषाला सौम्यता, सौंदर्य बहाल करणारी त्याची सोनेरी आयाळ म्हणजे सावरकरांची काव्यप्रतिभा. ती काव्यप्रतिभा, जी भगूरच्या वास्तव्यात, कोवळेपणाच्या वयात, अवघ्या अकराव्या वर्षातच अंकुरित झाली होती. आश्चर्य हे की त्या वयातही त्या कोंभाची पत्थर भेदून वर डोकावण्याची जिगीषा दिसून येत होती. फटके-पोवाडे-आरत्या यातून दिसणारी - शौर्य, पराक्रम, धाडस, मातृभूचे प्रेम, निष्ठा, 'स्वतंत्रते भगवती'ला पुनर्वैभवाप्रत नेण्याचा निग्रह आणि विलक्षण आत्मबल अशा ओेजस्वी स्फुल्लिंगांची आतशबाजी दिपवून टाकत होती. त्या काव्यवेलीवर तारुण्यसुलभ अशा भावनाही उन्मुक्त, तरीही संयतपणे उमलत होत्या. पराकोटीच्या विपरीत परिस्थितीतदेखील हा कवितेचा अंतःस्थ झरा अखेरपर्यंत त्यांच्या हृदयात झुळझुळत होता. सावरकरांची विलक्षण प्रतिभा, तरल कल्पनाशक्ती, ओजस्वी शब्दकळा, चिंतनाची खोली या साऱ्याचा अर्क ज्या कवितेत आहे, ती मनोरम काव्यचंद्रिका म्हणजे 'जगन्नाथाचा रथ'!

जगन्नाथाचा रथ ही परंपरा आपल्याला माहीत आहे. जगन्नाथाच्या रथयात्रेतील तिन्ही मूर्ती या भूत, भविष्य व वर्तमान किंवा उत्पत्ती, स्थिती व लय यांचे प्रतीक मानल्या जातात. तो उत्सव म्हणजे 'नव-कलेवर', देवाला नवं शरीर देण्याचा कार्यक्रम असतो. जणू देवालाही पुनर्जन्म असतो अशी कल्पना तिथे आहे! कठोपनिषदातील श्लोकाप्रमाणे आत्मा हा रथी, शरीर हे रथ, बुध्दी सारथी व मन हा लगाम असे मानवाच्या शरीराचेच प्रतीक म्हणूनही रथाकडे पाहता येते. जगन्नाथाचा रथ ओढायला हजारो हात लागतात. ज्या स्वातंत्र्यरथाला ओढायची शर्थ सावरकर करत होते, त्या रथासाठी असे हजारो हात अजूनही लागले पाहिजेत, हाही भाव मनात असेल.

जगन्नाथाचा रथोत्सव म्हणजे केवळ रथाची यात्रा नव्हे, तर रथ, चाके, त्याला ओढणारे हात व संपूर्ण भवताल मिळून हा रथोत्सव होतो असे मानले जाते. जीवनाचे चक्र व त्यात सहभागी असणारी सारी जीवसृष्टी याचेही हे प्रतीक मानले जाते. सावरकर या प्रतीकाचाच आणखी विस्तार करत विश्वनियंत्याला, जगाच्या नाथाला प्रश्न करत आहेत. हे प्रश्न त्या रथयात्रेच्या संदर्भात नाहीत, तर कोलूच्या मरणयातना सोसत त्या लाकडी खांबाभोवती फिरणाऱ्या सावरकरांच्या मनात या विश्वाच्या अविरत फिरत असलेल्या चक्राबद्दल, अद्यापही गूढ असलेल्या विश्वउत्पत्तीच्या रहस्याबद्दल, त्याच्याशी असलेल्या मानवाच्या नात्याबद्दल कुतूहल आहे. या अथांग पोकळीत आपल्या दिव्य रथातून फिरत असलेल्या जगन्नियंत्याला ते त्यांची जिज्ञासा पुरवण्याची विनंती करत आहेत. परंपरा, पुराणकथा, विज्ञान, काव्यप्रतिभा यांचे अद्भुत मिश्रण असलेली ही कविता, 28 मे या सावरकरांच्या जन्मदिवसानिमित्त!

 जगन्नाथाचा रथ

ऐश्वर्ये भारी। या अशा ऐश्वर्ये भारी।

महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी ॥ध्रु.॥

दिक क्षितिजांचा दैदिप्य रथ तुझा सुटता

ह्या कालपथाच्या अतुट उतरणीवरता

नक्षत्रकणांचा उठे धुराळा वरता

युगक्रोश दूरी। मागुती युगक्रोश दूरी।

महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?

 

पुसूं नयेचि परी। पुसतसे पुसूं नयेचि परी।

मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी

दुज्या कुण्या द्वारी। जावया दुजा कुण्या द्वारी

किंवा केवळ मिरवत येई परत निजागारी

ह्या सूर्यशतांच्या किती दुज्या मशाली जळती

मधुनीच शतावधि चंद्रज्योति ह्या अडती

सरसरत बाण हे धूमकेतूचे सुटती

कितीदा आणि तरी। हीहि तैं। कितिदा आणि तरी

उठे। चमकुनि रात्रि पुरातन तिच्या अंधकारी॥

महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?

 

जिवाचीच किती। कथा या। जिवाचीच किती।

रथासी जगन्नाथ तुझ्या या ओढू जे झटती

ज्वालामुखि पंक्तीपासुनी। ज्वालामुखी पंक्ती।

मज्जापिंडापर्यंत प्रस्फुटिता जी जगती

उंचनिंच पाठी। पुढती वा। उंचनिंच पाठी।

गती तितुकी तव रथ झटतसे ओढायासाठी

इच्छांत आणि या भूतमात्र वेगांच्या

ओवून लगामा तुझ्या परम इच्छेच्या

त्या अतूट उतरणीवरती हो काळाच्या

खेळत हा अतलीं। रथोत्सव। खेळत हा अतलीं

महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?

 

मी, विनायक दामोदर सावरकर.

'अनादि मी-अनंत मी-अवध्य मी भला' असे म्हणत मार्सेलिसच्या बोटीवरील निर्मम छळास तोंड दिलेला मी.

काळया पाण्याची कठोरतम शिक्षा जणू मायभूमीच्या ॠणमोचनाचा पहिला हप्ता, असे समजून 'ॠण ते फेडाया। हप्ता पहिला तप्त स्थंडिलि देह अर्पितो हा।' असे म्हणून अंदमानच्या भूमीवर पाय ठेवलेला मी.

दोन जन्मठेपींच्या वज्रलेप लिखितानंतर तिथल्या वीतभर कोठडीच्या नखभर खिडकीतून कोन साधून नभनक्षत्रे पाहणारा मी....

बारीबाबाच्या यातनासत्रात सारेच भरडून निघत होतो. पण प्रिय बाबारावांच्या आजारी अवस्थेतही त्यांची होत असलेली ससेहोलपट मनाला झोंबत होती. काथ्याकुटीवरून कोलू फिरवण्यापर्यंतची बढती मिळाली होती.

'प्रतिकूल तेच घडेल' म्हणताना शारीरिक यातना सोसायची तयारी केली होती.

पण आता मन मात्र बंड करून उठते आहे.

कष्टांनी नाही, तर पदोपदी होणारी अवहेलना, विटंबना याने हृदय धगधगत आहे. हा तेजोभंग वाटयाला का यावा? ही अवहेलना सोसण्यात कसले देशकार्य? माझ्या शरीराचा आस केला आहे मी या स्वातंत्र्यरथाला. पण या कोलूसारखाच हा स्वतंत्रतेचा रथही एका जागीच फिरतो आहे. मग हा फिरला काय नि थांबला काय! आता फक्त आत्मघातच, आत्मगौरव परत देऊ  शकेल. तवर कुणीतरी आतून म्हणतं आहे की 'अरे, हे हात आत्मघात करू शकत नाहीत. मारिता मारिता मरेतो झुंजेन या प्रतिज्ञेत बध्द आहेत ते..'

एकेका उपनिषदांचे सार आठवू लागले. या अवाढव्य विश्वलयीचा मी एक भाग आहे. मी क्षुद्र नाही. माझी ही परिक्रमा व्यर्थ नाही. हा एका विराट नियोजनातला एक भागच. पण हेच सत्य आहे, हा दिलासा कुठून मिळावा? कोण सांगेल या परिक्रमेमागचा हेतू? तिची फलश्रुती? विश्वचालक भगवान जगन्नाथही तर अशाच परिक्रमेत व्यग्र आहेत! तेच सांगतील याची संगती.

सांगा ना, महाराज!

काळाचा हा अफाट विस्तार. कुठल्यातरी कृष्णपोकळीत झपाटयाने उतरत जाणारा हा अनादि अनंत मार्ग. त्यावरून दिमाखात निघालेला आपला रथ. दिशांनी बनलेला अन साक्षात गतींचे अश्व असलेला. भरधाव चालतोच आहे. युगामागून युगांचे अंतर मागे पडते आहे. काळाच्या पोटात गडप होणाऱ्या युगांचे आक्रंदन मागे टाकत रथ पुढेच जातो. मागे धुरळा उडतो आहे नक्षत्रांचा.

पण याचे गंतव्यस्थान कोणते, महाराज? याला जायचेय तरी कुठे?

खरे असे विचारू नये. हे औध्दत्यही आहे नि अप्रस्तुतही. पण माझी जिज्ञासा, माझी तळमळ मला सारखी डिवचते आहे, म्हणून विचारतोच. कशासाठी आहे ही महायात्रा?

या शतसूर्यांच्या, अगणित सूर्यमालिकांच्या दीप्ती, या उत्पन्न होणाऱ्या, विझणाऱ्या, पुन: दृग्गोचर होणाऱ्या लक्ष लक्ष चंद्रज्योती, जन्मणारे-अंत पावणारे तारका-नक्षत्रांचे समूह, या धवल आकाशगंगा, हे सारे अनुपम वैभव घेऊन आपण निघाला तरी कुठे?

मध्येच काही चमकदार कल्पनांसारखे धूमकेतू दिसतात, तेही विरतात. असे कितीदा तरी होत राहते. हा पुरातन चिरकाल अंधकार कधी मध्येच उजळतो नि पुन्हा सर्वत्र पसरतो.

या यात्रेत काही तत्त्वे नष्ट होतात, काही आपोआप पुन्हा प्रस्फुरित होत आहेत, ती कोणाच्या प्रेरणेने?

जगन्नाथाच्या रथयात्रेप्रमाणे ही मिरवणूक कुणा दारी जाऊन मग परत येणार, की उत्पत्ती-स्थिती-लय या चक्रगतीने पुन:पुन्हा आरंभबिंदूपशीच येणार? जडातून चैतन्य प्रकटावे व चैतन्य जाताच जड पुन्हा धुळीत विरावे, इतकेच का याचे साध्य?

यातून काही साध्य होणार आहे की हे मिरवणे, केवळ असणे हेच याचे सार्थक?

कोणाला प्रभावित करायचे आहे आपल्याला? या यात्रेला काही हेतू आहे का?

महाराज! तुम्हीच हे कोडे उलगडून सांगा!

हे सारे ईश्वराचे-ईश्वरीय-ऐश्वर्यनाटय. पण जीव या नाटयात किती रमला आहे पाहा! किती भ्रमात आहे तो! त्याला वाटते हा सृष्टीचा हा महारथ आपणच तर ओढत आहोत. आपल्या सोयीनुसार, आपल्या इच्छेने, आपण हा नेऊ शकतो. वास्तविक त्याच्या आत त्याला जाणवणारे जे ऊर्जेचे स्फुल्लिंग आहे, तेच या सृष्टीच्या उत्पत्तीच्या स्फोटात, तेच ज्वालामुखीत आहे. या रथाची जी लय, तीच जिवाच्या मेरुदंडातील कुंडलिनी, तीच सर्व शरीरात वाहणारी चेतना. ती सर्व शारीर वेगांचे नियंत्रण करणारी, तीच इच्छा-आकांक्षा निर्माण करणारी. साक्षात गती तुमचा रथ ओढत आहे आणि समस्त जीवसृष्टीच्या इच्छांचे उंच उसळणारे आवेग तिला बळ देत आहेत. जीव आपापल्या इच्छा, धारणा यानुसार त्या रथाला इकडे-तिकडे ओढू पाहतात. पण या कशाचाच आधार न घेणारा, हा 'अतली' चालणारा, भूमीवरही न टेकणारा, अधांतरी चाललेला रथ! पण तरीही महाराज, तुमची स्वारी भरकटत नाही, याचे कारण त्या रथाचा लगाम तुमच्या परम इच्छेच्या हाती आहे!

मग असे जर आहे, तर हा स्वतंत्रतेचा रथही पुढे जाईल. या विश्वनाटयाचा जो लहानसा अंक इथे या काळकोठडीत रंगतो आहे, त्यातली माझी भूमिका मला समरसून जगलीच पाहिजे. त्याच चेतनेचे स्फुल्लिंग माझ्या आत आहे. ते मी प्राणपणाने जपेन. आता कोलू फिरवतानाही ही विश्वलयच जणू मी अनुभवतो आहे असे म्हणेन! मी जणू या कोलूद्वारे स्वातंत्र्यरथालाच ओढत आहे असे मी मानेन. याचं काय, याहूनही अधिकतम मानहानी, यातना वाटयाला आल्या, तरी मी त्या सोसेन. या अनंताच्या दीपोत्सवात माझी एक दिवली मी लावेन!

'निरंजनासी निरंजनाचा देवा दीप तुला....'

हा घे अनंता, मी माझा जीवनदीप लावला!

9890928411

Powered By Sangraha 9.0