एका जिद्दी उद्योजकाचा प्रवास- सत्येश जवाहराणी

02 May 2018 15:15:00

प्रचंड कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर सत्येश जवाहराणी यांनी वयाच्या 21व्या वर्षी स्वतःचा 'सम्राट प्लास्टिक्स' उद्योग उभा केला. गेल्या तीन दशकांपासून त्याची सातत्याने होत असलेली प्रगती आजच्या नवउद्योजकांना निश्चित प्रेरणा देणारी आहे. 'जिद्द असेल तर मार्ग दिसेल' हा मंत्र यशाकडे कसा घेऊन जातो, यावर प्रकाशझोत टाकणारी उद्योजक सत्येश जवाहराणी यांची ही यशोगाथा.

 सत्येश जवाहराणी  हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व. त्यांचे बालपण अतिशय लाडात गेले. कुटुंबातील सर्व लोक नोकरीपेशातील. वडील मधू जवाहराणी हे आयकर अधिकारी होते. सत्येश यांनी इंजीनिअरिंगचे शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा घरातले सर्व लोक हैराण झाले होते. त्या वेळी त्यांच्या मनात मात्र वेगळी ऊर्मी होती. त्यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. रोजच्या आयुष्यात नैराश्य आणणाऱ्या एखाद्या समस्येची जाणीव करून देणारी तीक्ष्ण नजर आणि त्यापासून दूर न पळता ती सोडविण्यासाठी कल्पक मार्ग शोधणारे सत्येश जवाहराणी यशस्वी उद्योजक आहेत. त्यांची कथाही तेवढीच रंजक आणि प्रेरणादायी आहे.

सत्येश सांगतात, ''माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता, मी चांगली नोकरी मिळविण्याचे ध्येय समोर ठेवूनच लहानाचा मोठा झालो. बारावी पास झाल्यानंतर इंजीनिअरिंग शिक्षणाकडे वळलो. तिथले शिक्षण आणि तिथून बाहेर पडणारे विद्यार्थी पाहून मी स्वतःचा विचार करू लागलो.  स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे  स्वप्न बघू लागलो. हे स्वप्न साकार करण्यासाठी इंजीनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडण्याचा धाडसी आणि धक्कादायक निर्णय घेतला. माझ्या कुटुंबाला न रुचणारा हा निर्णय होता. मी एकुलता एक मुलगा असल्याने वडिलांनी तितके मनावर घेतले नाही. ''तुला जे करायचं आहे त्यात समाधान आणि आनंद असेल तर काहीही कर'' असा सल्ला दिला. शिक्षण सोडून पुढे काय करावे, असा माझ्यापुढे प्रश्न उभा होता. ना घरात कुणी उद्योजक होते, ना कुणी व्यापारी. तरीही माझ्या मनात उद्योजक होण्याचे स्वप्न घोळत होते. मी  आयुष्याच्या एका वेगळया वळणावर उभा होतो. माझी दोलायमान स्थिती पाहून वडिलांनी त्यांच्या एका मित्राच्या प्लास्टिक कंपनीत मला पाठवले. तिथे मला कुणी काम सांगत नसत, त्यामुळे सुरुवातीला माझी घुसमट झाली. मात्र काही काळातच तिथल्या कामाची पूर्ण माहिती घेऊन असाच स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा मी निर्णय घेतला. आयुष्यात उद्योजकतेची बीजे तिथेच रोवली गेली.

स्वतःचा उद्योग सुरू करायचा म्हटले तर पुरेसे पैसे आणि भांडवल असणे आवश्यक असते. घरच्यांनी, स्नेहीजनांनी माझ्या उद्योग उभारणीला पाठिंबा दिला, पण आर्थिक पाठबळ मात्र कुणी दिले नाही. माझ्यापुढे भांडवलाचा, जागेचा प्रश्न उभा होता. वडिलांच्या सहकार्याने मला अंधेरी पूर्व भागात मित्तल इंडस्ट्रीजमध्ये जागा मिळाली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 4 लाखांचे भांडवली कर्ज मिळाले. सोसायटीतून 25 हजार रुपयांचे कर्ज मिळाले. येथून माझ्या उद्योजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्या वेळी माझ्याकडे ना कामाचा अनुभव होता, ना उद्योजकीय व्यवस्थापानाचे गुण. मी जेमतेम एकविशीच्या उंबरठयावर उभा होतो. मालक कोण आणि कामगार कोण यातला फरक मला कळत नव्हता. अशी 1987 साली 'सम्राट प्लास्टिक्स' उद्योगाला सुरुवात झाली. सुरुवातीला 800 फुटाच्या गाळयात माझ्याकडे 1 मशीन आणि एक वर्कर होता. बॉलपेनपासून माझ्या कामाला सुरुवात झाली. त्या काळी बाजारात बॉलपेनला मोठी मागणी होती. व्यवसायात जम बसू लागला आणि  पेनची मागणी कमी होऊ लागली. कामगाराचे पगार, बँकेचे हप्ते, सोसायटीचे कर्ज यामध्ये ताळेबंद घालताना नाकीनऊ यायचे. बँकेचे कर्ज वाढतच होते. एके दिवशी बँकेचे अधिकारी आले आणि कर्ज फेडू न शकल्यास कंपनी सील करू, असा अधिकाऱ्यांनी आदेश दिला. काही रुपयांची तजवीज करून कर्जाचे व्याज भरले. ठरावीक काळापुरते बँकेने मला सहकार्य करावे अशी विनवणी केली. त्यानंतर मी कामावर व वस्तूवर विशेष लक्ष ठेवून ग्राहकांकडून ज्या मालाची मागणी जास्त आहे अशा वस्तू तयार करण्याचा सपाटा सुरू केला. मालाच्या गुणवत्तेमुळे माझ्या उत्पादनाला बाजारात मागणी आली. त्यामुळे 2 ते 3 वर्षांत बँकेचे पूर्ण कर्ज फेडू शकलो. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याच बँकेचे कर्ज घेतले नाही. मात्र, बँकेच्या सहकार्यामुळे उद्योगात पाय टाकू शकलो हेही नाकारता येत नाही. आज माझ्याकडे 4 मशीन आणि 9 कामगार आहेत.'' मालक आणि कामगार यांच्यात आपुलकीचे नाते असल्याने कामगार कधीच काम सोडून गेले नाहीत, असे सत्येश जवाहराणी सांगतात.

आपल्या स्वप्नांच्या दिशेने पाठलाग करत असताना सत्येश जवाहराणी यांनी अनेक चढउतार पाहिले, नुकसान पाहिले, मात्र कामात सातत्य ठेवले. कामाची गुणवत्ता राखत अनेक कामे मिळविली. त्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. 'ग्राहक देवो भव' यावर विश्वास ठेवत त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. प्लास्टिक व्यवसायातील जास्त मिळकतीचा विचार न करता शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून, व्यवसायातील चढउतार लक्षात घेऊन आयुष्यभरासाठी आपल्या व्यवसायाला फायदेशीर ठरेल, असे व्यवस्थापन सूत्र सत्येश जवाहराणी यांनी वापरले. आज, पीव्हीसी आणि प्लास्टिक उत्पादन निर्माता आणि पुरवठादार म्हणून सत्येश जवाहराणी यांची ओळख आहे.

आपल्या व्यवसायाची वैशिष्टये आणि वेगळेपण सांगताना सत्येश जवाहराणी म्हणाले, ''कोणताही उद्योग कमी दर्जाचा नसतो. तो उद्योग शून्यातून कसा पुढे नेला जातो, यास महत्त्व असते. माझा उद्योग मी शून्यातून पुढे नेला. यशस्वी उद्योग करण्यासाठी सचोटी, हातोटी आणि कसोटी या तीन गुणांची आवश्यकता असते. या गुणांचा आपण कितपत उपयोग करतो हे महत्त्वाचे आहे. आम्ही पीव्हीसी पंप आणि प्लास्टिक, प्लास्टिक हँगर्स, प्लास्टिक क्लिप आणि प्लास्टिक फनेल अशा चार उत्पादनांची निर्मिती करून दुसऱ्या विक्रेत्यांना वितरित करतो. आम्ही आमच्या ग्राहकांना देऊ केलेल्या उत्पादनांच्या प्रीमियम गुणवत्तेच्या आधारावर आमचा उद्योग उभा आहे. यात आम्ही पूर्णपणे समाधानी आणि आनंदी आहोत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून ते आसामपर्यंत उत्पादनाचे वितरण करत असतो'' असे सांगत त्यांनी आपल्या व्यवसायावर चिनी वस्तूंचा काय परिणाम होतो यावर प्रकाश टाकला.

सध्या चिनी वस्तू बाजारात अफाट वाढल्याने देशी उत्पादन घटले आहे. चिनी वस्तूंचे आव्हान समोर आल्यामुळे आमच्या तोटयाकडे दुर्लक्ष करून जास्तीचे उत्पादन पदरात पडण्यासाठी कामगारांची संख्या वाढविणे, त्यांना परवडेल असा पगार देणे यांचा वापर करावा लागला, असे जवाहराणी यांनी सांगितले.

आज व्यवसायात अपुरा वीजपुरवठा, जीएसटी अशी अनेक संकटे उभी आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने साथ देणे आवश्यक आहे. छोटे उद्योजक आणि व सरकार यामध्ये समन्वय नाही, ही अडचण आहे. हा समन्वय निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय तत्परता यांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे, अशी जवाहराणी यांनी अपेक्षा व्यक्त केली.

कोणतेही काम हलके न समजता आपल्या व्यवसायात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या आणि घरात कोणताही वारसा नसताना एक यशस्वी उद्योजक म्हणून सत्येश जवाहराणी यांनी मिळविलेले यश पाहता आजच्या नवउद्योजकांनी यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी.

- विकास पांढरे

  9970452767

Powered By Sangraha 9.0