नवल वर्तले! -उत्तरेची कोरिया दक्षिणेच्या भेटीला!

12 May 2018 15:03:00

शत्रुत्वाच्या स्पर्धेत कायमच आघाडीवर राहिलेल्या दोन्ही कोरियन नेत्यांचे मनोमिलन झाले, हा चांगला भाग. आता त्यांच्यात निर्माण होऊ  घातलेली शांतता टिकवणे वा मोडीत काढणे हे चीन आणि अमेरिका यांच्याच हाती आहे. दोन्ही कोरिया भविष्यात एक झाले, न पेक्षा त्यांच्यातले शत्रुत्व कमी झाले, तर अमेरिकेला दक्षिण कोरियातून माघार घ्यावी लागेल. ती घ्यायची तर अमेरिकेला चीनवर नजर ठेवायला आणखी एखादा तळ शोधावा लागेल. अमेरिकेची या पध्दतीने माघार ही चीनला मानवणारी असेल.

'त्यांना केवळ एकच भाषा कळते, तेव्हा त्यांचे लांगूलचालन करू नका' असे ट्वीट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केले होते. हे 'ते' म्हणजे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन. आधीच्या आपल्या सगळया मुक्ताफळांना आवर घालून किम यांनी नववर्षाच्या प्रारंभी केलेल्या भाषणात कोरियन द्वीपकल्पात असलेला तणाव कमी करण्यासाठी आपण तयार असल्याचे जाहीर केले. तोच धागा पकडून दक्षिण कोरियाने त्यांच्या या भावना अमेरिकेपर्यंत पोहोचवल्या. त्यानंतर लगेचच ट्रम्प यांनीही उत्तर कोरियाविषयीच्या आपल्या वल्गना थांबवल्या. त्यापूर्वी त्यांनी उत्तर कोरियाला अद्दल घडवायची भाषा केली होती. आपल्याला किम यांना भेटायला आवडेल, असे त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर किम यांनी दोन्ही कोरियांच्या सरहद्दीवर जाऊ न दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची अलीकडेच भेट घेतली. जगाच्या दृष्टीने हे नवलाईचे होते. दोन्ही नेत्यांनी हात उंचावून वाऱ्याची दिशा बदलत असल्याची खूणगाठ घालून दिली. ट्रम्प यांच्यामुळे किम बदलले की किम यांच्या खेळीमुळे ट्रम्प बदलले, याची चिकित्सा सध्या चालू आहे. यामध्ये चीनची भूमिका काय राहणार आहे, त्याविषयी संशय व्यक्त  होत आहे. उत्तर कोरिया आपल्याला खेळवू शकणार नाही, असे सांगणारी अमेरिका सध्या उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्या खेळात अडकलेली आहे. सहा महिन्यांपूर्वीच किम यांनी अमेरिका आपल्या आण्विक क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात असल्याची धमकी दिली होती. ट्रम्प यांनीही आपले हात बांधलेले नसल्याचे म्हटले आणि जगाने पुन्हा एकदा अणुयुध्दाची छाया अनुभवली.

मात्र किम आणि मून यांच्या भेटीने अणुयुध्दाची भीती किंचित कमी झाली आहे. किम यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांना आणि अणुचाचण्यांना आवरते घेण्याची तयारी दाखवलेली आहे. नंतरच्या काळात सर्व अण्वस्त्रे काढून टाकण्याचीही त्यांची तयारी आहे. त्यासाठी त्यांनी काही अटी घातल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेने दक्षिण कोरियातून आपल्यावर हल्ला करता कामा नये, ही किम यांची पहिली अट आहे. कोरिया द्वीपकल्पात शांतता नांदण्यासाठी चीन आणि अमेरिका यांच्या उपस्थितीत आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्वजाखाली दोन्ही कोरियांमध्ये करार करायची या दोन्ही नेत्यांची तयारी आहे. त्यानंतरचे त्यांचे पुढले पाऊ ल हे दोन्ही कोरियांच्या एकत्रीकरणाच्या कार्यक्रमावर चर्चा करण्याचे असेल आणि ही चर्चा येत्या 15 ऑॅगस्ट रोजी सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले  आहे.

उत्तर कोरियाजवळ दर वर्षी सहा अतिशय शक्तिशाली बाँब बनवता येतील असे तंत्रज्ञान आणि अर्थातच त्यासाठीचा युरेनियमचा साठा आहे. किम यांनी जेव्हा अमेरिकेला धमक्या द्यायला आरंभ केला, तेव्हा ''आपल्याकडे संपूर्ण अमेरिका बेचिराख होईल एवढया ताकदीची आण्विक क्षेपणास्त्रे आहेत'' असे किम यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. आकाराने लहान आणि ताकदीने मोठी अशी आण्विक क्षेपणास्त्रे बनवायला उत्तर कोरियाने आरंभ केला. उत्तर कोरियाकडे 13 हजार किलोमीटरचा प्रवास करून आपले लक्ष्य गाठतील अशी क्षेपणास्त्रे आहेत. ती दक्षिण अमेरिका आणि अंटाक्टर्िका वगळता साऱ्या जगाला पादाक्रांत करू शकतील, असे सांगण्यात येते. अमेरिकेला त्याचीही भीती होती. उत्तर कोरियाला पाकिस्तानने 2004मध्ये हे अणुविषयक तंत्रज्ञान दिले ही वस्तुस्थिती खुद्द उत्तर कोरियाने मान्य केली. त्याबद्दल पाकिस्तानी बाँबचे जनक अब्दुल कादिर खान यांनी कबुलीही दिली आहे.

किम महाशय वारसा हक्काने उत्तर कोरियाच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांचे आजोबा किम इल सुंग हे उत्तर कोरियाचे अध्यक्ष होते. या किम उल सुंगचे चिरंजीव किम जाँग इल हे अध्यक्ष बनले. त्यांचे चिरंजीव किम जाँग उन हेही आपल्या वडलांप्रमाणे हुकूमशहा आहेत आणि आपल्या मार्गातला काटा कसा काढायचा हे त्यांना नेमके कळते. म्हणजे हुकूमशाहीची ही घराणेशाहीच आहे. त्यांचा सावत्र भाऊ किम जाँग नाम हा खरे तर उत्तर कोरियाच्या अध्यक्षपदी यायचा, पण त्याने जपानमध्ये खोटया पासपोर्टवर डिस्ने वर्ल्ड पाहण्यासाठी प्रवेश मिळवला आणि तो पकडलाही गेला. त्यानंतर गेल्या वर्षी तो मलेशियात गेला असताना त्याला उत्तर कोरियाच्याच सरकारी हस्तकांनी मारले. किम नामच्या खुनाचा संशय हा किम जाँग उन यांच्यावर-म्हणजे सध्याच्या अध्यक्षांवरच घेतला जातो, पण त्यांना जाब कोण विचारणार? अशा या किमबरोबर आपले बऱ्यापैकी संबंध असल्याचे ट्रम्प यांनी सांगून टाकले आहे. किम आपल्या सरहद्दीवर जातात काय आणि आपल्या कट्टर वैऱ्याशी बोलतात काय आणि इतकेच नाही, तर लगेचच आपल्या अणुबाँब प्रकल्पांना आवर घालण्याचे धोरण जाहीर करतात काय, हे सगळे परिवर्तन कशामुळे घडले आणि ते खरे की खोटे, असे विचारले जात आहे. त्याचे श्रेय द्यायचेच झाले, तर ते दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना द्यावे लागेल. एवढया नरसंहारास कारणीभूत असलेल्या देशाचे प्रतिनिधी असणाऱ्या किम यांच्याशी बोलायला आपण उत्सुक आहोत असे मून यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सर्वप्रथम जाहीर केले. ट्रम्प यांच्या भूमिकेतही मग बदल घडला.

कोरियाच्या दोन्ही भागांची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, एकत्र असलेल्या कोरियावर 1910 ते 1945 अशी पस्तीस वर्षे जपानची सत्ता होती. दुसऱ्या महायुध्दात जपानचा पराभव झाला, तेव्हा दक्षिण आणि उत्तर भागात कोरियाची फाळणी झाली. जपानी सैन्याने शरणागती पत्करली, पण अमेरिका आणि तेव्हाचा कम्युनिस्ट सोव्हिएत युनियन यांनी कोरियाचे एकत्रीकरण होऊ दिले नाही. उत्तरेच्या भागात असलेले सोव्हिएत सैन्य आणि दक्षिणेच्या भागात असलेले अमेरिकन सैन्य यांनी त्याची तशीच विभागणी केली. 38 अक्षांशावर  दोन विभागांची कृत्रिम सीमारेषा बनवण्यात आली. सोव्हिएत युनियनचे नेते जोसेफ स्टालिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष हेन्री ट्रुमन यांच्यात तसा करार झाला. आपणच कोरियन द्वीपकल्पाचे खरे तारणहार आहोत, असा दोन्ही कोरियांनी दावा केला होता. उत्तर कोरियाच्या अध्यक्षपदी किम इल सुंग यांची निवड झाली, तर दक्षिण कोरियाच्या अध्यक्षपदी सिंगमन ऱ्ही हे निवडून आले. ते कडवे कम्युनिस्ट विरोधक होते. त्यानंतर लगेचच, म्हणजे 1950मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केले. सोव्हिएत युनियनने किम यांना आवर घालायचा प्रयत्न केला आणि तो फसताच उत्तर कोरियास शस्त्रास्त्रांची मदतही मोठया प्रमाणात केली. तेव्हाच्या संयुक्त राष्ट्र संघटनेत (युनोत) हा प्रश्न गेला. चीनला (तैवान नव्हे) संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रवेश न दिल्याबद्दल सोव्हिएत युनियनने सुरक्षा समितीच्या बैठकांवर बहिष्कार टाकला होता. स्वाभाविकच सुरक्षा समितीच्या बैठकीत उत्तर कोरियाच्या विरोधात ठराव संमत झाला. सोव्हिएत युनियनला नकाराधिकार (व्हेटो) वापरता आला नाही. ठरावात उत्तर कोरियास तातडीने सैन्य मागे घेण्याचा आदेश देण्यात आला. भारतानेही तेव्हा उत्तर कोरियाचे हे आक्रमण असल्याचेच म्हटले होते. त्या युध्दात अमेरिकेने दक्षिणेच्या बाजूने जबरदस्त आघाडी उघडली होती. तेव्हापासून अमेरिकेचे सैन्य दक्षिणेत तळ ठोकून आहे. आज ते चक्र उलट दिशेने फिरू लागले आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेला आपले सैन्य दक्षिण कोरियात हवे. त्यामुळे या दोघांमधल्या समझोत्यात बिब्बा घालायची कोणतीही संधी अमेरिका सोडेल असे वाटत नाही.

कोरियाच्या युध्दात 50 लाखांवर माणसे मारली गेली, तरी त्याकडे जागतिक प्रसारमाध्यमांनी म्हणावे तसे लक्ष दिले नव्हते. उत्तर कोरियावर आधीच्या काळात कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनचा प्रभाव होता, तो आता चीनचा आहे. त्यामुळेच दोन्ही कोरियन नेत्यांनी करार करताना चीन आणि अमेरिका, तसेच संयुक्त राष्ट्रसंघ यांना विचारात घेतले आहे, आताच्या रशियाला नाही. दोन्ही नेत्यांनी जो करार केला आहे, त्यातील अटी पुढीलप्रमाणे - 1) 1953नंतर स्थगित झालेले कोरियन युध्द संपले असल्याचे जाहीर करायला दोन्ही कोरिया तयार, 2) अण्वस्त्ररहित क्षेत्र हे आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे दोन्ही नेत्यांना मान्य, कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त प्रदेश बनवण्यासाठी एकत्र काम, 3) दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन प्याँगयाँगला (उत्तर कोरियाची राजधानी) येत्या हिवाळयात भेट देतील, 4) दोन्ही कोरिया जमिनीवर, आकाशात आणि समुद्रात शत्रुत्वाच्या आपल्या हालचालींना पायबंद घालतील, 5) कोरियाच्या सरहद्दीवर एकमेकांच्या विरोधात चाललेला प्रचार 1 मेपासून थांबवण्यात येईल, 6) उत्तर कोरियात गेसियाँगमध्ये दोन्ही कोरियांचे संपर्क कार्यालय असेल. 7) 1950-53च्या युध्दाने जी कुटुंबे विभक्त झाली आहेत, त्यांना येत्या  15 ऑॅगस्ट रोजी एकत्र आणण्यात येईल, 8) पूर्व किनाऱ्यावर दोन्ही कोरिया एकमेकांना जोडणाऱ्या लोहमार्गाची फेरउभारणी करतील, 9)2018च्या आशियाई  क्रीडास्पर्धेत दोन्ही कोरिया एकत्रपणे सहभागी होतील, सर्व क्षेत्रात आंतरकोरियन देवाणघेवाण होईल. हा करार पुढल्या सर्व पावलांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

दोन्ही देशांच्या सरहद्दीवर ध्वनिक्षेपकाद्वारे जो प्रचार चालतो, तो सभ्यतेच्या संकेतांच्या सर्व मर्यादा ओलांडणारा असतो, म्हणूनच ते ध्वनिक्षेपक काढून टाकायचे निश्चित झाले आणि प्रत्यक्षात 1 मेपूर्वीच ते काढून टाकायला प्रारंभ झाला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या टेहळणी नाक्यासमोर लष्करमुक्त प्रदेशात उभी उंच झाडे छाटून टाकण्यासाठी गेलेल्या अमेरिकी लष्कराच्या कॅप्टन ऑॅर्थर बोनीफास आणि मार्क बॅरेट यांना उत्तर कोरियाच्या लष्कराने गोळया घालून ठार केले. ही घटना 18 ऑॅगस्ट 1976 रोजी घडली. उत्तर कोरियाने त्याचे कारण देताना म्हटले की ते झाड किम इल सुंग यांनी लावलेले होते. केवळ एका झाडामागे दडून झालेले हे खून होते. उत्तर कोरियाच्या सुमारे डझनभर महिला कर्मचारी चीनमध्ये हॉटेलात काम करायला गेल्या आणि तिथून त्या दक्षिण कोरियात शरण आल्या. त्यांना दक्षिण कोरियाने उत्तरेत परत पाठवून दिले. त्यांचे पुढे काय झाले ते कळलेलेच नाही. दोन देशांमधले असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वैरभावाचे नमुने या जगाने पाहिलेले आहेत. ते संपवायचा प्रयत्न केला जाणार असेल तर त्याचे स्वागतच, पण शेवटी चक्रमपणासाठी प्रसिध्द असलेले किम आणि त्यांचे लहरी प्रशासन यांच्याशीच ही गाठ असल्याने नेमके काय आणि कधी घडेल ते सांगता येणे अवघड आहे. गेल्या वर्षी मून जे इन हे जेव्हा अध्यक्षपदी निवडले गेले, तेव्हा त्यांच्या प्रशासनाने उत्तर कोरियाकडे परस्पर भेटीगाठींचा कार्यक्रम निश्चित करण्याची मागणी केली होती, पण त्यास तेव्हा प्रतिसाद दिला गेला नव्हता. दक्षिण कोरियाच्या प्रशासनाकडे 1988पासून विभक्त बनलेल्या एक लाख 31 हजार 447 कोरियनांची नोंद होती, त्यापैकी सत्तर हजार जण हयात नाहीत. जे जिवंत आहेत, ते 90 वर्षांचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत. अनेक जण चीनमध्ये, अमेरिकेत किंवा कॅनडासारख्या देशात राहतात. त्यांना परत बोलावून घ्यावे लागेल, हे दोन्ही नेत्यांना मान्य आहे.

अशा तऱ्हेने शत्रुत्वाच्या स्पर्धेत कायमच आघाडीवर राहिलेल्या दोन्ही कोरियन नेत्यांचे मनोमिलन झाले, हा चांगला भाग. आता त्यांच्यात निर्माण होऊ  घातलेली शांतता टिकवणे वा मोडीत काढणे हे चीन आणि अमेरिका यांच्याच हाती आहे. दोन्ही कोरिया भविष्यात एक झाले, न पेक्षा त्यांच्यातले शत्रुत्व कमी झाले, तर अमेरिकेला दक्षिण कोरियातून माघार घ्यावी लागेल. ती घ्यायची तर अमेरिकेला चीनवर नजर ठेवायला आणखी एखादा तळ शोधावा लागेल. (सध्या जपान, थायलंड आणि फिलिपाइन्स या देशांमध्ये असे तळ आहेत.) अमेरिकेची या पध्दतीने माघार ही चीनला मानवणारी असेल. किम आणि मून यांच्यातल्या चर्चेचे श्रेय ट्रम्प यांनी स्वत:कडे घेतले आहे. अमेरिकेने घातलेले निर्बंध आणि आणलेला दबाव हा किम यांच्यात झालेल्या बदलास कारणीभूत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मून यांनी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे कौतुकच कौतुक केले आहे, ते इतके की, ट्रम्प यांना त्यांच्या या प्रयत्नांबद्दल शांततेचे नोबेल पारितोषिकच दिले पाहिजे, असे त्यांना वाटते आहे. ट्रम्प यांनी त्याबद्दल मून यांचे लगेचच आभारही मानून टाकले आहेत. चीन हा काही शांततेचा पाईक नाही, पण त्याला आपल्या व्यापारवृध्दीसाठी आणखी एक मार्ग मोकळा राहील. दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही कोरियांमध्ये चिनी उद्योगांना भरपूर मोकळीक मिळेल. दक्षिण कोरियाशी चीनचे वैर असले, तरी मोठया चिनी उद्योगांची महत्त्वाची केंद्रे दक्षिण कोरियातच आहेत, हे लक्षात घेतले म्हणजे चिन्यांना महत्त्व कशाचे आहे हे लक्षात येते. ही परिस्थिती अमेरिकेला मानवणारी असेल का? एवढाच फक्त प्रश्न आहे.

9822553076

 

Powered By Sangraha 9.0