* **संजय ढवळीकर ***
चांगल्या हुद्दयाची, भरगच्च पगाराची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस क्वचितच कोणी करू शकते. ठाण्यातील आर्चिस बिझनेस सोल्युशन प्रा. लि.ची सुरुवात अशाच धाडसातून झाली. कंपनीचे संचालक संजय ढवळीकर यांनी दोन तपाहून अधिक काळ बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिस आणि इन्श्युरन्स या क्षेत्रात नोकरी केली. त्यानंतर याच क्षेत्रात वेगळया प्रकारचे योगदान देणारा व्यवसाय त्यांनी सुरू केला. या व्यवसायाचे स्वरूप सांगणारी आणि त्या अनुषंगाने बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि इन्श्युरन्स या क्षेत्रातील तंत्रज्ञान क्रांतीचा वेध घेणारी संजय ढवळीकर यांची मुलाखत.
आर्चिस बिझनेस सोल्युशन्सची कल्पना कशी सुचली आणि ती प्रत्यक्षात साकारण्यास कशा प्रकारे सुरुवात झाली?
आर्चिस बिझनेस सोल्युशन्सची सुरुवात 2014मध्ये झाली. त्याआधी 26-27 वर्षे मी बँकिंग, इन्श्युरन्स क्षेत्रात बॅक ऑफिससाठी काम करत होतो. मी कॉमर्समधील पदवीधर आहे. पुढे मी एच.आर.मधील शिक्षण घेतले. बँकिंग आणि इन्श्युरन्स क्षेत्रात काम करत असताना या क्षेत्रातील बदल - उदा., विमा कंपन्या, बँका यांचे खासगीकरण या सगळया प्रक्रियांमध्ये मी सहभागी होतो.
आयसीआयसीआय बँक आणि आयसीआयसीआय इन्श्युरन्स विभाग दोन्हीमध्ये मी चांगल्या काळात काम केले. स्टेट बँकेच्या इन्श्युरन्स विभागात काम केले आहे. स्टार युनियन दायईची लाईफ इन्श्युरन्स यामध्येही मी पाच ते साडेपाच वर्षांसाठी काम केले आहे. त्याशिवाय सिटी बँक, स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक, एचडीएफसी बँक यांमध्ये महत्त्वाचे प्रकल्प हाताळले आहेत. या सगळयाच संस्थांमध्ये मी मोठया पदांवर काम केले आहे. त्यामुळे या संस्था वापरत असलेले तंत्रज्ञान, त्यांच्या उत्पादनांचा विकास, ग्राहकांविषयीचा त्यांचा दृष्टीकोन याबाबत माझ्या गाठीशी बराच अनुभव जमा झाला होता. या सर्व ठिकाणी नवीन शिकण्याची संधी मिळाली. यातून माझा आवाका वाढला आणि दृष्टीकोन व्यापक झाला. माझ्या कामाशी संबंधित शिबिरे, कार्यशाळा यांना मी उपस्थित राहू लागलो.
या क्षेत्रातील काम आणि अभ्यास करत असताना जाणवायचे की या सर्व विषयातील कायदे माहीत असलेली किंवाया सगळया प्रक्रियेतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती असलेली, नवीन तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर करू शकत असलेली, अशी जर एखादी संस्था किंवा कंपनी असेल तर ती या क्षेत्रात चांगली सेवा देऊ शकेल. माझ्या गाठीशी असलेला अनुभव बघता, मी अशी कंपनी सुरू करावी असा विचार मनात आला. आणि तो प्रत्यक्षात उतरला.
या माध्यमातून आपण रोजगाराचे काही साधन उपलब्ध करून देऊ शकतो असे वाटले. त्याचबरोबर बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिस हे क्षेत्र एका खूप मोठया स्थित्यंतरातून जात आहे. तंत्रज्ञानातही मोठया प्रमाणात बदल होत आहेत. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण एक चांगली सपोर्ट सिस्टिम उभी करू शकू या विचारांतून 2014 साली आर्चिस बिझनेस सोल्युशन्स कंपनीची स्थापना केली. आज कंपनीने चांगली प्रगती केली आहे. माझी पत्नी माधुरी ढवळीकरदेखील कंपनीची संचालक म्हणून काम पाहत आहे. तसेच नॅशनल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऍण्ड सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या राष्ट्रीय कार्यशाळेत मला 'इंडियन लीडरशीप'चा पुरस्कारही मिळाला आहे.
व्यवसायाचा सुरुवातीच्या काळ कसा होता?
आपण जेव्हा एखाद्या मोठया हुद्दयावर असताना व्यवसाय सुरू करण्याचा विचार बोलून दाखवतो, तेव्हा सर्व जण भरभरून पाठिंबा देतात. पण नोकरी सोडून जेव्हा खरोखरच व्यवसायात उतरतो, तेव्हा खरेच कोण कोण आपल्यासोबत आहे ते कळते. पहिले सात महिने माझ्याकडे एकही काम नव्हते. हे सात महिने लोकांना भेटून कंपनीची माहिती देण्यातच गेले. आर्चिस सोल्युशन्स ही इतर स्पर्धक कंपन्यांपेक्षा वेगळी आणि उत्कृष्ट सेवा देणारी कशी आहे, हेसुध्दा त्यांना पटवून द्यावे लागले. ही प्रक्रिया खूप मोठी असते. मात्र या काळातही टीजेएसबीसारख्या बँकेने आमच्यावर विश्वास दाखवून काम करण्याची संधी दिली.
तुमच्या कामाचे स्वरूप नेमके कसे आहे?
बँका, पतपेढया, फायनान्शिअल कंपन्या, इन्श्युरन्स कंपन्या यांना त्यांची कामे सुलभ करण्यासाठी मोठया प्रमाणावर सर्व्हिस सपोर्ट लागतो. हा सर्व्हिस सपोर्ट आम्ही पुरवतो. उदाहरणार्थ, बँकांमध्ये खाते उघडण्याची एक प्रक्रिया असते. आपण बँकेत गेल्यावर खाते उघडण्यासाठी अर्ज भरतो. पण त्यासाठीची सगळी प्रक्रिया असते ती बँकेला किंवा तिसऱ्या एखाद्या व्यवस्थेला करावी लागते. इन्श्युरन्स कंपन्यांमध्ये पॉलिसीचे नूतनीकरण किंवा ग्राहकांना हप्ते भरण्याची आठवण करून देण्यासाठी अशा प्रकारचे सहकार्य लागते. थोडक्यात म्हणजे आजच्या काळात ज्या मुख्य आर्थिक संस्था असतात, त्यांना ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी तांत्रिक सहकार्य लागते ते आम्ही पुरवतो.
आपण देत असलेल्या सेवांपैकी 'डिजिटल लायब्ररी' आणि 'डिजिटल अर्काइव्ह' यांमागची संकल्पना काय आहे?
'डिजिटल लायब्ररी' आणि 'डिजिटल अर्काइव्ह' अशा आमच्या दोन महत्त्वाच्या सेवा आहेत. आपले डॉक्युमेंट्स डिजिटाईज करण्याची आणि पुढे जाऊन प्रक्रिया अधिक जलद करण्याची गरज आज सर्वांनाच आहे. उदा. आपण कर्जाची मागणी करतो, त्या वेळी नेहमीच्या प्रक्रियेत आपल्याला कर्जासाठी अर्ज भरावा लागतो. त्यानंतर सगळया कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यांची डेटा एन्ट्री होते, मग तपासणी होते. मग ते सगळे पुढच्या अधिकाऱ्याकडे जाते. तो अधिकारी त्यावर कार्यवाही करून त्याबाबत नोट लिहितो, ही नोट लिहून तो अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो. या सगळया प्रक्रियेत एका कर्जाला मंजुरी मिळायला साधारण 15 दिवस आणि जास्तीत जास्त 2-3 महिने इतका काळ जातो. पण हीच प्रक्रिया जर डिजिटल केली, तर ज्या दिवशी अर्ज भरला, त्या दिवशी तो स्कॅन करून त्याला वर्क फ्लो इंजीनच्या माध्यमातून आपोआपच त्याची लगेच डेटा एन्ट्री होते, तेथून त्याची पडताळणी होते. अधिकारी संगणकावरच अर्जांची आणि कागदपत्रांची तपासणी करून त्यावरच नोट लिहून पुढे पाठवू शकतो. त्यामुळे एकूणच कर्ज मंजुरीची प्रक्रिया ही तीन महिन्यांवरून 8-10 दिवसांवर येऊ शकते.
यालाच मी 'ऍनालॉग प्रोसेस डिजिटल करण्याऐवजी डिजिटल विचार करून डिजिटल प्रोसेस तयार करणे' असे म्हणतो. याच प्रकारात मोडणारी उत्पादने आम्ही तयार करतो. यामध्ये सध्या बँका, इन्श्युरन्स कंपन्या, सहकारी बँका आणि पतपेढया यांना सेवा देतो. डिजिटल इंडियाचा मुख्य उद्देश हाच आहे की कमीत कमी वेळेत आणि अचूक कामे व्हावीत आणि त्यामध्ये पारदर्शकता राहावी.
आपले महत्त्वाचे ग्राहक कोण आहेत?
ठाणे जनता सहकारी बँकेला (टीजेएसबीला)आम्ही सेवा देतो. तंत्रज्ञान केंद्रस्थानी ठेवून ग्राहकांना कशा प्रकारे चांगल्यात चांगली सेवा देता येते, याचे चांगले उदाहरण म्हणजे टीजेएसबी बँक आहे. त्याशिवाय जनसेवा बँक, झोरास्टि्र्रयन बँक, ठाणे भारत बँक या सहकारी बँकांबरोबरच काही खासगी बँकांबरोबरही काम करतो. कल्याण जनता बँकेसोबतही लवकरच काम सुरू होत आहे. विमा क्षेत्रात एसबीआय जनरल इन्श्युरन्स कंपनीबरोबर काम केले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही आम्ही सेवा देतो. भारत सरकारच्या शिक्षण खात्याने नॅशनल ऍकॅडेमिक डिपॉझिटरी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये परीक्षार्थींची सर्व कागदपत्रे स्कॅन करून जतन केली जातील. महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी त्यातूनच ते घेतले जातील. महाविद्यालयातून पास झाल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राची त्या कागदपत्रांमध्ये नोंद होईल आणि त्याची कॉपीही त्यात जतन केली जाईल. नोकरीच्या वेळेसही त्या व्यक्तीची सर्व कागदपत्रे त्यातूनच पडताळली जातील. एनएसडीएल, सीडीएसएल या विभागांद्वारे हा उपक्रम एकत्रितपणे चालवला जातो. त्यात आमचाही महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच काही शैक्षणिक संस्थांसाठी आम्ही नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारी शिबिरे, कार्यशाळा किंवा कोर्सेस आयोजित करतो.
तंत्रज्ञानात सातत्याने आणि वेगाने बदल होत आहेत. त्यानुसार सेवा देताना तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागते?
तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल हे या क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान आहे. आतापर्यंत तंत्रज्ञानाबाबतीत ज्या ज्या क्रांती झाल्या आहेत, त्यामुळे काही गोष्टी किंवा आधीच्या पध्दतीतील नोकऱ्या लुप्त झाल्या आहेत, पण त्याचबरोबर दुसरे काही तरी निर्माण झाले आहे. असे बदल आपण किती तत्परतेने स्वीकारतो, तो बदल समजून त्या वेगाला अनुसरून आपण बदलणे हे सगळयात मोठे बौध्दिक आव्हान आहे. त्यासाठी आपल्याण तत्पर राहणे गरजेचे आहे.
यासाठी मला स्वत:ला तंत्रज्ञानातील बदलांबाबत जागरूक राहावे लागते. आज काय होतेय यापेक्षा उद्या पाच वर्षांनी काय होईल आणि त्याच्याही पुढच्या पाच वर्षात काय होईल याबाबतची माहिती देणारी अनेक शिबिरे, कार्यशाळा किंवा अन्य साधने असतात. आज अनेक लोक तंत्रज्ञानात काय प्रकारचे बदल संभवतात याचा अभ्यास करणारे असतात. ते त्याबाबतची माहिती, अंदाज प्रसिध्द करतात. त्यातून स्वत:ला अपडेट ठेवावे लागते. तसेच त्यानुसार आपल्या कार्यपध्दतीत बदल केल्यास फायदा होतो.
एकीकडे तंत्रज्ञानात काय बदल होतील याचा विचार करून आम्ही त्यासाठी मनुष्यबळ तयार करतो, तर दुसरीकडे व्यवसाय प्रतिनिधीसारख्या माध्यमातून सेवांची क्षमता कशी वाढवता येईल यावर आम्ही काम करत आहोत. गेल्या काही दिवसांत आर्थिक क्षेत्रातील जोखीम वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल यावर आम्ही काम करत आहोत.
दुसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना, त्यावर विश्वास ठेवण्याची आपल्याला भीती वाटते. परंतु, या भीतीवर मात करणे हेही मोठे आव्हान आहे.
तंत्रज्ञान बदलाचे भविष्यातील स्वरूप काय असू शकेल? आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे तयार आहात?
या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे भविष्यातील बरेचसे स्वरूप व्हर्च्युअल असणार आहे. मात्र त्यासाठी कदाचित जास्त मनुष्यबळ लागू शकेल. उदा. खेडयापाडयापर्यंत आर्थिक सेवा पोहोचवण्यासाठी सध्या बीसी (बिझनेस कॉरस्पॉन्डन्स)सारख्या मॉडेलचा वापर होत आहे. बीसीमध्ये बँकेचा व्यावसायिक प्रतिनिधी एखाद्या गावात बँकेतर्फे एका ठरावीक मर्यादेत व्यवहार करू शकतो. अशाच प्रकारचे व्यवसाय प्रतिनिधी केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर अन्यही क्षेत्रात असतात. त्यामुळे यापुढे जास्तीत जास्त काम ग्रामीण भागात होईल. शहरी भागात तंत्रज्ञानातील बदल होतील आणि ते ग्रामीण भागात कसे पोहोचवायचे याकडे आम्ही सध्या लक्ष केंद्रित केले आहे.
दुसरे उदाहरण द्यायचे, तर बँकेत खाते उघडण्याच्या प्रक्रिेयेत कमालीचे बदल झाले आहेत. त्याच्या पुढच्या पायरीत टॅब बँकिंग केले जाऊ लागले. त्यामध्ये बँकेचामाणूस आपल्या घरी येऊन फॉर्म भरून घेतो. त्याच्याकडच्या टॅबमध्येच आपला फोटो काढतो. आपली सर्व कागदपत्रे स्कॅन करतो आणि पुढे पाठवून देतो.
कोटकने सध्या एक नवीन खातेप्रकार सुरू केला आहे, 811. म्हणजेच 8/11 रोजी निश्चलनीकरण झाल्यानंतर काय बदल होणार, त्यानुसार त्यांनी हा खातेप्रकार सुरू केला. त्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटरवर आपली सर्व आवश्यक माहिती भरून बँकेकडे ऑनलाईन पाठवली की दुसऱ्या दिवसापासून तुमचे अकाउंट वापरायला सुरू करू शकता. पुढच्या काही काळात कदाचित असे बदल होतील की आपल्याला बँकांच्या शाखाच दिसणार नाहीत. व्हर्च्युअल बँक असेल. चेक, प्लास्टिक मनी यांचा वापरही कमी होईल. सगळे व्यवहार मोबाइलच्या माध्यमातून होतील. या बदलांनुसार आपल्या प्रोसेसेस कशा तयार करता येतील यासाठी तयार राहावे लागते. असे बदल केवळ बँकिंगमध्येच नव्हे, तर संपूर्ण आर्थिक क्षेत्रात होतील. त्याहीपुढे डिजिटल लॉकरसारख्या सुविधाही असतील. अशा प्रकारचा तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात होत आहे. डेटा ऍनालिसिस आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांच्याबद्दल मोठया प्रमाणात बोलले जात आहे.
आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत जनजागृतीसाठी आपण काय प्रयत्न करता?
तंत्रज्ञानातील झपाटयाने होणाऱ्या बदलाबाबतही विशिष्ट वर्गालाच माहिती आहे. मात्र ग्राहक असणाऱ्या मोठया वर्गाला त्याबाबत माहिती नाही. 2015पासून आम्ही फायनान्स क्षेत्रासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. 2015मध्ये पुण्याला आम्ही स्व-तंत्र-ज्ञान परिषद घेतली, ज्यामध्ये महाराष्ट्रातील साधारणत: 100 सहकारी बँका आणि पतसंस्था यांना भविष्यात होणारे तंत्रज्ञानाचे बदल याबाबत माहिती दिली.
2017मध्ये 'टेक ए बिग लीप' हा कार्यक्रम विवेक समूहासोबत केला. बँक, इंडस्ट्री आणि गव्हर्नमेंट (BIG) यांनी एकत्रित सहकारातून व्यवसायवृध्दी आणि आर्थिक विकास कसा साधता येईल या विषयाला धरून हा कार्यक्रम केला. तसेच गेली दोन वर्षे आर्चिसच्या माध्यमातून आम्ही अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्याचे तत्काळ विश्लेषणही देत आहोत. विदेशातदेखील भविष्यातील ट्रेण्डस् (बँकिंग आणि इन्श्युरन्स क्षेत्रातील) या विषयातील काही परिषदांना मी उपस्थित राहिलो आहे व त्यात मार्गदर्शनदेखील केले आहे. विशेषत्वेकरून फ्रान्स, मलेशिया, द. आफ्रिका या देशांमध्ये अशा प्रकारच्या परिषदांना उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
आपले भविष्यातील ध्येय आणि योजना काय आहेत?
जेव्हा आम्ही हे काम सुरू केले, तेव्हा दोन जणच होतो. आज अडीचशे-तीनशे लोक त्यात सहभागी आहेत. पुढच्या पाच वर्षांत वार्षिक उलाढालीचा 25 कोटींचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे भविष्यात जेव्हा कोणाला आर्थिक क्षेत्रातील अशा सेवांची गरज पडेल, तेव्हा आमच्या कंपनीचे नाव समोर यावे असे काम करायचे आहे. मग बाकीच्या गोष्टी त्याबरोबरीनेच साध्य होतील.
सपना कदम-आचरेकर
--------------------------------------------------------------
संजय ढवळीकर
आर्चिस बिझनेस सोल्युशन्स प्रा. लि.
9619186333
www.archisbiz.com