कर्नाटक निकाल अंदाजांनी पुरोगामी घायाळ

23 Apr 2018 12:23:00

या सर्वेक्षणाची अडचण अशी आहे की काँग्रेसची सत्ता परत येईल का, याची खात्री देणे मुश्कील झाले आहे. आणि यानेच पुरोगामी घायाळ झाले आहेत.सर्वेक्षणात कुणालाच स्वत:च्या बळावर सत्ता मिळणार नाही असे भाकित आहे. आणि हीच पुरोगाम्यांना घायाळ करणारी बाब आहे. कारण इतरांशी जुळवून घेणे हे यांच्या डीएनएमध्येच नाही.

कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. पुढच्या महिन्यात मतदान होऊन नवीन सरकार सत्तेवर येईल. या निवडणुकीच्या निकालांचे अंदाज इंडिया टुडे या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने जाहीर केले आहेत. या अंदाजांप्रमाणे काँग्रेसला जास्तीत जास्त 100 जागा मिळू शकतात. (आपण जास्तीच्याच जागा गृहीत धरू.) भाजपाला कमीत कमी 80 जागा मिळू शकतात. (पुरोगाम्यांच्या सोयीसाठी भाजपाच्या कमीच जागा गृहीत धरू.) माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने मायावतींच्या बहुजन समाज पक्षाशी युती केली आहे. त्यांना 35 जागा मिळतील असे हे सर्वेक्षण सांगते. शिल्लक 9 जागा अपक्षांना व इतरांना मिळतील, असा अंदाज आहे. (एकूण जागा 224 अधिक एक नेमलेला सदस्य). सध्या काँग्रेसच्या ताब्यातील हे एकमेव मोठे राज्य आहे. (पंजाब काँग्रेसच्या ताब्यात आहे, पण तिथे लोकसभेच्या केवळ 13 जागा आहेत, तर कर्नाटकात 28 आहेत.)

आता या सर्वेक्षणाची अडचण अशी आहे की काँग्रेसची सत्ता परत येईल का, याची खात्री देणे मुश्कील झाले आहे. आणि यानेच पुरोगामी घायाळ झाले आहेत. या सर्वेक्षणाबद्दल संशय यावा अशी एक आकडेवारी यात आहे, ती म्हणजे सत्तास्थापनेसाठी जास्तीत जास्त लोकांनी काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी एकत्र यावे, असे मत व्यक्त केले आहे.

पुरोगाम्यांची हीच तर अडचण आहे. सध्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे मूळचे भारतीय लोकदलाचे. मग ते जनता पक्षात गेले. पुढे देवेगौडा यांच्याबरोबर जनता दलात राहिले. कर्नाटक जनता दल मंत्रीमंडळात अर्थमंत्री राहिले. अगदी उपमुख्यमंत्रीसुध्दा राहिले. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आमदार म्हणून निवडून आले. 2013पासून ते मुख्यमंत्री आहेत. अशा या मूळच्या समाजवादी सिध्दरामय्यांचे देवेगौडा यांच्याशी जराही पटत नाही.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत देवेगौडांच्या पक्षाचे सात आमदार त्यांनी फोडले आणि काँग्रेसचा खासदार निवडून आणला. परिणामी देवेगौडांचा उमेदवार पराभूत झाला.

या सगळया पार्श्वभूमीवर जे निवडणूकपूर्व अंदाज प्रसिध्द झाले आहेत, ते पुरोगाम्यांसाठी काळजी करणारे आहेत. कारण देवेगौडा आणि सिध्दरामय्या यांच्यात विस्तव आडवा जात नाही. दुसरीकडून देवेगौडांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जाहीर सभांमधून 'कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसबरोबर जाणार नाही' असे ठासून सांगितले आहे.

यात आणखी दुसरी भर म्हणजे ओवैसी यांचा एम.आय.एम. पक्षाने उत्तर कर्नाटकातील 50 जागा लढविणार असल्याची घोषणा केली आहे. हा पक्ष भाजपाला मदत करतो असा आरोप पुरोगामी आणि काँग्रेसवाले करत असतात, तर दुसरीकडे स्वत: ओवैसी 'काँग्रेस व इतर सेक्युलर पक्ष हेच भाजपाला मदत करतात' असा आरोप करत असतात.

सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ शकते. पण सुरुवातीलाच असले अपशकुन होत असतील तर करायचे काय, हा पुरोगाम्यांसमोर प्रश्न आहे.

अजूनही डाव्या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. बाजूच्या केरळात डाव्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत आहे. आतापर्यंत काँग्रेसप्रणीत आघाडी त्यांचा प्रमुख विरोध करत आलेली आहे. याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे कर्नाटकात काँग्रेसला कसलेही सहकार्य करू नये, असा मतप्रवाह कर्नाटकातील डाव्या गटांमध्ये आहे. त्यांचा कल देवेगौडा-मायावती युतीकडे आहे. ज्या तत्परतेने मायावती यांनी निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे, ती तशी करण्याची हिंमत अजूनही डाव्या पक्षांनी केली नाही.

डाव्यांची हीच नीती त्यांच्या अंगाशी येत असते. गुजरातमध्ये भाजपाच्या विरोधात इतकी राळ उडवून दिली गेली होती, पण एकाही डाव्या पक्षाने प्रत्यक्षात तिथे काँग्रेसशी युती केली नाही. आज बेळगाव भागात सभा घेणारे शरद पवार यांनीही गुजरातेत काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवत स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या.

भीमा कोरेगावनंतर देशभरच्या दलित राजकारणावर वर्चस्व मिळवू पाहणारे प्रकाश आंबेडकर अजूनही कर्नाटकात फिरकले नाही. गुजरातेत त्यांनी दौरे केले होते. प्रत्यक्ष निवडणुकीत यांनी कसलीच सक्रिय भूमिका घेतली नाही. आता तर कर्नाटकबाबत त्यांनी तेवढेही केलेले नाही.

त्रिपुरात माक्र्सवाद्यांची सत्ता होती. त्या ठिकाणी सगळे पुरोगामी एकवटून त्यांनी प्रचार केला असता, तर शक्यता होती की माक्र्सवाद्यांचा पराभव झाला नसता. तसेही भाजपा आणि माक्र्सवादी यांच्या मतांत फारसा फरक नाही. पण पुरोगामी मोदीद्वेषाने इतके पछाडलेले आहेत की त्यासाठी ते स्वत:चा नाश करून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात.

आता कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली, तर त्यात व्यावहारिक पातळीवर देवेगौडा किंवा कुमारस्वामी हे नितीशकुमार यांच्या पायावर पाय ठेवून भाजपाबरोबर जाण्याची जास्त शक्यता आहे.

सर्वेक्षणाप्रमाणे काँग्रेस आणि देवेगौडा यांचीच युती होईल हे आपण गृहीत धरू. मग दुसरा प्रश्न समोर येतो. भाजपच्या सध्याच्या 40 जागा आहेत, त्या वाढून 80 होत आहेत. याचे विश्लेषण काय करणार? कारण गुजरातेत काँग्रेसच्या 20 जागा वाढल्या, तर त्याचे वर्णन 'नैतिक विजय' असे केले गेले होते. मग आता भाजपाच्या तर 40 जागा वाढत आहेत. मग त्याचे वर्णन 'दुप्पट नैतिक विजय' असे करणार का?

साधारणत: जानेवारीपासून कर्नाटकाच्या लगतच्या राज्यातील भाजपा कार्यकर्ते त्या त्या लगतच्या कानडी प्रदेशात कामाला लागले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार आखणी केली गेली आहे. 2008ला पहिल्यांदा भाजपाने कर्नाटकात सत्ता मिळवली होती. त्यानंतर सत्ता गमावली, पण दुसरा क्रमांक शाबूत ठेवत विरोधी पक्षनेतेपद पटकावले होते. आताही किमान दोन नंबरचा पक्ष भाजपाच असेल, हे सर्वच मान्य करत आहेत.

भाजपाला सत्ता न मिळता त्याच्या जागांची संख्या दुप्पट झाली तरी त्यांचा फायदाच आहे. पण यदाकदाचित जर काँग्रेसची सत्ता गेलीच, तर काँग्रेस ती हानी कशी भरून काढणार आहे?

अणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी स्वत: हरल्या होत्या. पण लगेच त्यांनी कर्नाटकातील चिकमंगळूर येथून पोटनिवडणूक लढविली आणि दणदणीत विजय मिळवत राजकारणात पुनरागमन केले. काँग्रेसचे कार्यकर्ते हा देदीप्यमान इतिहास विसरू पाहत असतील, तर पक्षासाठी ते मुश्कील आहे. सिध्दरामय्या समाजवादी चळवळीतून राजकारणात आले. काँग्रेस तर सेक्युलर राजकारणाचे पेटंट आपल्याकडेच आहे अशा तोऱ्यात असते. मग याच काँग्रेस सरकारने लिंगायत धर्माच्या स्फोटक मागणीला निवडणुकीच्या तोंडावर हवा का दिली? समोर भाजपाकडे येड्डियुरप्पांच्या रूपाने हुकमाचा लिंगायत एक्का असताना ही खेळी खेळण्यात नेमका कुठला राजकीय शहाणपणा होता?

1989पासून सतत मिळणारी मते आणि जागा यांचे संतुलन भाजपा राखत आला आहे, असे सखोल विश्लेषण सुहास पळशीकर यांच्यासारख्या राजकीय अभ्यासकाने केले आहे. देशपातळीवरील कर्नाटकातही गेल्या वीस वर्षांपासून हे विश्लेषण दिसून येते आहे. दक्षिणेतील पहिली लोकसभेची जागा भाजपाने इथूनच जिंकली होती. याच राज्यात पहिल्यांदा स्वत:च्या बळावर सरकारही स्थापन केले होते. आज सर्वेक्षण करताना त्यांना किमान दोन नंबरच्या जागा आणि काँग्रेसच्या बरोबरीने मते ही वस्तुस्थिती अभ्यासकांना मान्य करावी लागते आहे.

खरे तर चिवटपणे सातत्याने राबणाऱ्या हजारो लाखो कार्यकर्त्यांमुळे भाजपाचे यश आहे. भाजपावर मात करावयाची असेल, तर असे नि:स्वार्थी कार्यकर्ते तयार करावे लागतील. त्यांना सतत विधायक कार्यात गुंतवून ठेवावे लागेल. त्यासाठी सामाजिक संस्थांची मोठया प्रमाणात उभारणी करावी लागेल. पण हे काहीच न करता भाजपाच्या नावाने बोटे मोडत राहणे एवढा एकच उद्योग पुरोगामी करत आहेत. अगदी कुमार केतकरांसारखे विद्वानही '2019मध्ये भाजपा जिंकल्यास देशात लोकशाही उरणार नाही' असली बिनबुडाची विधाने करत आहेत. याचा परिणाम इतकाच होतो की काठावरचा मतदारही भाजपाकडे झुकतो.

सर्वेक्षणात कुणालाच स्वत:च्या बळावर सत्ता मिळणार नाही असे भाकित आहे. आणि हीच पुरोगाम्यांना घायाळ करणारी बाब आहे. कारण इतरांशी जुळवून घेणे हे यांच्या डीएनएमध्येच नाही. गमतीत नेहमी असे म्हटले जाते की दोन डावे मिळून तीन पक्ष स्थापन करतात.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

  9422878575     

 

Powered By Sangraha 9.0