पार्वती दत्ता आणि महागामी नृत्य गुरुकुलाचा वेगळा प्रयोग

06 Mar 2018 18:15:00

 

 देश-परदेशात आपल्या संगीत परंपरेचा धागा गुंफत जागतिक पातळीवर एक कलात्मक वस्त्र विणण्याचे मोठे कामही पार्वती दीदी करत आहेत. स्वत:ची कला जपताना व विकसित करताना याच कलेचा सम्यक विचार करत प्रत्यक्ष कृती करण्यातही शक्ती खर्च करावी, ही वृत्ती खरेच गौरवास्पद आहे.

लाकारांच्या चरित्रात नेहमी आढळणारी बाब म्हणजे त्यांनी मेहनतीने कला कशी आत्मसात केली, गुरूकडे राहून कष्टाने ज्ञान मिळवले, प्रचंड रियाज केला आणि त्यांच्या कलेला रसिकांनी कसा प्रचंड प्रतिसाद दिला, विविध पुरस्कार कसे प्राप्त झाले....

पण आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाबरोबरच कलेबाबत प्रशिक्षण देणारी, डोळसपणे अभ्यास करणारी, या क्षेत्रातील विद्वानांना सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचे भांडार रसिकांसाठी व अभ्यासकांसाठी खुले करणारी एखादी संस्था स्थापन करणे आणि ती चिवटपणे दीर्घकाळ चालविणे ही फार दुर्मीळ गोष्ट आहे.

औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन शिक्षण संस्थेत 'महागामी' गुरुकुलाच्या रूपाने सुप्रसिध्द नृत्यांगना पार्वती दत्ता गेली 21 वर्षे असा प्रयोग चालवीत आहेत.

मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या पार्वती दीदी (त्यांना त्यांच्या शिष्या आणि या गुरुकुलाशी संबंधित सर्व जण याच नावाने ओळखतात) वडिलांच्या नोकरीनिमित्त भोपाळला आल्या. भोपाळच्या वास्तव्यात त्यांच्या बाबतीत एक फार चांगली गोष्ट घडली - त्यांची हिंदी भाषा अतिशय वळणदार, शुध्द, माधुर्यपूर्ण बनली. अन्यथा बंगाली भाषिकांची किंवा हिंदीखेरीज अन्य भाषिकांची हिंदी कानाला इतकी गोड वाटत नाही. सुप्रसिध्द नर्तक पद्मविभूषण गुरू केलुचरण महापात्रा यांच्याकडून त्या ओडिसी आणि नर्तक गुरू पं. बिरजू महाराज यांच्याकडून त्या कथ्थक शिकल्या.

आपले शिक्षण चालू असतानाच त्यांच्या मनात संगीत शिक्षण देणारी आगळीवेगळी संस्था असावी असे विचार चालू झाले. संगीताचे आद्य ग्रंथ अभ्यासत असताना शारंगदेवाचा ग्रंथ 'संगीत रत्नाकर' त्यांच्या हातात लागला. मूळचे काश्मीरचे असलेले शारंगदेव देवगिरीच्या यादवांच्या दरबारात संगीतज्ञ म्हणून होते. देवगिरी किल्ल्यावर या ग्रंथाची रचना झाली. या परिसरांतील वेरूळ, अजिंठा लेण्यांमधील मूर्तींच्या नृत्यमुद्रा पार्वती दीदींना मोहवत होत्याच. औरंगाबाद शहराला लागून विद्यापीठ परिसरात ज्या लेण्या आहेत, त्यात 'आम्रपालीचे नृत्य-वादन-गायन' असे एक शिल्प आहे. भारतातातील नृत्य-गायन-वादनाचा हा सगळयात जुना शिल्पांकित पुरावा मानला जातो. हा जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे.

या सगळया वातावरणाने भारून जाऊन पार्वती दीदींना असे वाटले की ज्या परिसरात गेली दोन हजार वर्षे संगीताचे वातावरण राहिलेले आहे, जिथली सांगीतिक परंपरा खूप समृध्द आहे, त्याच परिसरात संगीत शिक्षण देणारे आगळेवेगळे गुरुकुल स्थापन केले पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी चाचपणी सुरू केली. महात्मा गांधी मिशन शिक्षण संस्थेच्या अंकुशराव कदम यांना त्यांचा प्रस्ताव पसंत पडला. त्यांच्या परिसरात त्यांनी 'महागामी' गुरुकुलाला जागा दिली, शिवाय सर्व साहाय्य केले.

वारली चित्रांनी सजलेल्या आकर्षक भिंती, उंचच उंच वाढलेल्या वृक्षांची घनदाट छाया, प्लास्टिकसारख्या कृत्रिम वस्तूंचा वापर न करता लाकूड, धातू यांपासून तयार केलेले फर्निचर, नृत्य करताना वापरावयाची सुती वस्त्रे, जुन्या परंपरेतील दागिने, केशभूषेचे अस्सल भारतीय बाज अशा कितीतरी बाबींतून या गुरुकुलाचे वैशिष्टय न सांगताही पाहणाऱ्यांच्या डोळयात-मनात ठसते. इथल्या विद्यार्थ्यांची सुंदर संस्कृतमिश्रित शुध्द हिंदी हेसुध्दा एक वैशिष्टयच आहे.

ओडिसी आणि कथ्थक शिकवीत असताना केवळ नृत्यच नाही, तर एकूणच वागण्यात सुसंस्कृतपणा रुजविण्याकडे दीदींचा कल असतो. या परिसरात एक बंदिस्त आणि एक खुले असे दोन रंगमंच आहेत. जेव्हा रसिकांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते, तेव्हा सगळया परिसरात पणत्या पेटविल्या जातात. दगडी बाकांवर सुती सतरंज्या अंथरल्या जातात. पुरुषांसाठी कपाळाला गंध आणि स्त्रियांसाठी फुलांचे गजरे यांची व्यवस्था केली जाते. मंचावर कधीही कुठलेही भडक बॅनर पाठीमागे लावले जात नाही. नृत्याच्या मोठया कार्यक्रमांसाठी रेकॉर्डेड संगीत न वापरता वादकांना खास आमंत्रित केले जाते. कथ्थकसाठी सारंगी-तबला, तर ओडिसीसाठी बासरी-पखावज वादकांना सन्मानाने बोलावून रसिकांना नृत्याबरोबरच प्रत्यक्ष वादनाचाही आस्वाद दिला जातो.

केवळ मनोरंजनाच्या हेतूने अथवा शृंगाराचा उद्देश समोर ठेवून सादर केल्या जाणाऱ्या कलांना आणि कलाकारांना इथे बोलाविले जात नाही, तर आपल्या प्रदीर्घ तपश्चर्येने, रियाजाने ज्यांनी कलेची जोपासना केली आहे, अभ्यास केला आहे अशा कलाकारांनाच 'शारंगदेव समारोहा'त आमंत्रित केले जाते. मग यात बाउल संगीतासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या पार्वती बाउल असोत की दुर्मीळ अशा वीणा वाजविणाऱ्या ज्योती हेगडे असोत की मार्गनाटयसारखा हजार वर्षांपूर्वीचा कलाप्रकार जपणारे पियल भट्टाचार्य असोत.

पार्वती दीदींनी स्वत:चा कलात्मक विकास करत असताना या परिसरातील कलेचा जो अभ्यास सुरू ठेवला आहे, तोसुध्दा फार महत्त्वपूर्ण आहे. ओदिशा आणि महाराष्ट्र यांच्यात हजारो कि.मी.चे अंतर. पण वेरूळमधील शिल्पांत मूर्तींमध्ये ज्या मुद्रा आहेत, त्या ओडिसी नृत्य प्रकारातील मुद्रांशी कशा जुळतात, याचा त्या बारकाईने अभ्यास करत आहेत. या दोन ठिकाणच्या राजवटींतील कलाकारांमध्ये आदानप्रदान होत असणार, असे त्यांचे प्रतिपादन आहे.

जगप्रसिध्द कैलास लेण्यात शिवाची नटराज मूर्ती आहे. ही मूर्ती सर्वत्र पूजल्या जाणाऱ्या तंजावरच्या या 'उल्लोलितपाद नटराज' मूर्तीपेक्षा जुनी आहे. ही मूर्ती 'लोलितपाद' नटराज असून, कलेच्या सादरीकरणापूर्वी आपण याचीच पूजा कशी केली पाहिजे अशा बाबी त्या अभ्यासाने आग्रहपूर्वक ठासून सांगतात, तेव्हा त्यांचा या प्रदेशाबद्दलचा अभिमान जाणवत राहतो.

शिष्यांना ओडिसी व कथ्थक शिकविण्याची त्यांची पध्दतही अभिनव अशीच आहे. पहिल्यांदा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यातून त्यांची निवड केली जाते. त्यांना काय शिकवायचे, कथ्थक की ओडिसी? याचा निर्णय गुरुकुलाच्या वतीनेच घेतला जातो. गुरुपौर्णिमेला या गुरुकुलाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. वर्षभर शिष्यांना शिकवीत असताना पालक सभा म्हणून पालकांसमोर त्यांना सादरीकरण करायला सांगितले जाते. स्वत: पार्वती दीदी प्रत्येक शिष्याचे नृत्य पाहून पालकांसमोरच सूचना करतात. उणिवा दाखवून देतात. आपण वर्षभर काय आणि कसे शिकविले, हे पालकांनाही समजावून सांगतात. त्या स्वत: उत्कृष्ट नृत्यांगना आहेतच;  शिष्यांना शिकवताना त्या ज्या पध्दतीने स्वत: मुद्रा करून दाखवतात, ते फारच परिणामकारक ठरते. त्याशिवाय आमंत्रित हजारो रसिकांसमोर वर्षातून त्या किमान दोन तरी मोठी वाटणारी सादरीकरणे करून शिष्यांसमोर एक वस्तुपाठच ठेवतात.

या वर्षी शारंगदेव समारोहात त्यांनी 'धृपदांगी कथ्थक' हा स्वत: शोधून काढलेला व विकसित केलेला, अभ्यासलेला नृत्यप्रकार सादर करून रसिकांना, अभ्यासकांना आणि शिष्यांना चकित केले. कथ्थक हे केवळ मोगलांच्या दरबारातून पुढे आले, विकसित झाले असे नसून पूर्वीच्या ग्रंथांत, परंपरांत त्याचे धागे कसे सापडतात, इतकेच नाही, तर कथ्थकचे महाभारतकालीन संदर्भही कसे आहेत हेही त्यांनी अभ्यासातून उलगडून दाखविले आहेत.

लोककलांच्या बाबतीतही दीदी जागरूक आहेत. शारंगदेवाच्या संगीत रत्नाकरमध्ये उल्लेख असलेल्या 'किन्नरी वीणा' या वाद्याचा शोध घेत त्यांनी तेलंगणातील एकमेव कलाकार शोधून काढला. या जानेवारीत रसिकांसमोर त्याचे सादरीकरण करण्यात आले. याच पध्दतीने डवरी गोसावी वाजवतो त्या छोटया सारंगीचा शोध या गुरुकुलाला नुकताच लागला आहे. त्याचेही सादरीकरण इथे आता होणार आहे.

संगीत परंपरा डोळसपणे अभ्यासत असताना आपल्या या परंपरांचा प्रभाव इतरांवर कसा पडतो, याचाही शोध पार्वती दीदी घेतात. चीनमध्ये भरतनाटयम शिकवणाऱ्या इशा दीदी (जीन शान शान) यांच्या परदेशी छोटया शिष्यांचे भरतनाटयमचे सादरीकरण नुकतेच या गुरुकुलात झाले. मलेशियाचे ओडिसी नर्तक रामली इब्राहीम यांनी या वर्षी त्यांची कला शारंगदेव महोत्सवात सादर केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना भारत सरकारने पद्मश्री जाहीर केले. देश-परदेशात आपल्या संगीत परंपरेचा धागा गुंफत जागतिक पातळीवर एक कलात्मक वस्त्र विणण्याचे मोठे कामही पार्वती दीदी करत आहेत. स्वत:ची कला जपताना व विकसित करताना याच कलेचा सम्यक विचार करत प्रत्यक्ष कृती करण्यातही शक्ती खर्च करावी, ही वृत्ती खरेच गौरवास्पद आहे.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.

9422878575

Powered By Sangraha 9.0