गरजूंच्या मुखी घास घालणारी गृहिणींची 'धान्य बँक'

06 Mar 2018 16:43:00

  उज्ज्वलाताई म्हणाल्या,''आपला चांगला वेळ  वाया जातोय. आपण तो सत्कारणी लावण्यासाठी काही तरी केलं पाहिजे.'' त्या वेळी उज्ज्वलाताईंनी धान्य बँकेची आणि अन्नदान करण्याची संकल्पना मांडली. सगळयाच बाजूंनी ही कल्पना गृहिणींना पटली आणि 'वुई टुगेदर ग्रूप' तयार झाला आणि त्यातूनच धान्य बँकही सुरू झाली. गृहिणीही असे सामाजिक कार्य करण्यात आपले योगदान देऊ  शकतात ही भावना त्यांना अधिक सक्षम करत आहे.

भारतीय संस्कृतीत ज्या दानांना विशेष महत्त्व आहे, त्यापैकी अन्नदान हे महत्त्वाचे मानले जाते. त्यामागचा शास्त्राधार, पुण्यकल्पना काहीही असोत, मात्र भुकेची जाणीव, उपाशी राहण्याची विवंचना असणाऱ्या गरजूंची संख्या आजच्या काळातही कमी नाही. सामाजिक कार्याचे अनेक आयाम उपलब्ध असतात. त्यात अन्नदानाच्या माध्यमातून आपला खारीचा वाटा उचलावा अशी जाणीव काही गृहिणींना झाली. त्यातून उभी राहिली ती आगळीवेगळी 'धान्य बँक'. ठाण्याच्या उज्ज्वला बागवाडे यांनी या धान्य बँकेची कल्पना पुढे आणली आणि त्याद्वारे आज काही गरजूंची भूक भागवली जात आहे.

एरव्ही गृहिणी म्हटल्या की फक्त आपल्या कुटुंबापुरता विचार करणाऱ्या, केवळ आपल्या परिघापुरता विचार करणाऱ्या अशी एक सर्वसाधारण प्रतिमा असते. अर्थात कोणत्याही पुरुषापेक्षा किंवा करिअरिस्ट महिलेपेक्षा गृहिणीचे काम नक्कीच दुय्यम नसते. त्या घरातील प्रत्येक सदस्याची, त्याच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यासाठी रात्रंदिवस झटतात. घर स्वच्छ, नीटनेटके ठेवतात. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांनाही एकत्र ठेवतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या करतात ती म्हणजे घरातील कोणतीच व्यक्ती कधी उपाशी राहणार नाही याकडे लक्ष देतात. हे सर्व करण्यासाठी लागणारी ऊर्जा काही कमी नसते. उज्ज्वलाताई स्वत: गृहिणी असल्याने त्यांना गृहिणींच्या या गुणांची कल्पना होतीच. त्याचबरोबर गृहिणींकडे बऱ्यापैकी मोकळा वेळ असतो, याची जाणीवही होती. विशेष म्हणजे उज्ज्वलाताईंना स्वत:ला सामाजिक कामाची ओढ होती. पण त्यात आपण कोणते योगदान कसे द्यायचे हे त्यांना कळत नव्हते. एखाद्या चांगल्या सेवाभावी संस्थेचे कार्य त्यांना कळायचे किंवा त्यांच्या वाचनात यायचे, तेव्हा त्या संस्थेशी संपर्क साधून आवर्जून त्यांच्या कामाचे कौतुक करत असत. या दिशाहीन सद्विचारांना योग्य दिशा मिळाली ती दोन संस्थांमुळे. एक म्हणजे बीडची शांतिवन. दीपक नागरगोजे यांची ही संस्था. ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी काम करते. अशा अनेक मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी या संस्थेने उचलली आहे. 300-350 मुले शांतिवनमध्ये आहेत. त्यापैकी काही जण एमबीबीएसपर्यंतही शिक्षण घेऊ शकले आहेत. तर दुसरी संस्था कर्जत येथील श्रध्दा फाउंडेशन. मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी ही संस्था डॉ. भारत वाटवानी यांच्या माध्यमातून चालवली जाते. धान्य बँक सुरू केल्यानंतर या दोन संस्थांना धान्य पुरवण्याचे उज्ज्वला बागवाडे यांनी ठरवले.

या सगळयाची सुरुवात झाली ती एका नियतकालिकात या दोन संस्थांविषयी आलेल्या लेखांपासून. या दोन संस्थांचे काम वाचल्यानंतर उज्ज्वलाताई मधील सामाजिक भान जागे झाले. त्यांची उत्सुकता इतकी वाढली की बीडला जाऊन 'शांतिवन'चे काम पाहण्याचे त्यांनी ठरवले आणि त्या तिथे जाऊन पोहोचल्याही. संस्थेचे काम पाहिल्यानंतर जाणे वाढले, त्यांचे काम अधिक नीटपणे लक्षात येऊ लागले. त्याबरोबर असेही लक्षात आले की, आपण 2-3 दिवसांसाठी शांतिवनात जातो, पण काही काम करत नाही. त्यांना आपली तशी काही मदत होत नाही. त्यापेक्षा आपल्या परिसरात राहूनच त्यांच्यासाठी काही करता येईल का, याचा विचार उज्ज्वलाताई करू लागल्या. मग एक दिवस सगळया मैत्रिणींना त्यांनी घरी बोलावले. सगळया मिळून 12-13 जणी होत्या. उज्ज्वलाताई त्यांना म्हणाल्या, ''आपला चांगला वेळ वाया जातोय. आपण तो सत्कारणी लावण्यासाठी काही तरी केलं पाहिजे.'' तेव्हा सगळयांच्या चर्चेतून जाणवले की, काहीतरी करायचे हे मान्य आहे, पण काय करायचेय ते कळत नाही. वेळ सत्कारणी लावायचा म्हणजे नेमके काय करायचे? कोणाला मदत करायची?

त्या वेळी उज्ज्वलाताईंनी धान्य बँकेची आणि अन्नदान करण्याची संकल्पना मांडली. शांतिवनसारख्या संस्थेत 300-350 विद्यार्थ्यांच्या जेवणाचा खर्च कमी नसणार. संस्थेच्या अन्यही गरजा आहेत. पैसे संपले तर एखादे काम थांबवता येते, पण जेवणाचे काय? काही झाले तरी मुलांचे जेवण थांबवता येत नाही. त्यामुळे त्याची जबाबदारी आपण घ्यायची, असे या महिलांनी ठरवले. त्यासाठी गृहिणींचेच बचतीचे तत्त्व उपयोगी पडले. दर महिन्याला एक-एक किलो धान्य जमा करायचे किंवा दर महिन्याला धान्य जमा करण्याऐवजी तीन महिन्यांतून एकदा तिन्ही महिन्यांचे धान्य जमा करायचे. पण 13 जणींमधून असे कितीसे धान्य जमा होणार? मग इतरांकडूनही असे धान्य जमा करावे लागणार होते. परंतु कोणाही समोर हात न पसरणे हा गृहिणींचा आणखी एक स्वभाव. त्यामुळे प्रत्येकीने आपल्याच परिचयातील, कुटुंबातील 10 जणींना धान्य बँकेचे सदस्य करायचे, असे ठरवले. म्हणता म्हणता 143 महिला धान्य बँकेच्या सदस्य झाल्या. मग प्रश्न होता तो धान्य गोळा कसे करायचे? 1 किलो धान्य, पण ते कुठले द्यायचे, हे त्या महिलेने ठरवायचे. धान्य द्यायचे नसेल, तर धान्यासाठी किमान 50 रुपये महिना - म्हणजे 3 महिन्यांतून 150 रुपये आणि वर्षाचे 600 रुपये जमा करायचे. ही रक्कम तशी फार नव्हती. त्यामुळे सगळयाच बाजूंनी ही कल्पना गृहिणींना पटली, 'वुई टुगेदर ग्रूप' तयार झाला आणि त्यातून धान्य बँकही सुरू झाली. सदस्य झालेली प्रत्येक गृहिणी आपल्या परिचयातील महिलांना यात जोडते. अडीच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे आणि सदस्यांची संख्या 450च्या वर आहे.

शांतिवनबरोबरच ज्या संस्थेची निवड अन्नधान्यासाठी करण्यात आली, ती म्हणजे श्रध्दा फाउंडेशन. त्याबाबतचाही एक वेगळा किस्सा उज्ज्वलाताई सांगतात. आपल्याला रस्त्यावर फिरणारे अनेक मनोरुग्ण दिसतात. अनेकदा ते चांगल्या घरातील असतात आणि आपल्या घरापासून, कुटुंबापासून हरवलेले असतात. डॉ. वाटवानी केवळ त्यांना बरे करत नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसनही करतात. उज्ज्वलाताईंना एका बसस्टॉपवर अशी एक वेडसर तरुणी नियमित दिसायची. तिला त्या कधी कधी बिस्किटाचा पुडा द्यायच्या. तिच्याशी बोलण्याचा त्या प्रयत्न करायच्या, तेव्हा ती बऱ्या घरातील असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हळूहळू तिच्याशी त्यांचे भावनिक बंध जुळू लागले. त्यांना तिची काळजी वाटू लागली. श्रध्दा फाउंडेशनविषयी त्यांनी वाचलेले होतेच. एक दिवस संस्थेत फोन करून त्या मुलीविषयी सांगितले. दुसऱ्याच दिवशी संस्थेची गाडी आली आणि तिला घेऊन गेली. दोन महिन्यांनी डॉक्टरांकडून फोन आला. ''आप की पेशंट ठीक हो गई है। मिल के जाओं।'' उज्ज्वलाताई मैत्रिणीसह कर्जतला गेल्या. त्या मुलीने त्यांना पाहिले आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडली. ''मेरे लिए बिस्किट नही लायी क्या?'' म्हणून तिने विचारले. ती उत्तर प्रदेशमधील एका गावातली असल्याचे कळले होते. तिथून दीड वर्षांपासून ती बेपत्ता होती. संस्थेने तिला तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले. उज्ज्वलाताई सांगतात, ''डॉक्टर केवळ अशा रुग्णांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवत नाहीत, तर त्या भागात या मानसिक आजाराविषयी जनजागृतीही केली जाते. तिथल्या स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने हे केले जाते. शिवाय त्या रुग्णाला दोन वर्षे विनामूल्य औषधे पाठवली जातात. डॉक्टर वाटवानींमुळे आज असे अनेक रुग्ण त्यांच्या घरी पोहोचले आहेत. अन्यधा आपण पाहतो की, अशा रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना एक दिवस रस्त्यावरच मरावे लागते.''

या संस्थेसाठीही धान्याची गरज असल्याचे उज्ज्वलाताईंच्या लक्षात आले. खरे तर दोन्ही संस्थांविषयी त्यांना धान्य बँकेचे काम सुरू होण्याच्या आधीपासून माहीत होते. विशेष म्हणजे त्यांचे काम त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते आणि त्यांना त्याचे महत्त्व पटले होते. त्यामुळे धान्य बँकेतून करावयाच्या अन्नदानासाठी या दोन्ही संस्था प्राधान्याने त्यांच्या डोळयांसमोर होत्या. त्याचबरोबर सुरेश राजहंस यांची 'सेवाश्रम' या आणखी एका संस्थेलाही 'धान्य बँक' मदत करते. या संस्थेत तमासगिरांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते. ही संस्था छोटी असून 20-25 मुले येथे शिक्षण घेतात.

 

उज्ज्वलाताई सांगतात, ''श्रध्दा फाउंडेशन मुंबईनजीक असल्यामुळे आम्ही त्यांना धान्य पाठवतो. त्यांची ते रिसीट पाठवतात. पण बीडला धान्य पाठवणे अधिक त्रासाचे आणि खर्चीक असते. त्यासाठी नगरच्या एका दुकानाशी आम्ही टायअप केले आहे. अमुक अमुक रकमेचे धान्य संस्थेला द्यायचे आहे, असे आम्ही कळवतो. संस्थेलाही सांगतो. मग संस्था आपल्या गरजेनुसार त्या रकमेचे धान्य दुकानातून घेते. या अन्नदानामुळे शांतिवनचे वर्षाला 3-4 लाख रुपये वाचतात. त्यातून विद्यार्थ्यांना इतर सुविधा पुरवणे त्यांना शक्य होते. तर श्रध्दा फाउंडेशनचेही सुमारे 2 लाख रुपये वाचतात. त्यामुळे रुग्णांना चांगल्या मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठवण्यासाठी त्या पैशांचा उपयोग करता येतो. शिवाय या संस्थांची बरीच ऊर्जाही वाचते.''

शिवाय इतर संस्थांनाही तत्कालीन अन्नदान करण्याचा 'धान्य बँके'च्या सदस्यांचा प्रयत्न असतो. ठाण्याला वर्षातून एकदा पॅराप्लेजिक स्पर्धा होतात. त्यासाठीही अन्नदान केले जाते. ही तत्कालीन मदत करण्यासाठी या मंडळींनी आणखी एक उपक्रम शोधला आहे, तो म्हणजे 'आय गिव्ह माय रद्दी टू यू'. घरातली रद्दी म्हटली तर अडचण. तीच कोणीतरी घरी येऊन घेणार असेल आणि त्यातून सामाजिक कार्याचे समाधान मिळणार असेल, तर कोण नकार देईल! ही रद्दी विकून मिळणाऱ्या पैशांतून अशी तत्कालीन धान्याची मदत केली जाते. या रद्दी उपक्रमाचा दुहेरी फायदा होत असल्याचे उज्ज्वलाताई सांगतात - एक म्हणजे रद्दी घेण्याच्या निमित्ताने एखाद्याच्या घरी गेल्यावर धान्य बँकेची माहिती दिली जाते. त्यातून नवे सभासद मिळतात आणि दुसरा म्हणजे धान्य बँकेचे सदस्यही आपली रद्दी देतात.

शिवाय फेसबुकसारख्या समाजमाध्यमाचा उपयोग करून आपल्या वाढदिवसाला स्वतःची धान्यतुला करण्याचे आणि त्याचे दान करण्याचे आवाहन उज्ज्वलाताई करतात. कारण सगळेच जण धान्य बँकेचे सदस्य होऊ  शकत नाहीत. पण त्यासाठी सहकार्य करण्याची अनेकांची इच्छा असते. या 'धान्यतुला' करण्याच्या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उज्ज्वलाताई सांगतात.

हे सर्व करत असताना कमालीची पारदर्शकता राखली जाते. बॅनर तयार करणे, माहिती पत्रक तयार करणे, प्रवास, यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चासाठी धान्य बँकेचे मूळ सभासद (13 जणी) दरमहा 50 रुपये वेगळे काढतात. धान्य बँकेच्या सदस्या जेव्हा आपण मदत करत असलेल्या संस्थांना भेट देतात, तेव्हा आपण करत असलेल्या या छोटयाशा सहकार्याचे त्यांना खूप समाधान मिळते. गृहिणीही असे सामाजिक कार्य करण्यात आपले योगदान देऊ  शकतात ही भावना त्यांना अधिक सक्षम करते.

या कामातील सातत्य राखण्यासाठी प्रत्येकाने तहहयात सदस्य राहणे ही अट असते. कारण या संस्था काही अंशी तरी धान्य बँकेच्या या उपक्रमावर अवलंबून असतात.

उज्ज्वलाताई सांगतात, ''या संस्थांना आपण चार महिनेच धान्य देऊ  शकतो. आमचे ध्येय त्यांना वर्षभर पुरेल इतके धान्य देण्याचे, शिवाय अधिकाधिक संस्थांना या प्रकारे मदत करण्याचे आहे.''

या सर्व उपक्रमात उज्ज्वलाताईंना त्यांच्या कुटुंबाचा मोठा पाठिंबा होता. पण धान्य बँकेच्या अन्य सदस्यांच्या कुटुबांनाही त्या करत असलेल्या सेवा कार्याचे नक्कीच कौतुक वाटत असणार. यातून प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही अशा प्रकारची धान्य बँक तयार करावी, असे आवाहन उज्ज्वलाताई करतात.

महिलांमध्ये उपजतच सेवाभाव असतो. त्यामुळे त्या असे सामाजिक काम आधिक सद्भावनेने करू शकतात. समाजात इतक्या वाईट गोष्टी घडत असल्याचे आपण ऐकलो, वाचतो, पाहतो, त्या पार्श्वभूमीवर काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत, अशी सकारात्मक भावना त्या व्यक्त करतात. ही सकारात्मकता दारोदारी फुलली, तर अशा अनेक धान्य बँका चांगल्या कार्यासाठी तयार होतील, हे निश्चितच.

9594961851

 

Powered By Sangraha 9.0