चैत्र शुद्ध नवमी देशभर ‘रामनवमी’ म्हणून थाटामाटाने साजरी होते. भगवान राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीच्या महावस्त्राचे उभे-आडवे रेशीमधागे आहेत. रामनवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, तसाच राम दासाभिमानी समर्थ संत रामदास स्वामींचाही जन्म झाला. त्यामुळे महाराष्ट्रात रामनवमीला देवाची व दासांची जन्मतिथी म्हणून दुहेरी महत्त्व आहे. कालच (दि. २५ मार्च रोजी) देशात रामनवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली आहे. सज्जनगड, चाफळ, शिवथर घळ, समर्थ वाग्देवता मंदिर (धुळे) या प्रमुख ठिकाणांसह काळाराम मंदिर (नाशिक), साईबाबा समाधी मंदिर (शिर्डी) येथेही मोठ्या यात्रेसह रामनवमी उत्सव साजरा झाला आहे. या निमित्ताने आपण समर्थांच्या ‘मनाच्या श्लोकातील’ रामाचे दर्शन घेऊ या.
भगवान राम हे रामदासांचे केवळ आराध्य दैवतच नव्हे, तर त्यांचे गुरू होते. वयाच्या आठव्या वर्षी रामदासांना (नारायण ठोसर) जांब येथे प्रभू रामाचा साक्षात्कार होऊन अनुग्रह लाभला होता. त्यानंतर नाशिकजवळील टाकळी येथे तपाचरण करीत असताना रामदासांनी वाल्मिकी रामायणाची स्वहस्ते प्रतिलिपी तयार केली होती. ती आजही धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिर येथे उपलब्ध आहे. राम हाच समर्थांचा प्राण होता. रामाचे दास्यत्व हाच त्यांचा अभिमान होता. ‘रघुनाथ भजने ज्ञान झाले’, ‘रघुनाथ भजने महत्त्व वाढले’ असे समर्थांनी लिहून ठेवलेले आहे. ‘रघुनाथ स्मरोनि कार्य करावे’ हे त्यांचे ब्रीद होते. समर्थांनी भारतभ्रमण करून सातारा परिसरात कृष्णेकाठी आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला, तो चाफळ येथे राम मंदिर बांधून व रामनवमी उत्सव सुरू करून.
मनाच्या श्लोकामध्ये श्रीरामाचा उल्लेख वारंवार येतो. ‘सदा सर्वदा प्रीती रामी धरावी।’, ‘मना राघवाविण आशा नको रे’, ‘करी रे मना भक्ती या राघवाची‘, ‘दीनानाथ हा राम कोदंडधारी।’ अशा वेगवेगळ्या अर्थांनी, वेगवेगळ्या पद्धतींनी मनाच्या श्लोकामध्ये रामदर्शन घडते. एवढेच नव्हे, तर ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।’ चरण २८ ते ३७ या दहा श्लोकांत येतो, तसेच ‘मना सज्जना राघवी वस्ती कीजे।’ असा चरण ३८ ते ४७मध्ये पाच वेळा आढळतो. ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा।’ हा चरण ६७ ते ७६ असा दहा वेळा समर्थ वापरतात. याशिवायही काही चरणांमध्ये राघवाचा उल्लेख आहे. यावरून समर्थांचे जीवन, दष्टी आणि उपदेश कसा राममय झालेला होता, हेच दिसून येते.
रामनामाचा असा विविध प्रकारे उपयोग समर्थ का करतात? तर त्यांच्या दृष्टीने रामनामाने सर्व दोष जातात, पुण्याचा साठा होतो, मनुष्यजीवनाला गती लाभते, भय नष्ट होते, चिंता दूर होते, सर्व संकटसमयी राम रक्षण करतो, रामनाम हे सुखानंद कैवल्यदानी आहे, काम-क्रोध-मद-मत्सरापासून मुक्ती मिळते, विवेक जागृत होतो आणि विवेकाने क्रिया पालटते, सदाचाराकडे प्रवृत्ती होते. भक्ताचे जीवन पूर्णकाम होते. देहबुद्धी नष्ट होते, आत्मबुद्धी उदय होते. सत्संगाची रती वाढते. घडीने घडी जीवन सार्थकी लावावेसे वाटते. थोडक्यात - ‘रघुनाथ स्मरोनी कार्य करावे।’ असे समर्थ केवळ सांगत नाहीत, तर त्यांच्या प्रत्येक कार्यात रघुनाथाचे स्मरण आढळते, समर्थ म्हणतात, ‘‘रघुनायका दृढ चित्ती धरावे।’’ यातून आपल्या इष्टदेवतेविषयी दृढ भाव - अविचल निष्ठाभाव ठेवला पाहिजे, हा बोध भक्तांनी घेतला पाहिजे. ‘न बोले मना राघवेवीण काही’ हा त्यांचा उपदेश लक्षात घेतला, म्हणजे समर्थांनी मनाच्या श्लोकात इतक्या वेगवेगळ्या प्रकारे रामाचा उल्लेख का केला आहे, त्याचा उलगडा होतो.
मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी रामायणातील अहिल्या, हनुमान आणि बिभीषण या तिघांचा उल्लेख केलेला आहे. ३२व्या श्लोकात समर्थ म्हणतात - ‘अहिल्या शिळा राघवे मुक्त केली। पदी लागता दिव्य होऊनि गेली।’. रामायणातील अहिल्याची कथा सर्वांनाच परिचित आहे. पण खरे तर ही कथा वाल्मिकी रामयणात नाही. मात्र गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’मध्ये आहे. वाल्मिकी रामायण मानणार्या समर्थांनी मग मनाच्या श्लोकात अहिल्याचा उल्लेख का केला? हा प्रश्न पडतो. समर्थभक्त व अधिकारी अभ्यासक सुनील चिंचोळकर याबद्दल म्हणतात - ‘‘जनमानसात रामचरितमानसमधील अहिल्येची कथा रूढ होती आणि समाजसंघटना करणार्या समर्थांनी लोकश्रद्धेचा विषय म्हणून ती स्वीकारली.’’ अहिल्येचा तिरस्कार न करता करुणाकर प्रभू रामचंद्र तिचा उद्धार करतात.
मनाच्या श्लोकामध्ये‘ ‘चिरंजीव केले जनी दास दोनी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।’ या चरणात दोन चिरंजीवांचा उल्लेख आहे. हे दोन चिरंजीव म्हणजे हनुमान आणि बिभीषण. दोन्ही रामाचे निस्सीम भक्त. आपल्या भारतीय प्राचीन परंपरेने ७ जणांना चिरंजीव मानले आहे. ‘अश्वत्थामाबलिर्व्यासोहनुमांश्च बिभिषण। कृपः परशुरामश्चसप्तै ते चिरंजीविनः।’ हे ते सात चिरंजीव आहेत. या श्लोकानुसार १) अश्वत्थामा, २) बली, ३) व्यास, ४) हनुमान, ५) बिभीषण, ६) कृपाचार्य आणि ७) परशुराम हे ते सात चिरंजीव आहेत. या ७पैकी हनुमान व बिभीषण हे दोघे रामकृपेने चिरंजीवपदी विराजमान झाले आहेत. त्यायोगे ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।’ हे ब्रीद रामाने सिद्ध केले, असे समर्थांनी प्रतिपादन केले आहे.
| श्रीराम जय राम जय जय राम |
विद्याधर ताठे
९८८१९००७७५,